जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, February 6, 2011

राधाक्का...

वाड्यातल्या त्या काहीश्या अंधार्‍या, कोंदट, पोपडे उडालेल्या भिंती. आठवड्यापूर्वी शेणाने सारवलेल्या जमिनीला शुष्कतेने पडलेल्या भेगा. धगधगलेल्या चुलीतून भसभसून निघणारा, ज्याला खिडकीपेक्षा खिंडार म्हणणे योग्य ठरेल अश्या मोठ्या भगदाडातून, मोकळा होण्यासाठी झेपावणारा काळा धूर. राधाक्काचा कोंडलेला, घुसमटलेला श्वास. ओली लाकडे पेटवताना फुंकणी फुंकून फुंकून कोरडा पडलेला घसा. तिच्या संपूर्ण जीवनाची धग दाखवत रसरसून लालबुंद झालेला चेहरा. भगदाडातून संधी मिळताच धुराला बाजूला सारत मुसंडी मारून घुसलेली सूर्याची किरणे. त्यांचा तयार झालेला धूमकेतूच्या शेपटीसारखा एक लांबलचक पट्टा. त्यात बंदिस्त होऊन फिरणारी निरनिराळी तुसे, तंतू, कण अन त्यातच मुक्त भरकटणारे राधाक्काचे ' मन ', तिची स्वप्ने, तिच्या आयुष्याला पुरून उरलेले तिचे अविरत कष्ट, तिच्या व्यथा, क्वचित मिळालेली सुखं. तिची सगळ्यात मोठी मिळकत... तिची आठ मुले व त्यांच्याभोवती फिरणारे तिचे संपूर्ण जीवन. सगळे कसे त्यांच्या त्यांच्या जागा नेमून दिल्यासारखे त्या पट्ट्यात रोज गरगरे. काही तुसं विरळ होत होत नाहिशी होत तर कधी बंड करून तिथल्यातिथे विरून जात. काही तंतू बंध तोडून, ती नेमून दिलेली चाकोरी तटकन भेदत इकडे तिकडे सैरावैरा पळत तर काही नेमक्या जागी राहून हा पसारा अलिप्त न्याहाळत. ना किरणं त्यांचा क्रम चुकवत ना हा तुकड्यांचा पट्टा. सातत्याची महती सांगणारी जीवनाची कहाणी अविरत वाहत राही.

चुलीवर अन्न रटरटू लागे. डोह डुचमळवून उरापोटी भिरकावलेला एखादा दगड राधाक्का बाहेर काढे. मग त्या दगडाच्या भिंती त्यांना न फोडता शिताफीने भेदण्याचा तिचा रोजचा आवडता खेळ सुरू होई. परातीत घेतलेल्या कणकेची एक सुबक मोट बांधून होईतो त्या भिंती तिला आपलेसे करत. तिंबलेली कणीक गोळ्या गोळ्यात वाटली जाई. प्रत्येक गोळ्याची निगुतीने चौपदरी घडी होई. दगडाचे पदर सुटे सुटे होत अलवार उलगडू लागत. त्यातले कणभर सुख मणाचे दु:ख मागे सारे. त्या निसटलेल्या सुखाच्या तुकड्याची उब तिच्या दुबळ्या, बांगड्या पिचलेल्या मनगटांना बळ देई. एका तालात मनगटे हालू लागत. चौपदरीचा वाटोळा चंद्र तयार होई. एकसारखा... एकसंध. कुठे जाड नाही की कुठे पातळ नाही. तिचा न्याय कायम तोललेलाच. जगाने इतका दुजाभाव, मतलब दाखवूनही तिची चाल प्रेमाचीच गाणी गाई. चुलीखालची लाकडे त्या पिचलेल्या बांगड्यांत उरलेल्या किणकिणीत समरसून धगधगू लागत. तवा रसरसून उठे. दोन्ही डोळ्यात फुल पडलेली राधाक्का तव्याच्या मध्यावर तळहात ठेवून त्याला चाचपे. त्वचेचा चर्र आवाज ' कसा ऐकू आला म्हणजे वाटोळा चंद्र हसरा होईल ' याचे तिचे गणित पक्के होते. पाहता पाहता पौर्णिमेच्या चंद्रावर मोजके मातकट ठिपके उमटलेली, आतडी पेटवणारी खरपूस रास टोपलीत रचली जाई. बुडी मारली तरी डाळीचा कणही सापडणार नाही असे फोडणी दिलेले पिवळसर पाणी व डाव्या बाजूला उगाच बोटभर तेलात खललेले तिखट मीठ घेत आठ पोरं पंचेंद्रिये एकवटून राधाक्काने वाटून दिलेले सुग्रास अन्न चवीचवीने खात. दमलेल्या मनगटांची गती किंचित सैलावत मायेचे कान प्रत्येकाच्या मिटक्यांतून आजच्या दिवसाचे सार्थक आनंदून ऐकत राही.

पोटाची खळगी तूप्तीने हुंकारू लागली की सगळी पांगत. पांगताना टोपलीतल्या चंद्रांची मोजदाद भिरभिरते डोळे करत. संध्याकाळी फक्त पाणी का त्या पाण्यासोबत एखादा चतकोर मिळेलची चाचपणी चोरटेपणाने होई. आजूबाजूचा वावर राधाक्काचे कान टिपत पण आता तिचे त्यातले लक्ष उडालेले असे. आजचा दगड तिचा आवडता. सुखाची रास घेऊन आलेला.....

" नुकतेच नहाण आलेली दहा वर्षांची परकरी पोर, राधा. कालपर्यंत सुरपारंब्या, झिम्मा, फुगडी, आट्यापाट्या खेळणारी, पिसासारखी आनंदाने तरंगणारी राधा, सगळ्यांच्या दृष्टीने अचानक मोठी झाली. तिच्या पाठवणीची बोलणी दिवसरात्र वाड्यात घुमू लागली. तिकडून निरोप आला, " घ्यायला येतो. " त्या क्षणी राधेची, राधाक्का झाली. घरावरचे हक्क बदलले. " हक्काचे घर तिकडचे बरं आता राधाबाई. इथे माहेरवाशिणी सारखे यायचे आता चार दिवस. " या बोलांचा अर्थ त्या बालजीवाला कळला नाही तरी त्यामागचे भाव उमगले. तिकडून येणं झालं आणि राधाक्का आज खर्‍या अर्थाने सासरी निघालेली. पैठणी नेसलेली, सोन्याने वाकलेली तिची इवलीशी कुडी आईला सोडून जायचेय या कल्पनेनेच गदगदलेली. आता आई कधी भेटेल? मैत्रिणींसंगे कधी आट्यापाट्यांचा डाव पडेल. आईची सय आली की मी कोणाच्या कुशीत शिरू?? नुसती प्रश्नांची माळ गुंफली जाऊ लागली. उत्तरे नसलेली प्रश्नांची माळ. "

निघताना काकीसासूबाईंना आई म्हणाली, " आमच्या राधेला ना वरणावरचे पाणी खूप आवडते हो. कधी मधी.... " आईचे ते वाक्य पुरे होण्याआधीच काकीसासूबाई उद्गारल्या, " राधेच्या आई तुम्ही मुळीच चिंतीत होऊ नका. अहो डोणीत बुडी मारून शोधली ना तरीही डाळ दृष्टीस पडायची नाही इतके मोठे खटले आमचे. कधीमधी कशाला रोज मिळेल हो. " खरेच काकीसासुबाईंनी दिलेला शब्द कधी मोडला नाही. तेव्हाही नाही आणि त्यांच्या माघारीही नाही. राधाक्काच्या डोळ्यातून दोन अश्रू ओघळले, सुरकुतलेल्या गालांना गोंजारत हनुवटीवरून तळहातावरच्या आजच्या चर्रवर पडले. चटक्याचा दाह थोडासा निमाला. राधाक्काने हलकेच कवाड लावले. दगडाच्या भिंती पुन्हा लिंपल्या. अन ओंजळीतले ते क्षण पुन्हा डोहाच्या तळाशी सोडून दिले. डुबुक.... डोह थरथरला. ते छोटेसे तरंगाचे वर्तुळ शांत झाले. गुढतेची झूल पांघरून डोह पुन्हा पूर्ववत गडद, अगम्य झाला.

" माये, अगं जेवतेस ना? हे बघ तुझे ताट वाढलेय. कुसूमने गरम गरम दोन भाकर्‍या टाकल्यात बघ तुझ्यासाठी. आणि तुला माहितीये का, परवा एक पोह्याचा पापड लपवून ठेवला होता शामने. त्याची चटणी तुला खूप आवडते ना... ती वाढलीये करून. ऊठ ऊठ चुलीसमोरून. पोतेरे घालू दे मला. " कमळी राधाक्काला उठवत होती. फक्त सोळा वर्षाची विधवा पोर माझी. काय आहे हिच्या नशिबात देवच जाणे. किती समजुतीने बोलत असते आजकाल. पोरं मोठी झालीत. मायेचे कष्ट, पोरांच्या करणीतून दिसू लागलेत. धूमकेतूच्या शेपटीतल्या दु:खाच्या थिजलेल्या काळ्या गडद पुंजक्याला खिंडार पडू लागलीत. इवल्या इवल्या मूठी, जोर लावून सर्वशक्तीनिशी राधाक्काचा वर्तमान उजळायचा प्रयत्न करत आहेत. ही माझी आठ किरणे सदैव तेजस्वी ठेव रे देवा. ओचा सोडून हाताने चाचपडत राधाक्का चुलीसमोरून उठून भिंतीशी पाठ टेकून उजवा पाय उकिडवा ठेवून बसली. पदराने चेहरा पुसून त्याच्या शेवेत तिने दु:खाची गाठ मारली. कुसुमने केलेल्या भाकरीचा तुकडा चटणीला लावून तोंडात सारून सुखाची चाहूल घोळवत राहिली.

