जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, November 6, 2012

रव्याचे लाडू

दिवाळी आलीच आहे. घराघरातून खमंग वास येऊ लागलेत. दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी जोरावर आहे. हल्ली गोडधोड डाएटींग मुळे मागेच पडलेय. वर्षभर काय ते डाएटबिएट तब्येतीत करावे आणि दिवाळीत मनाचे लाड करावेत. म्हणूनच निदान दिवाळीच्या मंगलमयी पहाटे... सकाळीही चालेल....( का ते कळले नं... " लाडू खायला नरकात पडलेले असलो तरी नो प्रॉब्लेम... :) " ) लाडू खायचेच. घरभर पणत्या, कंदील, माळांची रोषणाई...  आजी-आई, पहाटे उठवून तेल-उटणे लावून, न्हाऊमाखू घालत. की लगेच फटाके उडवायला आम्ही मुले पळायचो. मागोमाग त्या दोघींनी अतिशय उत्साहाने प्रेमाने केलेल्या फराळाचे ( बेसनाचे, रव्याचे लाडू, करंज्या, शंकरपाळे, चिवडा, चकली, कडबोळ्यांनी... ) भरलेले ताट... आधी डोळे तृप्त होत मग गप्पांमध्ये ताट कधी फस्त होई कळतही नसे. आताशा आजी वरून पाहतेय.... आई करायला तय्यार पण अंतराचा टप्पा कसा पार करायचा या चिंतेत. तसे कुरियर करता येईलही पण त्या फेडेक्स/ डिएचएलमधून कशी व्हावी ' ती ' अनुभूती.... सगळीकडे समझोता एक्सप्रेस धरावीच लागते. आठवणी आहेतच आणि त्या तश्याच नाही तरी जमतील तश्या ताज्या करणे आपल्याच हाती आहे. :)

चला तर फराळाचा श्रीगणेशा रव्याच्या लाडूने करूयात... :)

 ' रव्याचा लाडूखरं तर सोप्पा. गणित सहज जमून जाते....  ज्याला जमते त्यालाच. बहुतांशी भाजण्यात फारसा घोळ होत नाही. पण जर का पाक थोडा जरी अल्याड किंवा पल्याड झाला... की फज्जा ! गुलाबजामचा पाकही होता नये आणि गोळीबंदही होता नये. गोळीबंद झाला की भगरा हमखास ठरलेला. लाडू वळता वळेनासा होऊन जातो. मग तुपाची भर... दुधाचे हबके असे करत करत चुकलेल्याची गाडी वळत्यावर आणावी लागते. म्हणून शक्यतो पहिल्याच फटक्यात जमवायचाच.

वाढणी : मध्यम आकाराचे वीस-बावीस लाडू होतील.

साहित्य :

तीन वाट्या बारीक रवा

अडीच वाट्या साखर

पाऊण नारळाचा चव

एक वाटी पातळ केलेले तूप

आठ दहा वेलदोड्याची पूड

थोडे बेदाणे

कृती :

पातळ केलेल्या तुपात रवा मध्यम आचेवर खमंग भाजावा. एकीकडे वेलदोड्याची पूड करून घ्यावी. रव्याचा रंग थोडासा तांबूस दिसू लागला की खवलेले खोबरे घालून नीट एकत्र करून मिश्रण पुन्हा भाजावे. खोबरे गरम रव्यात घालताच रवा एकदम फुलल्यासारखा दिसू लागेल. खोबर्‍यातला ओलेपणा पूर्णतः जाईल इतके पक्के मिश्रण भाजायला हवे.

एका भांड्यात साखर घेऊन त्यात वाटीभर पाणी घालून एकतारी पाक करावा. पाक करताना गॅस समोरून हालू नये. साखर विरघळली की चार -पाच  मिनिटातच किंचित किंचित बुडबुडे येऊ लागतील. अजून दोन मिनिटांनी दोन बोटांमध्ये पाकाचा थेंब घेऊन तार येतेय का पाहावे. पाक पक्का एकतारी झाल्यावर एखादा मिनिटभर आंचेवर ठेवून बंद करावा. उष्णतेमुळे गॅस बंद केला तरी प्रक्रिया होत राहते. तशी व्हायला हवी म्हणून मिश्रण लगेच घालू नये. दोन-तीन मिनिटांनी घालावे.

वेलदोड्याची पूड भाजलेले खोबरे-रव्याचे मिश्रण पाकात घालून एकत्र करून ठेवावे. दर पंधरा-वीस मिनिटांनी मिश्रण पुन्हा नीट एकत्र करावे. तीनेक तासात लाडू वळता येण्यासारखे होईल. वळायला घेण्याआधी हे मिश्रण खूप मळून घ्यावे. मिश्रण मळल्यामुळे हलके होऊन तूप सुटते. चुकून पाक दोनतारी झाला तरीही मळल्यामुळे लाडू वळले जातात. मग प्रत्येक लाडवाला बेदाणे लावून लाडू वळावा. बेदाण्यासोबत बदाम काजूचे छोटे काप किंवा पूडही घालता येईल. ( ऐच्छिक )टीपा :

लाडूंसाठी बारीक रवा घ्यावा. उपम्याचा घेऊ नये. उपम्याचा घेतला तरी लाडू चांगलेच होतात चवीला पण थोडे जाडेभरडे दिसतात.
लाडवात पेढे ( कुस्करून घ्यावेत ) किंवा खवा ( मोकळा करून घ्यावा ) घालायचा झाल्यास चमचाभर तुपावर भाजून घेऊन रवा-खोबर्‍याबरोबरच पाकात घालावा. मात्र यासाठी पाक दोनतारी करायला हवा.

रवा भाजताना आंच नेहमीच मध्यम ठेवावी. जेव्हा थोडा शांतपणे वेळ असेल तेव्हाच करायला घ्यावा. घाईघाईने उरकून टाकू नये... बिघडण्याची शक्यता दाट.

लाडू बिघडलाच तर थोडे तूप गरम करून घालून मळून वळता येतो का ते पाहावे. पाक कमी ( कच्चा ) झालेला असेल तर थोडासा रवा तुपावर भाजून घेऊन घालावा.

पाक गोळीबंद झाला आहे असे वाटले तर पाण्याचा एक हबका मारून वितळवून घेऊन एकतारी पक्का पाक करावा. मगच मिश्रण घालावे. हे फार सोपे चटकन करता येते. त्यामुळे पुढले संकट टळते.

19 comments:

 1. परत ब्लॉगिंग सुरु?? छान गोड शुभारंभ केलास.

  ReplyDelete
 2. आपल्या पेणच्या ट्रिपपर्यंत तरी माझा असा समज होता की समोर असणारा रव्याचा लाडू हा प्रकार ज्याने केलाय त्याच्या समोर कधीच खाऊ नये, त्याला वाईट वाटते. कारण एकतर तो फोडायला किती जोर लावायचा याचा आपल्याला अंदाज येत नाही. लाडू एकतर फस्सकन फुटून रांगोळी तरी घालतो किंवा कितीही ताकद लावली तरी फुटतच नाही. मग लाटणे, बत्ता, दातांनी कोरुन खाणे असे पर्याय उरतात. पण पेणला खाल्लेला (rather खाल्लेले) लाडू.... ह्म्म्म्म... हाय अल्ला... जाने कहॉं, कब, कैसे होगा उनसे मिलन !

  ReplyDelete
  Replies
  1. हाहा... लाडू करणार्‍यालाही वाईट वाटायला नको आणि खाणार्‍याचीही झटापट दिसायला नको म्हणूनची तुझी पॉलिसी परफेक्ट !

   ते लाडू एकदम मस्त झालेले नं!

   बाकी पुन्हा मिलना... नेक्स्ट आऊटिंगला... नाहितर घरी.. :)

   आभार्स!

   Delete
 3. इशानू खुश आज लाडू पाहुन ... रव्याचे लाडू आणि जिलेबी याउपर काहिही गोड त्याला आवडत नाही :)

  बयो मला पाठव गं पार्सल, नाहितर अमितला रेसिपी वाचायला सांगते :)
  मस्त दिसताहेत लाडू.....
  (बाकि अमितने विचारलेय त्याला हवीये ती पोस्ट कुठेय :) )

  ReplyDelete
  Replies
  1. आता पुढल्यावेळी तू माझ्याकडे मुक्कामाला ये. मग इशान नेहमीच हॅप्पी ! :)

   जरा जवळ तरी राहायचेस की बयो... धाडले असते नं...

   अमितला म्हणाव येतेय पोस्ट लवकरच!

   Delete
 4. Mala khupach avadtat Rava ladu. aajach vichar kela hota nidand rava bhajun tari thevava. Pan jamlech nahi. :( aata udya nakki karnarach. Tondala pani sutle. :P
  -Vidya.

  ReplyDelete
  Replies
  1. विद्या, अगं किती दिवसांनी दिसते आहेस. मस्त वाटले बघ तुझा अभिप्राय पाहून.

   कर कर गं आजउद्याकडे. :) आणि सांगशील कसे झाले ते.

   धन्यू धन्यू !

   Delete
 5. वाह....काय सुंदर दिसताहेत गं....
  किती दिवसांनी ब्लॉगवर आलीस असं रागाने कसं विचारणार नं... :P

  अवांतर - माझी एक इस्ट कोस्ट मधली मैत्रीण आमच्याकडॆ येताना रव्याचे लाडू बनवून आणायची अगदी तस्सेच दिसताहेत म्हणून चाखल्यासारखे पण वाटतात... :)

  लिहिते रहो...:)

  दिपावलीच्या जरा आधीच शुभेच्छा.

  ReplyDelete
  Replies
  1. चला या लाडवांमुळे तुझ्या कृतककोपातून बचावले मी. :)

   बाकी ईस्टकोस्टातल्या मैत्रिणीमुळे चाखल्यासारखेही वाटतात हे छानच... तुला चवही मिळाली !

   तुम्हालाही दिवाळीच्या अनेक शुभेच्छा !

   आभार्स!

   Delete
 6. दिवाळी येती घरा.. श्री लाडू करी भरा भरा.. :) सुरुवात झालेली आहे हो.. :D

  ReplyDelete
  Replies
  1. सुरवात झालेली आहे हो... :):)

   Delete
 7. ही पोस्ट आणि पोस्टमधला फोटो मला दिसत नसल्याने कमेंटले जाणार नाही ;)

  ReplyDelete
  Replies
  1. हीही... काय सायबा आता चाखल्यावर तरी दिसतेय का? :D :D

   Delete
 8. हेरंबच्या आधी माझा नंबर.....खाल्या लाडवाला जागून कमेंट करायला आलेय...अगं कसले सुंदर होतात हे पण ते फ़क्त तुझ्याच हातचे...:)

  रच्याकने, तुझी सेलेब्रिटी पोस्ट माझ्या ब्लॉगरमध्ये दिसलीच नव्हती. मी आपली लाडूंसाठी आले.... असो...
  आता एकदा तुला हे लाडू करताना पाहायचंय (आणि पुन्हा खायचेय)....ऋषांकच्या आजच्या वाढदिवसाची ट्रीट..:)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !