जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, March 26, 2009

होउन जाऊदे!!!

नवे वर्ष नवी सुरुवात
नव्या यशाची नवी रुजवात
आरंभ होई चैत्रमासीचा
गुढ्या तोरणे सण उत्सवाचा
कवळ मुखी घालू गोडाचा
साजरा दिन हो गुढीपाढव्याचा!
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
काल रात्री झोपताना वाटले, " उद्या नवीन वर्ष सुरू होणार. म्हणजे काय वेगळे होणार, सूर्य तर रोजच्याच वेळेला उगवणार. " खरंच की प्रत्यक्षात काहीही वेगळे होणार नाही. आपणही तेच, कामेही तिच, अडचणीही त्याच.

आज सकाळी उठल्यावर जाणवले, हे सारे असले तरी ॠतू कूस बदलून गेला. बर्फाने गारठून काड्या झालेल्या झाडांवर दिसतील न दिसतील असे कोवळे धुमारे डोकावू लागलेत. पक्ष्यांचे कूजन कानी पडू लागले आहे. दिवसाची लांबी वाढू लागलीय. मन प्रसन्न झाले.

आजकाल बरेच जण संकल्प करीत नाहीत. केलेले संकल्प पुरे होत नाहीत आणि मग खंत वाटत राहते. मला वाटते, ह्या खंतावण्या साठी तरी संकल्प करायला हवेत. त्याचे अनेक फायदे आहेत. संकल्प केला की किमान पंधरा दिवस तरी त्याच्या साठी प्रामाणिक प्रयत्न आपण करतो. ते सगळे दिवस आपण स्वतःवर खूश असतो. दुसऱ्याला संकल्प करण्यास प्रर्वूत्त करतो. (समाजकार्यही झाले बरोबरीने ) पुढे आपण जरी ढेपाळलो तरी मधून मधून पुन्हा प्रयत्न करतो. उदा. व्यायामाचा संकल्प, कितीतरी फायदे. पंधरा दिवसांनी आपलाच चेहरा आपल्याला तरतरीत दिसतो. उत्साह वाढल्याचे जाणवते. आठवड्यातला एक दिवस आपल्या आवडीचा पदार्थ मनसोक्त खाण्याचे सुख. प्रयत्न मनावर घेऊन केलेच तर आवडते ड्रेस घालण्याचा आणि ते होत आहेत ह्याचा आनंद. किमान काही रोगांना प्रवेश बंद ची पाटी दाखवता येईलच. ट्रीपला गेल्यावर हृदय आत्ता बाहेर येते की मग असे न होता, सगळ्यांबरोबर चालून मजा घेण्याचा आनंद. अजून बरेच आनंद. आता संकल्प न करून ह्या आनंदांना का बरं पारखे व्हायचे?

चला तर मग मंडळी नवीन वर्षाचे स्वागत आणि मनाशी यादीतील पहिला संकल्प. होऊन जाऊदे!!!

No comments:

Post a Comment

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !