तसे अनेकांनी वेगवेगळ्या मन:स्थितीत माझ्यावर राज्य केलेय. मोह घातलाय. हसवलेय, रडवलेय... काहूर माजवलेय. विषण्ण केलेय. स्तब्ध केलेय. खांडेकर, खानोलकर, कर्णिक, पेंडसे, नवरे, माडगूळकर, ह.मो., केशवसुत, अत्रे-कुमार, कुसुमाग्रज, दळवी, पुलं, नेमाडे, तांबे, करंदीकर, माधव ज्यूलियन, गो. नि., पाडगावकर, पु. भा. भावे, बोरकर, आरती प्रभू, रवींद्र भट, वपु, सुशि, इंदिरा संत, विभावरी शिरुरकर, मतकरी, शांताबाई, इनामदार, रणजित देसाई, बहिणाबाई, इरावतीबाई, गौरी, सानिया, ग्रेस, सुरेश भट, नांदगावकर, महानोर... यादी न संपणारीच. या सगळ्यांची पुस्तके म्हणजे रत्न आहेत. तिही डागहीन. निखळ भिडणारी. अंतरंगी उतरत जाणारी.
वाचता वाचता मनात सहजी उमटत जाणारे हे भाव....
शब्दामाजी जगण्याचा प्रत्यय येई
शब्दातूनी होतसे अंतरंग घडाई
सुटावी अनन्य मोहाची चढाई
आत्म्याची देवापाशी मुक्ताई...
या सगळ्यांचीच मोहिनी अखंड असली तरी काहींची निर्विवाद अर्निबंध सत्ता माझ्या मनावर नेहमीच अधिराज्य करून आहे. जितके वाचावे तितक्या लडी उलगडत जाव्यात, विविध भाव समोर यावेत... परंतु ही ही माणसेच आहेत. प्रत्येक जीवाच्या जगण्याला अनेकविध पदर असतात... असणारच... हे गृहीत धरल्यानंतरच त्या शब्दातली सखोलता किंचितशी समोर येईल. आरती प्रभूंच्या अनेक कवितांनी असेच माझ्यावर गारुड केले आहे. त्यातलीच एक ही... नेहमीच भावलेली...
ही निकामी आढ्यता का?
ही निकामी आढ्यता का? दाद द्या अन शुद्ध व्हा
सूर आम्ही चोरतो का? चोरिता का वाहवा
मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली
न्या तुम्ही गाणे घराला फूल किंवा पाकळी
आरती प्रभूंच्या कवितांमध्ये, शब्दांमागल्या गर्भित अर्थाने, जीवनाच्या क्वचित देखण्या व नेहमीच भीषण भयानकतेनं भरलेल्या स्वरूपाचा प्रत्यय आपल्याला वारंवार येत राहतो. या जगाचे हे विचित्र वरपांगी सोकॉल्ड सुखी जीवन - लपलेले दुभंगलेपण... पवित्रतेत दडलेली अपरिहार्य अपवित्रतता... सुखामाजी दडवलेले दु:ख, फसवणूक. मानवी मन आणि निसर्गाची निरनिराळी रुपे यांची अचूक उत्कट सांगड..... डोहाचा तो हिरवागुढ गडद घट अन त्याच्या तळाशी मनातली सर्वोच्च ( मानलेली ) दु:खे, काळजाचा लचका तोडणारी सत्ये.... आणि काठावर ओठांच्या घट्ट बंद महिरपीखाली सुखाचा अंगरखा घालून वावरणारी ज्याची त्याची तोल सावरण्याचा प्रयत्न करणारी दुबळी कुडी...
या छोट्याश्या जगण्यातही कितीदा ही कुचकामी आढ्यता सर्वत्र दिसत राहते. निसर्गालाही दाद द्यायची जिथे तयारी नाही तिथे मानवी संबंधाची ती काय तमा. मनाची कवाडे, डोळ्यावर झापडे( अहंमची ) लेऊन बंद केलीत. आपणच आपल्याला निकामी करत चाललोत. कशालाही दाद देणे ही प्रतिक्षिप्त क्रिया सहज उत्स्फूर्त उमटणेच दुर्मिळ झालेय. केवळ सुदैव म्हणून या सुंदर जगात आपण आलोत. उत्कट सुंदरतेचा आस्वाद तितक्याच उत्कटतेने घेण्यातही होत असलेला हिमटेपणा विषण्ण करणारा आहे. या घररूपी मैफिलीची सजावट केवळ तुमच्याच हाती असूनही क्षुद्रश्या कपाळावरील आठीची ( अहंमची ) मिजास जोपासती मने कवीला खटकतात.
दाद देणे हे हि गाण्याहून आहे दुर्घट
गुंफणे गजरे दवांचे आणि वायुचे घट
नम्र व्हा अन सूर जाणा जीवघेणा रंग हा
साजरा उधळून आयु हो करावा संग हा
किती यथार्थ शब्द आहेत... दाद देणे हे हि गाण्याहून आहे ( का ) दुर्घट... कवीचा खडा सवाल. गुंफणे गजरे दवांचे आणि वायुचे घट.... पुढे जाऊन दिलेला हा अशक्य दाखला.
खरेच साधेल का कधी त्या अर्धमावळत्या चंद्राच्या अन पहाटेच्या पहिल्या प्रहराच्या साक्षीने अलगद उतरलेल्या तृणपात्यावरील त्या पवित्र दवमोत्यांची माला बांधणे... कवीच्या आत्यंतिक तरल मनाची साक्ष देणारे हे शब्द.
पुढे ते म्हणतात... " नम्र व्हा अन सूर जाणा जीवघेणा रंग हा..." अनेकदा माणसाचे मन सरड्यासारखे सगळे रंग धारण करेल परंतु नम्रता ही मुळातच असावी लागते. ती प्रयत्नाने रुजवता येते... जोपासता येते. परंतु हा प्रयत्न उभा जन्म करावा लागतो. ज्याला या नम्रतेचा सूर उमगला त्याला जीवनाचे महत्त्व अन स्वत:ची क्षुद्रता जाणवेल. अन तोच स्वत:ला समर्पित करून जीवनाशी मनाची सारी कवाडे उघडून संग करेल.
चांदणे पाण्यातले की वेचिता येईल ही
आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही
ना परंतु सूर कोणा लाविता ये दीपसा
सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा
काय विलक्षण भाव आहेत हे. जे चांदणे आकाशी नांदते आहे... जे सदैव अप्राप्यच आहे ते केवळ पाण्यावर उतरलेय म्हणून ओंजळीत वेचता येईल? कदाचित येईलही. निदान तसा आभास तरी निर्माण करता येईल अन स्वत:चीच समजूतही घालता येईल. काळोखात चिमटीत धरलेला पारा पाहायला तिमिर छेदणारा उजेड नाहीच तिथे. तिथे हे शक्य आहेच. मनाचा आगळाच रंग !
या दोन्ही.. " पाण्यावरील चांदणे वेचणे अन काळोखात पारा धरू पाहणे... " विलक्षण तरल प्रवाही प्रतिमा ! कवीच्या समर्थ प्रतिभेची स्फटिकेच जणू. जे अप्राप्य आहे तेच धरू पाहण्याचा अट्टाहास करता सहज समोर असलेले विसरण्याचा दुर्लक्ष करण्याचा विचित्र अनाकलनीय मनुष्य स्वभाव.
पुढे ते म्हणतात, ज्योतीतला त्यागमय प्रकाश... स्व(ता :) ला पणाला लावून जीवनाचा गाभारा उजळण्याची क्षमता इतकी सहजी कोणाला साधत नाही कारण त्यासाठी नुसता प्रकाश असून भागत नाही तर अंतर्यामी झोकून देऊन तम छेदण्याचा भाव असायला हवा.
" सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा... " प्रवाहाबरोबर पोहणे अशक्य. जीव विद्ध झालाय जगाचे फटकारे सोसून. प्रत्येक श्वासामागले-शब्दामागले सत्य ती कडवट घुसमट आहे. विलक्षण तरल वृत्तीमुळे कवीच्या संपूर्ण शरिरी व अशरीरी जाणिवा एकमेकीत तादात्म्य पावल्यात. प्रतिमांची ही देखणी बोली आरतींच्या सगळ्या कवितांची... कवी मनाची शब्दाशब्दातून साक्ष देत राहते. गारुड करते राहते.
येथे ऐकता येईल