जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, November 25, 2010

चिवट....

चाळींचे स्वतःचे खास रसायन असते. आताशा ' असायचे ' असेच म्हणावे लागेल. इतक्या अशक्य वेगाने उभ्या राहणाऱ्या गगनचुंबी सदनिका पाहून माझी मातीला नमन - णारी, चुंबणारी पावले दचकू लागतात. तिने डोळे वटारून माझ्याकडे पाहून म्हटले तर, " बेमुर्वत... तेरी इतनी मजाल की मेरे सोने देह पे तेरे इतने मलिन पैर.... तौबा... तौबा!! कोई बचाए मुझे इन मन, प्यार, स्नेह के पुजारीओंसे. अभी तक माझी चाळ, माझी माणसे, वाटीतल्या भाजीची देवघेव, काकू पटकन साखर द्या हो तिकडे गॅसवर चहा उकळू लागलाय.... ( बेवकूफ, साखर नाही ना घरात मग बंद कर की गॅस. काकूंनी काय ठेका घेतलांय. पण नाही. मिजास देखो लडकी की.... जैसे उसका हक बनता हैं काकू की शक्कर पे... और काकू के क्या कहने? वो अटकी पडी हैं पडोस धर्म, सख्खे शेजारी, सलोखा... और न जानें क्या क्या, कहानी में भी शोभा न दे ऐसें पन्नों में.... ) मध्येच अटकून पडलीत. शेवटी काय, हे मध्यमवर्गीय.... तेही गिरणगावातले, काळाबरोबर कितीही उंच उंच उड्या मारू देत, फिरून भावना, प्रेम यातच मरणार. एकेका फरशीच्या तुकड्याची किंमत मोजायची सोडून, ' किती गोत जोडलं ' ची नाणी रोज रात्री मनाच्या गाडग्यात छनछनवत उकाड्यात निवांत निजणार. "

अय्याSSS.... तरीच म्हटले, कितीही सोन्याने मढलीस तरी शेवटी निवांत निजण्यावरच आलीस की. आता कसं मला मोकळं मोकळं वाटू लागलं. अगं कितीही तू सोन्यात तोललीस ना तरीही अजून तुझ्या तळाशी धुगधुगी आहे. आणि आठवणींच्या डोहाची खोली, आकाशाला भिडणारे तुझे डोलारे मुळीच मापू शकत नाहीत. त्यावर आजही समस्त मध्यमवर्गीय गिरणगावाचीच मालकी आहे बरं.

तर अशा या आमच्या चाळीचेही स्वतःचे खास नियम, चौकटी होत्याच. आपापल्या परीने जो तो त्यात भर टाकी किंवा त्यांना वकुबानुसार छेद देई. आपसात कितीही बंडाळी माजली तरी बाहेरच्या आक्रमणांना एकजूटीने सामोरे जाऊन समस्त चाळजनांची शान आणि मानही सारे सांभाळून असत. किंबहुना घरच्यांच्या मानापेक्षाही चाळीच्या ' आन-बान-शान ' वर कुठलीही आंच येणार नाही याची खास दक्षता घेतली जाई. खरं तर, या चाळ संस्कृतीने जगण्याच्या बाराखडीत किती काय काय शिकवलेय याचा उहापोहही आताशा करोडोवावी आवृत्ती च्या पलीकडे गेलाय. फिरून नव्याने सांगण्यासारखे खरेच काही उरलेय का? असा प्रश्न पडावा.... तरीही प्रत्येक अनुभव त्या त्या वेळी व जेव्हां जेव्हां डोहातून अचानक ढवळला जाऊन पृष्ठावर त्याच्या अस्तित्वाच्या खुणा दाखवू लागतो तेव्हां पुन्हा एकदा त्याचा जुनाच पैलू नव्याने दाखवतो. कधी आधार देतो तर कधी उभारी.... कधी समजूत काढतो तर कधी मायेची उब देतो. तर कधी जगण्याची प्रक्रिया उकलून दाखवतो. गर्भात रुजण्यापासूनच शिकलेली चिवटता पुढे आयुष्यभरही अंगी बाणव गं.... या जगात जगण्यासाठी नितांत गरजेची आहे ती . तिचे अस्तित्व मनाने नाकारले की तू संपलीस. अगदी लहानपणीच या एका प्रसंगाने न कळत्या वयातही नकळत खोलवर बिंबलेली चिवटता, आज पुन्हा एकवार पृष्ठावर आली आहे...

आमचे घर तिसऱ्या मजल्यावर रोड फेसिंग. चाळीत आतल्या बाजूची गॅलरी ' राजरोस सार्वजनिक ' असतेच. पण प्रत्येक खोलीला असलेली खाजगी गॅलरीही सार्वजनिकच असते. फक्त त्या सार्वजनिकतेला एक खाजगी पदर असतो. या वरही एकदा लिहायलाच हवेय. पण आज नको. आज फक्त बेसिकवरच भर. तर सकाळचे नऊसाडेनऊ होत होते. रविवार होता. वार कुठलाही असो पाणी तर लागतेच ना... त्यामुळे पहाटेपासून तीन मजले उतरून पहिल्या मजल्यावरील त्या भल्या लोकांच्या ( ज्यांनी उदारपणे त्यांची घरे आमच्यासाठी कायमची मुक्तप्रवेशात ठेवलेली ) साखरझोपा न मोडतील याची काळजी घेत आम्ही सारे मांजरीच्या पावलांनी पाणी भरत होतो. आठाच्या सुमारास रक्मा कोळिणीने चिंबोऱ्यांनी भरलेली पाटी दाणकन आपटून मोठ्ठा गदारोळ उडवून दिलेला. त्या वाट फुटेल तिथे पळू पाहणाऱ्या चिंबोऱ्यांची आणि रक्मेची झटापट ही माझी-भावाची हक्काची करमणूकही पार पडली होती. आईने पोहे बश्यांमधून काढायला सुरवात केली होतीच आणि अचानक धाड धाड आवाज येऊ लागला. आईने हातातले पातेले खाली ठेवत म्हटले, " अरे कोणीतरी गॅलरीचे दार बंद करा. दगडफेक सुरू झाली वाटते. " भाऊ पळतच गेला आणि दाराला कडी लावूनही टाकली. वाचताना नवल वाटेल की इतका थंडपणा... पण हा दगडफेकीचा प्रकार अक्षरशः आठवड्यातून एकदा कधीकधी तर दोनतीनदा ही चाले. अनेकदा कारणेही कळत नसत. फक्त गॅलरीत जमलेल्या विटा दगडांच्या ढिगावरून आम्ही मुले केसरबाग की नायगांवची पोरे अशी गणिते मांडत हिरीहिरीने चर्चा करायचो.

थोड्यावेळाने दगडफेक जशी अचानक सुरू झाली तशीच एकाएकी थांबलीही. पुढची दहा मिनिटे शत्रुपक्षाचा अंदाज घेण्यात गेली. उगाच एखादे ढेकूळ धडधड वाढवण्याच्या प्रयत्नात ढिसाळपणा दाखवत फुटून गेले. वंद झालेली कवाडे उघडून आत्तापर्यंत दुबकून घरात बसलेली मंडळी माना काढून डोकावू लागली. तोच प्रवेशद्वारासमोर गदारोळ माजला. " अरे, पकड पकड. सोडू नका साल्याला. बरा सापडलाय. मार मार... " कोण कोणाला पकडतोय आणि कोण तावडीतून सुटतोय हे कळेतो, तात्पुरते एकच भासणारे दोन्ही पक्ष ' चाळ अ व चाळ ब ' च्या मध्ये असलेल्या वडाच्या झाडाच्या पारावरील मारुतीच्या देवापुढे पोचले होते. आमच्या चाळीतल्या पोरांच्या तावडीत शत्रुपक्षातला एक शेलका मोहरा अचानकपणे सापडला होता. अपने गलीमें कुत्ता भी... इथे तर अख्ख्या ' अ आणि ब ची समस्त जनता ' पाहत असल्याने अक्षरशः शेंबड्या पोरानेही यावे आणि टपलीत मारून जावेची गत झालेली. बरं तो शत्रूही काही लेचापेचा नव्हता, इतका मार खाऊनही जमेल तसे आणि मिळेल त्याला हाणत होता. अचानक दोघातिघांनी त्याला धरला आणि तथाकथित आमच्या चाळीच्या स्वघोषित म्होरक्याने मारुतीच्या पुढचा दिवा-नारळ ठेवण्याचा दगड उचलला आणि घातला त्याच्या डोक्यात. आईने तक्षणी आम्हा दोघांच्या पाठीत रट्टा घालत आम्हाला मागे खेचले तरीही भळकन उडालेली चिळकांडी अजूनही दिसतेच. तोच पोलिसांच्या सायरनचा दूरून आवाज येऊ लागला. पाहता पाहता कानठळ्या बसतील इतका जवळ आला. आमची मुंडकी धडधडत्या काळजाने पुन्हा डोकावून पाहू लागली. तोवर डोक्यात व हातपायांवर चार पाच दगड घेऊन, मारुतीला रक्ताचा अभिषेक घालत शत्रुपक्ष अर्धमेला होऊन निपचिप पडला होता. " मेला मेला वाटत... हो ना... अजिबात हालचाल करीतच नाहीये. खरंच मेला की काय. आता पोलिसस्टेशन, साक्षीपुरावे, किती सजा होईल हो... आणि आता पुढचा हल्ला आज रात्रीच होईल बरं का... तयारीत राहा. आज सोडा वॉटर बॉटल्सचा मारा नक्कीच होणार. काचा गोळा करायची तयारी ठेवा... वगैरे महिलावर्गाची जोरदार चर्चा - ठोकताळे सुरू झाले. "

पोलिस आले. दोघे तिघे मूर्ख पित्ते पळून न जाता आपल्या किडूकमिडूक छात्या फुगवत पोलिसांसमोरही त्याच्या निपचिप देहावर उगाचच धावून जात होते. पोलिस अगदी जवळ उभे आहेत हे दिसताच तो निपचिप पडलेला देह अचानक उसळला आणि तोच दगड उचलून एका मच्छरावर धावला. पोलोसही या अचानक हल्ल्याने बावचळले. भानावर येत दोघां हवालदारांनी त्याला धरला आणि गाडीकडे नेऊ लागले तर तो जाता जाताही त्यांच्या तावडीतून सुटत शिव्यांची लाखोली अन शब्दशः लाथाळी करत होता. मी अवाक. ज्या देहात दोन मिनिटांपूर्वी धुगधुगीही नव्हती, वडाचा संपूर्ण पार, भोवतालचा फुटपाथ ज्याच्या रक्ताने माखलेला आहे अशा मरणासन्न देहात इतकी ताकद आली कुठून??? जीव किती चिवट असतो याचे जिवंत प्रात्यक्षिकच होते ते. चार दिवसात मोठ्या ताठ्याने आमच्या बसस्टॉपवर उभा त्याला पाहिला अन माझेच पाय लटपटले. तो मात्र मस्तीत हसत बाता करीत होता.

किती सहजी शिकवून गेला, जगण्याच्या लढाईचा चिवट पाठ....

22 comments:

  1. !!! चाळीतले राडे!!! खतरनाक!!!

    ReplyDelete
  2. सौरभ, स्वागतम! :)

    ReplyDelete
  3. माझी आत्या रहाते चाळीत...तेव्हा बघितलंय हे लहानपणी! म्हणून फार दूरच नाही वाटलं आणि तू चित्र उभं केलयस डोळ्यापुढे!

    ReplyDelete
  4. कोपऱ्यात घेरलं की मांजर पण नख्या बाहेर काढते.. छान लिहिलंय..

    ReplyDelete
  5. दगडी चाळीत राहायचीस काय?
    हि दृश्ये नेहमीची असायला ...!

    लिखाण एकदम जबरदस्त पण .

    ReplyDelete
  6. धन्यवाद BinaryBandya. :)

    ReplyDelete
  7. जीवनाच्या अजब कहाण्यांनी भरलेला एक पुंजकाच गं तो अनघा. बालपण गेलय ना सारं तिथे...

    ReplyDelete
  8. खरेच रे महेंद्र... शेवटी जीवेच्छा बलवान... आभार.

    ReplyDelete
  9. हा हा... नाय बा... राजीव, अहो अळवावरच्या थेंबासारखेही जगता आले पाहीजेच हेही इथेच शिकले.
    :)

    ReplyDelete
  10. चंगोने लिहिलंय ते आठवलं.

    सरपणासाठी तोडलेल्या ओंडक्याला
    एकदा पालवी फुटली
    त्यालाही कळेना
    जगायची ही जिद्द कुठली?

    ReplyDelete
  11. सही लिहिलं आहेस ग ... मला खूप आश्वस्त, सेफ लहानपण जगायला मिळालं लहान गावात असल्यामुळे. मोठी शहरं, तिथली माणसं याचं एक वेगळंच आकर्षण वाटायचं तेंव्हा ... आता समजतं आपलं ते जग खरंच स्वप्नासारखं होतं हे.

    ReplyDelete
  12. >>> सही लिहिलं आहेस ग ... मला खूप आश्वस्त, सेफ लहानपण जगायला मिळालं लहान गावात असल्यामुळे. मोठी शहरं, तिथली माणसं याचं एक वेगळंच आकर्षण वाटायचं तेंव्हा ... आता समजतं आपलं ते जग खरंच स्वप्नासारखं होतं हे... +१

    तायडे अगं कालच वाचली होती ही पोस्ट... आज पुन्हा एकदा... काटा आला अंगावर आणि काय कमेंटू समजत नव्हते.... गौराईने नेटके मांडलेत विचार!!

    ReplyDelete
  13. ताई, कसले कसले अनुभव काय काय शिकवून जातील त्याचा नेम नाही!

    ReplyDelete
  14. खरेच! हेरंब, वाटत या भूतलावर जीव असलेल्या प्रत्येकाला हे लागू पडते. कित्येक किडे पाहताच यांच्या जन्माचे प्रयोजनच काय असा प्रश्न पडावा. पण ते आहेत आणि निर्मितीही करत आहेत.

    धन्यवाद रे...

    ReplyDelete
  15. गौरी, धन्यू गं. आपली भेट व्हायला हवी होती पण... पुढच्या वेळी नक्की. :)

    कशी गंमत आहे पाहा, इतके आजूबाजूला अस्थिर व काहीसे भयावह वातावरण असूनही आई+बाबा+भाऊ व मी, आमचा एक अतिशय उबदार, सुरक्षित व आनंदी कोष होता. आम्हाला खेटायला कधीच कोणीही आलेले मला आठवत नाही. आजोळी-रावळगावी असलेल्या प्रचंड मोठ्या बंगल्यात वर्षातले दोन महीने आम्ही जितक्या आनंदाने व आश्वस्तपणे राहत असू तितकेच चाळीतही राहत होतो.

    कधी कधी वाटते शेवटी सारे काही आपण मनाला कसे घडवतो-घडता घडता बरे वाईट यातला फरक समजून घेऊ लागतो आणि आपला मार्ग निवडतो यावरच निर्भर करते. नाही का?

    ReplyDelete
  16. तन्वी, अगं तुझ्या प्रतिक्रियेची वाट पाहत होते... :) आभार्स. बाकी गौराईला लिहीलेच आहे.

    ReplyDelete
  17. हो रे विद्याधर... काही दूरून तर काही भोगून... शिकवणी तर होतेच.

    ReplyDelete
  18. भाग्यश्री मॅम सही, आम्ही पण खूप राडे अनुभवलेत, प्रसंगी केलेतसुद्धा :)

    खरंय या आई लोकांचा काय प्रोब्लेम असतो काही कळत नाही, राडा चालू असताना ऐन क्लायमॅक्सच्या वेळेला आक्रमक एन्ट्री घेऊन सगळा क्लायमॅक्स पचपचीत करतात, मजा घालवतात सगळी, 'आता तर मी मोठा आहे ना? मला पण कळतं? तो पहिल्या माळ्यावरचा बाब्यापण बघतोय?' पण छे पाठ नि थोबाडं रंगवायची हौस नसते, सगळे प्रश्न आम्ही ऑपशनला टाकून दाराची फट, खिडकीचा गज याला कान-डोळे लावून क्लायमॅक्सचा अंदाज घेतो, शेवटपर्यंत कळतं नाही साला नक्की मॅटर काय झाला?

    ReplyDelete
  19. हा हा... हे मात्र परफेक्टच. असे कितीतरी मॆटर्स आजही आठवणीत अनुत्तरीतच आहेत. :(

    धन्यवाद प्रसाद.

    ReplyDelete
  20. भाग्येश्री 'चाळ' झक्कास रंगलेय... पण माझ्या आत्ताच्या चाळीपेक्षा तेव्हाची तुझी चाळ मला जास्त खतरनाक वाटली...अर्थात हा काळाचा महिमा आहे

    ReplyDelete
  21. वेलकम बॆक श्रीराज. :)

    हा हा... जसे राडे होते तसे आमच्या चाळीत मोठे वलयांकित लोकही होते बरं. भगवानदादा - तेच अलबेला फेम, आमच्याच चाळीत राहायचे. अनेकदा लपाछपी खेळताना आम्ही त्यांच्याकडे जायचो. किती सहजपणे वागत. कसलाही बडेजाव नाही. अतिशय साधे व प्रेमळ होते रे.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !