जाता जाता एक नजर इथेही........

Monday, February 15, 2010

आजी, सून आणि बागबान.........

( वय साधारण ८२-८३ असावे, आजी एकटीच गॅलरीत उभी राहून विचार करतेय........ )

गेले किती दिवस सांगतेय, माझी चप्पल अगदीच झिजलीये. तळव्यांना सहन होत नाही तिचा रखरखीत स्पर्श आताशा. जाऊन नवीन चप्पल आणूयात. पण कोणालाही वेळ नाही. एक आठवडा उलटला सूनबाई माझ्याकडून चपलेसाठी पैसे घेऊन गेलीये पण अजून चप्पल काही आली नाही. ( आजोबांच्या फोटोसमोर जाऊन उभी राहते )
" पाहताय ना तुम्ही? आपल्याकडे सुटीला आले की दरवर्षी नवीन बूट-चप्पल, साड्या-शर्ट-पॅन्ट, धान्यधुन्य-वाळवणं, हळद-तिखट-मसाले, लाडू.... डबेच्या डबे भरून जात होते. अहो रागावून कशाला पाहताय? मी काही काढून दाखवत नाहीये की हिशेबही घालत नाहीये. पण आईकडून चपलेसाठी पैसे कसे घेववतात....., जाऊ दे. अडचण आहे त्यांची. आपणच समजून मदत करायला हवी. आता हेच पाहा ना, मी दिवसाकाठी तीन पोळ्या खाते. घरात आम्ही सात माणसे. ते पिल्लू तर तान्हेच आहे म्हणा अजून. आता माझ्या म्हातारीच्या तीन पोळ्या जडच की हो. त्यातून त्यांची अडचण. पोळीवाली व भांडीवालीचे पैसे मी द्यायचे असा फतवा जारी केला चार महिन्यांपूर्वी आणि हा आपला लेक, नंदीबैल आहे नुसता. अगदी न चुकता दोन तारखेला पोळीवालीचे व भांडीवालीचे पैसे वसूल करतो माझ्याकडून. देवपूजेला फुले मला लागतात मग त्याचे पैसे मीच द्यायला हवे, बरोबरच आहे हो. चांगल्या संस्कारातली, श्रीमंत घरातली सून हवी होती ना आपल्याला. आता दाखवतेय ती संस्कार आणि मनाची श्रीमंती. "

" तुमचे बरं चाललंय ना वर? का तिथेही आहेतच अडचणी? एकाला दोघे होतो तेव्हा निदान एकमेकांसाठी जगावेसे वाटत होते. तुम्ही गेलात, मी राहिलेय. ह्म्म..... देवा हातीपायी धड ने रे बाबा. आत्ता आहे तर पुढच्या क्षणी नाही. ऐकशील ना तेवढं माझं? "( सुस्कारा टाकते...... )
-------------------------------------------------------------------------------------
( आठ दिवसांनी, संध्याकाळची दिवेलागणीची वेळ....... आजी मुलाला हाक मारतेय..... )

" अरे, ऐकतोस का? "
" काय आहे गं आई? सारखं तुझं काहीतरी चालूच असतं? आता आणखी काय हवंय तुला? सांग पटकन, कामे पडलीत खूप. "
" हो रे बाबा. खरेय तुझे. पण, गेले आठ-दहा दिवस रोज ताप येतोय. १०० च्या पुढे जातोय पुन्हा उतरतोय. कोरडा खोकलाही वाढलाय, छातीत-पोटात दुखतं रे खोकून खोकून. डॉक्टरकडे जायला हवे. नेतोस का?"
" अग, कशाला डॉक्टरकडे जायला हवे. काही झालेले नाही तुला. उगाच उठसूट काय डॉक्टर-डॉक्टर करत असतेस. क्रोसीन घे, होशील बरी. "( निघून जातो )
" अरे निदान आईच्या अंगाला हात लावून ताप पाहायचास तरी. सूनबाई आठ दिवसांपासून सारखी क्रोसीन देऊनच झोपवतेय हो. आई गं.......सहन होत नाही..... " ( आजोबांच्या फोटोकडे पाहत गरम वाफारे येत असलेल्या डोळ्यातून झरणारे मनाचे कढ असह्य होऊन केविलवाणी हाक मारते..... ) " अहो, तुम्ही जरा जवळ बसा नं माझ्या. पूर्वी कसे मी आजारी असले की बसायचात. वाचून दाखवायचात, थोपटून झोपवायचात. घशाला कोरड पडलीये हो माझ्या. पाणी कुठे गेले...... पाणी, पाणी....... " ( ग्लानी येऊन आजी तशीच कण्हत पडून राहते )
------------------------------------------------------------------------------------

( दहा-बारा दिवसांनी सकाळी सकाळी सून व मुलगा बोलत असतात )
" अहो, उद्या त्यांना भावोजींकडे द्या पोचवून. जरा मेली सुटका नाही. सारखा जाच चालू. कितीही करा तक्रारी आहेतच. "
" अग, काहीतरीच काय बोलतेस? महिना झाला तिला ताप येतोय. निदान ताप तरी उतरू देत, मग पोचवतो. क्रोसीन देते आहेस ना?"
" चांगल्या ढीगभर क्रोसीन खाऊन झाल्यात. अहो, काही ताप-बीप आलेलाच नाही तर उतरणार कुठून? पांघरूण घेऊन पडून राहायचे नुसते दिवसभर, तापाच्या नावाखाली. एक काम करायला नको. आजकाल देवाची पूजाही करत नाहीत.म्हणतात, बसवत नाही गं मला. ऐका. आता दिवसभर लोळायची सवय लागलीये मग पूजेसाठीही बसवत नाही हो त्यांना. ते काही नाही, उद्या पहाटेच निघा म्हातारीला घेऊन आणि द्या पोचवून. "
" अग पण ........ "
" अग नाही आणि पण नाही...... उद्या म्हणजे उद्याच.... कळलं?"
( फणकाऱ्याने निघून जाते. )

" आई, झोपली आहेस का? मी काय म्हणत होतो......... ऐकतेस ना?"
" हो, ऐकतेय मी. काय सांगत होतास? "
" दादाकडे नेऊन घालतो तुला. बरेच दिवस झाले गेली नाहीस ना. उद्या पहाटेच निघू. तयारी करून ठेव. उगाच उशीर नको. "
" अरे, इतकी काय घाई आहे? जरा ताप तरी हटू दे, खूप अशक्तपणा आलाय. प्रवास झेपायचा नाही मला. आणि उद्या तर सणाचा दिवस. नातू-पणतू बरोबर राहू दे हो. ती अगदीच हटून बसली असेल तर परवा नेऊन घाल, पण उद्या नको हो. "
( आई-लेकाचे बोलणे ऐकत उभी असलेली सून तरातरा येते....... )
" अहो, सण काय रोजच चालू असतात. ते काही नाही, उद्याच नेऊन घाला. काय? यात बदल होणार नाही सांगून ठेवत्येयं. "
(तणतणत निघून जाते. आजी डोळ्यात जीव एकवटून मुलाकडे पाहत राहते. मुलगा नुसतेच खांदे उडवतो आणि तोही निघून जातो. आजीच्या डोळ्यात पाणी येते.... पाहता पाहता आजी हसू लागते. हसता हसता आजोबांकडे पाहून म्हणते....... )
" चला, गाशा गुंडाळायला हवा हो आता. नाहीतर ही उद्या पहाटे माझ्या हाताला धरून बाहेर काढायला कमी करणार नाही. तुम्ही पण चला माझ्याबरोबर. उगाच या घराला तुमच्या फोटोचेही ओझे नको. जिथे मी तिथे तुम्ही. "
( बॅग भरते. फोटो काढून तोही बॅगेत भरते. रात्री पुन्हा क्रोसीन देऊन आजीला झोपवतात. पहाटे सहालाच आईला घेऊन मुलगा निघत असतो........ )

" सूनबाई, येते हो. जपून राहा. "
" येतो गं मी आईला पोचवून. उद्या रात्री येईन परत. "( दोघे जातात. )
-----------------------------------------------------------------------------------

( दुसरा दिवस उजाडतच असतो आणि फोन वाजतो...... नातू उठतो. पहाटेच्या सहा वाजता कोण फोन करतेय..... वैतागून फोन घेतो. )

" कोण अवी का? अरे, मी काकू बोलतेय. "
" काकू, अग इतक्या पहाटे फोन केलास? काय झाले? सगळे बरे आहेत ना? आणि बाबा तर आजीला घेऊन तुमच्याकडेच आलेत की."
" हो हो, तू ऐक आधी मी काय सांगते ते. आजींना बहुतेक ऍटॅक आलाय. पहाटे चारला बाथरुमला गेल्या आणि तिथेच डोके ठेवून पडल्या. आधी कळलेच नाही आम्हाला. बराच वेळ झाला बाहेर का आल्या नाही म्हणून पाहिले तर आजी बेशुद्ध झालेल्या. आता हॉस्पिटल मध्ये नेलेय. कळवते पुन्हा डॉक्टर काय म्हणतात ते. तुझ्या आईला सांग हे सगळे. ठेवते रे. "
" अग आई, आई..... ऐकलेस का? " ( आई आणि त्याची बायको येतात...... )
" काय झाले रे? पहाटे पहाटे कशाला बोंबलतो आहेस? आज जरा झोपावे म्हटले....... त्यांची नाही तर याची कटकट.... काय झालेय इतके आग लागल्यासारखे ओरडायला? "
" अग, आजीला ऍटॅक आलाय बहुतेक. तरी मी तुला सांगत होतो, तिला तापाची पाठवू नकोस. चक्क हुसकलीस आजीला तू घराबाहेर. त्यात लाल डब्याने बाबा घेऊन गेला. ती लाल डब्बाही नेमकी दुपारी बाराच्या उन्हात फेल झाली. दोन तास आजी तळपली बिचारी. महिनाभर क्रोसीन देऊन झोपवलीत तिला. आता पाहिले ना काय झाले ते. आला ना ऍटॅक."
( त्याला मध्येच थांबवत ..... ) " काही झाले नसेल रे इतके. जरासे छातीत दुखले असेल. उगाच सगळ्यांना घाबरवून सोडायचे. सोडतील घरी त्यांना दुपारपर्यंत. तू तणतणू नकोस. झोप जरा. "

( जाऊन झोपते. नातू अस्वस्थपणे फे~या घालत राहतो. सकाळ होते. अकराला पुन्हा फोन वाजतो......धडधडत्या मनाने नातूच फोन घेतो.... )

" हॅलो.... कोण, कोण बोलतेय? "
" मी बोलतोय......, बाबा."
" बाबा, बाबा...... आजी ... आजी, कशी आहे आता? डॉक्टर काय म्हणाले? घरी कधी पाठवणार आहेत? मी निघू का लागलीच? "
" नको. तू निघू नकोस. आता कशाचाही उपयोग नाही. आई गेलीये. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर पुन्हा एक ऍटॅक आला आणि गेलीच. आम्हीच इथून दुपारी निघू तिला घेऊन. ऐकतोस ना? आई, गेलीये. हिला निरोप दे. संध्याकाळी बरीच गडबड होणार आहे. "

( बाबा फोन ठेवतो. नातू वेड्यासारखा तसाच फोन हातात घेऊन उभा असतो, तोच आतून आई येते....... )

" अवी, कोणाचा फोन होता? आणि असा काय शॉक लागल्यासारखा उभा आहेस? अरे बोल की काहीतरी. फोन कोणाचा होता? "
आईकडे वळून त्वेषाने , " तू, तू मारलीस तिला. हाताला धरून बाहेर काढलीस तिला, तिच्याच घरातून. विनवून सांगत होती, अग, परवा जाईन हो मी. नको मला बळजोरीने पाठवूस. पण नाही. कैदाशीण आहेस नुसती. माझ्या आजीला तू मारलीस. " ( मोठ्याने हंबरडा फोडून रडू लागतो. नातसून तिथेच भिंतीशी बसकण मारते आणि असहायपणे रडू लागते. अचानक आजीच्या जाण्याने सून एकदम घाबरून जाते. मला काय स्वप्न पडले होते का असे होईल म्हणून...... आता हा पोरगा जर हे असे बडबडला सगळ्यांच्या समोर तर जोतो शेण घालेल तोंडात माझ्या......, या भीतीने एकदम कोलमडते आणि तीही जोराजोरात रडू लागते. )

-----------------------------------------------------------------------------------

( आजीला जाऊन सहा महिने होऊन गेलेत. टीवीवर बागबान लागतो. कितव्यांदा कोण जाणे. लागलीच आई टीवीसमोर हातात मोठ्ठा टॉवेल घेऊन बसते. एकटक सिनेमा पाहू लागते आणि एकीकडे तोंडाने बडबड चालू....... )

" बाई बाई, काय जमाना आलाय? किती नालायक मुले आहेत ही. आई-बापाला म्हातार वयात वेगळे केलेन. आता बापाचा चष्मा फुटला तर नको का नवीन आणून द्यायला? त्यांचे कर्तव्यच नाही का? एवढे जन्माला घातले, शिकवले, वाढवले, लग्नेकार्ये केली. आता आईबापाला सांभाळायचे काम नाही का त्यांचे? ( उमाळ्यावर उमाळे येऊन रडते.... टॉवेलने सारखे डोळे पुसते. पुन्हा रडते..... ) कुठे फेडतील ही पापं. देवा असल्या नालायक मुलांना चांगली शिक्षा कर रे. मेल्यांचं वाट्टोळं होऊ दे. आईबापाला घराबाहेर काढतात........, मोलकरणीच्या खोलीत झोपवतात. खायला घालत नाहीत. निदान जनाची तरी लाज ठेवाल का नाही. "

( बडबड-रडारडीतही एकीकडे कान सगळे स्वयंपाकघरात लागलेले......... नातवाच्या रडण्याचा आवाज येतो तशी, सुनेला हाक मारते...... )

" अग, का गं तो रडतोय? मी काय म्हणते, तू त्याला ग्लास भरून दूध देतेसच कशाला? नास नुसता. मग त्याने टाकले की तुला मटकावायला आयतेच मिळतेय की. सासू-सासरा आहे बरं का अजून जिवंत. जरा त्यांच्या तोंडात घास घाला आधी मग गिळा स्वत: ताटं भरभरून...... ( पुन्हा सिनेमात गुंगून....... ) बघा हो, आईला मायाच फार लेकराची. गेली बिचारी डबा घेऊन...... आणि हा करंटा बाईलबुद्धी मुलगा, बायकोच्या नादाने आला तणतणत आईला दोष द्यायला......... देवा! अरे किती वाईट दिवस दाखवतोस. त्या मेल्या सुनेला इतक्या वर्षात सासूची जराही माया कशी नाही लागत म्हणते मी ........... खरेच, कलियुग आहे हो हे कलियुग."

तिची सून अवाक होऊन ऐकत राहते. " किती दुटप्पी वागणे आहे सासूचे, आजींना दोन वेळचे जेवण देतांनाही कटकट करणारी. आदल्या रात्रीच्या भाताचे तडतडीत ढेकूळ त्या माउलीच्या ताटात आपटणारी ही बाई दर वेळेला तो बागबान पाहून अशी ढसढसा रडतेय आणि आम्हाला बोल लावतेय.. ......." हळूहळू गालावर अश्रू ओघळतात.

तशीच धावत आजींच्या फोटोपुढे जाऊन उभी राहते........ ओठावर ओठ गच्च दाबून मुकपणे रडत राहते. अचानक नातसुनेला भास होतो. जणू आजी हसून तिला सांगतेय, " नातसुने सांभाळ गं बाई. दुसरा अध्याय सुरू झालाय बरं का. रोल मात्र उलटे आहेत हो यातले. अग मी त्र्याऐशीं वर्षाची म्हातारी आयते बसून गिळत होते. आजारपणाचे ढोंग करून पडून राहत होते-कामे टाळत होते. पण तुझी सासू मात्र साठाव्या वर्षीच म्हातारी झालीये हो. तुला सुटका नाही गं बायो, किमान अजून तीस वर्षे तरी तुला सुटका नाही. बागबानची सीडी घासून गुळगुळीत झाली तरी हिचे मगरीचे अश्रू थांबणार नाहीत. तेव्हा स्वतःला सांभाळ पोरी स्वत:ला सांभाळ. "

8 comments:

 1. असतात गं बाई अश्या बायका!
  पोस्ट छान झालंय.

  ReplyDelete
 2. Namskar. . .kase aahat??? Mastach zali aahe post.

  ReplyDelete
 3. Mugdha, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

  ReplyDelete
 4. मनमौजी, खूप दिवसांनी दिसलात. मी मजेत आहे.
  आभार.

  ReplyDelete
 5. कुठून सुचली?...बागवानची CD उलट वगैरे केलीस काय...एकदम DC चा शॉक बसला !

  आहे मात्र एकदम सत्य कथा ! काना मात्रांचा फरक नाही !

  ReplyDelete
 6. पेठेकाका, ब्लॊगवर आपले स्वागत आहे. सत्य घटनाच बरेचदा खोट्या वाटत असतात. हे असे घडू शकते यावर आपले मन विश्वास ठेवू इच्छित नसते. पण दुर्दैवाने सत्य मात्र तेच राहते. याहीपेक्षा भयंकर परिस्थिती दुर्बलांवर- जे वयातीत आहेत, ओढवत आहेच. काही आपल्या समोर घडत असतात पण आपण थांबवू शकत नाही.कारणे जगाच्या व्यावहारिक नजरेत संयुक्तिक असली तरी अंतरमनात त्यामुळे येणारा असहायपणा आणि स्वत:चाच येणारा राग- जो खरोखरच वाझोंटा- कुचकामी आहे,मलाच कोसणे सोडत नाही.
  प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

  ReplyDelete
 7. खरं सांगु, माझा अजिबात विश्वास बसत नाही की असे कोणी वागु शकते.
  सोनाली

  ReplyDelete
 8. सोनाली, साहजिकच आहे. असे घडूच नये असेच वाटते म्हणून पटत नाही आणि त्यापेक्षा पचवता येत नाही. मात्र याहीपेक्षा भयावह घटना घडत असतात आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार असेच अव्याहत होते.:(

  काही वर्षांपूर्वी पेपरमध्ये आलेल्या एका बातमीने बरेच प्रश्न उभे केले होते. एका अशाच खूप वयस्कर आजोबांना विचारले होते की तुम्हाला असे पतवंडाला घेऊन बागेत येणे झेपतेय का? त्याच्या मागे पळायचे म्हणजे.... त्यावर आजोबा उत्तरले होते," अग नाही जमत.पण सांभाळतो ना मी त्याला म्हणून नातसून थोडे जास्त तूप वाढेल हो भातावर...."

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !