" ब्लॉगबाळ " काल दोन वर्षांचं झालं. याचा वाढदिवस असणं आणि नेमकं त्याचवेळी मी प्रवासास जाणं, हा योगायोग दोन्ही वेळी झाला. गंमतच आहे. काल पोस्ट टाकणे अशक्यच होते. पण माझ्या मैत्रिणीने '
उमाने ' खास लक्षात ठेवून शुभेच्छा व केक बझवर टाकला. खूप खूप आभार्स बयो! जी खूश हो गया!!

आजकाल वाढदिवस या शब्दानेच मला कापरे भरते. मेली ' कशाकशाची ' जाणीव ठळकपणे होते.

आत्ता आत्ता पर्यंत आरशात पाहून, नटणे-मुरडणे, गिरक्या मारणे, स्वतःच स्वतःच्या प्रेमात पडणे, ( हे लिहिता क्षणीच... , " खर्रच?? वेडपट कुठली... असे स्वतःलाच म्हणत काढलेली मोठ्ठी जीभ.....

" ) प्रकार सुरू होते. आता किती जमेस धरता येईल चा हिशोब आणि आरशापासून लांब लांब पळावेच्या स्थितीशी मन रेंगाळू लागलेय. असेही, " म्हातारे जरा धडपड कमी कर " म्हणत
तन्वी, अंमळ दमात घेत असतेच.

तरीही या बाळाच्या वाढदिवसाची दखल घ्यायला हवीच. काहीसे उदास, व्याकुळ झालेले मन याच्या आगमनाने, चहलपहलीने भरून टाकले. सदैव माणसांच्या गर्दीत रमणारी मी, अलिप्त, शून्यवत होत चालले होते. या बाळाने चैतन्य फुंकले. एक अनामिक ओढ निर्माण केली. ' वैयक्तिक आनंद ' मिळवून दिला.
आपण सगळीच कुटुंबासाठी जगतो, झटतो. त्यांच्या सुखात आपले सुखं पाहतो. कित्येक प्रसंगी स्वतःला बाजूला सारून इतरांना प्राधान्य देतो. ती क्रिया इतकी सहज व प्रेमाने केलेली असते की तिला त्यागाचे लेबल जोडावेसे वाटतच नाही. आपण हे असेच केले पाहिजे, ही भावना गृहीत असते. हा सारा पसारा आपण स्वतःला विरघळून टाकून जपलाच पाहिजे हे जितके खरे तितकेच, स्वतःचे जग - अस्तित्व, असणेही गरजेचे. जे मनात येईल ते न संकोचता, खाडाखोड न करता, बेगडीपणा, मुखवटे न चढवता व्यक्त होण्याची गरज. मनाचे कोंडलेपण मोकळे करण्याची गरज. त्यातूनच शब्दांचे पूल बांधत उमलत जाणारा संवाद, ' स्व ' अस्तित्वासाठी अपरिहार्य!
गेली काही वर्षे प्रत्यक्षात तशी मी एकटीच झालेय. आधीचे प्रचंड गोत जुन्या गावीच राहिले. जीवनचक्रानुसार वाहते पाणी बनावेच लागते. मायदेश सुटला... इथे येऊन रुजवलेले बंधही अंतरांच्या परिमाणात दुरावले.... चालायचेच! वर्षातले सात महिने थंडी व पाच महिने तब्येतीत लाड करून घेणारे हिमं, यांच्या सोबतीत जिवंतपणाची लक्षणे गोठायला लागलीत की काय असा प्रश्न वारंवार पडू लागला. मनात नेहमीच अनेक विषय, आठवणी, माणसे, प्रसंग, फेर धरून असतातच. ऊन पावसाचा खेळ सततचा व आवडीचाही. डायरीची अखंड आराधना. ते पृष्ठावर आलेले भाव रिते केल्याशिवाय मन शांत होईना झालेले. तश्यांत या एकटेपणात तुटलेपणाची भावना तीव्र बळावत चाललेली. संवाद खुंटायला लागलेला. अन अचानक एके दिवशी
अरुणदादा व
रोहिणीच्या बोलण्यातून हे विश्व गवसले. त्यांचे ऋण कायमचेच.
मनाला जिवंत ठेवणारी एक ओघवती वाट सुरू झाली. आपल्या समोर प्रत्येक गोष्ट येईलच असे नसतेच. पेपर, बातम्या यातूनही अनेक घटना नजरेतून सुटतात, वाचायच्या राहून जातात. या ब्लॉगविश्वामुळे त्याची नोंद मिळू लागली. राजकारण, समाजकारण, आनुषंगिक चर्चा, संवाद, वादविवाद, मायदेश व देशोदेशीचे पर्यटन, अतिशय तरल भावानुभव देणारे ललित, निरनिराळ्या विषयांना समर्थपणे हाताळत लिहिलेल्या उत्तमोत्तम कथा, नेमक्या भावना भिडवणाऱ्या कविता, आवडीची खादाडी व त्यांची रसभरित वर्णने, फोटू.... अश्या अनेकविध अंगांनी काही वर्षे अडखळत सुरू असलेला हा प्रवास पुन्हा प्रवाहित झाला. अर्थात हे सारे इंटरनेट कृपेनेच शक्य झाले.
अगदी सहज म्हणून सुरू केलेला ब्लॉग दोन वर्षे टिकलाय याचा खूप आन्ंद आहे. सातत्य पहिल्या वर्षाइतके नसले तरी हुरूप तितकाच आहे. गेल्या दोन वर्षातील या लेखन प्रवासाने मला खूप आनंद दिला. अनेक मित्र-मैत्रिणी मिळाल्या. निःस्वार्थी प्रेम करणारे प्रचंड गोत दिले. दोन दिवसांपूर्वीच राजीव ( श्री. फळणीटकर ) यांच्याशी बोलता बोलता किती वाजलेत हा विषय येताच चटकन तुमचे इतके वाजलेत ना? असे म्हणताच, ते किंचित चकित झाले. मायदेशाचे वेळेचे गणित चटदिशी सांगता येईलच पण या ब्लॉगमैत्रीमुळे चक्क देशोदेशीच्या टाईमझोनचे कोष्टक मनात पक्के गिरवले गेले. विचार करावाच लागत नाही या वेळेच्या गणिताचा. काश, शाळेत असताना हे साधले असते....
रोहन मुळे कित्येक वर्षांनी , ' तिकोना गडाचा ' ट्रेक करता आला. तो आनंद अवर्णनीयच!
महेंद्रच्या सततच्या प्रोत्साहनामुळे लिहिते राहण्याचे बळ मिळत गेले. च्यामारिकेत दोन टोकाच्या ठिकाणी असूनही
हेरंब व
अपर्णा या दोघांसमवेत चालणारा रोजचा हल्लागुल्ला अपरिहार्य बनला. या दोन वर्षात अनेक बंध जुळले, त्यांनी सातत्याने व भरभरून प्रेम दिले, जीव लावला. कित्येक वाचकांनी अतिशय नियमीतपणे नोंद घेऊन आवर्जून ती पत्राद्वारे, अभिप्रायाद्वारे पोचवली. त्यातून पांढऱ्यावर काळे उमटवत राहण्याची ऊर्मी बळावत गेली. आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!
नेटभेट व
भुंगाचे आभार्स! दीपक, जवळजवळ नऊ हजार डाऊनलोडस झालेत!! खूप खूप आनंद मिळवून दिलास. धन्यू रे!
कांचनने, ' मोगरा फुलला ' च्या दिवाळी अंकात संपादकीय लुडबुडायला दिले. धन्यू गं. अजून बरेच जण आहेत.... पण....
तीस सेकंदाची वेळ कधीचीच संपलिये. ' आवरा ' चे संगीत लाउड लाउड होत चाललेय. तेव्हां आता कलटी मारावी. काट्याला काट्याने मारावे तसे म्हणत हिमाला बदाम कुल्फीने हुडहुडी भरवतेय.

आपापल्या भौगोलिक क्षेत्रानुसार कुठे कुडकुडत तर कुठे घामाच्या धारांसोबत ती यथेच्छ हाणा.