जाता जाता एक नजर इथेही........

Monday, March 23, 2009

गेले दोन दिवस...

अकराच्या दरम्यान नवऱ्याचा फोन आला। सकाळपासून मी ह्या फोनची वाट पाहत होते. देवाची प्रार्थना करीत होते. धडधडत्या हृदयाने मी फोन घेतला. नवऱ्याचा आनंदी स्वर कानावर पडला, " मिळाला. " कानावर विश्वास बसेना. मी पुन्हा एकदा खात्री करून घ्यावी म्हणून विचारले, " खरंच? सगळे काही आहे ना? लॅपटॉप? " तो म्हणाला, " हो, सगळे काही होते तसेच आहे. आता बरे वाटले ना? " मी थोडे बोलून फोन ठेवला.

स्प्रिंग ब्रेक साठी आमचा मुलगा आठ दिवस घरी आला होता. हे आठ दिवस इतके भर्रकन गेले की वाटतेय जणू तो आत्ताच आलाय. त्याच्या आवडीचे पदार्थ झाले, सिनेमे, थोडीफार भटकंतीही झाली. घर आठवडाभर चहकत होते. गडबड, गोंधळ, मस्त मजा येत होती. शनिवारची दुपारची दिडची फ्लाईट होती. सकाळी बॅग भरली. बॅकपॅक भरताना सहजच त्याला विचारले, " अरे ही पुस्तके आणि लॅपटॉप बॅगेत ठेवू का? " "काही नको गं, मला सवय आहे वजनाची. राहू दे तिथेच. " इति मुलगा. मी मान डोलवली खरी पण मनातून मात्र सारखे वाटत होते, कशाला एवढे वजन उचलायचे. विमानतळावर त्याला सोडले. फ्लाईट वेळेवर आहे आणि मी आता माझ्या गेटवर बसलोय. पोचलो की फोन करतो. असे त्याने सांगितले. आम्ही तोवर अर्ध्या वाटेवर पोचलो होतो. इथे चेटिनाड म्हणून एक छान साऊथ इंडियन हॉटेल आहे तिथे जेवून मॉल मध्ये जाऊया असे ठरले.

त्याप्रमाणे जेवून मॉल मध्ये पोचलो . नवरा गाडी पार्क करायला गेला. तेवढ्यात मुलाचा फोन आला. मी खूश, चला वेळेवर पोचलाही. मुलाने विचारले बाबा आहे का? त्याला फोन दे. माझ्या नेहमीच्या अनुभवानुसार त्याला काही त्रास झाला असेल तर तो आधी बाबाला शोधतो. बाबा गाडी पार्क करून येतोय, तो कशाला हवाय ते सांग ना मला. " मी प्रयत्न केला. "आई, अग मी ना माझी बॅकपॅक विमानतळावरच विसरलो आहे. असे कसे झाले काही समजत नाही गं. वेळ होता बोर्ड करायला म्हणून मी शेजारच्या सीटवर ठेवली होती आणि गडबडीत फक्त बॅग घेऊन गेलो. जेव्हां विमान रनवेवर गेले तेव्हा लक्षात आले. " त्याने एका दमात सारे सांगून टाकले. तेवढ्यात बाबाही आला. मग पुन्हा सगळे त्याला सांगितले. आम्ही दोघे उलट्या पावली परत विमानतळावर निघालो.

गाडीत संपूर्ण शांतता होती. मला समजत नव्हते की एवढी मोठी व दररोज गेली दहा वर्षे पाठीवर असलेली बॅकपॅक हा विसरला कसा. तरी मला सकाळी वाटत होते की पुस्तके, लॅपटॉप बॅगेत ठेवावे. ह्म्म्म.... मी कशाला त्याचे एकले. काहीतरी आगाऊ सूचना मिळते म्हणतात ना तसेच झाले होते, पण इतके कळले असते तर... ह्या दोघा बापलेकांना इलेक्ट्रॉनिक्सचे वेड आहेच. शिवाय जे घ्यायचे ते एकदम लेटेस्ट, मग किमंतीही तशाच असतात. आता केवढयाला पडणार हे रामायण? नवऱ्याच्या चेहऱ्यावर इतके संमिश्र भाव होते की मी काही बोलण्याच्या भानगडीत पडलेच नाही. रस्ताही मेला लवकर संपेना.

एकदाचे विमानतळावर पोचलो. नवरा गेला 'हरवले-सापडले' मध्ये शोधायला. थोड्यावेळाने तो रिकाम्या हाताने परत आलेला पाहून मी हताश झाले. गाडीत बसल्यावर त्याने एक नंबर लिहिलेला चिटोरा दिला आणि ह्या नंबरवर सोमवारी फोन करून विचारायचे. पाहू, नशिबात असेल तर मिळेल, असे म्हणाला. म्हणजे शनिवार आणि रविवार ह्या घालमेलीत जाणार, आम्हा तिघांचेही. फार त्रास झाला होताच त्यात आता सगळे लक्ष सोमवारकडे लागले. प्रत्येक वेळी किती पटकन संपला असे वाटणारा विकेंड ह्यावेळी संपता संपेना. मुलाने आजवर एकदा शाळेचा डबा हरवण्या व्यतिरिक्त काहीही हरवले नव्हते. आणि असेही त्याला ओरडूनही काहीही उपयोग नव्हताच. तोही खूप वैतागलेला होताच स्वत:वर.


शेवटी एकदाचा सोमवार उजाडला डबा भरला, सगळे आवरले. दिलेल्या नंबरवर फोन लावला पण लागेचना सारखा बिझी येत होत होता. शेवटी नवरा म्हणाला मी जातोच तिकडे. शनीवारी घरी आल्याआल्या त्यांच्या वेबसाइट वर जाऊन फॉर्म भरून सगळी माहिती दिलेली होतीच. त्यांचे पत्र घेऊन नवरा गेला आणि सगळी बॅकपॅक जशीच्यातशी मिळाली. सुटलो एकदाचे. मनात आले, आजकाल विमानतळावर कुणीही बॅग्जना हात लावायला घाबरतात हे फार चांगले आहे . पोलिसांनी बॅग उचलली होती त्यामुळे सहीसलामत मिळाली.

नशीब जोरावर होते हे नक्की. दोन दिवसांच्या घालमेलीची सांगता चांगली झाली. सुटलो. आता आमच्या गावाहून मुलाच्या कॉलेजच्या ठिकाणी बॅग पाठवायचा फेडेक्स चा खर्च किती येतो ते पाहायचे. हा... हा... हा...

3 comments:

  1. Chhan lihita tumhi. donhi posts aavadalya.

    ReplyDelete
  2. हरवणे आणि सापडणे यात बाबा तुमचा नंबर पहिला..

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !