जाता जाता एक नजर इथेही........

Monday, May 3, 2010

संजीवनी....

गेल्या आठवड्यात एका मैत्रिणीचा फोन आला. खूप रडवेली झालेली. दिवाळीच्या दरम्यान बाळ- लेक झाल्याने सध्या घरात नुसता दंगा-गडबड सुरू असलेली. लेक तर इवलीशीच आहे... ...मस्त निवांत काम. अंघोळ झाली की गुडुप. दूध प्यायले की पिता पिताच पेंगायला लागते. रात्रीही छान गाढ झोपते. कधी कधी मैत्रीण म्हणते, अगं काल चक्क हालवून हालवून उठवली गं तिला..... जाम कंटाळा आलेला...... जरा पालथी पडेल, पुढे सरकेल..... हुंकारेल, हसेल आणि रडेलही.... पण हा गोडांबा म्हणजे कुंभकर्णाची बहीण आहे नुसती....... कितीही आवाज करा, उचलून घ्या नाहीतर खाली ठेवा..... आम्हाला काही फरक पडतच नाही. आम्ही पुन्हा मुठी चोखत देवाशी गप्पा मालत हशतच लाहतोयं.....

मैत्रिणीची आई नुकतीच परत गेल्याने ही थोडीशी धास्तावलेली. जरासे उशीराच लग्न व लेकही उशीरानेच झाल्याने मनात धाकधूक असतेच. जमेल ना गं मला एकटीला...... तश्या आहेत गं जवळ एक दोघी पण आई ती आईच ना..... आमच्या रोजच्या गप्पा, इशानीचे कौतुक - लाड जोरदार सुरू असताना अचानक हिचा रडका-घाबरलेला सूर ऐकून मीही जरा हबकलेच. अगं, ईशानीला बरे नाहीये. दोन दिवस झाले, अचानक उलट्या-जुलाब. इमर्जन्सीत घेऊन गेलो गं परवा रात्री- डिहायड्रेट झाली आणि एकदम डोळेच उघडेना. घाबरून गेलो आम्ही दोघेही. आता जरा बरी आहे. श्री, दूध देऊ नका अजिबात असे डॉक्टर म्हणता आहेत. अगं तुझ्या शोमूलाही असेच झाले होते नं.... मला सांग ती तुझी संजीवनी - पेज, लगेच करते.... " तिला हो म्हटले खरे पण हा काही मायदेश नाही- इथे कोणालाही काही सांगायचे म्हणजे मला तरी भीतीच वाटते. त्यातून मैत्रीण खूप लांब अंतरावर..... समजा मी सांगितले आणि ईशानीला पेज पचलीच नाही किंवा काहीतरी अजूनच गडबड झाली तर.... नकोच बाई, डॉक्टर सांगतील तेच करू देत. पण मैत्रीण ऐकेना...... म्हणून शेवटी तिला पेजेची कृती सांगितली..... तिने लगेच केलीही. ईशानीचा डॉक्टर सुदैवाने भारतीयच असल्याने त्यानेही पेजेवर होकाराचा शिक्का उमटवला. हे ऐकताच हुश्श झाले अगदी...... आता ईशानी खूपच बरी आहे. पेज आवडीने घेतेय. या सगळ्या प्रसंगाने मला एकदम वीस वर्षे मागे नेले.

शोमू जेमतेम पावणेतीन महिन्यांचा असेल. मी आईकडेच होते. जुलै जवळ जवळ संपत आलेला. अचानक शोमूला डायरिया व उलट्या सुरू झाल्या. चोवीस तासात हे प्रमाण अतिरेक वाढल्याने शेवटी त्याला हॉस्पिटल मध्येच ठेवावे लागेल इतकी वाईट अवस्था झाली. एक तर इतके तान्हे बाळ त्यातून ओकून आणि सारखा पिळकून तो थकून गेलेला...... रडण्याचेही श्रम त्याला झेपत नव्हते इतका हल्लक झालेला. फक्त एकच चांगली गोष्ट म्हणजे तो ओकत असूनही पाणी-दूध पीत होता. केवळ त्यामुळेच डिहायड्रेट होण्यातून वाचल्याने त्याला सलाईन लावायची वेळ आली नाही. प्रभादेवीचा डॉक पेंडसे माझ्या एकदम चांगला ओळखीचा. तोच शोमूचा डॉक्टर. तो सारखा मला धीर देत होता, " अगं नको इतकी हवालदिल होऊस. हे पावसाचे दिवस आहेत नं..... शोमूचा पहिलाच पावसाळा. असे होणारच. आता शोमूला जरा जास्तच बाधलेयं हे खरेयं. घाबरू नकोस गं.....मी आहे नं.... " काय काय तो बडबडत होता. पण माझा जीव कसा शांत व्हावा.... शेवटी तीन दिवस बाळाला थकवून त्याचे दूध पूर्ण बंद करून एकदाच्या उलट्या - जुलाब थांबले.

" शोमूला कुठलेच दूध द्यायचे नाही का रे? आईचे दूध तर सगळ्यात उत्तम असते नं... मग तू तेही नको म्हणतोस म्हणजे....... काय झालेय रे त्याला? एवढुश्या माझ्या बाळाची पचनशक्तीच बिघडून गेली की काय कायमची? आता दूध नाही पाजायचे तर मग तीन महिन्याच्या बाळाला द्यायचे तरी काय? डाळीचे-भाताचे पाणीही इतक्या तान्हेपणी देत नाही. दूधच बंद तर मग वाढ कशी होणार? " प्रश्नांवर प्रश्न, उत्तरे लगेच कशी मिळावीत? मला तर काहीच समजेना...... इतक्या प्रचंड उलट्या जुलाब करून करून लेकरू बेजार झालेलं तरीही मी त्याच्याकडे पाहून बोलले-हसले की लगेच हुंकार देत क्षीण हसत होता. इतका आजारी असतानाही त्याने दूध पिणे सोडले नव्हते आणि आता कालपासून नुसता साखर-मिठाच्या पाण्यावर होता. भुकेने अगदी कळकळून गेल्याने सारखा मुठी चोखत मांडीवर पडून होता. माझ्या आईलाही काही सुचत नव्हते. सगळेजण ताणाने - जागरणाने व काळजीने अतिशय थकलो होतोच.

अचानक आई उठली आणि एक वाटी तांदूळ व अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुऊन तिने मऊ पातळाच्या घडीवर सावलीत पसरून वाळत घातले. तीन तासांनी आईने हे वाळलेले तांदूळ व डाळ गोळा करून कढईत मंद आचेवर वेगवेगळी चांगली भाजली. दोन चमचे जिरेही भाजले. सगळे जरा निवल्यावर लगेच मिक्सरमधून काढले. अगदी पूड न करता किंचित भरड - जाडसरच दळले. एका पातेल्यात अडीच भांडी पाणी घेऊन त्यात दोन चमचे साखर व अगदी किंचित मीठ घालून मध्यम आचेवर ठेवले. पातेल्याच्या तळाशी जरासे बुडबुडे दिसू लागताच तयार केलेल्या पिठातील दोन चमचे पीठ पाण्याला लावले. आधीच पीठ धुऊन-वाळवून-भाजून तयार केलेले असल्याने लगेच शिजले. दुधापेक्षा अगदी किंचित घट्ट असा द्रव तयार होताच आचेवरून उतरवले. एकीकडे दुधाच्या बाटलीच्या बुचाचे छिद्र दाभण अगदी लालभडक तापवून घेऊन थोडेसे मोठे केले. तयार पेज कोमट होईपर्यंत सारखी मी ढवळत होते जेणेकरून त्यावर साय धरू नये. शोमूला पिता येईल इतपत निवल्यावर बाटलीत भरून ही पेज त्याला पाजली. लेकरू इतके भुकेजले होते की अक्षरश: पाच मिनिटात त्याने बाटली संपवली. खांद्यावर घेऊन पाठीवर हलकेच थोपटून दोन छोटेसे ढेकर काढता काढताच तो लुडकला. बरोबर चार दिवसांनी इतका गाढ व शांत झोपी गेलेला पाहून आमच्या सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले.


पाच महिन्यांचा

आता ही पेज पिऊन त्याला पचते का याची चिंता होतीच. त्यामुळे मी व आई अगदी दर पाच पाच मिनिटांनी कसलाही आवाज न होऊ देता त्याच्या जवळ जाऊन दुपट्याला चाचपून पाहत होतो. ओकला तर नाही नं.... पुन्हा ढुंगीला धार लागली की काय..... शेवटी आमचे बाबा ओरडले, " अरे काय सारखे वेड्यासारखे चाचपताय. इतका गाढ झोपलाय.... मंद घोरतोय, ऐकताय नं तुम्ही दोघी. मग झोपू द्या की त्याला. ओकला- पिळकला तर तो काय गप्प बसणार आहे का? तुम्ही दोघी म्हणजे नं.... कमालीच्या घाबरट झाला आहात. त्याच्याकडे पाहत बसण्यापेक्षा पेजेची दुसरी बाटली घ्या भरायला. आता दर दोन-अडीच तासांनी पाजावे लागेल नं...... आणि जेवून घ्या गं. मी पाहतो त्याच्याकडे. " आम्हाला शोंमूजवळून हाकलून बाबा मात्र त्याच्या शेजारीच पडून राहिले....... कधीतरी त्यांचाही डोळा लागून गेला. मग काय... आजोबा आणि नातू यांची मस्त जुगलबंदी सुरू झाली. बाबांच्या तब्येतीत घोरण्याला शोमूचा मंद लयीतला प्रतिसाद...... तालावर ताल........ मी आणि आई दारात उभे राहून कितीतरी वेळ हे आनंदाचे क्षण गोळा करत राहिलो. पेज नव्हे संजीवनीच होती नं ती........ जिच्यामुळे आम्हा सगळ्यांनाच जीवन मिळाले. पुढे शोमू साडेतीन वर्षांचा झाल्यावर दूध पिऊ लागला. तोवर या संजीवनीचा अगदी भक्त होता. दोन महिन्यातच शोमूचे गाल पडायला लागले इतके बाळसे त्याने धरले.



तीन महिन्यापासून फक्त या संजीवनीवर असलेल्या शोमूचे हे काही फोटो.


आमचा बाळकृष्ण
संक्रांत




सारे लक्ष पतंगांकडे

मिश्किल हसू



अशा पद्धतीने तयार केलेली पेज पचायला अतिशय हलकी असते. तान्ह्या बाळापासून ते कुठल्याही वयात देता येते. मोठ्यांसाठी थोडासा चवीत बदल करावा. चमचाभर साजूक तुपावर जिरे-हिंगाची फोडणी करून चार चमचे तयार केलेल्या पेजेची भरड भाजून स्वादानुसार मीठ घालून त्यावर गरम पाणी ओतून लापशी बनवावी. नुसते भातावरचे पाणी घेण्यापेक्षा याने जास्त ताकद राहते व शक्ती लवकर भरून येण्यास मदत होते. अतिशय पौष्टिक. लहान बाळे दूध पीत असतांनाही दिवसातून एकदातरी ही पेज पाजावी. आजकाल दुधाची ऍलर्जीही अनेक बाळांना असते त्यांच्यासाठी खूपच उपयुक्त. डॉक्टरना विचारूनच द्यावी. शक्यतो दिवसा पाजावी, रात्री झोपताना पाजू नये.

24 comments:

  1. जाम मस्त आहेत शोमूबाळाचे फोटो (त्याचे मोठे हॅंडसम फोटो पाहिलेत म्हणून इथे बाळ म्हणतेय...)... हो गं... ही पेज म्हणजे खरचं संजीवनी आहे. मी पण नेहेमी दिलीये ही मुलांना!!! याचबरोबर नाचणीची(नागलीची) पेजही कायम द्यायचे मी ईशान/ गौरीला...

    ReplyDelete
  2. असे अनुभव बरेच असतात, काही चांगले काही विसरुन जावेसे वाटणारे. असे विसरुन जायचे अनुभव तु कशाला लक्षात ठेवतेस?? असं विचारावसं वाटलं होतं, पण नंतर लक्षात आलं,कदाचित इतरांना फायदा होईल अनूभवाचा.

    ReplyDelete
  3. असे अनुभव खरचं विसरणे शक्यच नसते...त्यतुनच जर दुस~यांचा फ़ायदा होत असेल तर लक्षात ठेवणेच बरे !!!शोमु बाळ गोड...:फ

    ReplyDelete
  4. फोटू मस्त आहेत!!!

    ReplyDelete
  5. मनमौजीशी सहमत.
    बाकी, कृती लक्षात ठेवतो, कधी कुणाच्या कामाला येईल सांगता येत नाही!(अर्थात डॉक्टरच्या दुजोऱ्यानंतरच)

    ReplyDelete
  6. बाप रे. वाचून क्षणभर कसंतरी झालं. आदितेयला जन्मल्याच्या दुस-या दिवसापासून ताप होता ते पुढचे २ दिवस सलग. तेव्हा आमची भयंकर अवस्था झाली होती ते आठवलं.. !!

    आणि ही पेजेची आयडिया सॉलिड आहे एकदम. खरोखर संजीवनी अगदी.

    आधी फक्त बाळकृष्णाचा फोटो बघितला होता. आता बाकीचे बघून अजून मजा आली :-)

    ReplyDelete
  7. महेंद्र, मीही हा अनुभव जरा मागेच ढकलला होता पण ईशानीमुळे पुन्हा वर आला. ब~याच जणांना या संजीवनीचा उपयोग झालाय, म्हणून लिहिले.

    ReplyDelete
  8. हो गं, नागलीची पेजही खूप पोष्टिक. मोठ्या माणसांसाठी खास उपयोगी.तन्वी धन्यू गं.:)

    ReplyDelete
  9. माऊ, अगं काय भयंकर होते ते चार दिवस... निभावलो त्यातून. देवाची कृपा.

    ReplyDelete
  10. योगेश, थांकू.

    ReplyDelete
  11. the prophet, प्रतिक्रियेबद्दल आभार. नक्कीच उपयोग होईल.

    ReplyDelete
  12. हेरंब, खरेयं.कोणीही आजारी असले आणि त्यातून बाळं आजारी म्हणजे भयंकर अवस्था. गेल्याच महिन्यात पुन्हा एकदा घेतला नं अनुभव. दोन दिवसांचा आदी तापाने....बापरे!:(
    फोटो आवडलेले पाहून आनंद झाला.धन्सं.

    ReplyDelete
  13. कडु आठवणी नाहि या अनुभवाचा खजिना आहे याच मोठ्यांच्या अनुभवाला आमचि पिढि मिस करते आहे दिड महिन्याच्या माझ्या छोकरी ने शिँक जरि दिली तरि डाँ असुन सुध्दा घालमेल होते माझि या संजिवनि पेजेने माझ्यातल्या डाँ ला सँजिवनी मात्र दिलि नक्कीॐ

    ReplyDelete
  14. upayukta mahiti aani shomuche sunder photos. chhan lekh!

    ReplyDelete
  15. डॉ.प्रसाद, ब्लॉगवर आपले स्वागत व अभिप्रायाबद्दल अनेक आभार.:)

    ReplyDelete
  16. रोहिणी,तुला फोटो व लेख दोन्ही आवडल्याचे पाहून खूप आनंद झाला. धन्सं.

    ReplyDelete
  17. Bhagyashree ,

    Photo chan ahet

    MAdhuri

    ReplyDelete
  18. माधुरी, धन्यवाद.:)

    ReplyDelete
  19. डॉ. प्रसादांची प्रतिक्रिया बोलकी आहे.
    शोमुचे फोटो मस्तंच

    ReplyDelete
  20. खरंय. सध्या यातून जात असल्यामुळे जास्तच टची व्हायला झालं. आपली पोरं म्हणजे आपला जीव की प्रान कशी असतात ते अशाच प्रसंगात समजतं.

    ReplyDelete
  21. अगदी खरं गं. फार फार असहाय अवस्था असते ती.मार्ग निघतोच पण तोवर जीव उडून जातो. धन्यवाद Shinu.

    ReplyDelete
  22. श्रीताई,
    किती गोड दिसतोय शोमुबाळ फोटोंमध्ये.
    आम्ही पण आर्यनला ही पेज आणि नाचणी सत्वाची खीर द्यायचो आत्ता आत्ता पर्यंत.
    ही पोस्ट कशी वाचायची राहिली काय माहित?
    सोनाली केळकर

    ReplyDelete
  23. सोनाली, अगं गडबडीत असले की राहून जाते वाचायची... म्हणून तर नं सांगितले नं. अश्या प्रकारे बनवलेली पेज बाळांच्या खूप अंगी लागते. धन्सं गं.:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !