तुझ्या धीट नजरेत सदासर्वदा
आनंदाचा महासागर उचंबळत असतो.
माझ्या दुःखानेही गढूळ झालेला
कधी पाहिला नाही मी तो.
पण अवचित कधी,
वेदनेचा एक ठिपका उमलतो त्या अथांगतेत
नि पसरत राहतो___
___ टिपकागदावर शाई पसरावा तसा सर्वदूर-
तुझ्या अस्तित्वभर.
भासच का तो सये?
तसंच असूदे गं... तसंच असूदे.
मात्र लवमात्रही सत्यांश असला त्यामध्ये तर -
- तर तुझे दुःख, वेदना, अश्रू, रोग, जखमा... सारंसारं
देऊन टाक मला ___
__ माझ्या चिरंजीव जखमांसाठी तेल म्हणून ___!
_ नि नि:संग हो, निर्विकार हो, निरिच्छ हो ___!!
जशा त्या वेदना तुझ्या नव्हत्याच कधी _
_ भिऊ नकोस सये ___
त्या ओझ्याने पाठ वाकेल माझी,
पण मोडायची नाही.
काय म्हणतेस? दोन ओझ्यांचा गाढव?
हसत्येस?
हस सये - मनसोक्त - मनमुराद हस!
पुन्हा तो आनंदाचा महासागर
उचंबळू दे तुझ्या धीट, गहिऱ्या डोळ्यांत!
तुझ्यासाठीच चिरंजीव होऊन
जन्मोजन्मी तुझ्या दाराशी येणारा
नि तूच केव्हांशा दिलेल्या,
वाळल्या-भेगाळल्या जखमांसाठी
तुझ्या हास्याचच चिंधीभर मलमतेल मागणारा
मी एक अश्वत्थामा -- अश्वत्थामा--!!
ओळखलंस सये?