जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, February 24, 2009

कौतुकास्पद!!!

जानेवारी २००० मध्ये आम्ही अमेरिकेस आलो. मुंबापुरीतील घामाच्या धारांच्या गुलामीतून सुटून एकदम शून्यांच्या खाली तापमान असलेल्या प्रदेशात पोहोचलो. थंडीने दातखीळ बसली आणि पाठीच्या मणक्याचा पार निकाल लागला. हळूहळू आम्ही रुळलो. भुरभूर पडणारा, ऊन असतानाही तुषारासारखा अंगावर रुजणारा बर्फ, शेंबड्या बोरापासून ते मोठ्या गराळ बोरापर्यंतच्या गारांचा मारा कसा होतो आणि कसा लागतो ते अनुभवून झाले. काड्या झालेली झाडे बर्फमिश्रीत पाण्याच्या पुंगळ्या लेऊन समाधी लावून बसलेली असताना अचानक पडलेल्या लख्ख सूर्यप्रकाशाने काचेची होतात हे वर्णनातीत दृश्य डोळे भरून पाहून झाले. चार चार फुटाचा बर्फ दारातून उपसताना कोटाच्या आत वाहणाऱ्या घामाच्या धारा आणि नाकातून वाहणारे थंडीचे बक्षीस यात नक्की काय पुसावे हे न कळून काम करीत राहिलो. मजा-सजा ह्यांची बेरीज-वजाबाकी करीत दिवस चालले होते.

नोव्हेंबर महिन्याच्या चोथ्या गुरवारी इथे थँक्स गिवींग साजरे केले जाते. ह्या वर्षी ते २५ नोव्हेंबराला होते. सगळ्यांना सुटी असते. हा दिवस म्हणजे नुसती धमाल. सगळ्यात मोठा सेल ह्यादिवशी असतो. खरेदी करायची असो वा नसो सारेच पहाटेपासून कडाक्याच्या थंडीत आणि ढिगारभर बर्फात उत्साहाने हुंदडत असतात. त्याचप्रमाणे आम्हीही बाहेर पडलो होतो. ही आमची पहिलीच वेळ होती आणि आमच्यासाठी ही तारीख नेहमीच खास आहे. आमच्या सहजीवनाची सुरवात ह्याच दिवशी झाली आहे. हे म्हणाले की आज आपण मोठी खरेदी करायची. झाले, माझ्या पोटात मोठा खड्डा पडला आणि त्याचे प्रतिबिंब माझ्या चेहऱ्यावर दिसू लागले. नवरा आणि मुलगा ह्यांच्या एकमतापुढे टिकाव लागणे शक्य नाही हे कळत असूनही मी नन्नाचा पाढा नेटाने लावून धरला होता.

आमच्या छोट्या गावात एकच मोठे मॉल होते. तिथे जवळपास सगळ्या दुकानातून एक चक्कर होईतो दुपार झाली. भुकेची जाणीव काहीच सुचू देईना म्हणून तिथल्याच फूड मॉल मध्ये आम्ही गेलो. प्रचंड गर्दी झालेली. कशीबशी जागा मिळवून भल्या मोठ्या रांगेत उभे राहून ह्यांनी आणि मुलाने सॅंन्डविचेस आणली. खाताना असे ठरले की आपण मोठा दूरदर्शन संच घ्यायचा. ह्या दोघांचा उत्साह जोरदार होताच, आता मला त्यातला ठामपणाही दिसत होता. विचार केला आत्ता काही विरोध नको करायला. आधी दुकानात तर जाऊ, काही डिल्स आहेत का, किमती काय आहेत ते पाहू आणि मग काय ते ठरवावे. ह्या मॉल मध्ये ते दुकान नसल्याने तिथे जाण्यासाठी आम्ही निघालो. मोठेमोठे कोट, हातमोजे, टोप्या असा जड जामानिमा चढविला आणि बाहेर आलो.

गाडीत बसून दहा मिनिटावर असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानाच्या पार्किंग लॉट मध्ये गाडी लावली. आणि नेहमीच्या सवयीने सीटच्या खाली ठेवलेली पर्स घेण्यासाठी हात घातला. अरे देवा! पर्स गडबडीत फूडकोर्ट मध्येच राहिली होती. डोळ्यासमोर दोन्ही कप्प्यांमध्ये काय आहे हे तरळले. घराच्या किल्ल्या, पाकीट-त्यात पैसे, क्रेडिट-डेबिट कार्डे, चालक परवाना आणि असंख्य फुटकळ गोष्टी. मला माझ्या वेंधळेपणाचा आलेला राग त्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस, ह्या साऱ्या गोष्टी हरवल्या तर त्यामुळे होणारा मनस्ताप आणि हे दोघेही किती वैतागतील ह्या साऱ्यामुळे डोळ्यातून धारा वाहू लागल्या. "काय हा बावळटपणा. बरे जाऊ दे आता रडतेस कशाला? आम्ही असे केले असते तर किती बोलली असतीस." इति नवरा. मी चूप. कारण तो म्हणाला तसेच मी केले असते. नवरा म्हणाला चला परत मॉलमध्ये जाऊन पाहू पर्स सापडते का. मला मनातून वाटत होते काही उपयोग नाही, एक तर मॉल मध्ये आज प्रचंड गर्दी आहे आणि आम्ही तिथून निघून तिथे पुन्हा पोहचेपर्यंत अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ गेलेला असणार. पण मी काहीच बोलले नाही.

अंतर थोडे होते पण सगळेच फिरत असल्यामुळे गाड्यांची फार गर्दी होती. ति पंधरा मिनिटे संपता संपेना. एकदाचे आम्ही पुन्हा मॉल मध्ये आलो. आम्ही जिथे खायला बसलो होतो तिथे आता दुसरी माणसे होती. त्यांना इथे पर्स सापडली का असे विचारले असता नाही असे उत्तर मिळाले. मी तर केव्हाच आशा सोडली होती. नवरा म्हणाला गिऱ्हाईक मदत कक्षात जाऊन विचारूया. हे आमचे संभाषण जवळच उभ्या असलेल्या सफाई कामगाराने एकले आणि तो म्हणाला, " काळ्या रंगाची पर्स होती का तुझी? " मी हो म्हणताच, " अग आत्ताच मी मदत कक्षात नेऊन दिली आहे. ते देतील तुला. काळजी करू नको, आजचा दिवस सुखाचा जावो " असे म्हणून तो गेलाही. आम्ही मदत कक्षात जाऊन थोडेसे पर्स चे वर्णन करताच तिथे असलेल्या आजीबाईंनी पर्स माझ्या ताब्यात दिली. सारे काही आहे ह्याची खात्री मला करून घ्यायला लावली आणि उरलेला सारा दिवस छान जाईल असे आश्वासनही दिले. तिचे आभार मानून तसेच तिच्याजवळ त्या सफाई कामगाराचेही चारचार वेळा आभार प्रदर्शित करून आम्ही गाडीत बसलो.

आता हे दोघेही माझ्या वेंधळेपणाला व नंतरच्या रडण्याला जोरात हसत होते. " आता खबरदार दूरदर्शन संच घेताना काही कटकट केलीस तर. पर्स मिळाल्याचा आनंद कर. " इति नवरा. हे एवढे रामायण झाल्यावर मी कसलाही विरोध करणार नव्हतेच. मनात मात्र राहून राहून त्या सफाई कामगाराच्या प्रामाणिकपणाला सलाम करीत होते. इतक्या प्रचंड गदारोळात, एवढा वेळ मध्ये जाऊनही माझी हरवलेली पर्स जशीच्यातशी मला परत मिळते हे अतिशय कौतुकास्पद आहे.

काही वर्षांनी ह्या अनुभवावर कडी करणारा प्रसंग घडला. नेहमीप्रमाणे आम्ही किराणासामान, भाजी-फळे, वगैरे घेण्यासाठी वॉलमार्ट मध्ये आलो होतो. माझे आई बाबाही बरोबर होते. खूप खरेदी झाली होती. पैसे देऊन आम्ही बाहेर आलो. ट्रॉलीमधून सगळे सामान गाडी मध्ये भरले. घरी आलो. सामान जागेवर लावणे सुरू असताना आईने विचारले, " अग, बागकामाचे सामान कुठे आहे? ति पिशवी गाडीतच राहिली का?" मी म्हणाले नाही. सगळे सामान तर आणले घरात. बील तपासले असता दोन छोट्या कुंड्या, खुरपे, बागकामाचे मोजे आणि झाडे कापायची छोटी कात्री हे सामान बहुदा ट्रॉलीतच राहिले असावे असे वाटले. असे कसे विसरलो असे म्हणत आम्ही सगळे हळहळलो.

नेमके दुसऱ्याच दिवशी काही कारणाने नवरा पुन्हा वॉलमार्ट मध्ये जायला निघाला. घाबरत घाबरत त्याला गिऱ्हाईक मदत कक्षात चौकशी करायला सांगितली. अशा गोष्टीमुळे नेहमी वैतागणारा माझा नवरा बरं म्हणाला. चला निदान घरातच नन्नाने सुरवात झाली नाही. मी बीलही बरोबर दिलेच होते. वॉलमार्ट मध्ये बील दाखवून काल ह्या गोष्टी बहुतेक ट्रॉलीमध्येच राहिल्या आहेत व त्या तुम्हाला मिळाल्या असतील तर पाहाल का? असे विचारले असता हसतमुखाने, " अरे असे झाले का? होते कधी कधी. काळजी नको करूस. मी पाहते काय करता येईल ते. " असे उत्तर आले. नंतर तिने त्या सगळ्या वस्तूंच्या किमतीची बेरीज केली आणि तेवढे पैसे माझ्या नवऱ्याच्या हातावर ठेवले व ह्यावर्षीच्या बागकामाच्या शुभेच्छा दिल्या. कसलीही कटकट नाही की उपकार केल्याचा भाव नाही. असेही घडू शकते हे खरे वाटत नाही.अजूनही जगात माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला जातो. हि भावना फार मोठी आहे. माणसामधील खरेपणा वाढवण्यास उत्तेजन देणारी. कौतुकास्पद!

No comments:

Post a Comment

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !