" अगं, एकटीने खाऊ नकोस. वाटून खावे नेहमी. किती वेळा सांगायची तीच गोष्ट? राणू, असा अप्पलपोटेपणा कधी करायचा नसतो बरं. आपल्याला कितीही थोडंसं जरी मिळालं नं तरीही त्यातला काही भाग दुसर्याला द्यावा. त्यामुळे काय होतं माहीत आहे तुला? असं बघ, एक लाडू मी तुला दिला तर तुला त्या क्षणापासून तो पोटात गडप होईतो किती छान वाटतं. पण एकदा का तो खाऊन संपला की पुढच्या पाच मिनिटात त्याचं मनातलं अस्तित्वही पुसलं जातं. बरोबर? पण हेच जर त्या लाडूतला अर्धा भाग तू मनीला किंवा दादाला दिलास तर त्यांच्या चेहर्यावरचे आनंदी भाव बरेच दिवस तुझ्या मनात राहतील. त्या एवढुश्या लाडवातून एक तात्कालिक आनंद व एक दूरगामी आनंद मिळेल. खरं नं? मग, आता ह्या लाडवाचे दोन तुकडे होणार की..... अगं, काय कारटी आहे पाहा. खाऊनही टाकलास. छान. म्हणजे घागर पालथीच होती का नेहमीप्रमाणे. मुलखाची अप्पलपोटी आहेस बघ तू. आता दात काढत कशाला उभी आहेस? पळ इथून. "
" बाई बाई, कसं होणार या पोरीचं पुढे.... पोरीच्या जातीला इतका अप्पलपोटेपणा बरा नाही. सूनबाई, तुझी फूस आहे तिला म्हणून ही अशी सारखी मन मानेल तसे वागत असते. मी पदोपदी तिला टोकते मग मी वाईट. पण तूच सांग, अशाने निभेल का गं या जगात? वेळ प्रसंगी कशाकशाची वाटणी आणि तीही कोणाबरोबर करावी लागेल हे सांगता येईल का? मग तेव्हां मन खट्टू करून नाईलाजाने करण्यापेक्षा लहानपणीच मनाला मुरड घालावी. म्हणजे मग उन्मळून पडायची वेळ येत नाही हो. "
राणू...... रागिणी, फक्त पाच वर्षांची तर आहे माझी पोर. नाही म्हणजे एक तीळ वाटून खावा वगैरे सगळं ठीकच आहे पण ते कधी? एकच तीळ असेल तेव्हां नं... आत्ता प्रत्येकाला चांगले चार चार मिळतील इतके लाडू डब्यात आहेत तरीही राणूला सांगायचे की अर्धा दादाला दे..... तिच्या बालबुद्धीलाही लाडवांची रास दिसतेय ना.... मग तिने हे गणित कसे जुळवावे. आणि किती जड शब्द वापरायचे. तिला अर्थ तरी कळतो का त्याचा.... इतकुश्या जीवाकडून नको तिथे नको त्या अपेक्षा करायच्याच कशासाठी? ते जाऊदे, पण त्यापुढची ती चार वाक्ये..... सासूबाईंनी इतक्या क्षुल्लक गोष्टीवरून बोलावीत? घाव इतका जिव्हारी लागला असून वाटणीच्या दीक्षा आजही द्याव्यात. का? पुन्हा पुन्हा हे घाव सोसण्याकरता मनाला तयार करायचे, तेही स्वत:च?
बाकी, वाटणी बरेचदा आपल्या हातात नसतेच. कुशीत घेणारा नवरा जेव्हां मनातून कोणा दुसरीचाच विचार करत असतो.... तेव्हाही वाटणी होतेच. कधी उमजून तर कधी दृष्टीआड.... कोणी आपल्याच हाताने बायकोला स्वार्थासाठी बॉसच्या हाती सोपवतो तेव्हाही वाटणी होतेच. तीही बळजोरीने. अंगाला चिकटलेल्या अनेक नजरा ओरबाडतात तेव्हाही अप्रत्यक्ष वाटणी होतेच. जीवाभावाची सखी डोळ्यादेखत आपला प्रियकर पळवते, आणि तो ही तिला साथ देतो....... तेव्हाही वाटणीच होते. शरीराची वाटणी तात्कालिक, मनाची चिरकाल. एकदा भोगलं की शरीराचा भोग संपला आणि मनाचा सुरू झाला. आपलेच मन आपल्यावर पुन्हा पुन्हा बलात्कार करत राहते. दु:ख नेमके कशाचे करायचे? वाटणीचे..... भोगाचे की माझ्याच वाट्याला का याचे? लाडवासारखे मनाचेही तुकडे तोडून वाटून टाकता आले असते तर.....