चुलीवर पाण्याचा हबका मारून कमळीने मागे वळून पाहिले. मायेच्या पांढुरक्या राखाडी बुबळातून उमलणारी समाधानाची साक्ष पाहून ती हरखून गेली. मोरीच्या कट्ट्यावर बसून भांडी विसळीत असलेल्या शामशी तिची नजरानजर झाली आणि दोघी खुदकन हसल्या. समाधानाचा एक त्रिकोण पूर्ण झालेला...


काही माणसे भक्ती करावी अशीच असतात. त्या भक्तीची सुरवात या माझ्या राधाक्केपासून ( माझी आजी - आईची आई ) झाली. तिच्या जीवनाचे, माझ्या हाती लागलेले काही तुकडे... या डोहाची खोली लागणे शक्यच नाही. काही घटना तिने स्वतः वर्णन करून ऐकवल्यात. काही तुकडे मी अनुभवातून वेचलेय काही सगळ्यांच्या तोंडून हृदयावर कोरलेत....

25 comments:

  1. कसलं जबरदस्त लिहिलंस ग...सलाम तुला हे तुकडे इतक्या सुंदर शब्दरचनेत वेचल्याबद्दल...
    नि:शब्द झाले मी...

    ReplyDelete
  2. आभार गं अपर्णा. :)

    ReplyDelete
  3. तायडे अगं कसलं जीवघेणं लिहीलं आहेस गं...

    तू बोलते आहेस जणू सगळं असं वाटत राहिलं. एक एक वाक्य अप्रतिम उतरलय गं, किती मनात रुजलेली असतात ना काही व्यक्ती आपल्या....

    जियो बयो!!

    ReplyDelete
  4. ताई शब्द नाहीयेत माझ्याकडे! :(

    ReplyDelete
  5. श्री,

    अप्रतिम !!

    ReplyDelete
  6. जिवंत चित्र उभ केलत तुम्ही :-)

    ReplyDelete
  7. सुंदर शब्दचित्र....'त्यांचा तयार झालेला धूमकेतूच्या शेपटीसारखा एक लांबलचक पट्टा. त्यात बंदिस्त होऊन फिरणारी निरनिराळी तुसे, तंतू, कण अन त्यातच मुक्त भरकटणारे राधाक्काचे ' मन '...
    सुंदर! :)

    ReplyDelete
  8. दोन-तीन वेळा वाचलं हे. कळतच नाही काय प्रतिक्रिया देऊ. एकदम थिजल्यासारखं झालं.. पहिला परिच्छेद, ते धूमकेतूचं वर्णन वगैरे फारच सुरेख आणि नंतर एकदम कलाटणी.. चटका लावणारं लिहिलं आहेस !

    ReplyDelete
  9. काय लिहु..खुपच सुंदर लिहिले आहेस...निशब्द केलेस बघ.... मी नेहमी म्हणते नं...तुझ्या लेखणीत जादु आहे..अशीच लिहीत रहा गं...

    ReplyDelete
  10. तन्वे, खूप खूप आभार गं. :)

    ReplyDelete
  11. धन्स रे विद्याधर.

    ReplyDelete
  12. अरुणदादा, अरे किती आनंद झाला मला तुझी प्रतिक्रिया पाहून. :) आभार्स...

    ReplyDelete
  13. धन्यवाद सविता. :)

    ReplyDelete
  14. अनघा, अगं तुला भावले पाहून आनंद झाला. धन्यू गं.

    ReplyDelete
  15. हेरंब, थंडीचे निरनिराळे इफेक्ट... :D

    ReplyDelete
  16. उमा, काय गो सकाळी सकाळी फिरकी... :D, मला माहितीये तू मनापासून लिहीलेस. खूप खूप आभार्स बयो. :)

    ReplyDelete
  17. मी अन फिरकी...अस का म्हणतेस तु???मी परवा .तुला मेल मधुन काय बोल्लेले...तु हात दुखतोय म्हणुन बसुन राहिलीस तर सग्ळ्यात जास्त तोटा आमचा...

    ReplyDelete
  18. श्री ताइ...प्रतिक्रिया काय लिहु हेच समजत नाही आहे...खुप जबरदस्त लिहल आहे.

    ReplyDelete
  19. सुंदर!!! भाग्यश्री, तू खूप patiently लिहतेस गं... खरंच नवल वाटतं.

    ReplyDelete
  20. First time on this blog;first ever post I read written by you,and now I am your Fan.Great,Great,Great.Really running out of Words

    ReplyDelete
  21. अनिकेत, ब्लॊगवर स्वागत आहे. :) पोस्ट आवडल्याचे वाचून आनंद झाला. अभिप्रायाबद्दल अनेक आभार.

    ReplyDelete
  22. योमू, धन्यू रे. :)

    ReplyDelete
  23. हा हा... ह्म्म्म. श्रीराज, तुला जाणवले हे पाहून छान वाटले. आभार्स.

    ReplyDelete
  24. सुंदर शब्दरचना- व्यवस्थित उतरले आहेत विचार मनातले.

    ReplyDelete
  25. महेंद्र, अनेक धन्यवाद !

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !