जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, March 31, 2010

सायनचा बसस्टॉप, तो आणि ती........

कथेची सुरवात येथे वाचता येईल

त्या हव्याहव्याश्या वाटणाऱ्या चिडवाचिडवीतून सुटका करून घेत ती साहेबांकडे वळली तसे........

पुढे........

या चिडवाचिडवीमुळे साहेबांना फार काही सांगावेच लागले नाही. साडेचार होऊन गेलेच होते. त्यांनी हसत परवानगी दिली तसे पटकन प्रसाधन गृहात जाऊन तोंड धुऊन हलकासा पावडरचा हात फिरवून फ्रेश होऊन शमाने पाचला ऑफिस सोडले. चांगला दीड तास आहे अजून..... सहज पोचून जाऊ आपण. अभी तसा शहाणा आहे. नेहमी वेळेवरच येतो. असे बसस्टॉपवर एकट्या मुलीने वाट पाहत उभे राहणे म्हणजे किती दिव्य आहे......... नेमक्या मेल्या बसस्टॉपवरच्या सगळ्या नंबरच्या बसेसनाही अगदी उत येतो अशावेळी. लागोपाठ येतच राहतात..... आणि मग सगळे टकमका पाहत बसतात.

असे झाले की वाटते, नकोच ते भेटणे.... कोणीतरी घरी जाऊन चुगलखोरी करायचे. सारखी छातीत धडधड. आईला माहीत असले तरी कधी आणि कुठे भेटतोय याचा हिशेब थोडाच ना देतेय मी...... बुरखावाल्यांचे बरे आहे नाही..... निदान तेवढा तरी फायदा बुरख्याचा......... " अचानक बसला जोरात ब्रेक लागला तशी शमा भानावर आली. आत्ता या क्षणाला अभीशी बोलायलाच हवे या अनावर ऊर्मीने तिने पर्स मधून सेल काढला. अभीचा नंबर लावला...... तिच्या लाडक्या गाण्याचे सूर ओघळू लागले....... रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन....... अभी, अभी... घे ना रे फोन..... आज, आत्ता या क्षणी मला तुझा आवाज ऐकायचा आहे. हा आपला क्षण तुझ्याबरोबर पुन्हा अनुभवायचा आहे....... अभी..... सूर संपले..... सेलचा नेहमीचा मेसेज वाजू लागला तसे तिने चिडचिडून फोनचा गळा दाबला. अभी कुठे आहेस रे तू.......... काळाच्या ओघात तूही हरवून जावेस..... बस तोवर प्रियदर्शनीला पोहोचली होती. तिच्या सीटला काहीसे खेटूनच कोणी उभे होते. त्याची कटकट होऊन तिने वर पाहिले, तर बुरखावालीच होती.......... तिला हसूच आले. नकळत शमा पुन्हा भूतकाळात रममाण झाली.

आजची त्यांची भेट शमेसाठी खासंखास होती. गेल्याच आठवड्यात- रवीवारी, दोघांच्याही घरचे भेटले होते. लग्नाची बोलणी सुरू झाली होती. साखरपुड्याची तारीखही जवळपास निश्चित झाली होती. त्यामुळे आज कसे अगदी, सीना तानके भेटता येणार होते. उगाच कोणी पाहील का.... ची भिती नाही की उशीर झाला म्हणून, आई ओरडेल ची चिंता नाही. आज अगदी राजरोसपणे सगळ्यांना सांगून-सवरून ते दोघे भेटणार होते. एकदम वेगळेच फिलिंग आलेले. तिला आठवले....... रवीवारी निघताना अभी म्हणाला होता, " शमे, पुढच्या भेटीत तुझ्यासाठी मस्त साडी घेऊ गं. आपल्या या भेटीची खास आठवण राहायला हवी. " आनंदातच शमेने आईला फोन करून भरभर सगळे सांगितले. अभी येईल गं मला घरी सोडायला.... तेव्हां उशीर झाला तरी तू मुळीच काळजी करू नकोस असेही वर सांगून तिने फोन ठेवला आणि निघाली. बसही पटकन मिळाली आणि चक्क खिडकीही मिळाली. आज सगळेच कसे मनासारखे घडतेय नं असे म्हणत आनंद स्वरातून ओघळत, गुणगुणत राहिली.

बरोब्बर सहा पंचविसाला सायन हॉस्पिटलपाशी बस पोहोचली. शमा पटकन उतरली. उतरतानाच तिची नजर अभीला शोधत भिरभिरली........ हे काय....... हा अजून पोहोचलाच नाही का? बास का महाराजा........ म्हणे मी तुझी वाट पाहत असेनच........ बस गेली तशी बसस्टॉप जरासा निवांत झाला. शमेने आजूबाजूला नजर टाकली पण कुठेही अभी दिसेना. मन थोडे खट्टू झाले खरे...... पण मान उडवून तिने नाराजी झटकली. येईलच दोन-पाच मिनिटात. खरे तर त्याला कधीच उशीर होत नाही. नेहमी आपली वाट पाहत असतो. तेव्हां आजच्या उशीराचा उगाच बाऊ नको करायला. फार तर काय एखादी बस येईल आणि लोकं पाहतील....... इथे चांगल्या चार पाच नंबरांच्या बसेस येतात. तुमची बस नकोय मला....., स्वत:शीच ती बडबडत होती. नजर मात्र अभीची चाहूल घेत राहिली. बरे फोनवर अभीने अमुक एका नंबरच्या बस स्टॉपवर असेही म्हटले नव्हते..... तसाही इथे हे लागून दोनच तर बस स्टॉप आहेत. म्हणजे कुठेही तो असला तरी मला दिसेलच की. येईलच इतक्यात.......

पंधरा मिनिटे झाली..... अभीचा पत्ताच नाही. नेमके शेवटच्या मिनिटाला काहीतरी काम आले असेल....... ट्रेन चुकली असेल....... सायन स्टेशनवरून चालत येईल ना तो...... जरा लांबच आहे तसे इथून..... अर्धा तास...... पाहता पाहता साडेसात वाजले. आता मात्र शमेचा धीर खचला...... डोळे अश्रूंनी काठोकाठ भरले. नेमके आजच अभीने न यावे...... का? बरा असेल ना तो? अपघात .... काही बरेवाईट तर घडले नसेल नं...... अग आईगं....... छे! काहीतरीच..... हे काय वेड्यासारखे विचार करतेय मी........ इथे जवळपास कुठेही पब्लिक फोनही नाही. नाहीतर निदान त्याच्या घरी तरी फोन केला असता. रडवेली होऊन शमा अजून पंधरा मिनिटे थांबली...... अभी आलाच नाही. हळूहळू कुठेतरी रागही आलेला होताच........ आता तर ती जामच उखडली. दुष्ट कुठला........ आता पुन्हा भेटायला बोलाव तर मला...... मुळीच येणार नाही मी. किती आनंदात होते आज ......... छानशी साडी घेऊ, मस्त काहीतरी चटकमटक चापू...... मधूनच हात हातात घेऊन रस्त्यातून चालू...... सगळे मांडे मनातच राहिले...... गालावर खळकन अश्रू ओघळले तशी ते पुसून टाकत, घरी जावे असा विचार करून ती निघाली.

रोड क्रॉस करून समोर जावे लागणार होते...... तिथून बस घेऊन घरी....... गाड्या जाईतो थांबावे लागले तेव्हां सहजच तिची नजर सायन हॉस्पिटलच्या गेटकडे आणि बसस्टॉपकडे गेली. हे सायन हॉस्पिटलचे इकडून पहिले गेट आणि पहिला बस स्टॉप असला तरी हॉस्पिटलचे दुसरे गेट आहेच आणि तिथेही बसस्टॉप आहेतच की. घातला वाटते मी घोळ......... अक्षरशः पळतच ती निघाली. जेमतेम पंधरावीस पावले गेली असेल तोच समोरून घाईघाईने येणारा अभी तिला दिसला. चेहरा चांगलाच तापलेला होता..... तिच्याकडे लक्ष गेले आणि तो तटकन तिथेच थांबला. भर्रर्रकन शमेने त्याला गाठले...... जणूकाही आता पुन्हा तो गायबच होणार होता. त्याला काही बोलायची संधी न देताच, " अभी, अरे किती हा उशीर केलास तू? बरोब्बर सहावीसला मी पोहोचलेय इथे. तेव्हांपासून तुझी वाट पाहतेय. तुला यायला जमणार नव्हते तर कशाला बोलावलेस मला........ सव्वा तास मी एकटी इतक्या नजरा आणि लोकांचे शोधक प्रश्न झेलत कशी उभी होते ते मलाच माहीत. " असे म्हणताना पुन्हा तिचे डोळे त्या जीवघेण्या वाट पाहण्याच्या आठवणीने भरले आणि ती मुसमुसू लागली.


इकडे अभीचा स्फोटच व्हायचा बाकी होता. शमेसारखा तोही आज खूप खूश होता. नेहमीसारखी शमेची भुणभूण असणार नाही...... घरी जाते रे आता... उशीर होतोय, असे ती मुळीच म्हणणारं नाही. मस्त फिरू जरा, तिला पहिली साडी घेऊ..... मग छान कॅंडल लाइट डिनर करू........ पण बाईसाहेबांचा पत्ताच नाही. आता मी इथे शोधायला आलो तर वर ही माझ्यावरच डाफरतेय.... त्यात भरीला रडतेही आहे. तो रागाने तिला झापणारच होता खरा... पण असे अगदी लहान मुलासारखे ओठ काढून मुसमुसणाऱ्या... तशातही गोड दिसणाऱ्या शमेला पाहून, तिच्या जवळिकीने त्याचा राग विरघळून गेला........ असेच पटकन पुढे झुकावे आणि हलकेच हे ओघळणारे अश्रू, नाकाचा लाल झालेला शेंडा आणि थरथरणारे तिचे ओठ टिपून घ्यावेत...... मोह अनावर होऊन नकळत तो पुढेही सरकला.... तशी शमाने डोळे मोठ्ठे केले........

तोवर दोघांनाही काय घोळ झाला होता हे लक्षात आलेच होते. चूक कोणाचीच नव्हती. आता अजून वेळ फुकट घालवण्याचा मूर्खपणा तरी नको असे म्हणून अभीने टॅक्सी थांबवली. दोघे बसून टॅक्सी निघताच तिचे डोळे पुसून तिच्या टपलीत मारत अभी म्हणाला, " पुढच्या वेळी अगदी रेखांश अक्षांशही सांगेन, आजूबाजूला असलेल्या दुकानाच्या पाट्या- खुणाही सांगेन. म्हणजे आमच्या महामायेच्या कोपाला निमित्त नको मिळायला...... ये पण तू कसली गोड दिसत होतीस गं.... खास करून मुसमुसताना पुढे काढलेले ओठ..... मला तर हा एपिसोड परत पण आवडेल........ " तसे खुदकन हसत शमा म्हणाली, " हे रे काय अभी....... आम्ही नाही जा....... त्यासाठी इतका वेळ एकटीने उभे राहायची माझी तयारी नाही. आज माझी मुळीच चूक नाहीये आणि काय रे शहाण्या, इतका वेळ तिथे माझी वाट पाहात उभे राहण्यापेक्षा आधीच का नाही मला पाहायला आलास...... हा सारा वेळ फुकट गेलाच नसता.... तू पण ना....... जरा लेटच आहेस.... "

उशीर होऊनही प्लाझाच्या समोरच्या रेमंडस व इतरही काही कंपनीचा माल असलेल्या दुकानातून अभीने शमेला चामुंडा सिल्कची सुंदर साडी घेतली. शमा तर हरखूनच गेली होती. चांगली साडेपाचशेची साडी होती. त्यावेळेच्या मानाने भारीच होती. तिचा पगार मुळी साडेआठशे होता. नुसती किमतीने महाग म्हणून नाही पण खरेच अप्रतिम साडी होती. मग दोघांनी जिप्सीत मस्त हादडले आणि दहाच्या आसपास दोघे घरी पोचली. आई-बाबा जरासे चिंतेत वाटले तरी त्या दोघांना पाहताच एकदम खूश झाले. कॉफी घेऊन अभी गेला. कितीतरी वेळ ती आईला साडी दाखवून दाखवून आपल्याच नादात बडबडत होती........

" अहो बाई, तुम्हाला गरोडीयला उतरायचेय ना........ मग उठा की आता........ ग्लास फॅक्टरीपासून हाका देतोय..... पण तुमचे लक्षच नाही...... " कंडक्टर तिला हाका मारत होता...... त्याला थॅंक्स म्हणत ती पटकन उठली...... उतरली. जणू काही बावीस-तेवीस वर्षांपूर्वीची अल्लड-अवखळ शमाच उतरली होती. मनाने पुन्हा एकवार ती ते सगळे क्षण-वैताग-आनंद तसाच्या तसा जगली होती. अभीला विचारायलाच हवे आज....... माझा पूर्वीचा अभी कुठे हरवलाय........... सारखे काम काम....... वेडा झालाय अगदी. कुठेही लक्ष नाही...... थट्टा नाही की रोमांन्सही नाही. पाहावे तेव्हां क्लाएंट, प्रपोजल आणि टूर्स यात अडकलेला. एखादे प्रपोजल फिसकटले की आठवडाभर घर डोक्यावर घेतोय...... पण, आयुष्य चाललेय हातातून निसटून त्याचे काही नाही. किती बदलला आहेस अभी तू......... ते काही नाही. आज लेकही गेलाय मित्राकडे स्लिप ओव्हरला...... फक्त तू आणि मी, मस्त कॅंडल लाइट डिनर करू आणि दोघे मिळून सायनच्या बस स्टॉपवर उभ्या असलेल्या त्या शमा-अभीमध्ये विरघळून जाऊ........... असे मनाशी ठरवत सोसायटीच्या गेटच्या दिशेने ती भरभर चालू लागली...........

समाप्त.... .

32 comments:

 1. बसस्टॉप वर अभी आधी भेटला नाही तेव्हा म्हटलं काही झालं की काय याला.. एवढा गुंतलो होतो.. मस्त ओघवतं वर्णन आहे. शेवटही मस्तच ;-)

  ReplyDelete
 2. अगं कसलं झकास सायन-दादर फ़िरवून आणलंस यार...ए, अभीला दे नं वाचायला ही कथा की मी फ़ोन करून सांगु????मध्येच आमच्या अभ्याचं असंच झालं होतं पण मी ती गाडी आणली बर्‍यापैकी रूळावर....शेवट एकदम झकास आणि आजचा आहे....

  ReplyDelete
 3. अप्रतिम...एकदम मस्त!

  ReplyDelete
 4. अप्रतिम !!खरच मी पण मस्त सायन दादर फ़िरुन आले...इतकी गुंतत चालले होते ना...की काय सांगु...सहीच एकदम.....

  ReplyDelete
 5. हेरंब, अभिप्रायाबद्दल आभार. :)

  ReplyDelete
 6. अपर्णा, हा हा... तुमच्या आभ्याची गाडी रूळावर आली ना....सहीच. दादर ही तर माझी लाईफलाईन गं...धन्स.

  ReplyDelete
 7. अभिप्रायाबद्दल धन्यवाद आनंद.

  ReplyDelete
 8. माऊ, यू नो नं.... तू तुझ्या आजच्या घाईगर्दीतही पोस्ट वाचायला आलीस..... धन्स रे.

  ReplyDelete
 9. अभि भेटत नाहि म्हटल्यावर, वाटल काहि तरी विपरीत घडलेल असणार.
  पण एकदम चोप्रां सारखा feel good शेवट केलात.
  मस्त.लय़ भारी.

  ReplyDelete
 10. मस्त....एकदम ओघवती झाली आहे कथा!!

  ReplyDelete
 11. मस्त ... दादरचा प्लाझाचा जिप्सी वगैरे परिसर एकदम ओळखीचा ... तिथून छान फिरवून आणलंस!

  ReplyDelete
 12. Interesting !! Pudhacha bhag lavkar yevu dyaa....Have a good day...Bharati

  ReplyDelete
 13. my id < b.rati70@rediffmail.com >
  Regards,
  Bharati

  ReplyDelete
 14. मस्त जमली आहे गोष्ट.
  आवडली. :)

  ReplyDelete
 15. मस्त, शेवट गोड की सगळच गोड.

  ReplyDelete
 16. कथा मस्त झाली आहे. वाचून मजा आली. शेवटपर्यंत खिळून राहिलं. आणि तुमच्या स्टाईलप्रमाणे मानवी भाव-भावनांविषयी यामध्ये आहेच. सुंदर....

  ReplyDelete
 17. yes ... धन्यवाद् !! आता सगळी एकदम वाचली .. मस्त आहे. अजुन येऊ देत !

  ReplyDelete
 18. अगं ताई सुरेख झालीये गं..... अगं बाकि लिहिते जरा याहूवर...:)

  फारचं मस्त आणि शेवट वाचून खात्री पटली की शमा आणि अभि आपल्याला ओळखीचे वाटत होते कारण ते खरोखरच आपल्या ओळखीचे आहेत... :)

  लिहीती रहो डार्लिंग.....!!!!!

  ReplyDelete
 19. canvas, कथा आवडली हे ऐकून बरे वाटले.धन्यवाद.

  ReplyDelete
 20. गौरी, अगं दादर म्हणजे जीव गुंतलेला.... ही..ही... धन्स गं.

  ReplyDelete
 21. भारती, तुम्हाला गोष्ट भावल्याचे पाहून आनंद वाटला. मेल आयडी बद्दल धन्यवाद.संपर्कात राहूच. :)

  ReplyDelete
 22. अनिकेत..... अनेक धन्यवाद.

  सोनाली, यस्स्स्स.... शेवट गोड असला की मग सारेच गोड.:)

  ReplyDelete
 23. prajkta, धन्स. प्रयत्न करतेय. :)

  विक्रम, अभिप्रायाबद्द धन्यवाद. तुम्हा सगळ्यांचे प्रोत्साहन खूप मोलाचे आहे.

  ReplyDelete
 24. तन्वी, ए भांडा मत फोड यार..... :P बाकी हे शमा आणि अभि सगळीकडेच आहेतच की... खरं ना.... :)

  ReplyDelete
 25. तन्वी
  मला पण वाटले ते ओळखीचे.:) मजा आली वाचायला.

  ReplyDelete
 26. :)

  मजा आली!! सहिच!!!

  ReplyDelete
 27. महेंद्र..... हा हा... तुमचीपण अशीच आठवण दिसतेय... :)

  ReplyDelete
 28. अभि, आभारी आहे.:)

  ReplyDelete
 29. छान झाली आहे कथा...शमेच भावविश्व ,फ़्लॅशबॅक मस्त सादर केल आहे....

  ReplyDelete
 30. davbindu, अभिप्रायाबद्दल धन्स.

  ReplyDelete
 31. SAHI YAAR,
  TE DOGHE BHETATAT BUS STOPVAR TYANANTAR..
  TI RADTE....SAHI KHUP ROMANTIC
  ME FIRST TIME COMMENT KARAT AHE
  RAAG MANU NAYE

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !