जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, December 28, 2010

चोरावर मोर... एकदा, दोनदा, तीनदा... चालूच...

थँक्स गिव्हिंगची धूम संपतानाच नाताळची नांदी होते. हॅलोवीनच्या भूतधुमाळी पासूनच नाताळच्या बेतांची आखणी सुरू होते. कोणी क्रूजला तर कोणी थंडीपासून काही दिवस तरी दूर पळण्यासाठी हवाई, कॅलिफोर्निया गाठायचे ठरवते. सगळीकडे उत्साहाचे, अगदी आपल्या दिवाळीची आठवण करून देणारे वातावरण. व्हाईट ख्रिसमसचे इथे फारच वेड दिसून येते. खरे तर साचलेल्या बर्फाच्या ढिगांमुळे कामांमध्ये श्रमामध्येही बरीच वाढ होते. ड्राइव्ह वे, वॉक वे कितीही स्नो पडला आणि कितीही वेडी थंडी झाली तरी स्वच्छ करावेच लागतात. ढिगारे उपसून उपसून मान, कंबर, हात पाय आणि डोके पूर्णपणे कामातून जाते. मग पाठोपाठ सर्दी, अंगदुखी आलीच. बरे हे उपसणे प्रकरण काही एक दोन वेळा करून संपत नसल्याने ही आवर्तने सुरूच राहतात. घरातल्या सगळ्यांनी आळीपाळीने मोहीम हातात घेतली तरी फत्ते होईतो सगळे गडी गारद होतातच. अशातच नाताळ पूर्व संध्येच्या पार्टीची जोरदार आखणी त्याबरहुकूम ती घडावी म्हणून धावाधाव सुरू होते. मेन्यू, टेबल सजावट, घराची सजावट, रोषणाई. गिफ्ट्स आणायला जाणे हाही एक मोठ्ठा उद्योगच. शिवाय ती गावोगावी राहणाऱ्या नातेवाईक, मित्रमैत्रिणींना पाठवणे हाही एक व्यापच, तरीही सगळे आवर्जून करतात. कौतुक वाटते. ( हा व्याप पोस्टाने यावेळी बराच सुसह्य केल्याने लोकं थोडीशी निवांत खूश झालेली )

या सगळ्या सणांबरोबरच ऑक्टोपासून नवीन वर्षांची सुरवात होईतो टीव्ही वरील सिनेमे, धारावाहिक हेही सारखे आपला सूर बदलत राहतात. भुताखेतांपासून ते देवदूतापर्यंत. एकदा का थँक्स गिव्हिंग संपले की नाताळचे काउंट डाउन सुरू होते. मग काय कुठल्याही चॅनलवर जा काहीतरी खूपच भारलेले, छान छान शेवट असणाऱ्या सिनेमांची स्पर्धा लागते. देवदूत तर जणू प्रत्येक कोपऱ्याकोपऱ्यात दबाच धरून बसलेले असतात. दुःखी, गांजलेली, हताश झालेली बिचारी लोकं दिसली ( आता या वर्गवारीचे निकष देवदूतांनाही लावताना किती कटकट होत असेल ना .... ) की लगेच जादूची छडी घेऊन हे हजर झालेच समजा. इतकी वर्षे मी वाट पाहतेय पण... , तरी मागच्या जन्मी अगदी आठवणीने कमीतकमी पाप्ं केलीत. पुढचा जन्म कसलाही असू दे पण देवदूत भेटायलाच हवा. कसचे काय तो मेला नेमका मलाच वगळून पुढे जातो.

जवळपास महिनाभर या देवदूतांचा अनुल्लेख सोसून शेवटी मी बंडाचा झेंडा फडकवला. खसकन टीव्हीचा रिमोट ओढला आणि खटाखट चॅनलची कत्तल सुरू केली. नुसता ख्रिसमस, एंजल्स, फन, आनंद यासारखे शब्द पूर्ण वाचून होण्याआधीच चॅनलचा गळा घोटू लागले. बिचारे चॅनल्सही कधीकधी माझ्या या नवीन रूपाने दचकू लागलेले मला स्पष्ट दिसत होते. हॅलोवीनची कुठलीशी द्वाड, हट्टी भूताळी चुकून हीच्या अंगात घुसली की काय! पण, हाय रे दैवा! चॅनल्सनि जागोजागी तेचतेच गुडीगुडी सिनेमे दाखवण्याचा चंगच बांधलेला. ते ही हट्टाला पेटलेले आणि मीही. असे करता करता नाताळच्या पूर्व संध्येला माझ्या खाटीकगीरीने कळस गाठलेला होता. अचानक एका नावावर बुबुळे स्थिरावली. अदमास घ्यावा म्हणून दोन ओळीतल्या सारावर नजर टाकली आणि लखकन आकाश चिरणारी वीज चमकली मागोमाग जोरदार गडगडाट करत चारीबाजूने आवाज आदळू लागला. नक्की तोच सिनेमा. लाव लाव. हा सूर्य आणि हा जयद्रथ होऊनच जाऊदे आज.

सुदैवाने सिनेमा नुकताच सुरू झाला होता. ' मेक वे फॉर टुमारो '. १९३७ साली आलेला. जवळपास विस्मरणातच गेलेला. लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झालेले ल्यूसी व बार्क हे जोडपे अतिशय आनंदात आपल्या लांब परंतु संपर्कात असलेल्या मुलांसमवेत आनंदात जगत असते. मुले मोठी होऊन मार्गस्थ झालेली असतात. अशातच घराचे हप्ते भरणे शक्य झाल्याने त्यांचे राहते घर बँक जप्त करते. मुलांना हे ऐकून खूप वाईट वाटते पण आता आईबाबांचे पुढे काय करायचे हा मोठ्ठा प्रश्न उभा राहतो. चार मुले तशी जवळजवळच असतात. एक जण कॅलिफोर्नियामध्ये जातो तो फारसा संपर्कात राहत नाही. चारही मुलांकडे आई वडील दोघांनाही सामावून घेईल इतकी जागा नसते. सरतेशेवटी आईने एकाकडे बाबांनी एकीकडे असे एकमेकांपासून वेगळे राहायचे असा निर्णय घेतला जातो. त्यांच्या स्वतःच्या घरातील एकमेकांच्या सोबत घालवलेली ती शेवटची रात्र.

या सुरवातीतच तीन-चार ठिणग्या आणि त्यांनी वेगवेगळी मांडलेली चूल मला दिसू लागली. ' ऊन-पाऊस', राजा परांजपे +सुमती गुप्ते, संजीव माला सिन्हाचा ' जिंदगी ' ( अजून मला माझे सुजून भप्प झालेले डोळे आठवतात... ), राजेश खन्ना+शबानाचा ' अवतार ' ( हा सिनेमा मला काय की फारसा रुचलाच नाही. ठराविक सिनेमे वगळता राजेश खन्ना मला कधीच आवडला नाही म्हणून असेल कदाचित ) आणि सरतेशेवटी आलेला ' बागबान '. खूपच लहान असताना ' जिंदगीपाहिलेला. मनात घर करून गेलेला. हॉलिवूडच्या सिनेमावरून बॉलीवूड मध्ये सिनेमा बनवतात हेच मुळी माहीत नव्हते. त्यातून आजूबाजूला काही घरांतून हे चित्र दिसू लागले होते. ' घर घर की कहानी ' च्या बलराज सहानीचा पगडा होताच तशात भर पडली ती जिंदगीच्या संजीवकुमारची.

जसजशी नको ती अक्कल वाढू लागली तशी काही गरजेच्या बऱ्याचशा नको त्या गोष्टी डोक्याचा भुगा करू लागल्या. त्यांतलीच एक ही सिनेमांची चोरी. मग काय अगदी, ’ दो आंखे बारा हाथ पासून जी पडापडीला सुरवात झाली ती पार गजनीपोत्तर ’. मात्र या गोंधळातहीबागबानहा आपल्याच घरी आपणच केलेल्या चोरीत मोडत होता. ( परवापर्यंत तरी ) एक तर अमिताभ बच्चन हेमामालिनीचीही मी चाहती. तशात त्यांची एकमेकातली केमिस्ट्री, गाणी यांचा सतत मारा होऊन होऊन, जिंदगी, अवतारची आठवण देणारा बागबान मी मन लावून पाहिला. ( एकदाच मन लावून नंतर बरेचदा अर्धा, कधीही कुठूनही सुरू होऊन संपेस्तोवर.... कारण नंतर रिमोटच गायब होऊ लागलेले... नाईलाज को क्या विलाज... ) हेमा वयाच्या मानाने किती सुंदर दिसते, तिच्या साड्या, अमिताभचे काम आणि आनुषंगिक सगळेच पूरक. हा भोपळा, ’ मेक वे फॉर टुमारोपाहताना अक्षरशः शकले शकले होऊन फुटला.

मेक वे, मधली ल्युसी ( Beulah Bondi ) मुलाकडे आल्यावर नातीच्या बरोबर नातीच्या खोलीत राहते. वयात येत असलेल्या नातीला ही सोय आवडत नाही पण तिला आजीबद्दल आपुलकी असते. सून पैसे मिळवण्यासाठी ब्रिजचे क्लासेस घेत असते. आजीला तिचे त्यातच गुंतलेपण घराकडे होणारे दुर्लक्ष आवडत नसते. ती लक्ष देत नाहीये म्हणून आपल्याकडून होईल ती मदत करायला आजी सारखी धडपडते. एकलकोंड्यासारखे एका कोपऱ्यात बसून राहणे तिला सहन होत नसल्याने ब्रिजचे क्लासेस सुरू असताना ती आरामखुर्चीत बसून झुलत राहते. त्या खुर्चीचा कुईकुई आवाज.... आजीचा ब्रिज शिकायला आलेल्या लोकांशी संवाद साधायचा प्रयत्न. त्यातच आलेला बार्कचा फोन. आजीचा पन्नास वर्षांच्या सहवासानंतर दूरावलेल्या बार्कबरोबरचा संवाद.... मनाला स्पर्शून जातो. सुनेची नातीची आपसातली चाललेली आजीची टोलवाटोलवी. नात आजीला घेऊन सिनेमाला जाते, तिथे तिला एके ठिकाणी बसवून स्वतः मैत्रिणींबरोबर बसते आहे असे भासवून नात गायब होते. सिनेमा संपून जातो. आजी बाहेर येऊन नातीची वाट पाहत उभी राहते. कोणा मुलाच्या गाडीतून नात उतरताना पाहते. नातीला नंतर हे सांगतेही. या मुलाबद्दल आजीच्या मनात थोडे जास्तच प्रेम असते. अचानक एके दिवशी तिला कळते की काही दिवसातच आपली रवानगी वृद्धाश्रमात होणार आहे. त्याला वाईट वाटू नये म्हणून तो काही सांगण्या आधीच आजीच त्याला वृद्धाश्रमातल्या फायद्यांबद्दल सांगून मला तिथे पाठव म्हणते. आईचा मुलाला त्रास होऊ नयेचा खटाटोप आणि मुलाचे ते उमजून असहायतेमुळे नाईलाज होऊन स्वत:लाच मनोमन दोष लावत आईला मीठी मारणे. प्रसंग जराही ओव्हर करता नेमक्या भावना पोहोचवतो.

इकडे बार्क ( Victor Moore ) न्यूयॉर्कमधील मुलीकडे पाठवले जातात. जागेच्या कमतरतेमुळे त्यांना हॉलमध्ये झोपवले जाते. आयुष्यभर कारकुनी केलेले वडील पुन्हा एकदा नोकरी शोधू लागतात. तशातच त्यांची चहा-कॉफी, थोडे जुजबी सामान इत्यादी ठेवणाऱ्या दुकानदाराशी गट्टी जमते. ( हा आपला परेश रावल ) मग एक आजीआजोबांचा फोन संवाद होतो. आजोबांना सर्दी झालेली असते. आजी सारखी काळजी व्यक्त करते, थोडीशी रागे भरते. मग एक आजीचे पत्रवाचनाचा सीन होतो. आजोबांचा चष्मा फुटलेला असतो. आजोबा दुकानदाराला पत्र वाचून दाखवायला सांगतात. तो बरेचसे वाचतो आणि मग एका ठिकाणी थांबतो आणि आजोबांना म्हणतो की तुमचा चष्मा आला की पुढचे तुम्हीच वाचा. आजोबा निघून गेल्यावर स्वतःच्या बायकोला हाक मारून म्हणतो, " मला तुला पाहायचे होते गं . " ( कंट्रोल सी कंट्रोल वि ... माझी चिडचिड सुरु... )

आजोबा सर्दीने पछाडले जातात. आजोबांच्या काळजीने आजीच्या जीवाची घालमेल सुरू होते. मुलगा सून तिला दिलासा देत राहतात. तशातच नात रात्रभर घरी येत नाही. आजी सुनेला सिनेमागृहात घडलेली घटना सांगते स्वतःला दोष लावते. सून वैतागते आणि म्हणते तुम्ही हे मला तेव्हांच सांगायला हवे होते. नवऱ्याशी भुणभूण लावते की आधी मुलीने असे कधीच केले नव्हते. पण आजी आल्यामुळे ती आपल्या मित्रमैत्रिणींना घरी आणत नाही. इकडे मुलगी डॉक्टरला बोलावते. डॉक्टर येण्या आधी घाईने वडिलांना बेडरूममध्ये झोपवते. डॉक येतो त्यानंतरचा सगळा सिनंच फारच गमतीशीर घेतला आहे.

शेवटी आजीची वृद्धाश्रमात रवानगी जोवर थंडीचा मोसम संपत नाही तोवर आजोबांनी कॅलिफोर्नियात राहायचे असे ठरते. आजी मुलाला सांगते की कुठल्याही परिस्थितीत आजोबांना मी वृद्धाश्रमात राहायला जाणार आहे हे कळता नये. पन्नास वर्षांच्या लग्नाच्या कालखंडातले हे एकमेव सत्य त्यांच्यापासून मला लपवायचे आहे. वडील कॅलिफोर्नियाला जाण्याआधीचा एक दिवस आजी-आजोबांची भेट ठरते. ठरल्याप्रमाणे दोघे भेटतात. मग त्यांच्या आठवणीत काळ पन्नास वर्षे मागे जातो. तो गाडीचा प्रसंग घडतो. सेल्समन त्यांना छानपैकी फिरवून आणतो. गाडी आवडल्याचे पाहून मग काय विचार आहे असे म्हणतो. आजी-आजोबा तेच उत्तर देतात. त्यावर तो वैताग दाखवता हसून मी ही तुम्हाला अशीच सफर घडवल्याचे म्हणतो. पुढे ते हनीमूनच्या त्याच हॉटेल मध्ये जातात. त्याचा मालक त्याला हे कळल्यावर येऊन अगत्याने बोलतो ड्रिंक्स ऑन हॉउस म्हणून सांगतो. मग आजोबांचे आजीला घे गं तू ही म्हणून आग्रह करणे, आजीचे, ' काहीतरीच हं का तुमचे म्हणून, तिचे लाजणे. मग आजोबांनी आजूबाजूला ड्रिंक्स घेणाऱ्या बायका दाखवल्यावर लाजत लाजत होकार देणे. आजोबांची आठवणीतली वाराची गल्लत आणि आजीची कसे तुम्ही चुकताय सारखे हे दाखवणे. पुढे डान्स सुरू असलेला पाहून आजोबांचे आजीला आग्रह करणे. पण नवीन लोकांसारखे नाचता आल्याने गडबडून जाणे. नेमके हे बँडवाल्याने टिपणे आजीआजोबांच्या काळातली त्यांची चिरपरीचीत धून वाजवणे. या सारखे छोटे छोटे प्रसंग अतिशय साधेसुधे दाखवलेत.

आजीआजोबा जेवायला येणार असतात परंतु ते आल्याने इकडे मुलांची बैचेनी. आजोबांच्या ट्रेनची वेळ जवळ येत चाललेली. ती चुकतेय की काय ही भीती तर एकीकडे आईबाबांची होणारी ताटातूट मुलांना कुरतडत असते. आजोबा फोन करून सांगून टाकतात की आम्ही जेवायला येणार नाही आहोत. आजीआजोबा तो संपूर्ण दिवस स्वत: रममाण होऊन आनंदाने घालवतात. जुन्या आठवणी काढत जीवनाचे वास्तव स्विकारतात. शेवटी ठरल्याप्रमाणे आजोबा ट्रेनने कॅलिफोर्नियाला रवाना होतात आजी प्लॅटफॉर्मवर हात हालवत उभी असते आणि सिनेमा संपतो. सिनेमा पाहताना कुठेही मेलोड्रामा, भडकपणा, अतिरंजित प्रकार दिसत नाहीत. सगळ्या मुलांना आईबाबांबद्दल प्रेम असते. कुठेही कोणीही मुद्दामहून वाईट वागताना दाखवलेले नाही. १९३७ साली, त्यावेळी ओढवलेल्या जागतिक मंदीच्या काळात आलेल्या या सिनेमात डायरेक्टर Leo McCarey यांनी अप्रतिमरित्या हाताळलेला सिनेमा. अतिशय संयमाने कुठेही आक्रस्ताळेपणा करता कथानक पुढे सरकत राहते. आजीआजोबांचे आपसातले प्रेम-एकमेकांप्रती आदर ठायीठायी सहजपणे दिसून येतो. Beulah Bondi Victor Morre यांचा अभिनय खासच आहे. हे दोघेही खरेखुरे आजीआजोबा वाटतात. शेवटही गोडगोड केलेला नाही. वास्तवात जे घडण्याची शक्यता जास्त तेच दाखवले आहे. इतका जुना कृष्णधवल सिनेमा पाहताना ( आधीच्या चार चार ठिणग्या पाहून ही ... ) आपण गुंतून जातो. या सामाजिक समस्येची जाणीव खोलवर होते. बागबान सारखी अतिरंजित, आचरटपणाची छाप उमटत नाही.

रवी चोप्राने मुळातच अमिताभहेमाचे स्वतःचे घर दाखवून परतीचा मार्ग खुला करून ठेवला. तश्यांत अनाथ सलमानचे ठिगळही जोडून ठेवलेय. ही अशी अचलुन आणलेली मुलेच खाल्लेल्या मीठाला का जागतात? मुलांनाही सुरवातीपासूनच खलनायकी चेहरा देऊन टाकला. गाडीच्या प्रसंगात अपमान आणि सलमानच तिथला मालक असणे त्याची ड्रामॆटिक रिऎक्शन, हॉटेलमध्ये एकदम जंगी खातिरदारी - लगेच महाल काय सूट्स काय... इतकं पण कैच्याकै दाखवायचं म्हणजे.... :( . हेमाचे नातीच्या अंगचटीस जाणाऱ्या पोराच्या कानाखाली आवाज काढणे, लेकाला वाढदिवसाच्या दिवशी डबा घेऊन त्याच्या ऑफिसात जाणे, एखाद्या नवथर अल्लड तरुणीप्रमाणे फोनची, पत्राची वाट पाहणे. आरामखुर्चीत बसून झुलणे, अमिताभच्या हाताची उशी करणे, सरतेशेवटी लेखक नसलेल्या अमिताभने दुखडा लिहिणे आणि त्याला बुकर ऎवॉर्ड मिळणे ते पुस्तक हातोहात खपणे, पुढे सन्मान वगैरे वगैरे चा प्रवास अक्षरशः मेलो मेलो चा अतिरेक होऊन कहर करत सहनशक्ती गारद करतो. भीक नको पण या चोप्राला आवर म्हणायची पाळी आणतो. अजून किती वेळा रिमेक बनवणार... बस करा यार आता.

या सगळ्या मोरांच्या पार्श्वभूमीवर अचानक हाती लागलेला, ’ मेक वे फॉर टुमारोजरूर जरूर पाहण्यासारखाच आहे.

19 comments:

 1. पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत नव्या शुभेच्छा!

  ReplyDelete
 2. :-) इतक सविस्तर वाचल्यावर आता सिनेमा नाही पाहिला तरी चालेल असच वाटतं मला!

  ReplyDelete
 3. :) आपण हे असेच करतो...अगदी 'MASTERCHEF AUSTRALIA' आणि 'MASTERCHEF INDIA' ...हे कार्यक्रम बघितले की आपण सगळाच भावनांचा अतिरेक करतो असं वाटतं! म्हणजे सगळंच loud! मी काही तू म्हणतेयस तो सिनेमा बघितलेला नाहीये. पण मला कळलं तू काय म्हणतेयस ते. बघायलाच हवा. :)

  ReplyDelete
 4. मराठीग्रिटींग्ज, अनेक धन्यवाद व नववर्षाच्या शुभेच्छा!

  ReplyDelete
 5. हा हा... aativas, असाही मोरांनी बराच वेळ खाल्लाच आहे. :D
  आभार.

  ReplyDelete
 6. अनघा, Loud loud तरी किती करायचं? प्रत्येक ठिकाणी काळजाला हात घालायलाच हवा का? पण... ये रे माझ्या मागल्या संपतच नाही. अगदी आवरा झालेत...

  धन्यू गं.

  ReplyDelete
 7. हात्तिच्या.. इतके दिवस 'बागबान' हा 'तू तिथं मी' वरून चोरलाय असं समजत होतो मी.. तर मूळचा 'तू तिथं मी' च चोरलेला आहे.. श्या !! :(

  अग खरंच सांगतो मी आत्तापर्यंत बघितलेल्या असंख्य सिनेमांपैकी प्रत्येक सिनेमातले काही सीन्स किंवा कित्येकदा जसाच्या तसा सिनेमा आपल्या बॉलीवूडने चोरलेला आहे. :( ..

  या काही लिंक्स बघ

  http://contests2wins.blogspot.com/2009/07/bollywood-movies-copied-from-hollywood_25.html

  http://www.facebook.com/topic.php?uid=106464276401&topic=9759

  http://www.bollywoodtrends.net/2009/04/bollywood-and-plagiarism-list-of.html

  http://www.scribd.com/doc/8279439/Hindi-Films-Inspired-From-Hollywood

  थोडक्यात ओरिजनलला पर्याय नाही !!!

  ReplyDelete
 8. हेरंब, अरे तू तिथे मी तर ९८-९९ च्या आसपासचा ना. ’बागबान ’ची मोट रवी चोप्राने प्रेक्षकांची नेमकी नस पकडून पक्की बांधली आहे. ओरिजनलची चोरी कधी डिट्टो तर कधी सोयिस्कर वाकवून खिचडी पेश केली. :D

  एक एक लिंक्स पाहतेय मी... कठिणच आहे सगळे. :))

  आभार रे.

  ReplyDelete
 9. aga parwa me not gone with the wind pustak wachun ashich thakka zale. agdi pinjara, do bigha jameen pun asech. manya ahe aplya bhashet te anne tevdhe sope nahi pun kiti copy.

  Ani shevat good ani loud he aplya cinemat pahikech karan they sale dreams..... apan jar kami shiklelya lokancha wichar kela tar they like to see what they dont have ani hi saway lagleli sutayla far wel lagel.

  ReplyDelete
 10. ताई सगळ्यात आधि अनघा, हेरंब आणि माधूरीचा निषेध करू दे बघू मला....

  >>>>'MASTERCHEF AUSTRALIA' आणि 'MASTERCHEF INDIA' ...हे कार्यक्रम बघितले की आपण सगळाच भावनांचा अतिरेक करतो असं वाटतं! म्हणजे सगळंच loud!
  हे हीने लिहीलं...

  >>>हात्तिच्या.. इतके दिवस 'बागबान' हा 'तू तिथं मी' वरून चोरलाय असं समजत होतो मी.. तर मूळचा 'तू तिथं मी' च चोरलेला आहे.. श्या !! :(

  हे या पठ्ठ्याने लिहीले...

  >>>>>aga parwa me not gone with the wind pustak wachun ashich thakka zale. agdi pinjara, do bigha jameen pun asech. manya ahe aplya bhashet te anne tevdhe sope nahi pun kiti copy.

  हेच माझ्याही मनात आले होते पोस्ट वाचताना... :)

  असो, पोस्टमधली वाक्यरचना म्हणजे खटाखट चॅन्ल्सची कत्तल वगैरे वाचताना मजा आली....

  आता हा सिनेमा पहायला हवा....

  ReplyDelete
 11. अगदी खरं गं माधुरी. भावना ओतप्रोत वाहिल्याशिवाय जणू त्या पोचतच नाहीत असा समज इतका घोटला गेलाय की... :D

  आभार.

  ReplyDelete
 12. धन्यू गं तन्वी. :)

  ReplyDelete
 13. मी अर्ध पोस्ट वाचलं, आणि यापुढे सिनेमा पहायचा, नंतर मग वाचायचं ठरवलं कुठलाही प्रिज्युडीस न ठेवता पहायचाय हा सिनेमा.

  ReplyDelete
 14. :D भाग्येश्री, चांगलेच फैलावर घेतले आहेस या चोरांना!!!!:P

  ReplyDelete
 15. महेंद्र, तू थक्क होशील ( अर्थात याआ्धीही अश्या डिट्टो कॊप्या अनेकांनी केल्याच आहेत म्हणा) पाहून. सिनेमा तुला आवडेलच.
  आभार.

  ReplyDelete
 16. श्रीराज, कधीकधी एकदम डोक्यातच जाते. काही तरी लिमिट्स ठेवा जरा... पण नाही... :(

  धन्यवाद.

  ReplyDelete
 17. >>:-) इतक सविस्तर वाचल्यावर आता सिनेमा नाही पाहिला तरी चालेल असच वाटतं मला!
  ह्यात मॉडिफिकेशन..
  इतक सविस्तर वाचल्यावर आता सिनेमा पाहावाच लागणार! ;)

  ReplyDelete
 18. विद्याधर, मिळाला तर जरूर पाहा तू सिनेमा. तुला आवडेलच. :)

  ReplyDelete
 19. आजच आपली पोस्ट वाचली चांगली माहिती मिळाली . मी आज The Confidence हा हॉलिवूड सिनेमा पाहिला मराठी चेकमेट त्याच्यावरूनच बनवलेला दिसतोय म्हणजे मराठी सुध्दा चोर झालेत

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !