जाता जाता एक नजर इथेही........

Monday, January 16, 2012

फिरणी

कोणालाही जेवायला बोलवायचे म्हटले की भाज्या- ओल्या-सुक्या, भाताचा प्रकार, डाव्या बाजूला तिखटमाखट, रायते, कोशिंबीर, चटण्या.... हे सगळे पटापट ठरते. एकदा का ' दिशा ' ठरली की मग एकमेकांना पूरक पदार्थ आपोआप समोर येतात. पण गोडाची गोची होते. श्रीखंड, बासुंदी, शिरा, शेवयांची खीर, गुलाबजाम, रसगुल्ले, सारखे पदार्थ सारखे सारखे होत असल्याने नकोसे होतात. त्यात एकंदरीतच गोडाचा कल अनेक कारणांनी कमी होऊ लागलाय. आधीच्या भरभक्कम जेवणानंतर काहींना गोड नकोसेच असते. किंवा जिभेवर रेंगाळणारी चटपटीत चव घालवायची नसते. किंवा गोड हवे असले तरी ते गोडमिट्ट व जड प्रकारात मोडणारे नको असते. त्यातून तीनचार कुटुंबे असतील तर घरातली धरून माणसे होतात पंधरा-सोळा. म्हणजे एकतर बाहेरून काहीतरी आणा नाहीतर मोठा घाट घाला. अशावेळी वारंवार न होणारी, करायला एकदम सोपी आणि पोटाला अजिबात तडस न लावणारी थंडगार फिरणी बाजी मारून जाईल. छानपैकी मडक्यात भरून, त्याचे तोंड फॉईलने बंद करून आदल्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवली की काम फत्ते.

वाढणी : सहा ते आठ मडकी ( कुल्फीचे मध्यम आकाराचे मटके मिळतात ते घेतल्यास आठ भरावीत )

साहित्य : दोन वाट्या तुकडा बासमती किंवा आंबेमोहोर। ( शक्यतो वासाचा तांदूळ घ्यावा ) सव्वा लिटर दूध, एक चमचा तूप, अडीच वाट्या साखर, बदामाचे -पिस्त्याचे पातळ काप, गुलाबपाणी, खस.

कृती : तांदूळ धुऊन रोळीत (गाळणीवर) थोडावेळ टाकून ठेवावे। खडखडीत कोरडे झाले की कढईत एक चमचा तुपावर मंद आचेवर पाच मिनिटे परतून घ्यावे. थंड झाले की मिक्सरमधून काढावे. बारीक रवा होईल इतपत वाटायला हवेत. एकीकडे जाड बुडाच्या पातेल्यात दूध तापत ठेवावे. दुधाला तीनचार उकळ्या आल्यावर वाटलेला तांदुळाचा बारीक रवा घालून चांगले ढवळावे. अजून एक उकळी फुटू लागली की साखर घालावी. मिश्रण हालवत राहावे. तळाला लागू देऊ नये. मिश्रण घट्ट होऊ लागले की ज्या भांड्यात किंवा मडक्यात काढावयाचे आहे त्यात ओतून त्यावर बदामाचे-पिस्त्याचे काप लावून गुलाबपाणी/खसाचे थेंब टाकावेत. मिश्रण जरा कोमट झाले की फ्रीजमध्ये ठेवावे. जसजसे थंड होईल तसे घट्ट होईल. जेवण झाले की ही सेट झालेली मडकी द्यावीत. मडक्यातली थंडगार शुभ्र फिरणी-आकर्षक सजावट पाहूनच मंडळी खूश होतील.

टीपा:
तांदूळ न भाजता नुसताच कोरडा करून बारीक वाटून घेऊन फिरणी करता येते. तीही चांगली लागते. परंतु भाजल्याने तांदूळ हलका होऊन जातो व पटकन शिजतो.
मात्र तांदूळ भाजताना मंद आचेवरच भाजायला हवा तोही अगदी पाच मिनिटेच. तांदळाचा पांढरा रंग बदलता नये. तूप एक चमचाच टाकावे. फिरणी तयार झाल्यानंतर त्यावर ओशट तवंग दिसता नये.

दूध आणि नंतर मिश्रण बुडाला अजिबात लागता नये. लागल्यास तो लागल्याचा जळका वास संपूर्ण मिश्रणाला येतो. म्हणून फिरणी करायला घेतल्यावर समांतर इतर कुठलीही कामे करू नयेत. गॅससमोरून हालू नये. अन्यथा एकतर सगळे परत करावे लागेल किंवा तसेच ढकलले तर प्रत्येक घासाला किंचितसा जळकट वास व चव जाणवत राहील. आधीच्या मस्त जेवणाचा बेरंग होईल.

चारोळीही घालतात पण मी घालत नाही, बरेचदा त्या कडूच असतात. गुलाबपाणी व खस हे दोन्ही मी एकत्र वापरलेत. चांगले लागतात. ज्यांना दोन फ्लेवर एकत्र करायचे नसतील त्यांनी फक्त एकच घालावा.