जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, February 8, 2012

काबीज...

अहोरात्र ओसंडून वाहत असलेली लोकल तिच्या नसानसातही सकाळ-संध्याकाळ रक्तासोबत समांतर वाहत असे. किती कप्प्यात विभागलो गेलोय आपण. पोळं वाढत चाललंय. आडवंतिडवं फुगत चाललंय. पोळ्यातले काही कप्पे मधानं भरलेले तर काही कोरडेठाक. मुंगीही विन्मुख फिरावी इतके रिकामे! स्वतःचा एक कप्पा. आई-बाबा, तो, पोरं,... दुसरा कप्पा. एक कप्पा घराचा. एक माणसांचा... तिच्या माणसांचा... त्याच्या माणसांचा... कालांतराने आपल्या माणसांचा. एक कप्पा आठवणींचा, तिच्या खास आवडीचा. एक ऑफिसचा. अजून एक या सगळ्याच्या आनुषंगिक फिरणार्‍यांचा. पुढला लोकलचा. नववा.....छे! क्रम चुकतोय ! कितीतरी गोष्टी राहिल्यात... त्यांना मागे नंबर देऊन कसे चालेल. अशी वर्गवारी कठीणच वाटतेय. कधी कुठला नंबर कुरघोडी करेल सांगताच येत नाही. क्षणात हा झुला वरवर तर तो झुला खाली. शांतशांत... थंड. कधी झुल्यांमधे भांडण तर कधी तटस्थता. कधी करकर... तिन्हीसांजेला घुसमटवणारी... वंगण मागणारी.

कामे आटपायची म्हणून रात्री तिंबून ठेवलेल्या कणकेचा गोळा कसा सकाळी फ्रीजमधून काढल्यावर थंड असतो. कितीही घाई असू देत तो त्याचा वेळ घेऊनच उमलेल. उमलल्यावर मात्र कश्या छान गरगरीत फुगलेल्या तीन पदर सुट्या होणार्‍या खरपूस पोळ्यांची रास रचेल. पण थंड असताना, जाम बधायचा नाही. अडेलतट्टू कुठला. माणसंही अशीच. अविरत बरसणारी ! एकदा बरसायला लागली की मुंबईच्या पावसासारखी कोसळतील. उसंत म्हणून मिळू देणार नाहीत.चहुबाजूने पाणीच पाणी! ते अंगावर येणारे प्रेमाचे लोंढे कुठे वाहून नेत ते कळतही नसे. नाहीतर बरेचदा अडलेली. रस्ता बदलणारी आणि एकदा का पांगली की आकाशाकडे नजर लावून डोळे भेगाळले तरी मागमूस दाखवायची नाहीत. आजकाल कसे कोण जाणे सगळेच हट्टी झालेत. कुरघोडी करण्याच्या नादात छाती फुटेस्तोवर धावू लागलेत. गुदमरून गेलो तरी चालेल पण ते जुने लोंढे पुन्हा यायला हवेत. गाभुळलेल्या चिंचा पुन्हा खायला हव्यात. कधी कधी... विचार सुरू होईतोच घराघरातून उगवणारा दिवस गजराच्या पहिल्या टाहोलाच युद्धाची नांदी सुरू करे. रोज एक नवा अध्याय. रंगमंच रोजचाच, नाट्यही रोजचेच. आपण जिवंत आहोत म्हणून हे नाट्य घडतेय की जिवंत राहण्यासाठी आपण घडवतोय, हा प्रश्न कधीचाच निकाली निघालाय.

रोज पहाटे उठायचे. दुधाच्या पिशव्या घ्यायच्या. चहाचे आधण कधी ती ठेवते कधी नवरा. ती पोरांना उठवते, तो दाढी करायला घेतो. मधून मधून पेपर आला का ते पाहतो. कोयंडा रिकामा दिसला की रोज तेच तेच चिडतो. दाढी करता करता गिझर लावतो. ती भरभर भाजी चिरते... कढई तापत ठेवते. सकाळ तापू लागलेली असते. पाहता पाहता सगळे धावू लागतात. त्यांचे आठ हात सपासप तलवारी चालवू लागतात. तिचे अदृश्य आठ हात ढाली घेऊन सोबत असतातच. तासाभरात उदरभरणापासून इस्त्रीच्या कपड्यांपर्यंतची सोय लावून दाराला कुलूप लागते. घर पोरके होते. चौघं चार दिशांना पांगतात. पोरं आधीच मार्गस्थ झालेली असतात. ती आणि तो खाली उतरतात. स्टेशनवर पोचण्यासाठी दहा मिनिटे लागतात. फक्त ती दहा मिनिटे हाच काय तो त्याचा आणि तिचा संवाद. तो बरेचदा मूकपणेच होतो. बोलायचं असतं रे खूप काही पण दहा मिनिटांच्या तालावर कसं व्यक्त व्हायचं..? तेही नेमक्या भावना पोचतील असं. या शोधाशोधीतच ती वेळ पसार होत राहते. रोज रोज ’आय लव्ह यू ’ काय म्हणायचं ? तेही यांत्रिकपणे. तिचा प्रश्न त्याला दिसतो.त्यामागची आर्तता पोचते. तो मान झटकतो. सोड नं! बिटवीन द लाइन्स वाचण्यातली सफाई वाढतेय दिवसेंदिवस. यस्स्स! दहा मिनिटं संपली. जाणवतं तेव्हा तो फास्टट्रॅकवर आणि ती स्लोवर पोचलेली असते.

चला सकाळ मार्गी लागली. एकही घोळ न होता. समाधानाचे हसू कळतनकळत ओठावर येते तोच लोकल येते. भरभर ओढणीला गाठ बसते. ओढणीसोबत शेपटा पुढे येतो, मंगळसूत्र चाचपून आत असल्याची खात्री होते. शेपट्यावर पर्स डाव्या हाताने ओढून छातीशी घट्ट धरलेली. उजवा हात अचूक दाराचे हॅंडल पकडतो. ट्रेन अजून धावतेय.... गती मंदावलीय... पण थांबली नाहीये. आठदहा जणींनी तोवर स्वत:च्या गतीला त्या अचल प्लॅटफॉर्मवर झोकून देत बिनचूक पाय टेकवलेला... शरीराचे पीस चार पावले धावून शरीराचा तोल तोलता येईल इतपत आटोक्यात आल्याक्षणाला तटकन थांबून मारलेली गिरकी. क्षणार्धात रिकामा ब्रिज चढणारी त्यांची पावले. क्रिया रोजचीच. नेमकी... अचूक. त्या रिकाम्या ब्रिजवरून पसार होण्यासाठी केलेला दहा सेकंदाचा खेळ. किती प्रचंड मने हा खेळ रोज सकाळ संध्याकाळ खेळतात. माझीही भर आहेच की त्यात. अनेक अनेक गोष्टी आपण किती सहजपणे रोज रोज करत असतो. इतक्या अंगवळणी पडल्यात त्या की त्यातली छुपी संकटं दिसतच नाहीत. इस पार या उस पार! यातले इस पारच घडणार हे गृहीत! त्या एका ब्रिजसाठी आपण काय काय पणाला लावतोय हा विचार प्लॅटफॉर्मला टेकलेल्या पहिल्या पावलालाही नसतो. आणि मस्टरवर आजचा दिवसाची मोहर उठवून, दिवस सार्थकी लागला असे म्हणत घेतलेल्या चहाच्या घोटासोबतही नसतो. नियती हसत असते. रोज संधी देत राहते. संधी संपलेले जीव दाखवत राहते. आपले डोळे मिटलेलेच. पुन्हा संध्याकाळ होते. मन कधीच घरच्या रस्त्याला लागलेले असते. पावले मनाला गाठण्यासाठी धावत सुटतात. गाडी स्टेशनात शिरते... ब्रिज समोर दिसू लागतो... अचूक टेकलेले पाय... नेमकी गिरकी... रिकामा ब्रिज... काबीज!

आज प्रथमच मनात चलबिचल झाली. गाडी स्टेशनात शिरली. ब्रिज दिसू लागला. उतरणार्‍या बायकांची घाई दरवाज्यात लटकलेल्यांना रेटू लागली. तीन चतुर्थांश शरीर बाहेर आणि एक पाय डब्याशी अजूनही नाते सांगू पाहणार्‍या पायावरचा भार वाढू लागला. एरवी फक्त पोपटाचा डोळा पाहणार्‍या मनात धडधड वाढलेली. नको... नको..... मन शरीराला मागे खेचू लागले... सुरक्षित करू पाहू लागले. रेटा वाढू लागला. पाय अजूनही खिंड लढवत होता. तोवर दोनचार जणी उतरून गेल्याही होत्या. मागच्या गोंधळल्या. कोणीतरी ओरडले," इतना डर लगता हैं तो कायको खडा रहने का? ढकल रे उसको... न जाने कहां कहां सें आ जाते है गर्दी के टाईमपें." गाडी थांबली. रेटा इतका वाढला की ती पडता पडता वाचली. तिच्या अचानक अडेलतट्टू बनण्याने अजून दोघी तिघी पडता पडता वाचल्या. त्यांच्या संतापाच्या नजरा झेलत तिने ब्रिजकडे नजर टाकली. डोक्याला डोकं लागलेलं. आता या भाऊगर्दीतून वाट काढणं आलं. शेवटी गड सर व्हायलाच हवा. तसा नाही तर असातरी ! थांबून चालणारच नाही. निदान जीव आहे तोवर तरी. उद्या सकाळी पुन्हा नवा अध्याय.

तीच सकाळ, तेच कुलूप, तिच दहा मिनिटे, लोकल.... ब्रिज..... आज नो चलबिचल. लोकलची गती... पावलांची गती... गतीचा तोल... टेकलेला पाय... कंट्रोल... काबीज! कंट्रोल आजतरी तिच्या हाती. उद्याचे उद्या पाहू. नाहीतर नियती पाहून घेईल. असेही तिला दुसरे कामच काय... !!

19 comments:

  1. बयो शब्द न शब्द अक्षरश: जीवंत झालाय गं पोस्टमधे ... जियो बयो!!!

    ReplyDelete
  2. Great Post !!!
    I have been 2 years in Mumbai.
    I faced every word that u wrote....

    hats of to u for giving me these feeling againn...

    ReplyDelete
  3. एकदम मुंबईचे माझे दिवस आठवले मला ..घालमेल चांगली मांडली आहेस रोजची.

    ReplyDelete
  4. बापरे.. खरंच प्रत्यक्ष दिसत होतं समोर.. लाखो लोकांचं न टाळता येणारं वास्तव !!

    ReplyDelete
  5. अभिजित, ब्लॉगवर स्वागत व धन्यवाद! :)

    ReplyDelete
  6. धन्यू गं तन्वी! :)

    ReplyDelete
  7. वरुणराजे ब्लॉगवर स्वागत आहे. :)

    कसे वेगळेच विश्व आहे नं ते...!

    धन्यवाद!

    ReplyDelete
  8. आभार्स सविता! नित्य लढाई... न जाणवणारी!

    ReplyDelete
  9. न टाळता येणारं... अंगवळणी पडलेलं वास्तव !

    आभार्स हेरंब... :)

    ReplyDelete
  10. सामान्य मुंबईकराची दर दिवसाची घालमेल :(
    मन काबीज केल ह्या लेखाने... :)

    ReplyDelete
  11. वा.. :) तंतोतंत मनातले... :) ४ वर्षे काढली कशीबशी. त्यानंतर रामराम.. अजून पर्यंत तरी.. :)

    ReplyDelete
  12. सुप्रिया ब्लॉगवर स्वागत व मन:पूर्वक आभार!! :)

    ReplyDelete
  13. हेहे! रामरामच बरा रे रोहन... पण त्या चार वर्षात सवय होऊन गेली होती नं... :)

    ReplyDelete
  14. आठवतंय आठवतंय ! डोंबिवलीला मेलं चढणं कठीण आणि दादरला मेलं उतरणं कठीण ! :)

    ReplyDelete
  15. खूप सुंदर मांडता तुम्ही. पण बर्याचश्या कथांमधून दुख जाणवते. ते तर आहेच सदैव. थोड्या positive कथा लिहिल्यात तर वाचायला फार आनंद होईल. माहितीये मला कि अशी demand करणे चुकीचे आहे. तरी पण......बघा पटले तर.

    BTW , तुम्ही दिलेल्या प्रोसेस प्रमाणे फिरनी बनवली. आईच्या वाढदिवसाला. छान झाली होती. धन्यवाद.

    ReplyDelete
  16. माधुरी, ब्लॉगवर स्वागत! :)

    अगं बरेचदा कथेमधून वास्तव मांडायचा प्रयत्न केला जातो. आता हीच कथा बघ नं... ही कुठे दु:खी आहे? समस्त मुंबईकरांचे रोजचे जीवन आहे. अंगवळणी पडलेलं, भिनलेलं. विनातक्रार! :)

    बाकी तू म्हणतेस तसं दु:खी बाज बर्‍याच कथांमधून ध्वनीत होतो हे खरेच! काही जुन्या कथा मात्र छान आनंदी आहेत हं का. सवड मिळाली तर वाचून पाहा. आवडतील तुला. ( अरेतुरे करतेय... आशा आहे राग येणार नाही )

    फिरणी ’छान’ झाली होती हे ऐकून छान वाटले.

    आवर्जून अभिप्राय दिलास... आनंद वाटला. अनेक धन्यवाद! काहिसे हलकेफुलके लिहायचा प्रयत्न करतेच... :)

    ReplyDelete
  17. हो नं अनघा, हे असं मधल्याच स्टेशनवर उतरणं आणि चढणं म्हणजे.. :(

    ReplyDelete
  18. >>नाहीतर नियती पाहून घेईल. असेही तिला दुसरे कामच काय... !!

    ऑसमेस्ट!!!

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !