जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, September 4, 2010

कच्छी दाबेली

" खूप दिवस झाले कच्छी दाबेली कर गं ", नचिकेतची फर्माइश सारखी सुरू होती. मे मध्ये शोमू आला होता तेव्हां केली होती. त्याने आणि त्याच्या मित्रांनी ताव मारला. दुसर्‍या दिवशी सहजच अपर्णाला फोन केला आणि बोलता बोलता तिला सांगितले. आधी ती वैतागली ( प्रेमाने ), नुसते सांगून जळव तू मला. खिलवणार कधी? मग म्हणाली, " अगं निदान कृती तरी टाक म्हणजे मी करेन ना. " पण आदल्या दिवशी शोमूने आधीच जाहीर केलेले, दाबेली झाल्या झाल्या लगेच आम्हाला खायला दे. नुसत्या वासानेच जठराग्नी खवळला आहे. तुझे फोटोबिटो काय ते पुढच्या वेळी करशील तेव्हां काढ. ती पुढची वेळ यायला तीन महीने जावे लागल्याने अपर्णाची इच्छा आज पुरी करतेय. ( सॉरी ) अर्थात हे फोटो पाहून ती जाम भडकणार आहेच तेव्हां आधीच माफीनामा लिहून ठेवलाय गं. जवळ असतीस तर नक्कीच खिलवली असती.

वाढणी : चार माणसांकरिता ( प्रत्येकी दोन या अंदाजाने...... करताना दीडपट प्रमाणाने करा बरं का, म्हणजे कमी का केलीची भुणभूण होणार नाही )

साहित्य :

चार मध्यम-मोठे बटाटे उकडून + कुस्करून

एक मोठा कांदा बारीक चिरून

एका मोठ्या डाळिंबाचे दाणे
( डाळिंब न मिळाल्यास लाल/काळी द्राक्षे मध्ये चिरून घ्यावी.
तीही नसतील तर मनुका घ्याव्यात. )

चिंचगुळाची चटणी एक वाटी

मूठभर कोथिंबीर चिरून

बारीक शेव वरून भुरभुरायला

चवीनुसार मीठ

पाच चमचे कच्छी दाबेली मसाला

चार/पाच चमचे बटर/तूप ( वितळवलेले )

मसाला शेंगदाणे एक मोठी वाटी भरून

दोन वाट्या पाणी

आठ पाव ( आपल्याकडचे बेकरीतले पाव असतील तर अजूनच मस्त )
( किमान आठ हवेतच. शक्यतो दोन लाद्या आणाव्यात. )कृती:

चिंचगुळाची चटणी :

दहा-बारा खजूर ( बिया काढून कोमट पाण्यात अर्धा तास भिजवून घ्या )
एक टेबल स्पून चिंचेचा घट्ट कोळ
तीन टेबल स्पून किसलेला/भुगा केलेला गूळ
अर्धा चमचा धणेजिरे पूड
अर्धा चमचा लाल तिखट
चवीनुसार मीठ घालून लागेल तितके पाणी घालून चटणी करावी.
( अती घटटही नको व पाणीदारही नसावी )

मसाला शेंगदाणे करताना......

दोन वाट्या कच्चे शेंगदाणे
दीड वाटी पाणी
तीन चमचे मीठ
तीन चमचे तिखट ( आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करावे )
चिमूटभर गरम मसाला
एक मोठा चमचा बटर किंवा तूप
दोन चमचे लिंबाचा रस ( ऐच्छिक )

शेंगदाणे, पाणी, मीठ व तिखट एकत्र करून उकडून घ्यावे. मुळात आपण पाणी कमीच ठेवले असल्याने जे उरले असेल ते काढून टाकायचे नाही. एका पसरट पॅनमध्ये एक चमचा तूप किंवा बटर घालावे. ते वितळले की हे उकडलेले शेंगदाणे शिल्लक असलेल्या पाण्यासकट त्यावर घालावेत. आच मध्यम ठेवावी व परतत राहावे. पाणी थोडेसे कमी झाले की गरम मसाला भुरभुरून लिंबाचा रस घालावा. शेंगदाणे जोवर कोरडे होत नाहीत तोवर परतत राहावे. तूप-तिखट-मसाला व लिंबाच्या एकत्रीकरणाने मस्त खमंग वास सुटतो व शेंगदाणे तुकतुकीत दिसू लागतात. साधारण दहा ते बारा मिनिटाने आच बंद करावी. गरम गार कसेही छानच लागतात.
मसाला बनविताना :

उकडलेले बटाटे साल काढून कुस्करून/किसून घ्यावे. एका पसरट पातेल्यात तीन चमचे तूप टाकावे. गरम झाले की लगेच कुस्करलेले बटाटे, मीठ व दोन वाट्या पाणी घालून मध्यम आचेवर झाकण ठेवून पाच मिनिटे ठेवावे. एक वाफ आली की कच्छी दाबेली मसाला घालून हालवावे. मिश्रण कोरडे होते आहे असे वाटल्यास अर्धी वाटी पाणी घालावे. पुन्हा पाच मिनिटे ठेवून आचेवरून उतरवावे.

सगळे साहित्य तयार झाल्यानंतर पाव मधून कापून त्याचे दोन भाग करावेत. तव्यावर दोन चमचे बटर टाकून सगळे पाव खालून वरून शेकून घ्यावेत. नंतर लगेचच एकेका पावाच्या तळच्या भागावर बटाट्याचा मसाला पसरावा. ( दोन चमचे तरी हवाच. आवडीनुसार कमी जास्त प्रमाण घ्यावे ) त्यावर मसाला शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, कांदा, कोथिंबीर व शेव घालावी. पावाच्या वरच्या भागावरही हलकासा बटाट्याच्या मसाल्याचा थर लावून चिंचगुळाची चटणी घालून तळच्या भागावर किंचितसे दाबून ठेवावे व गरम गरमच खायला द्यावे.

टीपा :
कच्छी दाबेली तसा वेळखाऊ पदार्थ मुळीच नाही. तयार मसाला शेंगदाणे, एखादा दिवस आधी चिंचगुळाची चटणी तयार करून ठेवली तर अक्षरशः: अर्ध्या तासात काम तमाम होऊ शकेल.
कच्छी दाबेलीचा तयार मसालाच वापरावा. मी टिट-बीट दाबेली मसाला वापरला आहे. बर्‍याच कंपन्यांनाचा मिळतो पण त्यातल्या त्यात हा जास्त छान वाटला. खाताना पावही गरम हवेत व आतला बटाट्याचा मसालाही गरम हवा, त्यामुळे अजूनच मजा येते.
कच्छी दाबेली अतिरेक तिखट नसते. खट्टामीठा व थोडा तिखा अशी लागायला हवी.

लहान-मोठ्या मुलांच्या पार्टीसाठी हिट व पोटभरीचा पदार्थ.

28 comments:

 1. bhaanasatai, namaskaar.

  aho tumcha blog nehmi vachate me. khoop chaan lihita tumhi. khaugalli ekdam mast. Undhio kela hota, chaan zala. Thanks. Kachchi Dabeli pahun tondala pani sutley agdi.... :)

  Sayli

  ReplyDelete
 2. सायली, ब्लॉगवर स्वागत आहे. :) उंधियो जमल्याचे वाचून बरं वाटले. धन्यवाद.

  ReplyDelete
 3. भाग्यश्री, कसली भारी दिसतीये ती दाबेली. एकदम तोंपासु.

  ReplyDelete
 4. णि...षे...ध...

  फ़ोटुत दाबेली काय भारी दिसते आहे.

  ReplyDelete
 5. निशेध!... अतिशय सुंदर दिसतेय दाबेली फोटोत..

  ReplyDelete
 6. अग आपला फ़ोन कधी झाला होता आठवतय का?? मी तर receipe चीआशा सोडली होती वाटल पोस्टaने येइल् आता
  ते ताट काय सुन्दर दिसतय ग........
  NI SHE DHA

  ReplyDelete
 7. योगेश, आनंद, विभी आता या निषेधांचे काहीतरी करायला हवे. प्रत्यक्ष खिलवली तर... :)

  ReplyDelete
 8. अपर्णा, पोस्टाने पाठवणे शक्य असते तर कधीचेच पाठवले असते ना गं. पण... :(

  ReplyDelete
 9. यम्मी...काय दिसते आहे ग दाबेली...बादलीभर पाणी निघाल तोंडातुन...तीव्र निषेध...

  ReplyDelete
 10. रोज टाळतेय अक्षरश: कमेंटायचे....
  कसल्या भन्नाट दिसताहेत या दाबेल्या....

  आज का कमेंटतेय माहितीये कारण काल तू ’करून खिलवते’ असे सांगितलेय...ab vo din dur nahee hai!!!!

  ReplyDelete
 11. आई ग... !!!

  तुझ्या लागोपाठ दोन पोस्ट्स निःशब्द करून टाकणाऱ्या.. आधीची तरल, हळवी असल्याने .. आणि ही तोंडाला सुटलेल्या पाण्याने तोंड भरून गेल्याने ;)

  ReplyDelete
 12. NADH KHULA....YA AATHWDYT GHARI KARUNACH BAGTO.

  ReplyDelete
 13. श्रीताई,
  कसली टेस्टी दिसत्ये दाबेली.
  कृती पण तशी सोपी दिली आहेस. सुट्टीत करुन बघेन.
  सोनाली

  ReplyDelete
 14. प्रसाद, जमली ना रे?:)

  ReplyDelete
 15. देवेंद्र, बाहेर जाऊन खायचीस ना... :)

  ReplyDelete
 16. तन्वे, अगं पक्का वादा. तू ये मात्र. काय???

  ReplyDelete
 17. धन्यू हेरंबा... तयारी झाली का बाप्पांची?

  ReplyDelete
 18. धन्यू गं सोनाली. कळव हो केलीस की.

  ReplyDelete
 19. namskar Bhanas,

  Mala ek doubt aahe... te masala shengdane kartana, paaNyat budavun ukdayche ki chalni thevun ukdayche?

  baaki paakru chhan ch aahe...

  deepali

  ReplyDelete
 20. दीपाली, ब्लॊगवर स्वागत आहे. :)व पाकृ आवडल्याचे पाहून छान वाटले. आभार.

  मसाला शेंगदाणे करताना, शेंगदाणे पाण्यात बुडवूनच उकडायचे. फक्त पाणी कमी ठेवावे. मायक्रोव्हेव मध्ये दोन मिनिटे व एक मिनिट असे ठेवून उकडावे. ( जास्ती चांगले मुरण्यासाठी उकडून लगेच पाणी काढून न टाकता किमान अर्धा तास तसेच ठेवावे.)

  ReplyDelete
 21. weekendला हा प्रयोग करण्यास हरकत नाही. :D

  ReplyDelete
  Replies
  1. प्रयोग फत्ते झाला का? :)

   Delete
 22. अगं आता पुन्हा करतेय....खाली वैधानिक इशारा वगैरे टाक की शेंगदाणे चाखताना आपल्या जबाबदारीवर चाखावेत नाहीतर दाबेलीसाठी उरणार नाहीत...;) आमची एटीएफ़ रेसिपी...:)

  ReplyDelete
  Replies
  1. हाहाहा... सगळे गट्ट्म केलेस की काय तू... :D :D

   Delete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !