जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, April 16, 2009

बाळे

संसाराचा गाडा ओढता ओढता अतिशय थकून, हरून मुलीने आईला विचारले, " आई, नाही आता सोसत. कितीही मी प्रयत्न केले तरी हे दुर्देवाचे फेरे संपणार नाहीत. थांबते इथेच. हा संबध संपवून भविष्याचा विचार करेन, पुन्हा नवीन स्वप्न पाहीन. "

त्यावर मंद हसून आई म्हणाली, "बाळे, स्वप्न सुंदर असतात. सारखी खुणावतात. म्हणून त्यांच्यामागे धावशील, अन पुन्हा एका संपणाऱ्या फेऱ्यात गुरफटशील. माझे ऐक, अग परत परत तेच काटे मिळतील हो. जुने काटे, जुन्या जखमा त्या ओळखीच्या तरी असतात . नवे काटे, नव्या जखमा त्या आता पेलणाऱ्या नसतात. तेव्हा आहे ते तसेच राहू द्यावे. नवा आधार शोधू नये अन सुंदर स्वप्ने पाहू नये. जे आज नक्की आपले आहे ते गमावू नये. वेळ प्रसंग पाहून वागावे. कधी झाशीची राणी तर कधी जिजाई हो. स्वप्न नुसती पाहायची नसतात ती स्वबळाने पुरी करायची असतात. म्हणून म्हणते बाळे धीर सोडू नको. अश्वस्त हो, शांत हो. पुन्हा एकदा तिथूनच आरंभ कर. माझ्या काटे भरल्या पायांनी मी सदैव तुझ्यासाठी उभी आहे हे विसरू नकोस. "

बरा संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर
आंधी हातालें चटके तव्हां मियते भाकर
करा संसार संसार खोटा कधीं म्हनूं नही
राऊळाच्या कळसाले लोटा कधीं म्हनूं नही
अरे संसार संसार नहीं रडन कुढनं
येड्या, गयांतला हार म्हनूं नको रे लोढनं..
.

No comments:

Post a Comment

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !