जाता जाता एक नजर इथेही........

Monday, March 30, 2009

रुमाल

बालपणापासूनच " रुमालाशी " आपल्या सगळ्यांची ओळख होते. आपल्याकडे बहुतेक सगळेच दररोज रुमाल वापरतात. लहान मूल बालवाडीची पायरी चढते तेव्हा प्रथम ह्याची ओळख होते. त्याआधीही त्याने हा वापरलेला असतो फक्त वेगवेगळ्या स्वरूपात, लाळेरे, दुपटे, इत्यादी. बालवाडीत जाताना त्याच्या शर्टाला/तिच्या फ्रॉकला हा टाचला जातो. सांगितले जाते की, नाक गळाले तर ह्याने पूस, जेवण झाले की तोंड ह्याला पूस. मुलींचे छान छान नाजूक , मुलांचे साधे पण टिकवू रुमाल. अनेकदा लक्षात येते की, आया आठवणीने रुमाल देतात पण तो धुता. त्याची खळही काढत नाहीत. बिचारी पोरे.

मोठे होता होता रुमालाचे महत्त्व समजू लागते. शाळेत खेळता खेळता पडले की गुडघ्याला, कोपरांना झालेल्या जखमांना बांधायला. बाई मुलांना ओरडल्या की हाच रुमाल तोंडाला लावून मुली फिदीफिदी हसतात, तर कधी प्रिय मैत्रिणीने कट्टी घेतली की डोळे पुसतात. अनुरोध मधले राजेश खन्नाचे," किस कदर एक हसीन खयाल मिला हैं, राह मैं एक रेशमी रुमाल मिला हैं..." किंवा " मेरी जोहराजबी गाताना बलराज सहानीच्या हातातील; यारी है इमान मेरा-म्हणताना प्राणच्या मनगटात; अनेक गाजलेल्या कवाल्या मध्ये झालेला ह्याचा प्रभावी वापर." अनुरोधसारखे सिनेमे पाहून तरुणाई अंगात संचारताना मुली रस्त्यातून जाताना दिसल्या की रुमाल टाकून एकदम फिल्मी स्टाइल मध्ये लाइन मारणारे रोमियो... कदाचित आजकाल हा उपयोग होत नसावा. मुलींनी रुमाल," अरे हो, खरेच की." असे म्हणत घ्यायला सुरवात केल्यावर सारखा नवीन रुमालांचा खर्च परवडेनासा झाला बहुदा. एकदा असेच एका मित्राच्या घरी गेले असता एक छान खोका दिसला. उघडून पाहिले तर अनेक नाजूक रुमाल होते. त्याला विचारले तर म्हणाला, " माझ्या धारातीर्थी पडलेल्या प्रेमाच्या(एकतर्फी) खुणा आहेत गं. लग्न झाले की प्रत्येकाची कथा बायकोचे मनोरंजन करेल म्हणून जपून ठेवलेत." त्याचा खिलाडूपणा आवडला, देव करो आणि बायकोही तशीच मिळो. म्हणजे हे सारे रुमाल पावन होतील. भडक रंगाचे चटेरीपटेरी रुमाल गळ्याभोवती गुंडाळून पानाच्या ठेल्यावर उभे राहून भंकस करणारे सडकछाप अजूनही कधीमधी दिसतात.

प्रेमात पडताना आणि पडल्यावर जागोजागी उपयोगी पडणारा हा रुमाल. पाऊस आला की प्रियेच्या डोक्यावर विराजमान होणारा, केसावरून, गालावरून चमचमणारे पावसाचे थेंब अलगद टिपणारा. समुद्रावर, बागेत प्रियेचे कपडे खराब होऊ नये म्हणून आवडीने माती माखून घेणारा. लाडीकपणे दातात धरलेला तिचा नाजूक रुमाल अन त्या रुमालात जाऊन बसलेले प्रियकराचे मन. अचानक तिचा भाऊ समोरून येताना दिसलाच तर तोंड लपविता येणारा. क्षितिजावर लुप्त होत असलेल्या सूर्यबिंबाबरोबर, आत निघायलाच हवे ह्या जाणीवेने विरहाची आर्तता तिच्या डोळ्यातून झिरपायला लागली की हळूवारपणे खात्री पटवणारा, मी तुझाच, तुझ्यासाठीच आहे. आजची तरूणाईही ह्याचा आणिक नावीन्याने उपयोग करीत असावी.

पाहता पाहता हा रुमाल, हवाच ह्या नित्य गरजांमध्ये जाऊन बसतो. एखादे दिवस जर त्याला विसरले तर दिवसभर प्रचंड बैचेनी येते. त्यादिवशी त्याचे महत्त्व आणि अपरिहार्यताही लक्षात येते. मुंबईसारख्या दमट हवेत वाहणाऱ्या घामाच्या धारा शोषणारा नितांत आवश्यक रुमाल. कुटुंबासाठी उन्हात वणवणताना येणारा घाम पुसणारा तर कधी वैफल्याचे, पराभवाचे, अगतिकतेचे अश्रू शोषणारा. नको असलेली व्यक्ती समोर उभी ठाकल्यास वैतागाची भावना चेहऱ्यावरून पुसून काढणारा. मुलाखतीस जाताना, महत्त्वाच्या मीटिंगमध्ये अस्वस्थता टिपून आंदोलने संयत करणारा. दुनियेत वावरताना काहीतरी आठवून अनावर होणारे हसू दाबताना तर कधी आईच्या डोळ्यातील आनंद टिपताना. माणसाच्या भावनिक आंदोलनाचा एकमेव साक्षीदार. अनेक जण एकच रुमाल आठवडाभर आलटूनपालटून घड्या उलगडत वापरतात. आठवड्याच्या शेवटी जेव्हा रुमाल धुण्याच्या बादलीत जाऊन पडतो त्यावेळी ह्या सात दिवसांचे सात मलिन छप्पे दिसतात. प्रत्येक छप्पा स्वतःची कहाणी सांगत असतो.

आपले मनही अशाच अनेकविध कप्प्यानमध्ये वाटले गेले आहे. चांगले-वाईट भाव सतत त्यात उमलत असतात. आसक्ती, ओढ, वासना, गरज, स्वार्थ, दु:,विषाद, आनंद, माया, प्रेम, आशा, प्रगती, भक्ती, तटस्थता...विरक्ती अशा कित्येक घड्या आपण घातल्यात. रुमालासारखे आपले मनही अनेक गोष्टी शोषून घेत असते, त्याचवेळी कुरकुरता एखाद्या सोशिक बाईसारखे( पुरुषही सोशीक असतात ह्याबद्दल माझ्या मनात दुमत नाही, केवळ कानालासवयीचे झालेय म्हणून वापरले आहे) प्रसन्न चेहरा मांडत राहते.

इथे-अमेरिकेत मी रुमाल वापरीत नाही. कागदाची(टिशू) दुनिया आहे ही. काही विसविशीत तर काही घट्ट. ह्या कागदांना ओलावा, समजूतदारपणा नाही. आहे तो व्यावहारीक तटस्थ कोरडेपणा, मनाचा एकही थेंब बाहेर सांडू देणारा अलिप्तपणा. वापरला की कचऱ्याच्या टोपलीत पडणारा , भावनारहित खरखरीत कागद. मायदेशात आले की लगेच रुमाल माझ्या हातात विसावतो कारण कोंडलेले आभाळ मोकळे होताना बरसणारही आहे हे त्याला सांगताही कळलेले असते.

3 comments:

 1. छान आहे तुमचा ब्लॉग. "शब्दबंध" ही मराठी ब्लॉगलेखकांची ई-सभा ६/७ जून २००९ रोजी होऊ घातली आहे. आपला सहभाग प्रार्थनीय आहे. अधिक माहितीसाठी http://marathi-e-sabha.blogspot.com/ येथे भेट द्या व सहभागी होण्यास उत्सुक असाल, तर shabdabandha@gmail.com येथे ई-मेल करा.
  धन्यवाद.
  -शब्दबंध

  ReplyDelete
 2. "ह्याकागदांना ओलावा, समजूतदारपणा नाही. आहे तो व्यावहारीक तटस्थ कोरडेपणा, मनाचा एकही थेंब बाहेर न सांडूदेणारा अलिप्तपणा. वापरला की कचऱ्याच्या टोपलीत पडणारा , भावनारहित खरखरीत कागद. मायदेशात आले कीलगेच रुमाल माझ्या हातात विसावतो कारण कोंडलेले आभाळ मोकळे होताना बरसणारही आहे हे त्याला नसांगताही कळलेले असते."


  शेवटच्या ४ ओळी माझ्या आरपार गेल्या ... सध्या मी सुद्धा भावनारहित खरखरीत कागद वापरतोय... :( पण लवकरच घेईन मी हातात रुमाल ...इतका साधा-सरळ विषय पण लेख निव्वळ अप्रतिम ... :)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !