जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, March 3, 2010

तेज : रक्षक की भक्षक?

मिल जळून भस्मसात या घटनेची भीषणता व आलेली विषण्णता अजूनही मनातून जात नाही. तसे पाहिले तर आजकाल ही तशी काही अघटित घटनाही नाही. अशा अनेक गोष्टी जाणूनबुजून घडवल्या जात होत्या-आहेत आणि घडत राहतील. आग मग ती अपघाताने-आपसूक लागलेली असो किंवा मुद्दामहून लावलेली असो, परिणाम तोच. राख. मालमत्तेची, आशा-आकांक्षांची, संसाराची, भविष्याची, कोसळलेल्या मनांची....... आगीत अतिशय सामर्थ्य असते. तिच्या वाटेत जे जे येईल ते सारे स्वाहा होऊन जाते. आगीचे असणे आणि नसणे हे दोन्हीही घातकच.

पोटाची आग जन्मापासूनच आपल्याला चिकटलेली असते ती अगदी मृत्यूपर्यंत. त्याहीनंतर आग आपली सोबत सोडत नाही. पाण्याने आग विझते खरी पण पाण्यात ती सामावलेलीही असते. जंगलात लागणारे वणवे अन धुमसणारी राने पाहिली की मला सतत माणसाचे आयुष्यभर धुमसणारे-जळणारे अंतरंग दिसते. जंगलातले वणवे बरेचदा माणसाच्या बेपर्वा वृत्तीने लागतात. एकदा लागले की मग ते कोणालाही आवरत नाहीत. मनाचेही असेच आहे. हे जळितं त्याचे संपूर्ण आयुष्य राख करत असते, अगदी त्याच्या डोळ्यासमोर. परंतु ही होरपळ स्वत:च करून घेतलेली आणि म्हणूनच न थांबवता येणारी. ” आग लावणे ’ चांगले नव्हेच. मग ती कुठली का असेना आणि कशी का लागेना.

पोटाची - उदरभरणासाठीची आग, निरनिराळ्या कारखान्यातील-भट्टीतील आग, दोहोंचे कार्य समान आहे. होळीची आगही स्वाहा करणारीच. या आगीत अनेकदा मनातील दुष्टता-स्वार्थ जळून जाण्याऐवजी नव्यानेच बखेडेही निर्माण होताना दिसतात. हृदयी जागी झालेली आग, एकतर प्रेमामुळे किंवा दुश्मनीमुळे. साध्या साध्या गोष्टींवरूनही अनेकदा आपला तोल जातो. चिडचिड, जिभेला हाड नसतेच त्यामुळे तिचा मनसोक्त वापर केला जातो. डोळे अंगार ओकू लागतात, शब्द तिरासारखे घुसतात-घायाळ करतात. बरेचदा हलके कान आणि होणारे गैरसमज आगीत तेल ओतत राहून अतिशय उग्र रूप धारण करतात. आजूबाजूचे स्वार्थी-कपटी लोक त्याला हवा देऊन ती अजूनच भडकवतात.

आग कधीच कोणालाही सोडत नाही. एकदा लागली की सारे काही भस्म केल्याशिवाय ती शमत नाही. समजूतदार लोकं नेहमीच आग कशी लागणार नाही याकडे लक्ष देतात. कारण एकदा का तीच्या ज्वाला आसमंताला भिडल्या की मग पाण्याचा शोध घेणे म्हणजे मूर्खपणाच आणि दांभिकताही. अनेकदा आपण पाहतो, जीवनाचा नाश करणाऱ्या आगीवरच काही लोक आपली पोळी भाजून घेतात. आता हे मिलचेच उदाहरण आहेच की ताजे. त्यांना ना कोणाबद्दल आस्था, ना सहानुभूती की कोणाच्या दु:खाची जाणीव. मी आणि माझा स्वार्थ, बास. आग लावून स्वत:च तमाशाई बनणारे हे लोक समाजासाठी-जीवनासाठी अत्यंत घातक आहेत. उजळ माथ्याने वावरणारे समाजकंटक-अतिरेकीच. आपल्यातच वावरणारे छुपे मानवी विध्वंसक बॉम्बंच.

अनेकदा आपण पाहतो, अगदी क्षुल्लक गोष्ट असते परंतु काही लोक राईचा पर्वत करतात. चार कानात एकदा का अफवा गेली की ती कधी चार हजार-चार लाख मनात पोचते हे कळतच नाही. जंगलाच्या आडव्यातिडव्या पसरत जाणाऱ्या वणव्या सारखी अफवा वाढत जाते. कोणा माहीत नसलेल्या व्यक्तीबद्दल सर्रास चर्चा, खुलेआम निंदा, चारित्र्यावर घाला घातला जातो. याच लोकांना चार दिवसांनी हेच पुन्हा विचारा त्यांना काहीच आठवत नसते. समोरचा बोलतोय मग मीही त्यापुढे जाऊन बोलले पाहिजे, त्यासाठी ती व्यक्ती माहीत असण्याची गरज काय. वाईट बोलायला विचार करावाच लागत नाही. सत्यताही पडताळून पाहावी लागत नाही. परंतु या अशा अफवांमुळे एखाद्याचे जीवन मात्र नष्ट होते. ही अफवांची आग बळी घेऊनच थांबते. कधी जीवाचा तर कधी संपूर्ण कुटुंबाचा - मनस्वास्थ्याचा, भविष्याचा.

माणसाला ताप आला की शरिरी आगीचा दाह त्याला जाळतो पण त्यावर औषध घेता येते, ते त्याला बरेही करते. परंतु मनावर झालेल्या खोल आघातांचे काय? अपमानाने पेटलेली आग सूडचक्र जागवते. सूडाला डोळे नसतात. असतो तो फक्त आंधळा प्रपाती दिशाहीन आवेग. निष्पत्ती फक्त विनाशच. खैरलांजी येथील भोतमांगे कुटुंबीयांचे हत्याकांड हे मानवतेला काळिमा फासणारे. या हत्या व महिलांची विटंबना हे अशाच एका आंधळ्या सूडाचे द्योतक आहेत.

एखादा प्रेमात पडला की नेहमी विचारणा होते, " काय रे, दोन्ही बाजूने प्रेमाची लागण झाली आहे ना? का मामला एकतर्फीच आहे? " दोघेही एकमेकांवर प्रेम करत असतील तर मग, अगदी चंद्राची शीतलता आणि चांदण्याची मोहकताही विरहाची आग जागवतात. कित्येक रात्री तळमळून चंद्राला दूषणे लावत काढल्या जातात. अनेक सिनेमात, कथा-कादंबऱ्यांत याची रसभरित वर्णने-प्रसंग आपण पाहतोच. ' चांद फिर निकला, मगर तुम ना आयें..... जला फिर मेरा दिल, करू क्या मै हायें......', ही अशी आर्तता जीवाला जाळीत असते. पण जर हे प्रेम एकतर्फी असेल तर भर दिवसा अनेक लोकांच्या साक्षीने रिंकू पाटील धडधडा पेटते- अत्यंत क्रूरपणे बळी जाते. अशा अनेक रिंकू पाटील समाजात सारख्या जळत असतात. ही प्रेमाच्या आगीची दाहकता तिचा-प्रेमाचाच बळी घेऊनही थांबत नाहीच.

पोटाची आग ही सगळ्यात भयंकर व घातकी. ही माणसाकडून काहीही करवून घेऊ शकते. उचित-अनुचित, चूक-बरोबर, सारासार विचार करण्याची शक्तीच खुंटवणारी पोटाची आग माणसाला मान-अपमान-स्वाभिमान साऱ्यांच्या पार घेऊन जाते. जोवर पोटात अन्न जात नाही तोवर माणूस त्याव्यतिरिक्त कसलाही विचार करू शकत नाही. ना त्याला घर चांगले वाटत ना दुनिया. उपाशी पोटी देवाचे नावही तो घेऊ शकत नाही. त्याचे सारे चित्त एकवटून तो ही आग कशी शमवता येईल याचाच फक्त ध्यास घेतो. पोटाची आग माणसाला असावीच, त्याशिवाय तो स्वत:ची व कुटुंबाची उन्नती करू शकत नाही. परंतु बरेचदा पोटाची आग तितकीच मर्यादित न राहता हव्यासाची, लालसेची भुकी होऊन विवेकहीन होते, कुमार्गाला लागते.

माहेराची लाडकी लेक सून होऊन दिल्या घरात लक्ष्मीचे रूप घेऊन येते. तिचे प्रेमाने आनंदाने स्वागत करण्याऐवजी हुंड्यांची लालसा जागते. आणि सुरू होतो अव्याहत छळ. मग एके दिवशी उडतो स्टोव्हचा भडका अन जळते एक भरभरून जीवन जगण्याचे स्वप्न. असहाय-लाचार-अबला अन तितकेच लाचार-दुर्बल आई-बाप. का? का? आज एकविसाव्या शतकातही ही आग तितकीच किंबहुना काहिशी जास्तच पेटलेली आहे. नेमाने घडणाऱ्या हुंडाबळीच्या घटना टाहो फोडून हेच दर्शवतात. वय-शिक्षण-रूप-धर्म-जात-गरीब-श्रीमंत या साऱ्यांना पुरून उरणारी हुंड्याची आग. अन विशेष म्हणजे या आगीची सूत्रधार - हवा देणारी बरेचदा स्त्रीच असते. एक सबला एका अबलेची जिवंतपणी चिता रचते.

लोकांच्या तोंडचे घास- जमिनी गिळंकृत करून, हजारो कोटीची मालमत्ता गोळा झाली तरीही भूक भागतच नाही असे आमचे नेते-उद्योगपती. आजचे राजकारण, अर्थकारण व समाजकारण हे याच भुकेचे बळी आहेत. खुर्चीचा-सत्तेचा हव्यास कोणाचेही व कुठल्याही थराला जाऊन लांगूलचालन करावयास यांना भाग पाडीत आहे. त्यापायी सामान्य जनता महागाईच्या - भ्रष्टाचाराच्या - मूठभर मदांध दुर्जनाच्या अतिरेकाचे बळी होऊन या रोजच वाढणाऱ्या आगीत होरपळून निघत आहेत. मरताना यातले काहीच बरोबर नेता येणार नाही याचा विसर तर कधीचाच पडलेला आहेच आणि मनाची नव्हतीच कधी पण जनाचीही लाज राहिलेली नाही.

आजचे राजकारणी पाहा, स्वत: आलिशान महालात-थंड हवेत बसून कार्यकर्त्यांना आपसात झुंजवत आहेत. पाच पन्नास लोक मेल्याशिवाय यांची प्रतिमा कशी उजळणार? मग मरणारा आपलाच का असेना. अशी बेअक्कल मेंढरे कितीही मिळतीलच. तेवढीच खाणारी तोंडे कमी होतील. लाख मेले तरी बेहत्तर पण लाखांचा पोशिंदा मरता नये ’हे वाक्य आजच्या काळात सार्थ करावे असा एकतरी पोशिंदा कुठे उरलाय का?

एक वेळ अशी होती की सगळ्या मनांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीची आग चेतलेली होती. क्रांतिकारी बेधडक व शूरपणे या आगीच्या ज्वालांमध्ये स्वत:ला झोकत होते. त्यांच्या निर्भय व वीर बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात जन्म घेऊ शकलो. त्यांनी कधीच लोकांना भडकवले नाही, स्वत:ऐवजी बळी दिले नाही. उलट स्वातंत्र्यप्राप्तीचा ध्यास घेऊन स्वत: संग्रामात प्रथम उडी टाकून लोकांना प्रेरणा दिली. ' सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है ', आधी स्वत: केले मग लोकांसी सांगितले. त्यांना लोकांना पटवावे लागलेच नाही. ही खरी आग. ज्या मनामध्ये देशाप्रती स्वाभिमान, राष्ट्रप्रेम नाही त्यांचे जीवन व्यर्थच. देशाला स्वातंत्र्य तर मिळाले पण खरेच का देश स्वतंत्र झाला आहे? त्यावेळी निदान दुश्मन कोण हे तरी ज्ञात होते आज सगळीकडूनच हल्ला होतोय आणि नेमकी कुठली आग विझवायला हवी व ती कशाने विझेल हेही समजत नाही.

अंतरात्म्याची, आतल्या आवाजाची आग ही माणसाला बलवान आणि सर्वशक्तीनीशी सामना करण्यास शिकवते. आणि यासाठीच आतल्या आवाजाची आग सदैव चेतलेलीच ठेवायला हवी. ही आग जर विझली तर जीवनच संपले. जगण्याचे प्रयोजनच नाहीसे झाले. या आगीला जे भिडतात, जिगर ठेवून आत्मविश्वासाने तिच्याशी लढतात तेच जीवनात अलौकिक कार्य करून जातात. विचारी, संतुलित, साधकबाधक परिणामांची शक्यता पडताळून ध्येयाचा पाठपुरावा करणे नेहमीच यशदायी असते. हृदयात हे ’ तेज ’ जागृत ठेवायला हवे आणि त्याला हवाही द्यायला हवी.

4 comments:

 1. "अंतरात्म्याची, आतल्या आवाजाची आग ही माणसाला बलवान आणि सर्वशक्तीनीशी सामना करण्यास शिकवते. आणि यासाठीच आतल्या आवाजाची आग सदैव चेतलेलीच ठेवायला हवी. ही आग जर विझली तर जीवनच संपले". . . या गोष्टीची प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे. मस्त पोस्ट झाली आहे.

  ReplyDelete
 2. खरंच तेज हे तेज न राहता ठिणगी, ज्वाळा झाली की किती भयंकर होते.
  शेवटचा परिच्छेद तर खुपच छान जमलाय !!

  ReplyDelete
 3. मनमौजी, आवर्जून प्रतिक्रिया दिलीस... धन्स रे.:)

  ReplyDelete
 4. हेरंब, हो ना.... कोण कसे आणि कशासाठी वापर करतेय त्यावर सारे अवलंबून आहे. तारक आणि मारक...,आभार.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !