स्वयंपाक घराच्या खिडकीत हाताशी असावी म्हणून कडीपत्ता, मधून मधून धणे पेरणे, मिरच्या, ओवा यांनी जम बसवला. सोबतीला लसूण, कांदाही अधुनमधुन पाहुणे बनून येत. कांदा, लसणीला डालकीत पात फुटली की मातीत रुजवायचा मोह आवरत नाहीच. आपल्या कुंडीत लावलेली लसणीची ओली पात इतकी सुंदर लागते म्हणून सांगू. ओव्याची भजी खाण्याचा कार्यक्रम महिन्यातून एकदा होत असेच. ओव्याची पाने किंचित फुगीर व खरखरीत असतात. या पानांची भजी अप्रतिम लागतात. अहाहा! नुसत्या आठवणीनेही तोंडाला पाणी सुटलेय.
कांदा म्हटला की प्रथम आठवतात त्या डोळ्याला लागणार्या धारा। डोळ्यातून पाणी काढणारा कांदा. लेक तर दुसर्या खोलीत असला तरी ओरडतो, " आई, डोळे चुरचुरतात. " भजी करू का असे विचारले की लगेच जोरात ’ हो ’ येते. तेव्हा आईचे डोळे वाहिले तरी चालतात. जिभेपुढे कोणाचे काही चालत नाहीच. खेकडा भजीचा कांदा, कांदेनवमीची धमाल. पीठ पेरून केलेली कांद्याची भाजी. आपले अनेक पदार्थ कांद्याशिवाय होतच नाहीत.
लहानपणी अचानक ठसका लागला की, " अगं वर बघ, वर बघ " असे आजी सांगे आणि म्हणे, " ती बघ तुझी सासू कांदे खाई " कोणी जरा अतीच करत असेल तर लगेच ऐकू येते, " नाकाने कांदे सोलू नकोस.. " किंवा " हा बघ अकलेचा कांदा बोलला... " कोणी कुचकटपणा केला की, " कुजका कांदा कुठला.. " हल्लीच भाव गगनाला भिडल्याने चिरताना डोळ्यांना नाही तर खिशाला रडे आणणारा कांदा. शंकर पाटील यांचे " कथा अकलेच्या कांद्याची " हे वगनाट्यही खूप गाजले होते. कांद्याची महती सांगावी तितकी थोडीच आहे.
हल्लीच आईने अश्याच लावलेल्या कांद्याच्या पातीवर अतिशय सुंदर फुल उमलले. इवलेसे ते फूल इतके गोंडस होते. कांद्याची शेती मी पाहिली आहे. पण मी गेले असताना एकदा कांदे काढणी सुरू होती तर एकदा पात डोलत होती. फूल आधी कधीच पाहिले नव्हते. फूल पाहिल्याचा आनंद तेही आपण स्वत: लावलेल्या कांद्याला आलेले पाहून द्विगुणित झाला. वेबकॅमवरुन त्याला पाहिले. त्याचे कौतुक, लाड झाले. बाबांनी त्याला कॅमेर्यातही बंदिस्त केले आणि लगेच ते फोटो मला धाडले. प्रत्यक्ष नाही तरी वेबकॅमवरुन का होईना ते गोजिरे फूल पाहिले. तुम्हीही पाहा...
किती इवलेसे आहे नं...
मेथीच्या दाण्याएवढ्या छोटुकल्या कळ्या आहेत या...
देवाने किती मनापासून निर्मिली आहे नं सृष्टी...