जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, February 19, 2009

जिव्हारी लागलेले सोळा सोमवार .


वार्षिक परीक्षा आटोपली. महिनाभर आधीच मी माझा भाऊ आजी-आजोबांकडे जाऊन काय काय मज्जाकरायची त्याचे मनोरे रचत होतो. त्यामुळे आईची बोलणीही खात होतो. आधी अभ्यास करा धडपणे, नाहीतरयावर्षी मूळीच नेणार नाही. असे आणि बरेच काही. आम्हीही घाबरून पुन्हा पुस्तकात डोके घालत असू. शेवटीआमचा अंत पाहून तो दिवस आला. रेल्वेत बसलों आणि दरमजल करीत आमच्या गावी येऊन पोहोचलो. आजीचेघर म्हणजे मोठा बंगला. मागे पुढे प्रचंड अंगण. फुले,फळे, शोभेची झाडे, पाहातच राहावे. खेळणें, खाणें आणि मस्तलोळणे. आजीकडे गडीमाणसे खूप होती. प्रत्येक कामाला माणूस होते. मला फार मजा वाटे. काहिही म्हणायचाअवकाश लागलीच कोणीतरी लगबगीने येई आणि करी. मुंबईच्या लहानश्या तिन खोल्या, खालून पाणी भरणे, सारेकाही आपणच करणे ह्या पार्श्वभूमीवर ही चैन आम्हाला आवडत असे. सगळ्यांना आम्ही नातवंडांनी लळा लावलाहोताच त्यामुळे तेही आनंदाने सारे काही करीत.

आम्ही पोहोचेतो राञ झाली. त्यामुळे गेल्या गेल्या गरम गरम साधंच पण रूचकर जेवण जेवून मी आजीच्याकुशीत झोपीही गेले. दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी उजाडले त्यावेळी सकाळचे दहा वाजून गेले होते. स्वयंपाकघरातूनछान छान वास येत होते. पटकन तोंड धुवून मी ओट्यापाशी गेले आणि लक्षात आलें की नेहमीच्यास्वयंपाकिणबाई नाहीत ह्या. मग आजीला विचारल्यावर कळाले, अक्कांना आताशा होत नाही त्यामुळे ह्यांना नेमलेआहे. त्यांचे नांव शालीनी होते. सगळे त्यांना शालूताई म्हणत. गोऱ्या, घाऱ्या डोळ्यांच्या, शेलाटा बांधा. स्वभावानेगरीब होत्या. पोरांचे पोट भरण्यासाठी हा मार्ग पत्करावा लागलाय हेही कळाले.एके काळी स्वतःच्या घरीनोकरचाकर असणाऱ्या शालूताईंना हे दिवस पहावे लागत होते. पण त्या स्वाभिमानी होत्या, दिराकडे जातास्वतःच हिमंतीने प्रयत्न करीत होत्या.का कोण जाणे त्यांच्याबद्दल मला खूप सहानुभूती वाटू लागली. आमचीहळूहळू चांगली गट्टी जमली.त्यामुळे कधीमधी आजीचा ओरडाही खावा लागू लागला. "खेळायचे सोडून कशालासारखे स्वयंपाकघरात लुडबूडत असतेस ?" असेच दोन-तिन आठवडे गेले. आम्ही पोरे उंडारत होतो. पानमळ्यातले जेवण,अंगणातील भेळ,पॉटमधले किंचित खारट आईस्क्रीम, उसाचा रस.... .मज्जाच मज्जा.

सकाळी सकाळी घरात गोंधळ-गडबड ऐकू आला म्हणून डोळे चोळत चोळतच गेले, तर दररोज पूजा करायलायेणारा नारायण रडवेला होऊन आजीला सांगत होता," देवाशपथ नैवेद्याची वाटी काल इथेच ठेवली होती, पण आजती दिसत नाहीये." आमची आजी खूप प्रेमळ, दयाळू होती पण चोरी म्हटंले की मग माञ ती एकदम रूद्रावतारधारण करीत असे. नारायण आमच्याकडे खूप वर्षे काम करीत असल्यामुळे आजीला त्याचा संशय नव्हताच. इतरही सारेजण जुनेच होते, फक्त शालूताई नवीन. त्यात दोनच दिवसांपूर्वी त्यांनी आजीकडे दोनशे रूपये मागितलेहोते. मग काय आजीने त्यांना सगळ्यांसमोर विचारले, " खरे खरे सांगा, घेतलीत का तुम्ही?" ह्या साऱ्या प्रकारामुळेत्या खूपच भेदरून गेल्या होत्या.त्यात आजीने चोरीचा आळ घातलेला पाहून त्या कोलमडूनच पडल्या. त्यांनीपरोपरीने आजीला विनवले पण आमच्या आजीला काही पटले नाही. अचानक घडलेल्या ह्या घटनेने घरातसगळेजण दु:खी झाले. माझी मनोमन खाञी होतीच, शालूताईं असे काहीही करणे शक्यच नाही. दुसऱ्याच दिवशीआई आणि काकू ह्यांचे बोलणे कानावर पडले, शालूताईंनी खडीसाखरेचे सोळा सोमवार धरल्याचे. मला काहीचउमगले नाही म्हणून आईला विचारले तर प्रथम एक धपाटा मिळाला, "कारटे, मोट्या माणसांची बोलणी ऐकायलाहवीत." त्याकडे दूर्लक्ष करून मी पुन्हा विचारल्यावर कळाले की ती हरवलेली वाटी मिळून आपल्यावरील आळजावा म्हणून शालूताई सोमवारी दिवसभर उपवास करणार होत्या आणि राञी फक्त एक खडिसाखरेचा दाणा आणिएक भांडे पाणी पिणार होत्या. हे एकल्यावर मला तिथे राहावेसेच वाटेना. गरीबाच्या अपमानाची देवाघरी मांडलेलीफिर्यादच होती ती.

पाहता पाहता सुट्ट्या संपत आल्या. शाळांचे वेध आम्हा मुलांना लागले. निघताना मी शालूताईंच्याही पाया पडले, तशी डोळे पुशीत मला जवळ घेऊन त्या म्हणाल्या, " दिवाळीला येशिल ना?" आम्ही निघालो, पुन्हा चक्र सुरू झाले, नविन मैञिणी, परीक्षा ह्या साऱ्यात शालूताई मागे पडल्या. एकेदिवशी शाळेतून घरी आले तर आई रडत होती. मीघाबरून गेले, आता काय झाले? आईने शालूताईंचे पञ वाचायला दिले. त्यांनी लिहीले होते, नैवेद्याची वाटी त्यांचेसोमवार पुरे झाल्यावर चार-पाच दिवसातच सापडली. आमचा देव्हारा मोठा होता, देवाचे टाक ठेवण्याकरिताऊतरत्या पायऱ्या होत्या. त्याखाली गेली होती. पुढे असेही लिहिले होते, तुम्ही मायलेकींनी माझ्यावर दाखविलेल्याविश्वासाबद्दल आभारी आहे. आमच्या आजीने त्यांच्यावर आळ घातल्याबद्दल त्यांची माफीही मागितली होती. त्यावर एवढे होऊनही तुम्ही मला कामावरून काढून टाकल्यामुळे माज्या पोराबाळांचे हाल झाले नाहीत, ह्याचेचउपकार मी विसरू शकत नाही असे म्हणून त्यांनी आजीचे आभारच मानले होते.

चला शेवट गोड तर सारेच गोड. माञ माझ्या जीवाला त्यांचे ते सोळा सोमवार जिव्हारी लागलेत. शालूताईंचाविदिर्ण चेहरा डोळ्यासमोर येतो आणि परिस्थितीचे चटके जीवनात काय काय दाखवतात ह्याची जाणीव होते.

4 comments:

 1. सच और सहस है जिसके मन मै .. अंत में जित उसीकी हो ... :)

  ReplyDelete
 2. कसलं टची झालाय..आज मुद्दाम मागून वाचयला घेतला ब्लॉग..वेळ मिळेल तसा वाचेन...सगळीकडे कदाचित प्रतिक्रिया देता येईल अस नाही त्याला मुख्य कारण वेळेची सध्याची वाटणी पण मी मधेच कधी तरी वाचायला लागले न म्हणून जरा पूर्ण करेन....हा अनुभव तू खूप प्रभावी मांडला आहेस....

  ReplyDelete
 3. आभार यशोधरा! खूप उशीर झालाय तरीही... :)

  रोहना, सत्यवचन! :)

  ReplyDelete
 4. अपर्णा,धन्यू गं.आवर्जून आवडल्याचे कळवलेस आनंद झाला. :)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !