जिन्नस
चार टेस्पून कुळथाचे पीठ
तीन चमचे तेल
एक मध्यम कांदा चिरून
दोन टेस्पून सुके खोबरे
दोन मध्यम लसूण पाकळ्या, दोन सुक्या लाल मिरच्या
सहा-सात आमसुले, एक चमचा जिरे
थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ
मार्गदर्शन
सुके खोबरे, जिरे व सुक्या लाल मिरच्या भाजून घ्याव्यात. लसूण पाकळ्या व ह्या भाजलेल्या मिश्रणाची पूड करून घ्यावी. कढईत तेल घालून नीट तापले की नेहमीप्रमाणे मोहरी, हिंग व हळदीची फोडणी करून त्यावर कांदा घालून पाच मिनिटे परतावे. नंतर त्यात चार कप पाणी, केलेली पूड, आमसुले व मीठ घालून एकजीव करून मध्यम आचेवर उकळी फुटेपर्यंत ठेवावे. चांगले उकळले की गॅस लहान करावा. आता त्यात कुळथाचे पीठ घालून विरघळवावे. प्रथम गोळे गोळे होतील. मिश्रण एकजीव करत राहावे. बऱ्यापैकी गुठळ्या मोडल्या की पाच मिनिटे झाकण ठेवून एक वाफ आणावी. झाकण काढून हालवून पाहावे गुठळ्या मोडल्या जाऊन मिश्रण छान एकत्र झाले आहे असे वाटले की गॅस बंद करावा. नसेल तर पाण्याचा एक हबका मारून पुन्हा दोन-तीन मिनिटे ठेवावे. वाढताना कोथिंबीर घालून गरम तांदळाची भाकरी व भाजलेल्या पोह्याच्या पापडाबरोबर खायला द्यावे.
टीपा
हे मध्यम तिखट असते परंतु आवडीनुसार तिखटाचे प्रमाण वाढवता येईल. कुळथाचे पिठले अतिशय चविष्ट लागते. ज्यांना आवडते त्यांना अतिशय आवडते अन नाही त्यांना अजिबात आवडत नाही. चव डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला तर न आवडणाऱ्यांनाही आवडू शकते. ( स्वानुभव, )