जाता जाता एक नजर इथेही........

Monday, February 6, 2012

पनीर वडे ( पकोडे )

वाढणी : चार माणसांकरिता

लागणारा वेळ : ४० मिनिटे

साहित्य

अर्धा कीलो पनीर ( शक्य तितके घट्ट असावे )
दोन पेर आले, दहा-बारा लसूण पाकळ्या, दहा-बारा तिखट हिरव्या मिरच्या
मूठभर कोथिंबीर
दिड वाटी बेसन, दोन चमचे तांदुळाची पिठी
एक चमचा हिंग, हळद, दोन चमचे तिखट
चवीनुसार मीठ व तळण्यासाठी तेल

कृती

पनीर कुस्करुन घ्यावे. बारीक भगरा होईल इतपत मोडावे. आले-लसूण हिरवी मिरची वाटून घेऊन पनीरमध्ये घालावी. स्वादानुसार मीठ व कोथिंबीर घालून हे सगळे मिश्रण हलक्या हाताने एकत्र करावे. सगळीकडे वाटण नीट लागले आहे असे वाटल्यावर मध्यम आकाराचे गोळे वळून घ्यावेत.



एका पातेल्यात बेसन व तांदुळाची पिठी घ्यावी. त्यात हिंग, हळद, तिखट व मीठ घालून हळूहळू पाणी घालत एकसंध मिश्रण तयार करावे. खूप घट्ट नको व खूप सैल नको. बटाटेवड्यांसाठी करतो तितपतच. मिश्रण एकाच दिशेने पाच मिनिटे फेटावे म्हणजे थोडे हलके होईल.

मध्यम मोठ्या आचेवर कढईत वडे बुडतील इतपत तेल घ्यावे. तेल चांगले तापल्यावर बेसनाच्या पिठात पनीरचे गोळे बुडवून सोनेरी आचेवर तळावेत. गरम गरम खायला द्यावेत.


टीपा

पनीर घेताना शक्य तितके घट्ट घ्यावे. घरी करून वापरणार असल्यास संपूर्ण पाणी काढून टाकावे. पनीरमध्ये जास्त ओलसरपणा असल्यास गोळे नीट बांधले जात नाहीत व खातानाही जरा पानचट लागते.

मिरच्या आपल्याला झेपतील तितक्या वाढवाव्यात. पनीर तसे गोडसरच असते. शिवाय इतर कुठलाही मसाला यात घालायचा नसल्याने तिखटपणा/तिखट स्वाद फक्त मिरच्यांचाच. थोडे तिखटच जास्त छान लागतात.
तांदुळाच्या पिठीमुळे वड्यांचे आवरण कुरकुरीत होते.

खायला देताना सोबत काहीही दिले नाही तरी चालेल. खरं तर गरजच पडत नाही. म्हणूनच वर चटणी-सॉस वगैरे लिहिलेच नाहीये.

पार्टीसाठी हिट पदार्थ आहे आणि खूपच झटपट होणारा. आदल्या दिवशी पनीरचे गोळे वळून ठेवून आयत्यावेळी तळता येतील.