जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, September 1, 2009

मैत्र जीवाचे

( फोटो: दिल चाहता हैं चित्रपटातील आहे )

टीना आणि मीनाची गाढ मैत्री होती. यथावकाश त्या मोठ्या झाल्या आणि एक दिवस टीनाचे लग्न होऊन ती दूर निघून गेली. मीनाला तिची फार आठवण येई म्हणून ती टीनाला वारंवार पत्र पाठवत असे. पण टीनाचे उत्तर नाही. अशी बरीच पत्रे पाठवल्यानंतर एकदाचे टीनाने उत्तर पाठवले. मीनाने मोठ्या उत्सुकतेने पत्र उघडले तर काय..... टीनाने फक्त एकच ओळ लिहिली होती, " मी ठीक आहे. " बस इतकेच...... मीनाला अतिशय वाईट वाटले पण तरीही तिने पुन्हा पत्र पाठवायचे ठरवलेच. मीनाने लिहिले, " तुझी खुशाली कळल्याने माझ्या काळजावरचा मोठ्ठा धोंडा उतरलाय. असो. मी तुला विपीने भेटवस्तू पाठवत आहे. ती तुला आवडली का ते जरूर कळव. " थोड्याच दिवसाने विपीने टीनाला भेटवस्तू आली. ती तिने पैसे देऊन स्वीकारली. भेटवस्तू चांगलीच वजनदार होती. त्यामुळे टीनाने घाईघाईने उघडून पाहिली. काय असेल बरे? भेटवस्तू म्हणून मीनाने एक मोठ्ठा धोंडाच पाठविला होता. आणि त्यासोबत एकच ओळ लिहिलेली चिठ्ठीही होती.
" प्रिय टीना, माझ्या काळजावरचा उतरलेला धोंडा मी तुला पाठवत आहे. मला खात्री आहे तो पाहून तुलाही बरे वाटेल. "

ही गोष्ट कोणीतरी मला मेलमध्ये धाडली होती. हा असा अनुभव आपल्यालाही कधीतरी येतोच. मग मनात अनेक प्रश्न निर्माण होतात:

माझी प्रिय मैत्रीण बरी असेल ना? तिला काहीतरी दुखते/खुपते आहे का? जे ती मला सांगू शकत नाही ( मनात असूनही ) म्हणून तर ती मला टाळत नसेल? मी तिला कशी मदत करू?

आता तिला माझी काय गरज? म्हणजे आपली मैत्री ही तात्पुरती काळानुरूप होती का? दूर गेली तरी मैत्री तर तितकीच राहू शकते ना?

आपली इतकी गाढ मैत्री होती मग आता काय झाले? असे का घडतेय? माझे काही चुकले असेल का/चुकते आहे का? मला जर तिने सांगितलेच नाही तर कसे कळावे?

मला ती जितकी जवळची वाटते तितकी ती मात्र मला आता मानत नाही/का कधीच मानत नव्हती? केवळ स्वार्थापुरतीच तिने माझ्याशी मैत्री केली का? का ती नेहमीच अशीच होती. मला वेडीलाच हे कळले नाही कधी. इतकी वर्षे बरोबर राहूनही आता तिला साधे दोन ओळींचे पत्रही मला धाडता येऊ नये?

असे अनेक प्रश्न आणि त्यांची कधीही न मिळणारी उत्तरे. अशावेळी काय करावे? मीनाने केलेली युक्ती खूपच आवडली. अगदी बिरबलाची आठवण आली. कदाचित टीनालाही तिची चूक कळेल. ( पण ही चूक जाणून बुजून केलेली आहे असे माझे मत आहे, तुम्हाला काय वाटते?) व ती पुन्हा असे वागणार नाही. मीनाला आपली मैत्रीण कशी आहे हे कळून चुकल्याने यापुढे ती पुन्हा तिच्या फंदात पडणार नाही. मात्र जर टीनाने संपर्क साधला तर मात्र खुल्या मनाने आधीचा उल्लेख टाळून तितक्याच प्रेमाने मैत्री ठेवेल. यापुढे कोणाशीची मैत्री करताना मीना नेहमीच अंतर राखून मैत्री करेल. का सगळेच टीनासारखे नसतात हा आशावाद मनात जागा ठेवून पुन्हा तितक्याच आवडीने, उत्सुकतेने नवीन मैत्रीचे बंध जोडेल.

काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.

मैत्री हे एक असे बंध आहे की जिथे शितावरून भाताची परीक्षा ही म्हण लागू होत नाही. आणि म्हणूनच मन एकदा पोळले तरी आपण फुंकून फुंकून का होईना पुन्हा पुन्हा मैत्री करतोच. नवीन स्नेह जोडतोच. थोडेसे जास्त डोळसपणे. आता आपल्यालाही कळलेले असतेच ना स्वतःच्या मनाला कसे जपायचे. मैत्रीत कुठवर जायचे. अतिपरिचयात अवज्ञा होऊ नये म्हणून कसे सांभाळायचे. एकदा का निरपेक्ष मैत्रीचा खरेपणा कळला की स्वार्थही हळूहळू गळून पडेलच.

नमक हराम मधले हे गाणे किती सुंदर व यथार्थ आहे पाहा.......


6 comments:

  1. Ase swarthi mitra naslelech changale. Tyanchya vagnyavar vichar karun aaple life ka kharab karayche? he shahanpan barach traas karun ghetlyavar mala suchale.
    Lekha nehmipramanech chaan.

    Lata Vichare.

    ReplyDelete
  2. लता स्वागत व आभार. काही गोष्टी त्रास देतातच.

    ReplyDelete
  3. खुप छान लिहिले आहेस श्री...किती ही मनाला त्रास झाला तरी मैत्रीचा मोह काही आवरता येत नाही.फ़रक इतकाच रहातो की खुप जास्त involement आपण होवु देत नाही.

    ReplyDelete
  4. हो ना गं माऊ असेच होते.

    ReplyDelete
  5. मी माझ्या मित्रा वर ऐवढे प्रेम करतो की, मि माझ्या आई वडिलांवर पण मी असे प्रेम कधी केले नसेल व करनार नाही. त्याने मला जिव जरी मागीतले तरी मि द्यायला तयार आहे. पण तो माझ्याबरोबर वेगळाच वागतो,नेहमी तोडून बोलतो. तो जर एक दिवस मला भेटला नाही तर मी एकटाच रडत बसतोँ . . . . मी देवाकडे एकच मागतो की आमची मैत्री शेवटच्या श्वासापर्यँत एकत्र टिकावी. मी काय करावे. मी तर त्याच्या शिवाय नाही राहू शकत. . his my heart pice. .

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !