जाता जाता एक नजर इथेही........

Friday, July 22, 2011

वारली - एक शाश्वतकला

आपल्या भारतात अनेकविध पारंपरिक कला आढळून येतात. अगदी रोज दारी काढल्या जाणार्‍या रांगोळीपासून कलात्मकता व योजना दिसून येते. शिवाय परगणे, प्रांत, शहरे, राज्ये बदलत जातील तसतसा या कलांवरचा प्रभावही बदलत जातो. परंतु या पूर्वापार चालत आलेल्या कला दिवसेंदिवस लोप पावताना दिसत आहेत. सिंधुसंस्कृती, मोहंजदडो मध्ये मातीच्या भांड्यावर, मडक्यांवर काळपट रंगाने रंगवलेली चित्रे असोत, किंवा पूर्वापार सुरू असलेली बाटिक व लाकडी ठसे वापरून कापडांवर त्यांचे छाप उठवून तयार केलेली राजदरबारी आढळणारी जाजमे वगैरे कलांचा, र्‍हास झालेला आढळतो. त्यामानाने सावंतवाडीची लाकडी खेळणी, सौराष्ट्रामधले कशिदा काम - कच्छी वर्क, निरनिराळे मणी, मोती वापरून केलेली तोरणे, दागिने, हैदराबादचे मीनाकाम, बांगड्या, बिद्रीवर्क, राजस्थानी मांडणा इत्यादी अजूनही तग धरून आहेत. स्क्रीन प्रिटींगने सारा बाजार ताब्यात घेतला असला तरीही बांधणी कापडे व साड्याही आपला जम बसवून आहेत. मधुबनी, तंजावर शैलीही आपले अस्तित्व व स्थान टिकवून आहेत.

या सगळ्यात आपला वैशिष्ट्यपूर्ण प्रभाव टिकवून आहे ती महाराष्ट्रातील ' वारली जमातीने ' गेली ११०० वर्षे जपलेली आपली कला. वारली ही महाराष्ट्रातील आदिम जमात. श्री. भास्कर कुलकर्णी यांनी या साध्या, सुंदर, रेखीव केलेतील कलागुण हेरून ही कला समाजापुढे आणण्याचा अनन्य ध्यास घेतला. वारली कला ही स्वतंत्र असून अतिशय संयमाने रेखाटावी लागते. तेव्हा कुठे हा रेखीव व सुंदर आविष्कार जन्म घेतो. वारलींच्या मूलभूत गरजाच अतिशय कमी. जीवनाप्रती, जगण्याप्रती असलेला त्यांचा सरळ दृष्टिकोन त्यांच्या कलेतून पुरेपूर डोकावतो. ' वारली ' ही एक धर्म, प्रथा, श्रद्धा अश्या पारंपरिक गोष्टीत गुंफलेली कला. निरीक्षण, चिंतन व त्यानुसार आकलन होऊन केलेल्या प्रत्यक्ष कृतींचे प्रभावी एकत्रीकरण यांच्या आधारे कला आकार घेते.

निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे आदिवासी जेव्हां निसर्गातील गोष्टींचा, वस्तूंचाच वापर करून निसर्गाइतकीच निखळ, मोकळी भावपूर्ण चित्रे काढतात तेव्हा त्यातली निर्मळता जाणवल्याशिवाय राहत नाही. ' वारलं ' म्हणजे नांगरलेल्या जमिनीचा भाग, तुकडा; ' वारली ' शब्द याच अर्थाचे समूहनाम/ विशेषनाम आहे. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीची वारली चित्रकला ही अविभाज्य अंग आहे. वारली चे चित्र काढताना सोपे आकार व पांढर्‍या रंगाचा आकर्षक व कल्पक वापर केलेला दिसतो. केवळ त्रिकोण, वर्तुळं, चौकोन, बिंदू, रेघा सारख्या बेसिक आकारांमधून अतिशय सहजसुंदर चित्रांचा होणारा जन्म. वारली लोकं अतिशय साधेपणाने व आनंदी वृत्तीने जगणारे असून त्यांची कलाही तितकीच साधी व आनंद देणारी. सुसंगत मांडणीतून समोर येणारे या कलासक्त समाजाचे चित्ररुपच.

वारली पाड्यात प्रत्येक घराच्या भिंतीवर आतून व बाहेरून चित्रे काढलेली दिसून येतात. शेणाने सारवलेल्या कुडाच्या भिंतीवर त्यांच्या जीवनाचे, सणांचे, देवदेवता, निसर्ग, चालीरीतींचे प्रतिबिंब मुक्तपणे चित्रित केलेले आढळते. होळी, दिवाळी, लग्ने, रोजच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी - अगदी सकाळी उठल्यापासूनच्या रोज घडणार्‍या घडामोडींची चित्रे दिसतात. पिकाची कापणी, मासेमारी, जत्रा, नृत्ये यांना त्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असल्यामुळे चित्रातून तेच व्यक्त केले जाते. पिकाची कापणी झाल्यावर आनंद व्यक्त करताना ' तारपा नृत्य ' केले जाते. सापा-नागाच्या वेटोळ्यासारखे दिसणारे हे नृत्य प्रसंगी आठदहा माणसांचे किंवा अगदी शंभरसव्वाशे जणांना घेऊन केले जाते. मध्यभागी तारपावादक असतो तो तारपा वाद्य वाजवत असतो. ' तारपा ' बांबूची किंवा माडाची पोकळ नळी, माडाची-ताडाची पाती, सुकलेला दुधीभोपळा, मेण व बांबूच्या चिपटीला छेद देऊन केलेल्या जिव्हाळीचा वापर करून बनवले जाते. तुतारीपेक्षा कमी बाक असलेले तारपा वाद्य देखणे आहे. उंबराचा चीक/मेण वापरून बांधणी केली जाते. दोन नळ्यांच्या मध्ये बारीकशी देवनळी असते. हे वाद्य तयार करणे व वाजवणे येर्‍यागबाळ्याचे काम नाही. वाद्य वाजवताना अगदी नाभीपासून हवा भरावी लागते. जराही श्वासावरचे नियंत्रण सुटता नये. तेव्हा कुठे सुरेल सुरावट घरंगळते. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत चालणार्‍या तारपा नृत्याचा प्रमुख तारपावादक असतो.

लग्न ठरले की प्रथम देवाच्या नावाने भिंतीवर रेघा ओढतात त्याला ' देवरेघ ' म्हणतात. नंतर नवरानवरीच्या नावाने रेघा ओढून घोड्यावर स्वार नवरानवरी दाखवून चौक लिहिला जातो. याला ' देव चौक ' म्हणतात. तसे पाहिले तर हे सामूहिकच चित्र असते. एकदा का देवचौक रेखाटून झाला की सगळे मिळून चित्र काढतात. वारली काढण्यासाठी वापरण्यात येणारा पांढरा रंग तांदळाच्या पेजेत डिंक मिसळून तयार केला जातो. गेरूने सारवलेल्या जमिनी, शेणाने सारवलेल्या भिंती व त्यावर पेजेच्या पांढर्‍या रंगाने बांबूच्या काड्या, चिंध्या इत्यादींचा वापर करून वारली त्यांचे जीवनच रेखाटतात. ही चित्रे साधे भूमितीचे आकार कल्पकरीत्या गुंफून जिवंत होतात. श्रद्धा, चालीरीती, रीतिरिवाज, प्रथा यांचे यथार्थदर्शन घडवणारी कला. चित्राखेरीज भिंत म्हणजे बिनकपड्याचा माणूसच. म्हणून अशा भिंतीला ' नागडी ' भिंत समजले जाते. ' पंचशिर्‍या ' हा देव पंचमहाभूतांचे प्रतीक असून त्याचा चौक कुटुंबाच्या रक्षणाकरिता चितारतात. तसेच कसलीही बाहेरची बाधा होऊ नये म्हणून ' सूर्यदेव व चंद्रदेवाची ' चित्रे काढली जातात. बहुतेकवेळी एकाच चित्रात सूर्य व चंद्र एकत्र दाखवले जातात.

पाऊस पडावा यासाठी ' कांबडी नाच ' करून वरुण देवाची प्रार्थना केली जाते. कांब म्हणजे काठी. ज्याच्या हाती घुंगरे लावलेली कांब असते तो कांबडी. पेरणीनंतर पंधरा दिवस म्हणजे साधारण नागपंचमीपर्यंत हा नाच केला जातो. ' मांदल नाच ' हा कोणत्याही दिवशी व कधीही केला जातो. मात्र यात स्त्रिया भाग घेत नाहीत. परंतु या नाचाचे प्रमाण कमी होते आहे. तसेच होळी पौर्णिमेच्या आधी माघी पौर्णिमेपासूनच रोज एक छोटी होळी पेटवून नाच केला जातो. ' घोर नाच किंवा टिपरी नाच ' हा दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत केला जातो. कितीतरी वेळा उपाशीतापाशी राहणारे वारली नृत्यांमध्ये मात्र स्वतःला झोकून देतात. अतिशय भक्तीभावे बेभान होऊन नृत्यात रममाण होऊन जातात.

माननीय ' जीवा सोमा म्हशे ' या प्रसिद्ध वारली चित्रकाराने ही कला सातासमुद्रापार पोहोचवली. अनेक देशांमध्ये जाऊन चित्रे काढली. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. वारलीने समृद्ध केलेल्या भिंती, दालने जगभर आढळून येतात. कलेच्या केलेल्या उत्कट सादरीकरणाचा सहजसुंदर आविष्कार जगभर आपला ठसा प्रभावीपणे उमटवत आहे. ही इतकी जुनी व सुंदर कला शिकण्याचा योग गेल्या दोन वेळच्या मायदेशाच्या भेटीत आला. पहिल्यावेळी केवळ दोन तासांची जुजबी ओळख झाली मात्र गेल्यावेळी माझ्या सुदैवाने श्री. संजय देवधर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. म्हणतात ना, ' चाह है तो राह आपोआप समोर येऊन उभी ठाकते '. तसेच काहीसे झाले. आठच दिवसांनी परतीचे तिकीट असताना अचानक गावकरीत दोन दिवसाच्या देवधर सरांच्या वारली शिबिराची माहिती मिळाली. लगेचच धाव घेतली. सरांनी वारली कलेची समग्र माहिती देऊन वारलींच्या जीवनाची ओळख करून दिली. वारली चित्र कशी काढावीत, ते कसा विचार करतात, त्यांच्या चित्रांमध्ये यथार्थदर्शनाचा विचार नसून भिंतीच्या आतलेही दृश्य कसे दिसेल ते काढले जाते हेही समजावून दिले. सरांच्या मार्गदर्शनाची शिदोरी बरोबर घेऊन घरी परतल्यावर चित्रे काढण्याचा व हा मौल्यवान ठेवा जपण्याचा, साखळीतील एक छोटीशी कडी होण्याचा प्रयत्न.

माझ्यासारख्या सर्वसामान्य परंतु कलासक्त मनांना थोडा नेट लावून प्रयत्न केल्यास सहजी अवगत होणारी निसर्गाचा, जीवनाचा कलाविष्कार प्रभावीपणे दर्शवणारी चित्रशैली सर्जनतेची अनुभूती देऊन जाते.












तारपा नृत्य








( उपरोक्त माहिती श्री संजयसर व जालावरून संकलित )