जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, June 21, 2011

तडजोड की अव्याहत चालणारी अपरिहार्यता...

आमच्या वसाहतीचे एक छोटेसे जीम व तरणतलाव आहे. गेले काही दिवस मी नित्यनेमाने जीम मध्ये जाते आहे. जीम व तलाव वसाहतीच्या मानाने फारच पिल्लू आहेत. पण आहेत हेही नसे थोडके या धरतीवर उपयोग करून घेण्याचा माझ्यासारखाच प्रयत्न इतरही करत असतात. सुरवातीला तरणतलावावर सकाळी व संध्याकाळी बराच गजबजाट असायचा. सकाळी भरणा असे तो बायकांचा. अगदी लहान पोरींपासून ते आज्यांपर्यंत. बराचश्या तेराचौदा ते वीसबावीशीतल्या पोरी स्वीमसूटमध्ये सनबाथ घेत पहुडलेल्या. तलाव रिकामाच. अगदी बापुडवाणा दिसायचा. एक डुबकी तरी कोणी मारेल पण नाही. अक्षरशः एक तरंगही उठत नसे. संपूर्णपणे पाण्याने भरलेला असूनही कायम तहानलेला भासायचा. आशेने कधी तारुण्याच्या उंबरठ्यावरील पोरींकडे पाही तर कधी आज्यांचे अखंड संवाद निमूट ऐकत राही. मात्र संध्याकाळी तलाव आनंदाने ओसंडून वाहत असे. धडाधड उड्या घेत डुंबणारी लहान मुले, त्यांची किंचाळाकिंचाळी, बारबेक्यू करणारे निरनिराळ्या वयोगटातील पुरुष, त्यांच्या मोठ्यामोठ्याने चाललेल्या निरनिराळ्या विषयांवरील गप्पा. मधूनच तलावात बुडी मारून पुन्हा बारबेक्युशी झटापट करण्यातली त्यांची लगबग. क्वचित गॅलऱ्यांमध्ये उभे राहून कॉफीचा घोट घेत घेत या सगळ्यांचा आस्वाद घेणारी मंडळी. तलावाची खुशी झलकत असे.

रोज ठराविक वेळी गेल्याने हळूहळू चेहरे ओळखीचे होऊ लागलेले. " हाय! हाव आर या? टेक इट ईझी मॅन... स्टे कूल." सारख्या संवादांची देवाणघेवाण होऊ लागलेली. एक दिवस गेले नाही तर लगेच येऊन दोघीतिघी विचारून गेल्या, " काय गं बरी आहेस ना? काल दिसली नाहीस? " हो. हो मी बरी आहे. काल जरा कामात होते नं म्हणून नाही आले. असे सांगून मी जीममध्ये आले. त्यांची ती विचारपूस मनाला आनंद देऊन गेली. मन एकदम गणेशवाडीत जाऊन पोहोचले. सकाळी ८.१५ ला घर सोडल्यावर कोण कुठल्या वळणावर भेटेल याचे गणित पक्के होऊन गेलेले होते. ज्या दिवशी कोणीच भेटणार नाही त्यादिवशी अक्षम्य उशीर झालेला असे. कुठली गाडी नक्की मिळेल याचेही गणित या साऱ्यांच्या टप्प्यातच गुंफलेले असायचे. पण ही नोंद बरेचदा मुकीच असायची. नजरानजर, हात उंचावून नोंद घेतल्याची पावती देणे, क्वचित दोन शब्द. पण जो तो स्वतःच्या नादात व घाईत असल्याने वर्षोनवर्षे रोज पाहिलेल्या कित्येकांची नावेही मला कधीच कळली नाहीत. कधी कधी ओळीने पंधरा दिवस एखादी गायब असायची. अचानक एक दिवस उत्फुल्ल चेहरा घेऊन समोर यायची. तिला पाहताच नकळत भुवया उंचावल्या जात. डोळे लकाकत. आपसूक हात, " काय गं? कशी आहेस? " विचारून जाई. तिही तितक्याच सहजपणे, " छान आहे सारे. " असे सांगून पुढे सरके. बरेच दिवसांनी कोटा पूर्ण झाल्यासारखा वाटे.

सातत्याने अनेक चेहरे पाहून पाहून ते आपल्या व आपण त्यांच्या ओळखीचे होऊन जातो. मग अवचित ते चेहरे अचानक नव्याच जागेवर दिसले तरी ओळख पटून जाते. असे असूनही मुद्दामहून कोणीही संभाषणाचा धागा छेडत नाही. खरे तर अगदी सहज जी प्रतिक्रिया मनात उमटते, " अय्या! इथे कुठे? " किंवा " अरे, काय म्हणताय? " ती गळ्यातून बाहेर येत नाही. नजरेतून, चेहऱ्यावरील हावभाव हे सगळे आधीच व्यक्त करून गेलेले असतातच, म्हणूनही असेल कदाचित. किंवा, आपण ओळख दाखवलेली आवडेल का नाही? उगाच खेटायला येते/येतोय असे तर वाटणार नाही. रोज तर आपण एकमेकांसमोरून जातो येतो पण अजूनपर्यंत एकदातरी संवाद झालाय का? नाही ना, मग आता कसा करावा? अश्या अनेक शंकाकुशंका मनाला मागे खेचतात. म्हटले तर ओळखीचे म्हटले तर अनोळखी असे हे धागे.

आज सकाळी नेहमीप्रमाणे जीम गाठले. बहुतांशी सकाळी नऊ ते दहा/साडेदहा जणू ते फक्त माझ्याच मालकीचे असल्यासारखे असते. क्वचित दोन तीन आज्या उगाच पाच मिनिटे सायकल पळवून पसार होतात. कधीतरी एक मुलगा वेटस करतो. मधून मधून डोकावून पंधरा मिनिटात गायब होणारे दोघे तिघे आज धडपडून गेले होते. धावपट्ट्याला दोन मैल दमवले. तिसऱ्याची सुरवात केली आणि जीमचे दार जोरात ढकलल्याचा आवाज आला. मागे वळून पाहिले तर चांगली साडेसहा फुटापेक्षा जास्त उंची व सहजी तीनशे पाउंड वजन असेल असा एक पस्तिशीचा गोरा धाडकन जीम मध्ये घुसला. मी त्याच्याकडे पाहायला आणि त्यानेही माझ्याकडे पाहायला एकच गाठ झाल्याने त्याने ' हाय ' केले. प्रत्युत्तर म्हणून मीही हाय म्हणायला जात होते तोवर तो माझ्या ट्रेडमिलशी येऊन पोहोचला. मी ३.८ चा स्पीड पकडलेला असल्याने चटकन घशातून आवाज निघाला नव्हता. त्यात तो माझ्या इतका जवळ का आलाय, या विचाराने मी गोंधळून गेले. एकतर मी एकटीच होते जीममध्ये त्यात असे कोणाच्या स्पेसमध्ये ढवळाढवळ करायला कोणीच कधी येत नसल्याने थोडी अस्वस्थही झाले होते.

माझ्या ट्रेडमिल शेजारीच अजून एक ट्रेडमिल आहे. पण ते बरेच दिवस झाले बंद पडलेय. तो त्याच्यावर उभा राहिला आणि त्याने पुन्हा मला, " हाय ! " केले. मी नुसते एक स्मित केले आणि पुन्हा नजर ट्रेडमिलच्या स्क्रीनवर केंद्रित करण्याचा प्रयत्न करत डोळ्याच्या कोपऱ्यातून तो काय करतोय त्याचा अंदाज घेत असतानाच, " अगं, मी आज फार फार चिडलोय. ही माझी गर्लफ्रेंड ना मला जगूच देत नाही. " हे बोलून तो वाकून माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागला. अर्थातच, मी यावर काहीतरी बोलावे या अपेक्षेनेच. एकतर मी त्याला आयुष्यात प्रथम पाहत होते. त्यात त्याचा स्वर अतिशय गंभीर होता. नाहीतर इथे बरेचदा थट्टेने आपापल्या जीएफ/ बॉयएफ बद्दल बोलणारे खूप जण सापडतात. पण त्यांना कुठल्याच संवादाची अपेक्षा नसते.

त्याचे वाकून अपेक्षेने पाहणे थांबेना म्हणून मी त्याला म्हटले, " अरे, असे प्रत्येकालाच वाटते. तीही हेच म्हणत असेल बघ. " मला मध्येच तोडत तो म्हणाला, " तुझ्या लग्नाला किती वर्षे झाली गं? तू इंडियन आहेस ना? माझे काही इंडियन मित्र आहेत. त्यांची लग्ने होऊन दहा दहा वर्षे झालीत पण अजूनही किती आनंदाने एकत्र राहतात. मला खरेच खूप हेवा वाटतो त्यांचा. माझेच बघ ना... माझा ' एक ' घटस्फोट झालाय. एक मुलगीही आहे. पाच वर्षांची आहे ती. खूप गोड आहे. पण आता ती तिच्या आईबरोबर असते. ती तिच्या आईच्या नव्या बॉयफ्रेंडबरोबर राहते. लहान असताना मीही अश्याच वातावरणातून गेलो असल्याने किती त्रास होतो अश्या विभक्तीचा हे एकदा नव्हे तीनदा अनुभवले आहे. मूल झाले तर त्याला माझ्यासारखे अखंड फरफट होणारे बालपण देणार नाही असे प्रॉमिस मी, " स्वतःला व त्या न झालेल्या बाळाला केले होते. " पण प्रत्यक्षात झाले अगदी तेच. माझ्या लेकीचा उदास चेहरा पाहिला की स्वतःचीच घृणा वाटते. का नाही मी तुम्हा इंडियन सारखी तडजोड करू शकलो? कित्येकदा माझ्या मित्रांना, त्यांच्या बायकांना चिडताना, भांडताना पाहिलेय. अगदी कड्याच्या टोकावर पोचलेलेही पाहिलेय पण असे असूनही ते आजही एकत्र आहेत. केवळ मुलांसाठी तडजोड करावीच लागली असे त्यांनी कितीही म्हटले तरीही कुठेतरी त्यांचे एकमेकांवरचे प्रेम अजूनही संपलेले नाही. मी माझ्या गर्लफ्रेंडला म्हणत होतो की तू तुझ्या मुलाला आण मी माझ्या लेकीला आणतो आणि आपण त्यांना एक सुरक्षित, सुंदर बालपण, तारुण्य देण्याचा प्रयत्न करूयात. आश्वासक, उबदार भीतीरहीत घर. जिथे ते कुठल्याही ताणाखाली वावरणार नाहीत. पण माझी जीएफ अजिबात तयार नाही. ती फक्त तिचाच स्वार्थ पाहण्यात दंग आहे. तिला ना तिच्या मुलाला आणायचे आहे ना माझ्या लेकीला आणू द्यायचे आहे. बिनधास्त, कुठल्याही जबाबदाऱ्यांशिवाय मुक्त जगायचे आहे. "

एका दमात सगळी मळमळ त्याने भडाभडा ओकून टाकली. त्याच्या या सगळ्या बोलण्यातून, मधून मधून शेव्ह केलेल्या डोक्यावर, कपाळावर तळवे घासण्यातून, त्याची असहायता, लेकीची आठवण, अपराधीपण, सारे सारे माझ्यापर्यंत पोचत होते. तो अजूनही बरेच काही बोलत होता. मैत्रीण आणि एक्स वाइफही कश्या स्वार्थी आहेत याची उदाहरणे देत होता. मला तर वाटतेय की मी मैत्रिणी बरोबर आता राहूच नये... या निर्णयापर्यंत येऊन पोहोचला होता. अचानक त्याला जाणीव झाली की आपण बराच वेळ बोलतोय आणि ही तर आपल्या ओळखीचीही नाही. तरीही इतका वेळ शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल दहा वेळा माझे आभार मानून व मला आता खूप हलकं वाटतंय. फार फार गरज होती गं कोणीतरी ऐकून घेण्याची. तू किती चांगली आहेस. भेटू पुन्हा. तुझा दिवस शुभ जावो, असे म्हणून तो आला तसा निघून गेला. माझीही साडेतीन मैलाची तंगडतोड झालेली होतीच. मी ही घरी आले.

त्याच्या बोलण्याने माझे विचारचक्र धावू लागले होतेच. किती सहजपणे त्याने त्याच्या खाजगी गोष्टी माझ्याशी शेअर केल्या होत्या. हिने कधी कोणाला हे सांगितले तर... किंवा आपण एकाच सोसायटीत राहतो म्हणजे जीएफ सोबत कदाचित आपली पुन्हा भेट होऊ शकते. त्याला कुठलेच प्रश्न पडलेले नव्हते. त्याला थोडेसे सबुरीने घ्यावेस व कूल डाउन करण्याव्यतिरिक्त मी कुठलाही सल्ला त्याला दिला नव्हता की उगाच नाकही खुपसले नव्हते.

आपल्या समाजातील तडजोडी करण्याबद्दल, सहनशीलतेवर त्याने बरेच भाष्य केले होते. त्याला दिसलेले, जाणवलेले चित्र चांगले होते. वाटले, खरेच का या चांगल्या चित्रामागे फक्त तडजोड, प्रेम, सहनशीलताच दडलेली आहे? का निव्वळ अपरिहार्यता, नाईलाज व एकाचा अव्याहत सोशिकपणा आहे.का केवळ मुलांमुळे व फक्त मुलांसाठी दिवसागणिक विरत चाललेल्या चादरीला ठिगळं लावत जगायचे. जर तसे नसते तर चाळीस-पन्नास वर्षे संसार करून वयाच्या सत्तरीत आजींना घटस्फोट घ्यावासा का वाटतो? मला आता तरी जगायचे आहे असे त्या ठामपणे सांगतात आणि नुसत्या सांगतच नाही तर तो निर्णय त्या अमलातही आणतात. ऐंशी वर्षाचे आजोबा पंचावन्न वर्षांनी दुसरे लग्न करतात तेही मुलासुना-नातवंडांना सोबत घेऊन. आता कुठे आनंदात जगायला लागलो असेही नमूद करायला विसरत नाहीत. सहन करण्यालाही मर्यादा असायला हव्यात.पती-पत्नीमधले सामंजस्य सहवासाने, मानसिक गुंतवणुकीमुळे वाढत नसेल तर केवळ संसार रेटला इतकेच करावे का? केलेच तर किती काळ.कधीतरी निव्वळ साधेसरळ जगावे.

आज आपल्याकडे विभक्त कुटुंब बरीच दिसू लागलीत असे सारखे ऐकू येतेय, काही अवतींभोवती दिसतातही. पूर्वीपेक्षा जास्त आणि निर्णयाप्रती ठाम व सशक्त. पण समाज, घरचे-दारचे, मुलं आणि जोडीदाराची वाटणारी भीती यामुळे आहे तेच जीवन मरेस्तोवर रेटणारीच घरेच जास्त आहेत. ' नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन ' हेही खरेच. शहर आणि गावं अशी तुलनेची तफावत या बाबतीत फारशी दिसून येत नाही. घटस्फोट घ्यावा असे कधीच कोणीच म्हणणार नाही. मात्र जेव्हा जगण्यापेक्षा मरण्याकडे कल वाढू लागतो तेव्हा तरी स्वतःला अन्यायापासून सोडवायला हवे. माणसाचा एकदाच मिळणारा जन्म कश्या पद्धतीने जगावा याचा हक्क तरी प्रत्येकाला असायला हवा. का तो हक्क फक्त जोडीदाराचा, मुलांचा असे म्हणत आयुष्य खंतावयाचे. जसा अन्याय करणे हा गुन्हा आहे तसेच अन्याय सहन करत राहणे हाही गुन्हाच आहे. आणि तो अखंड करत राहून ' त्याग ' या गोंडस भावनेतून स्वतःची फसवणूक करणे हा त्याहूनही अक्षम्य गुन्हा आहे. कधीकाळी एकमेकांवर भरभरून प्रेम केले होते, अत्यंत ओढ होती म्हणूनच लग्नही केले. म्हणून केवळ ते टिकवण्याचा अट्टाहास स्वत:चे आस्तित्व मिटवून करावा का? समपर्ण हे दोन्हीबाजूने व्हायला लागते. स्वभावानुसार त्याचे प्रमाण कमीजास्त असू शकेल. जात्याच झोकून देणारी वृत्ती व मुलत: आत्मकेंद्रित प्रवृत्ती एकत्र आल्या की एक जण भरडला जाणारच.

या नात्याचे एक अधिक एक बरोबर दोन इतके सोपे गणित नक्कीच नाही. या नात्याची व नात्यातून निर्माण होणार्‍या गुंतागुंतीची व त्यातून निर्माण होणार्‍या प्रश्नांची व्याप्ती फारच मोठी आहे. संसार म्हटला की तडजोड,त्याग,सहनशीलता हवीच. तीही दोन्हीबाजूने. अनेकविध बाबी यात गुंतलेल्या आहेत. कडेलोट होईतो सामंजस्याने एकत्र राहण्याचाच प्रयत्न दोन्ही बाजूंनी केला जातो हेही खरेच. परंतु अश्या घरामधला धुमसता तणाव सगळ्यांचेच मानसिक स्वास्थ्य उध्वस्त करत असतो. विभक्तीच्या निर्णयाच्या परिणामांपेक्षाही याचा असर दूरगामी व खोलवर रुतून राहतो. मग स्वतःचा बळी देऊन नेमके काय साधले हा प्रश्न जर आयुष्याच्या संध्याकाळी पडला तर बोल कोणाला लावावा....

20 comments:

  1. लेख छान झाला आहे. विचार करावयास लावणारा.

    ...एकदा मुले होऊ दिली की आयुष्याच्या priorities बदलून जातात वा बदलावयास लागतात. कारण बहुतेकवेळा त्यांना जन्म देणे, ही आपली इच्छा असते. त्यांची नसते.
    फक्त तडजोड, अति व एकतर्फी झाली की त्याचे वाईटच परिणाम होतात. आणि दुर्दैवाने ते मुलांना भोगावे लागतात.
    ह्या बाबतीत प्रत्येक माणसामाणसाला 'केस' बदलते. एकसरशी नियम नाही बनवून टाकता येत...

    ...लेख वाचून हे मनात आलं...
    :)

    ReplyDelete
  2. दुर्दैवाने आजही अगदी आपल्या जवळच्या व ओळखीच्या घरांमधेही मन विषण्ण करणारे चित्र सातत्याने दिसते. :(

    नियम करण्यासाठी साचेबध्दपणा हवा. इथे नेमके उलटच आहे. म्हणूनच कितीही कायदे केले किंवा समुपदेशन दिले गेले तरीही जोवर ’ आतले मन ’ बदलत नाही तोवर एकाची फरफट व एकाची मुजोरी चालूच राहणार.

    धन्यू गं.

    ReplyDelete
  3. श्रीताई, एकदम मस्त पोस्ट, खुप विचार करायला लावणारी. अशी अनेक उदाहरणं माझ्या मित्र वर्गात बघायला मिळाली होती मला. माझ्या ऑफिसमध्ये उसगावाची मंडळी ही मोठ्या प्रमाणात असल्याने अश्या गोष्टी नेहमी कानावर यायच्या. प्रत्येक नात्यात कधीनाकधी असे क्षण येतातचं की, आपण विचार करतो द्यावं तोडून त्या नात्याची सगळी बंधने आणि व्हावं मोकळं. फक्त त्या क्षणी,ती नाती तोडताना ती का जोडली गेली ह्याचा विचार मनापासून करावा आणि नाती सावरून घ्यावी :) :)

    ReplyDelete
  4. मला हल्ली असं बर्‍याचदा वाटायला लागलंय की आपल्यात "टिकवून" ठेवण्याचा अतिरेक आहे आणि यांच्यात "मोडून" टाकण्याचा अतिरेक !! दोन्हीकडे एक्स्ट्रीमच !! अर्थात सरसकट म्हणत नाहीये मी. पण बर्‍याच मोठ्या प्रमाणात.

    ReplyDelete
  5. खूप-खूप छान मांडला आहे विषय. आपल्याकडेही याची लागण होऊ लागली आहे. कायद्याच्या काठीचा उपयोग करून सुंदर घरटी विस्कटली जात आहेत. प्रेम, समर्पण, त्याग हे शब्द लोकांना फिल्मी वाटू लागले आहेत. स्वैर वागण्याला पायबंद बसतोय असे वाटले की घर मोडायला लगेच तयार होतात. पण आपलं काही चुकतंय का हे पाहण्याची तसदी मात्र कोणीही घेत नाही. दोन पावले मागे यायची कोणाचीच तयारी नाही. "मी' चा का? यामुळे असे प्रकार घडत आहेत. पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करताना वाट्टेल ते स्वीकारण्याची वृत्ती वाढत आहे. तुम्ही जेथे राहता तेथे तर असे वागणे हीच संस्कृती बनलेली आहे, मग तुम्हाला भेटला त्या तरुणाप्रमाणे जो सेन्सेटीव्ह आहे, त्याला त्रास होणारच.
    -मस्त विचारांना खाद्य पुरविणारा लेख.....(खूप दिवसानंतर एकदम मास्टर स्ट्रोक)

    ReplyDelete
  6. परिचित, अभिप्रायाबद्दल आभार.

    बरेचदा मला वाटायचे की माझ्या आजीच्या, आईच्या, अगदी गेल्या दोन दशकांपर्यंतच्या पिढ्यात हा अतिरेक जास्त दिसत होता. परंतु वास्तवात आजही चित्र तेच आहे. उलट त्यातील छळांत भर पडली आहे. ’ समर्पणाची भावना ’ दोघांतही हवीच ना...

    ReplyDelete
  7. सुहास, अगदी खरे. नाती जेव्हां बांधली जातात ते क्षण किती तरल, सुंदर असतात. हळूहळू त्यात हक्क शिरकाव करतो. म्हणजे तो नेहमी असतोच फक्त आधी पडद्याआड राहून प्यादी हलवतो. एकदा का दोहोतील एकाने निषेध नोंदवला नाही की सुरू होतो गृहित धरण्याचा व आग्रही मतांचा प्रवास.

    आभार्स! :)

    ReplyDelete
  8. हेरंब, तर काय. दोन्हीं चुकीचेच. बरेचदा समजत असतं पण आचरणात आणायचं धैर्य नसतं.( हे आपल्याकडे ) आणि इच्छा असते, तडजोड करायला हवी हेही कळत असतं पण शेवटी ’ स्व ’ यावर मात करतो आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या...

    धन्स रे.

    ReplyDelete
  9. प्रसाद, अंधानुकरण का संधी साधणे...?? तू म्हणालास तसे, स्वैर वागण्याला पायबंद बसतोय असे दिसले की लगेच घरे मोडून टाकायचीच तयारी. :( दोन पावले मागे येणे जाऊचदे पण निदान आत्मपरिक्षण तरी...

    आजही ’ तो ’ आला होता. कालपेक्षा बरा वाटला. लॉंग विकेंडला मुलीला जाऊन भेटणार आहे असे म्हणत होता. लेक भेटणार या कल्पनेनेच चकाकणारे त्याचे डोळे पाहून खूप आनंद झाला.

    धन्यू रे!

    ReplyDelete
  10. अतिशय समर्पक रित्य आजच्या साजिक परिस्तिथीचे वर्णन केले आहे. सगळाच गुन्ता आहे.पूर्वी बायका सर्वस्वी नवर्यावर अवलंबून असायच्या. पिढ्या अन पिढ्या असेच चालत आल्यामुळे बायकांचेच संपूर्ण समर्पण ग्रुहीत धरले गेले.त्यात पुरुषी स्वार्थ असल्यामुळे अजुनही ते हक्क सोडायला तयार नाहीत.स्त्र्री स्वतंत्र झाली, कमावती झाली. तिच्या अपेक्षा वाढल्या,अधिकार पण वाधले आणी संघर्ष सुरु झाला.
    समजून कोण घेणार आणी तड्जोद कोण करणार?माणसाचा ईगो फ़ार मोठा असतो. त्यात पास्चात्य विचारसरणी तर स्वार्थी आणी भोगवादी सगळ कठीणच आहे.

    ReplyDelete
  11. सगळाच गुंता गं..थोडंफ़ार हेरंबशी सहमत होईन मी...
    ते जिम आणि तलावाचं वर्णन तंतोतंत इथल्याथी जुळतंय...आणि विचारपुसबद्द्ल म्हणशील तर मी म्हणेन "वेलकम टु वेस्ट कोस्ट"....हा मुख्य फ़रक मला तरी जाणवलाय....
    बरंच काही कव्हर केलंस पोस्टमध्ये आणि एक सध्याच्या काळातली दुखरी नस उघडलीस....सहन करत राहणं हा (बर्‍याच भारतीयांनी स्विकारलेला) पर्याय असू शकतो का हा एक आणखी मुद्दा...पण सुरुवातीला म्हटलं तसं सगळा गुंता....

    ReplyDelete
  12. अभिप्रायाबद्दल आभार्स अरुणाताई.

    आजही आपल्या समाजाचे मन पूर्वीच्याच बेड्या जाणूनबुजून बाळगू इच्छिते आहे. अन्याय करणारे आणि सहणारेही. मात्र क्वचित काही ठिकाणी पुरुषाचाही सोशीकपणा नजरेस पडतो. प्रमाण अत्यल्प असले तरी आहे हे नक्की. ते पाहता वाटते की शेवटी हे ’ प्रवृत्तीवरच ’ निर्भर आहे.

    प्रत्येक घराची तर्‍हा न्यारी-निराळी. म्हणूनच सर्वसाधारण समीकरणात न बसवता येणारी...

    ReplyDelete
  13. ” सहन करत राहणं ’हा बहुतांशी लोकांनी स्वत:हून स्विकारलेला निर्णय असल्याने झगडा देण्याचा मार्गच त्यांनी जाणूनबुजून बंद केला आहे. हे घातक आहे. पण आपल्याकडे या अनुषगांनी उदभवणार्‍या समस्याही तितक्याच प्रचंड असल्याने कधीकधी इच्छा असूनही," तोंड दाबून बुक्क्याचा मार " सोसावा लागतो. :(

    वेस्टकोस्ट मस्त होरपळवतयं. :D:D

    धन्स गं!

    ReplyDelete
  14. लेख वाचला. सगळ्या प्रतिक्रिया पण वाचल्या. त्यातली अनघाची प्रतिक्रिया
    "एकदा मुले होऊ दिली की आयुष्याच्या priorities बदलून जातात वा बदलावयास लागतात. कारण बहुतेकवेळा त्यांना जन्म देणे, ही आपली इच्छा असते. त्यांची नसते.
    फक्त तडजोड, अति व एकतर्फी झाली की त्याचे वाईटच परिणाम होतात. आणि दुर्दैवाने ते मुलांना भोगावे लागतात.
    ह्या बाबतीत प्रत्येक माणसामाणसाला 'केस' बदलते. एकसरशी नियम नाही बनवून टाकता येत..."
    एकदम मनाला पटली.

    आणि तुझ्या पोस्ट मधले हे वाक्य -तडजोडिवरच भारतीय विवाह पद्धती टिकुन आहे हे पण पटलं. सुरुवातीला तडजोड ,एकमेकांना समजून घेण्यासाठी, नंतर मुलांसाठी!

    ReplyDelete
  15. भानस, कित्ती दिवसांनी तुझा ब्लॉग वाचतोय!!! खरंच छान वाटलं... असं वाटलं जणू काही एखादी मोठी बहिण तिच्या भावंडांना नाती कशी जपावीत आणि कधी जपावीत हे समजावून सांगतेय.

    ब्लॉगचा नवा लूक ही छान आहे. आवडला :)

    ReplyDelete
  16. पण खरच कधीतरी असे क्षण येतात कि एका बाजूने कितीही जपायचा प्रयत्न केला तरी नात तुटल जाते ...

    ReplyDelete
  17. खरे आहे महेंद्र. आपल्याकडे तडजोड करण्याची इच्छा व गरजही प्रबळ असल्याने कुटुंबे तग धरून आहेत. त्याचे फायदे खूपच आहेत पण अन्यायही आहेत. :(

    आभार्स! :)

    ReplyDelete
  18. श्रीराज, अरे मला वाटले विसरून गेलास की काय तू मला... :(

    आलास. प्रतिक्रियाही दिलीस, धन्यू रे.

    ReplyDelete
  19. जो प्रयत्न कायम एकतर्फीच होतो त्याचे पर्यवसन तुटण्यात होण्याची शक्यताच जास्त असतेच. परंतु, आपल्याकडे प्रत्यक्षात खूपच सो्शीकपणा व समंजसपणाही असल्याने गैरफायदेही सर्रास घेतले जातात. :(

    देवेन अनेक आभार. छान वाटले तुझी प्रतिक्रिया पाहून.

    ReplyDelete
  20. क्लासिक Grey Area आहे हा... ज्यानं त्यानं स्वतःचं ठरवावं! :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !