जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, July 25, 2010

मोरपिसे......

सुवासिक फुलांच वेड अगदी लहानपणापासूनच असलं तरीही मी फारच क्वचित कधी गजरा माळला असेल. कधीमधी सोनचाफा किंवा सोनटक्का मात्र घालतसे. बहुतांशी सगळीच सुवासिक फुले पांढर्‍या रंगाशी जवळीक साधून अन स्पर्शातील किंचितश्या तापानेही कोमेजायला लागतील अशीच. ती त्यांच्या आईच्या अंगाखांद्यावरच सुंदर दिसतात. देवाला वाहण्यासाठीही ती मला तोडवत नसत. मायदेशात त्यातूनही मुंबईत या सगळ्या सुवासांना सदैव बहरायला मिळेल असेच तापमान असल्याने माझ्या घराच्या छोट्याश्या बाल्कनीत ही सगळी आनंदाने नांदत, बहरत, सुवास उधळत होती. इथे यायला निघालो तेव्हां माझा सगळा जीव या झाडांमध्ये अडकलेला. एक वर्षभर मी इतक्या हजारो मैलांवरूनही त्यांना जपले. रोजच्या रोज त्यांची निगराणी, पाणी, खते घालणे यासाठी मोलकरीणही ठेवली. वर्षभराने सुट्टीसाठी गेलो तर काय चारी हातांनी सारी सुगंध उधळत होती. पारिजातक केवढा तरी मोठ्ठा झालेला. फुलांचा आकारही किंचित वाढल्यासारखा. रातराणीने तर घरात शिरल्या शिरल्या तिच्या अस्तित्वाची जाणीव दिलेली. जाई-जुई-सायली-मोगरा, अबोली, गुलबक्षी सारी सारी भरभरून फुललेली. आईला एक कडकडून मिठी मारून मी स्वत:ला या सगळ्यांमध्ये झोकून दिले. किती तरी वेळ माझ्या झाडांना गोंजारून, त्यांच्याशी बोलून, गाल घासून ख्याली खुशाली दिली घेतली तेव्हां कुठे जरा मन निवले. घरातले सगळे मला चिडवत, हसत होते खरे पण मनातून त्यांनाही या माझ्या वेडाची, प्रेमाची कदर होती. माझी समाधी कोणीही मोडली नाही.

इथे परत यायला निघताना मात्र मी स्वत:च्या हातांनी सगळ्यांची पाठवणी केली. मी निघाल्यानंतर, माझ्या अपरोक्ष त्यांची निरवानिरव करणे सहज शक्य असूनही मी ते टाळले. वाटले, माझ्या लेकरांशी ती दगाबाजी होईल. त्यापेक्षा एकेकाला मीच घेऊन जावे, त्यांच्या नवीन माणसांची ओळख करून द्यावी. माझ्या लेकराला नीट जपा म्हणून विनंती करावी. अचानक खुडून टाकल्यासारखे- बेवारस - अनाथ भाव त्यांच्या मनात नकोत रुजायला. सगळी झाडे माझ्या मैत्रिणींनाच दिलेली त्यामुळे आता ती माझ्याकडे नाहीत हे दु:ख वगळता सारी सुस्थळीच पडली. पुन्हा तीन वर्षांनी मायदेशी गेले तेव्हां ती दिल्याघरी आनंदाने सळसळताना पाहून जीव शांत झाला. त्यांच्या बंधनातून मी नाही तरी माझ्यातून ती नक्कीच मुक्त झाली. बरं झालं. कुढली असती तर अनर्थ झाला असता.

जे झाडांनाही कळलं ते मला मात्र कधी उमजलं नाही, आजही उमगत नाहीये. असं कसं होईल? का कळतं पण मला कळवून घ्यायचंच नाहीये. नात्यांमध्ये गुंतवलेला जीव असा सहजी काढून घेता येऊ शकतो? जर उत्तर ’ नाही ’ असे असेल तर मग ते सगेसोयरे, केवळ रोजचा संपर्क-भेट नाही म्हणून दुरावलेत.....? मग माझी त्या मैत्रीतली - नात्यातली ओढ आजही तितकीच का असावी? दुराव्याने मी का कुढावं - तळमळावं? का जीवनप्रवासात एका थांब्यापासून दुसर्‍या थांब्यापर्यंतच, त्या त्या वेळेपुरतीच फक्त ती माणसे माझी - माझ्यापाशी होती? मी तर सगळ्यांना, तितकाच भरभरून जीव लावला. ’ स्व ’ला संपूर्णपणे त्यागून, मैत्रीशी प्रामाणिक राहून. मग काहींतला प्राण, जिव्हाळा हरवून कसा गेला...... का प्रत्येक नात्यातून ही अपेक्षा करणेच मुळी चुकीचे आहे. मुळात आजही तितक्याच ओढीने टिकून असलेल्या मैत्रीच्या आनंदापुढे ही खंत कशाला? हे पटलं तरीही मन दुखतं हे सत्य नाकारता येत नाही.

कदाचित, काही नात्यांत सान्निध्याची - प्रत्यक्ष बरोबर असण्याची गरज असते. तसं झालं नाही तर ती हळूहळू क्षीण होत होत विझून जातात. " कशी आहेस? काय नवीन विशेष? " "अगं, मी ठीक आहे. तूच सांग. " शरिरी दुरावण्याचा पहिला भर ओसरला की या चार दोन शब्दांच्या वाक्यांपुढे गाडी सरकतच नाही. सरकलीच तरी लगेचच ’ बाकी ’ अजून काय म्हणतायं? वर अटकते. अजूनही दोन्ही मने सीमारेषेवर घुटमळत असतात. मग क्वचित कधी दोन्ही बाजूंनी पूल सांधण्याचा प्रयत्नही होतो. पण सामायिक विषयांच्या अभावी व समोरासमोर नसण्यामुळे काहीतरी अडखळत राहते - अपुरे वाटते. रोजच्या जीवनातील समान विषय - मग त्या अडचणी असोत, की राजकारण/समाजकारण/मोलकरीण - का लोकल-बस संप/ निवडणुका/ क्रिकेट/ नवीन साड्या-कपडे/ चकाट्या-भंकस, अगदी गेला बाजार डाळी-भाज्यांचे भाव असोत....... संपल्यामुळे त्यातली तक्रार - बोच -धग- असंतोष, असहायता, गंमत, आधाराची गरज - सांत्वन, यातले कुठलेच भाव समर्थपणे पोहोचत नाहीत - भिडत नाहीत. दोष कोणाचाच नसतो पण असे घडते खरे. मित्रमैत्रिणीतच नाही अगदी घरच्यांबरोबरही. अडचणी दोन्हीं बाजूंनी असतात पण तुला काय कळणार किती त्रास होतोय ते किंवा तुझं आपलं बरय गं..... अशासारखे बोल पटकन बोलले जातात. " The grass is always greener on the other side " असेच भासत राहते.

गेलेल्या काळाचा, अंतरामुळे आलेल्या दूरीचा जबर परिणाम असतो मनावर. जालावर असलेल्या सगळ्या जोडणार्‍या साईट्समुळे एकमेकांची खबर मिळत राहते. विरोपातून, फोनवर,वरचेवर बोलणे झाले तरी शेवटी माणूस समोर असणं, त्याचे अस्तित्व जाणवणं, त्याला स्पर्श करता येणं, अत्यंत क्षुल्लक गोष्टही तातडीने व उत्साहाने ऐकवता येणं व त्याने ती मन लावून ऐकणं..... हे फार फार गरजेच आहे अस सारखं वाटत राहतं.


वेबकॅममुळे एकमेकाला दिसलो तरी त्या चेहर्‍यात मी पूर्वीचेच भाव, त्या जुन्या ओळखीच्या खाणाखुणा शोधत राहते अन तो चेहरा मात्र काहीसा हरवलेला..... अनोळखी, कोरडा भासत राहतो. ( कदाचित त्यालाही मी तशीच भासत असेन........ दुर्दैव ) जुने जुने विषय काढून मी नात्याला पुन्हा पुन्हा जिवंत करत राहते..... पण खरं पाहता ते बंध कधीचेच सुटलेत. नवीन नात्यात गुंतलेत आणि असं गुंतणं चुकीचं नाहीच मुळी. माझ्यावर त्यांचा जीव आहेच फक्त आता तो पुस्तकात जपून ठेवलेल्या मोरपिसासारखा. वर्षा-दोन वर्षातून कधीतरी त्या मोरपिसावरून प्रेमाने त्यांचा हात फिरतो. दोन घटका मन आठवणींमध्ये रमते - चेहर्‍यावर आनंद-हसू उमट्ते, की पुस्तक मिटून पुन्हा ड्रॉवरच्या खणात सारले जाते. यातच सारे भरून पावले असे म्हणत मी स्वत:ला मुक्त करायला हवे. वरवर हे व्यावहारिक वाटेलही परंतु कुढत-तळमळत राहण्यापेक्षा बरं.

आठवणींच्या माळेत नवीन मण्यांची भर पडेनाशी झाली की ओवलेले मणी, इतकेच का म्हणत खंतावण्यापेक्षा त्यांचं मोरपीसच करावं. मग कधीतरी कातरवेळी ते अचानक समोर येईल तेव्हां त्या सुंदर क्षणांचा पुन: प्रत्यय तितक्याच आवेगाने घेता येईल. मन सुगंधीत-पुलकित होऊन जाईल. की हलकेच फोन उचलावा अन नंबर फिरवावा....... पुढचा अर्धा तास फक्त त्या मोरपिसांचा......

फोटो जालावरून साभार.

32 comments:

 1. सुंदर.. शेवट मनाला अतिशय भिडला....

  ReplyDelete
 2. agadi nemakepaNaani utaralaay lekh..

  ReplyDelete
 3. खूप सुरेख आणि खूप खरं लिहिलंस भाग्यश्री.

  ReplyDelete
 4. धन्यवाद आनंद.

  ReplyDelete
 5. मंदार, ब्लॉगवर स्वागत आहे. :)

  ReplyDelete
 6. अश्विनी, अगं बरेच दिवसांनी दिसलीस. खूप छान वाटले तुला पाहून. धन्यवाद.

  ReplyDelete
 7. क्रान्ति, तुला भावलं हे पाहून बरं वाटलं गं.:)

  ReplyDelete
 8. श्रीताई,
  एकदम भावूक केलंस...
  अगदी अशीच मोरपिसं काढून बसलो होतो आज!

  ReplyDelete
 9. विभी, ही अशी मोरपिसे दिवसागणिक वाढत जातील की काय या विचाराने.... :(

  ReplyDelete
 10. भाग्यश्री,
  मला नेहेमी प्रश्न पडतो कि एका फोनवर, एका sms वर मैत्री का अवलंबून रहाते?

  या विरोधात, माझी बालमैत्रीण, आता अमेरिकेत असते, परंतु जेंव्हा कधी ती येते तेंव्हा तिच्याशी मात्र अगदी कालच भेटलो होतो अश्या गप्पा पुन्हा सुरु कश्या होतात?

  आणि काही नाती मात्र मी भेटले नाही, मी फोन केला नाही कि मग अगदी, तुटक्या फांदीसारखी केविलवाणी लोंबू लागतात?

  अनघा

  ReplyDelete
 11. सगळेच अनाकलनीय आहे गं अनघा.

  ReplyDelete
 12. त्या जुन्या ओळखीच्या खाणाखुणा शोधत राहते अन तो चेहरा मात्र काहीसा हरवलेला..... अनोळखी, कोरडा भासत राहतो. ( कदाचित त्यालाही मी तशीच भासत असेन........ दुर्दैव ) जुने जुने विषय काढून मी नात्याला पुन्हा पुन्हा जिवंत करत राहते..... पण खरं पाहता ते बंध कधीचेच सुटलेत.

  हे श्री अगदी खरे बोल्लीस..कधी कधी वाटत की शरिरा बरोबर मनातही ईतका बदल होतो कि काय????????स्वभाव ही एवढा बदलतो?????? ..काही माणसे आयुष्यात अत्तराचा गंध घेउन येतात..तर काही नुस्ते वाळवंट...नुसते sms आणि फोन म्हणजे मैत्री नाही नं....स्वतःला झोकुन द्यावे अशी जी जागा ती खरी मैत्री.. पण उत्कटताच कमी झाली आहे बघ.... नात्यातला गंधच हरवला आहे...सगळ कसं कृत्रिम...[ः(]

  ReplyDelete
 13. श्रीताई, खुपच हळुवार आणि भावस्पर्शी लिहिलं आहेस. मी विकांतात गायब होतो म्हणून कमेंट टाकायला उशीर झाला तोवर तुझी पुढची पोस्ट आलीसुद्धा.. आता ती वाचतो.. :)

  ReplyDelete
 14. उमा, होतेय खरे असेच.:( त्याबरोबर असेही मनात येतेच की, टाळी एका हाताने कधीच वाजत नाही.... म्हणजे मग ???

  ReplyDelete
 15. वाटलेच मला. कुठे भटकलात आदिला घेऊन? :)

  ReplyDelete
 16. भटकलो नाही.. शनिवारी पॉटलक होतं आमच्याच घरी आणि रविवारी थोडा आराम आणि मग इन्सेप्शन बघितला :)

  ReplyDelete
 17. तायडे कसले हळवे लिहीलेस गं!!! अगं काल रात्रीच पोहोचलेय इथे आधिच मन हळवे झालेय त्या पार्श्वभुमीवर तर तुझी ही ’मोरपीस’ अजुनच वेगळी वाटताहेत,पटताहेत....

  ReplyDelete
 18. ओह्ह्ह्ह... इन्सेप्शन पाहिलासही... मलाही लगेच पाहायचा आहे. मोस्टली याच आठवड्यात. :)

  ReplyDelete
 19. श्रीताई, खुपच हळुवार आणि भावस्पर्शी लिहिलं आहे...

  ReplyDelete
 20. तन्वे, वेलकम बॅक.:)आता थोडे दिवस मन जरा सैरभैरच होणार गं. निघालो तरी जीव अडकलेलाच असतो नं आईपाशी-घरात... बोलू गं लगेच. भाचरे कशी आहेत माझी?

  ReplyDelete
 21. हा लेख छान आहे, पण जरा विषयांतर करतो.
  तुमचा ब्लॉग ओपन केला की जो पिवळ्या फुलांचा सुंदर फोटो दिसतो त्यावरून तुम्हाला झाडे, फुले अशा गोष्टी आवडतात हे स्पष्टच होते. तुमच्याकडील इतर मंडळींचेही - ब्रह्मराक्षस, वगैरे फोटो पाहिले - त्यावरूनही. तुम्ही पाना-फुलाना कुरवाळता, जवळ घेता हे वाचून फार छान वाटले. डॉ. शरदिनी डहाणूकरानी झाडे, फुले वगैरेंचे वर्णन इतके भरभरून केले आहे की ते तुम्ही प्रत्यक्ष वाचल्यावरच लक्षात येईल.
  पण ब्लॉगच्या मुखपृष्ठावर कोणत्या फुलाचा फोटो आहे ?
  झाडे, फुले यांविषयी आम्हाला - मी व अंजू, आवड आहे.
  त्याकरीता माझा e -mail -pshank13@gmail.com
  शशांक

  ReplyDelete
 22. शशांक, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. माझ्यासारखी आपल्यालाही झाडाझुडपांची आवड आहे हे पाहून खूप छान वाटले. सविस्तर मेल टाकतेच आहे. :)

  ReplyDelete
 23. धन्स रे मनमौजी. :)

  ReplyDelete
 24. aga faarach halawa jhalay...sadhya jya jya kashatun jatey tyat tar aankihch...fakt tyatlya tyat mhanaje nashbane botawar moju shakanari ashi nati pan aahet ki jyana na sangta sagala kalata...khup warshanni bhetlo tari jithe thamblo hoto tithunach suru hoto ani janu kahi ghadalech nahi ashya tarehene hati asalela wel satkarani lawala jato...aaso...tuhi halawi jhalis (kiwa jahli hotis) ka???

  ReplyDelete
 25. The grass is always greener on the other side ... & that is getting more & more green ... :)

  ReplyDelete
 26. अपर्णा, हो गं. काही बंध इतके पक्के जुळलेले असतात की कितीही काळ मध्ये गेला तरी कधीच अडखळत नाहीत.
  हळवं म्हणशील तर आठवणींची भूत अशी कधीकधी मानगुटीवर बसायचीच.

  ReplyDelete
 27. सीमा, धन्यू गं.

  ReplyDelete
 28. जुने बंध पुनश्च जुळुन येवोत आणि आठवणींच्या माळेत मुबलक मण्यांची रास पडो... माझ्याकडे किती मोरपिसे आहेत बघू... अरेच्च्या... एकही नाही. सगळेच वेडेपिसे आहेत. :-S :-)

  ReplyDelete
 29. ’सगळेच वेडेपिसे..” हा प्रकार मला आवडेल. :) थोडा दंगा करता येईल...

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !