जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, March 17, 2010

टोचणी.......

भरभर आवरून नेहमीप्रमाणे ८.५३ ची जलद लोकल मिळावी म्हणून ८.२० ला घर सोडले. नशिबाने रिक्षाही अगदी सोसायटीच्या दारातच मिळाली. " चल रे बाबा लवकर, नाहीतर आज लेटमार्क लागेल. " असे पुटपुटतच मी रिक्षात बसत होते तोच तो म्हणाला, " मॅडम, तुम्हाला कळले नाही का? काहीतरी लोचा झालाय डोंबिवलीला. ठाणा स्टेशनवर ही गर्दी झाली्ये. " रोजचा मेला वैताग आहे. कधी गाड्या लेट तर कधी रिक्षाच नाही. तर कधी दोन्हीही नाहीत. एक दिवस वाहनसुख लाभेल तर शपथ.

पण पेपरमध्ये तर काहीच आलेले नाही. ह्म्म्म...., सकाळी सकाळी झाले असेल काहीतरी. ऑफिसच्या वेळातच नेमके हे का घडते? थोडक्यात आजच्या मस्टरची आशाच सोडा. एका मिनिटात हजार विचार मनात वर्णी लावून गेले. आता स्टेशनवर जावे का बस पकडावी तिनहात नाक्याला जाऊन या दोलायमान अवस्थेत मी होते तोच सोसायटीमधलीच एक मैत्रीण धावतपळत येताना दिसली. तिचीही अवस्था माझ्यासारखीच. काय करूया.... यावर उहापोह होऊन शेवटी तिनहात नाक्यालाच जाऊ असे ठरले. रिक्षावाला ऐकत होताच, निघालो.

नीतिन कंपनीपासून मधल्या तीन-चार सिग्नलवरील धूर मन मानेल तसा व तितका आमच्या फुफ्फुसात शिरून आम्हाला पावन करून गेला. रुमाल नाका-तोंडावर धरत-खोकत एकदाची आमची वरात तिनहात नाक्याला पोचली. तिला व मला वेगवेगळी बस हवी होती. त्यात लोकलच्या घोळामुळे भल्या मोठ्या रांगा आधीच लागलेल्या. ऊन डोक्यावर तापलेले अन घामाच्या धारांनी मनाच्या वैतागात अजूनच भर टाकली. पण इलाज नव्हता, चडफडत रांगेत उभी राहिले.

मैत्रिणीची बस आली आणि चक्क तिला चढायलाही मिळाले. तिला पटकन बस मिळाली याचे दु:ख नाही पण आपल्याला मात्र असे चटकन काही मिळत नाही याची कटकट झाली. जाऊ दे. आता ह्यात नवीन काय आहे. मनाला पण अजूनही सवय कशी होत नाही, याचा अजूनच राग आला. तेवढ्यात एक बस आली आणि रांगेतली तीन चथुर्तांश माणसे तित गेली. चला निदान शेड मध्ये तरी उभे राहायला मिळाले या आनंदात ( अश्या छोट्याछोट्या गोष्टींचाही अशावेळी जीवाला आनंद होतोच....., आणि त्यांची नोंदही घेतली जाते, ) मी आजची पुरवणी काढून वाचायला सुरवात केली.


दोन मिनिटेही गेली नसतील तोच एका लहान मुलाचा अजिजीचा सुर कानावर आला, " मॉंजी, सुबू से कुछ नही गया पेट मे......, बहोत भूख लगी है। पचास पैसा - रुपया दे दो ना.....। ए मॉं, आपके घरवाले जीये-सुखी रहे, बच्चे फले-फुले । दे दो ना मॉं........ " आवाजातल्या अजिजीने मी कोण पोर आहे ते पाहावे म्हणून पुरवणीमधून नजर हटवली. पाहते तर, चांगला तरतरीत दहा-बारा वर्षांचा एक मुलगा होता. सकाळपासूनची झालेली तकतक त्यात ह्याचे भीक मागणे पाहून डोके सटकले.

रागाने त्याला जरा सुनावतच म्हटले, " काय रे, शरम वाटत नाही का तुला अशी भीक मागताना? चांगला तर दिसतो आहेस. जरा काम कर की. पण नाही, तुम्हाला कष्ट नकोत. आयते गिळायला हवे. निर्लज्जपणे भीक मागायची की भागतेय ना. " असे म्हणत मी त्याच्याकडे पाठ फिरवली आणि पुन्हा पुरवणीत लक्ष घातले. सहसा मी कोणालाही भीक देत नाही. एकतर यांचे दादालोक ती हडपतात किंवा हेच गांजा-दारू, कशात तरी उडवतात. यांच्या या फालतू गोष्टींसाठी माझा कष्टाचा पैसा गमवायची माझी बिलकूल तयारी नाही. पण अगदीच असहाय जीवाला खायला मात्र मी बरेचदा देते. वाटले हा मुलगाही खरोखरच उपाशी असेल. पैसे देण्यापेक्षा काहीतरी खायलाच द्यावे का? असे मी मनाशी म्हणतेय तोच,

" मॅडमजी, शरम तो बहोत आती हैं। पन मेरे जैसे सडक पे रहनेवाले को कोई काम देताच नई । " मी त्याच्याकडे पाठ फिरवली असली तरी तो अजूनही चिवट आशेवर तिथेच उभा होता. " का, का नाही देणार कोणी काम तुला? उगाच खोटे बोलू नकोस. तू मेहनत व प्रामाणीकपणे पडेल ते काम करीन असे म्हणालास तर कोणीही तुला काम देईल. आजकाल किती जणांना घरातले काम करण्यासाठी नोकर मिळत नाहीत. पण तुला सवय लागली आहे ती फुकटचे गिळायची. मग कष्ट कशाला करशील तू? चल पळ इथून. आधीच सकाळपासून कावलेय मी, त्यात तुझी भर नको. जा म्हणते ना...... "

तो मुलगा तरीही हलला नाही. आजूबाजूला उभे असलेल्या एक-दोघांनीही त्याला हाकलायचा प्रयत्न केला पण त्याने दुर्लक्ष केले. माझ्या उपेक्षेने असेल किंवा हेटाळणी केली म्हणून असेल, तो थोडासा दुखावला गेला होता. अचानक त्याने मला विचारले, " मॅडमजी, आपके पास काम हैं ? जो बोलोगे मै करूंगा । सचमुच । " " मला गरज तर आहेच एका नोक........." मला मध्येच तोडत, " तो चलो, अपुन है ना । अपुन को रख लो । चोरीमारी की बुरी आदत बिलकुल नही है । मॉं, तुम जो कहोगी मे सब कर देगा । रातको एक कोने मे पडा रहेगा..... बोलो, रखोगी मुझे? "

त्याचे हे उत्तर मला अपेक्षित नव्हतेच. मी विचारात पडले. खरे तर मला घर-ऑफिस, लेक, त्याचा अभ्यास, येणीजाणी या सगळ्याचा खूप ताण येत होता. कोणीतरी असे हाताशी मिळाले तर हवेच होते. चुणचुणीत दिसतोय. पुन्हा लहान आहे. डोक्यावर बसणार नाही. खाऊनपिऊन असा फार पगारही द्यावा लागणार नाही. शोमूला खेळवेल, शाळेत पोचवेल-आणेल, बराच उपयोगी पडेल.

" काय रे, तुझे आई-वडील कुठे आहेत? तुम्ही राहता कुठे? "

" मॉंजी, अपुन का मॉं तर कभीच मर गया । मेरेकू तो याद भी नई उसका चेहरा..... और बाप... हां है ना । पर मॉं के मरने के बाद उसने दुसरा शादी बनाया, वो और उसकी बिवी धारावी का झोपडपट्टी मे रैता । "

" बरं. मग उद्या तुझ्या आई-बापाला घेऊन ये मी बोलते त्याच्याशी आणि तुला घेऊन जाईन. "

" अरे मॉंजी, क्या आप भी । वो कैसी मॉं और उससे क्या पुछना..... उसनेही तो बापके कान भरभरके मुझे घरसे हकाल दिया नं...... "

" म्हणजे............? "

" एक नंबर की टुच्ची औरत हैं वो । दिनभर मुझे भुक्का मारती थी, और ढेर सारा काम करवा लेती थी । एक दिन पेट की आगसे झुंझलाकर मै कभी वडा उठा तो कभी पाव, कभी जो हाथ लगे वो चुराने लगा । करते करते एक दिन पकडा गया । वो हरामी शेठ ने बहोत मारा और पुलिसमे दे दिया । उपरसे घरमेंभी बोल दिया । पुलिसको मॉंने
सीधा बोल दिया, इसको हम नही जानता । फिर क्या जेल मे रहा, छुटने के बाद कुर्ला ठेसन पे बुटपॉलीश करने को चालू किया । पर वो पहले से बुटपॉलिस करते लोग ने मारके वहासें भगाया । फिर एक दादा ने पकडा और भीख मांगने के धंदे मे डाल दिया । अगर पैसा मिलेगा तो वो हडप लेता हैं । पर दोन वक्त पेट को तो डालता हैं.... मॉंजी, ये सुनके घबरा नको । मैं बुरा नही.... पेट के वास्ते चोरी किया था । तुमको कभी धोका नही देगा..... एक बार रखके तो देखो नं मुझे । "

हे ऐकले आणि मन कचरले. मी तर याला ओळखतही नाही. कोण कुठचा, चोरीमारी करून सजा काटून आलेला आणि याला घरात घेऊन जाऊ? म्हणजे स्वतःहून चोराला निमंत्रण देण्यासारखेच की . नको बाई या भलत्याच भानगडीत पडायला. दया-उपकार करावेत, काम द्यावे-सुधारण्याची संधी द्यावी हे सगळे बोलण्यापुरतेच असते. कुठून याला फुकटचा उपदेश पाजायला गेले असे मला झाले.

" अरे, मी तुला ठेवूनही घेतले असते रे. पण सध्यातरी माझ्याकडे एक बाई आहे. ती सगळे काम नीट करते. मग तू काय करणार आणखी. त्यापेक्षा, हे घे वीस रुपये आणि पुन्हा बुटपॉलीशचा धंदा सुरू कर. नाहीतर काहीतरी वीक ना लोकलमध्ये. तुझ्यासारखी बरीच छोटी छोटी मुले विकत असतातच की . घे. त्या तुझ्या दादाच्या हाती लागू देऊ नकोस. घे न. " असे म्हणत मी विसाची नोट पुढे केली.

मी त्याला घरी घेऊन जाईन या त्याच्या आशेलाच असा सुरुंग लागलेला पाहून तो चिडला. इतका वेळ आपल्याला झापणारी, वर डोस पाजणारी ही बाई स्वत: मात्र मला कामाला ठेवून घ्यायला तयार नाही हे त्याच्या जीवाला लागले. विसाची नोट माझ्या अंगावर फेकून तडकून म्हणाला, " वो मॅडम, खालीफोकट साला मेरा टाइम बरबाद कर डाला । उपरसे इत्ती सारी फालतू की सीख झाड दी । खुद पे आयी तो तुम कलटी मार
गई । इत्ता तो सच बोल दिया मैं पर तुमको तो अपुनपे भरौसाच नही । ये तेरा बीस रुपया और पाठ नई मांगता । पचास पैसा-रुपया भीख दे दो मुझको, मै जाताय । अपुन के पास ये बकवास सुनने का टाइम नई हैं । साला, जो उठता हैं अपुनकोच जुते मारता है। मदत कोई नई करता । " असे म्हणून मला आरसा दाखवून तो आला तसा गर्दीत हरवून गेला.

सगळा दिवस मी स्वत:चा छळ करून घेतला. कोणालाही फुकटचा सल्ला देण्याआधी मी त्या समस्येवर उपाय देऊ शकते का? सोडवणूक करू शकते का, याचा विचार करायला हवा. आणि तसे करू शकत नसेन तर किमान हिणवणे, झापणे तरी करता नये. मुळात अडचण समजून घ्यायला हवी, त्यासाठी तेवढा वेळ हवा. शिवाय, ती समजली तरी तिचे समाधान- निराकरण करणे आपल्याला शक्य असेलच असे नाही . तेव्हा ही उपदेशाची पोकळ ढोंगबाजी बंद. असे ठरवून मी त्या संवादावर पडदा टाकला खरा पण मनात कुठेतरी स्वत:च्या दुट्ट्पीपणाची - दांभिकपणाची टोचणी लागली . आज बारा-तेरा वर्षे झाली तरीही ती सलतेच आहे.

( फोटो जालावरून )

35 comments:

 1. It is a very sensitive story and I think you wrote it very well. I like you blog and wish you best for future stories.

  ReplyDelete
 2. Sundar lihili aahes. Aple dole khota baghayla saravle astat tyamule kadhi kadhi satya dekhi asa samor alyawar pachat nahi. Dev kunacha tondi bolel sangta yet nahi.
  Dhanyawad.

  ReplyDelete
 3. नक्कीच विचार करायला लावणारा लेख. या भिकार्‍यांकडे बघितलं की नेहमीच कणव वाटायची मला. आणि मग बरेचदा भरपूर भीक दिली जायची अगदी यांचे सगळे उद्योग माहित असूनही. मग ट्रॅफिक सिग्नल' बघितल्यावर ते वास्तव अजूनच येऊन टोचलं. मात्र तेव्हापासून मग त्यांना काहीतरी खायचं विकत घेऊन द्यायला लागलो.
  तुमच्याप्रमाणे द्विधा मन:स्थितीत ब-याचदा अडकलो आहे.

  ReplyDelete
 4. विशाल,ब्लॉगवर स्वागत व प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

  ReplyDelete
 5. शंतनू, स्वागत आहे. हे असे धाडस करायला मन कचरतेच आणि ते बरोबरच आहे पण त्यामुळे एखाद्या गुणी माणसावर अन्याय होऊन जातो. प्रातिक्रियेबद्दल आभार.

  ReplyDelete
 6. हेरंब, जितके भिकारी तितक्या कहाण्या. आपण कुठे कुठे व कोणाला पुरे पडणार. तरीही जीवाला लागतेच. पण ही परिस्थिती ना आपण निर्माण केली आहे ना आपण बदलू शकतो. मात्र केवळ आपल्या पूर्वीच्या कटू अनुभवांमुळे आपण आपल्याच कोणा जवळच्यालाही केवळ सल्ले देतो ते अजूनच लागणारे असू शकते.

  ReplyDelete
 7. खरंय, या बाजुचा सल्ला देण्यापुर्वी आपण विचारच करत नाही...
  मी कुणालाही भिक देत नाही, आणि हो कटाक्षाने भाषणबाजीही टाळतो, कारण एकदा एका भिकार्‍याने सुनावले होते, "साब, देनेका है तो दो, फोकट का लेक्चर नही चाहिये" आता बोला!

  ReplyDelete
 8. खूप विचार करायला लावणारा लेख आहे."दुधानी तोंड पोळल की माणूस ताक पण फुंकुन पितो". . .आज काल तर आता उपदेश पण करत नाही कोणी. कारण समाज बधीर होत चाललाय. ही परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार व्हायला हवा.

  ReplyDelete
 9. आपण काही करु शकत नाही ही भावना म्हणजे काय हे मी बरेचदा अनुभवतो. परवाचीच गोष्ट , एक पाच- सहा वर्षाची मुलगी एक वर्षाच्या मुलाला कडेवर घेउन भिक मागत होती. मुलाला सारखी रड - म्हणून सांगत होती, पण तो मुलगा मात्र काही रडत नव्हता तर चक्क हसत होता. सिग्नलला कार उभी होती, मी पहात होतो, तेवढ्यात तिने त्या मुलाच्या थोबाडीत मारली आणि जोरात चिमटा घेतला.. मुलगा रडायला लागला, आणि ती आपल्या भिक मागायच्या कामाला लागली..

  ReplyDelete
 10. हे नविन टेम्प्लेट मस्त आहे:)

  ReplyDelete
 11. पैसे कधीच देऊ नयेत .. खायला द्यावे हवेतर त्यांना... दिवसाचे ६० रुपये आणले तरच खायला मिलते त्याना दिवसाअखेर... :( धंदा जोरात आहे हां!!!

  ReplyDelete
 12. ताई अगदी खरंय गं आपण ना ही परिस्थिती निर्माण केली ना बदलू शकतो..... पण टोचणी लागतेच गं!!

  बरं बेमुर्वतपणे दुर्लक्षही नाही जमत मग काय त्रिशंकु अवस्थेत स्वत:चाच छळ मांडायचा....

  ReplyDelete
 13. खरंय. भीक देऊन किंवा न देऊन आपण त्यांचा प्रश्न सोडवू शकत नाही.

  भीक मागणार्‍या मुलांवर मी एक उपाय बघितलाय. गाडीमध्ये बिस्किटांचे छोटे पुडे ठेवायचे - पैसे देण्याऐवजी खाऊ द्यायचा. याने त्यांचा प्रश्न सुटणार नाही, पण दिलेलं त्यांच्याच पोटात तरी जाईल.

  ReplyDelete
 14. मस्तच झाली आहे पोस्ट एकदम.

  ReplyDelete
 15. kadhi kadhi khup daya yete lahan lahan mulana bhik magtana baghun. Train madhye ladies dabyat tar ashi khup lahan mula yetat. kachra shirtne bajula karun paise magtat ani koni nahi dile tar tasech kachra takun jatat. daya yete pan hyanch nantarch vagan baghun madat karavishihi vatat nahi. kharach ekhyadya garjula madat aaplyakadun nakarli jau shakte

  ReplyDelete
 16. आनंद,तेव्हांपासून या भानगडीत मी कधी पडलेच नाही. शिवाय त्यांना ही अशीच आयतेपणाची सवय झालेली, मग ते पिसाळणारच.

  ReplyDelete
 17. मनमौजी, ही परिस्थिती का निर्माण होताच नये या करिता प्रयत्न व्हायला हवेत. पण हे फार कठीण आहेच आणि ह्यात अडकलेल्या किती जणांची खरेच तयारी आहे यातून बाहेर पडण्याची... प्रमाण अतिशय नगण्य आहे. ऐतखाऊपणाची मुरलेली सवय अशी सहजी सुटात नाही.

  ReplyDelete
 18. महेंद्र,किती लहान वयात त्या मुलीला स्वार्थ कळलाय. कोणाचा तरी गळा दाबल्याशिवाय हाती काही लागणार नाही या विकृत सत्याची ओळख वय वर्षे पाचलाच झालेली. शिवाय ती स्वत:ही हे चिमटे-व थपडांमधून तान्ही असताना गेलेली असणारच. हे चक्र न संपणारेच आहे.

  ReplyDelete
 19. रोहन, ह्म्म्म... प्रत्येक धंद्याचे टार्गेट, डेडलाईन्स ठरलेल्या. मग धंदा कुठलाही असेना. हा धंदा जोरात आहे हे मात्र पदोपदी जाणवत असते.

  ReplyDelete
 20. तन्वी, हो गं. धड ना डोळे बंद करवत ना उघड्या डोळ्यांनी पाहवते. मग निदान कोणा आजीला-अपंगाला काही खायला द्यावे ही धडपड करतोच.

  ReplyDelete
 21. गौरी,बरोबर. मीही पैसे देत नाही. खायला द्यावे हेच त्यातल्या त्यात बरे. निदान ते त्यांच्या पोटात जाईल.

  ReplyDelete
 22. The Prophet, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. :)

  ReplyDelete
 23. सारिका, अग ती मुले पाहून दया येतेच पण तू म्हणतेस तशीच ती किती उद्दामही असतात. शेवटी हे सारखे पाहून पाहून आपल्यावर निगेटीव परिणामच जास्त होतो. आणि खरेच एखादा गरजू भरडला जातो.आभार.

  ReplyDelete
 24. ब्लॉगच नविन रुप छान आहे....

  ReplyDelete
 25. एका न सुटणारया प्रश्नावर छान लिहल आहे.मागे एकदा या भिकारी इंडस्ट्री वर एक लेख आल होता त्यातील उत्पनाचे आकडे पाहुन तर माझी बोबडी वळली होती.तसाही वर्तमानपत्रात वाचलेल्या बातम्यांमुळे विश्वास तरी कोणावर ठेवावा असे होते कारण महिन्याला कमीत कमी एक तरी बातमी असते कि नोकराने मालक/मालकीणिचा खुन केला म्हणुन..लोक प्रामाणिकपणा बघुनच ठेवत अस्तात हयांना पण काही लोंकामुळे जे खरच प्रामाणिक आहेत त्यांबद्दलही शंका निर्माण होते...

  ReplyDelete
 26. दवबिंदू, न सुटणारा व रोजचा वाढतच चाललेला प्रश्न आहे. हो नं,मोजके प्रामाणिक व मेहनती लोक भरडले जातात व शेवटी समाजाने केलेली हेटाळणी सोसून या मार्गाला लागतात.
  प्रतिक्रियेबद्दल आभार.

  ReplyDelete
 27. मदत करावी तर पंचाईत, न करावी तर रुखरूख हे बाकी खरं आहे. एकाने मी दिलेले पैसे पाठ वळताच बिड्या आणण्यासाठी उपयोग केलेले पाहून माझा संताप झाला आणि नंतर अशांना सरळ ओलांडून जाऊ लागले तेव्हा उगाचंच अपराध्यासारखे पण वाटले. काय करावे समजत नाही.
  आपल्या कपड्यांना हात लावून मागे लागणार्‍यांकडे मात्र मी पहात सुध्दा नाही.
  छान झाली आहे पोस्ट.

  ReplyDelete
 28. nave rup akdam mast. khup aawdle.

  ReplyDelete
 29. सकाळच्या सप्तरंग पुरवणीत आपल्या ब्लॉगचा उल्लेख आलाय... याच लेखाच्या संदर्भात!

  अभिनंदन

  alhadmahabal.wordpress.com

  ReplyDelete
 30. छान लिहलय....वास्तव आहे हे,आमच्याही बाबतीत

  ReplyDelete
 31. मीनल, हो बाई. मलाही हे असे हात लावून( मुद्दामहून) वागणारे पाहीले की मस्तकात तिडिक जाते. प्रतिक्रियेबद्दल आभार.

  ReplyDelete
 32. Prajkta, नवे रूप आवडलेले ऐकून मस्त वाटले. धन्स रे.

  ReplyDelete
 33. आल्हाद, ब्लॉगवर आपले स्वागत आहे. बरे झाले कळवलेत. खूप खूप आभार. गेले तिन दिवस माझी फार गडबड-प्रवास सुरू होता. कदाचित मला कळलेच नसते. पुन्हा एकदा धन्यवाद.

  ReplyDelete
 34. अमित, प्रातिक्रियेबद्दल आभारी आहे.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !