जाता जाता एक नजर इथेही........

Monday, February 6, 2012

पनीर वडे ( पकोडे )

वाढणी : चार माणसांकरिता

लागणारा वेळ : ४० मिनिटे

साहित्य

अर्धा कीलो पनीर ( शक्य तितके घट्ट असावे )
दोन पेर आले, दहा-बारा लसूण पाकळ्या, दहा-बारा तिखट हिरव्या मिरच्या
मूठभर कोथिंबीर
दिड वाटी बेसन, दोन चमचे तांदुळाची पिठी
एक चमचा हिंग, हळद, दोन चमचे तिखट
चवीनुसार मीठ व तळण्यासाठी तेल

कृती

पनीर कुस्करुन घ्यावे. बारीक भगरा होईल इतपत मोडावे. आले-लसूण हिरवी मिरची वाटून घेऊन पनीरमध्ये घालावी. स्वादानुसार मीठ व कोथिंबीर घालून हे सगळे मिश्रण हलक्या हाताने एकत्र करावे. सगळीकडे वाटण नीट लागले आहे असे वाटल्यावर मध्यम आकाराचे गोळे वळून घ्यावेत.



एका पातेल्यात बेसन व तांदुळाची पिठी घ्यावी. त्यात हिंग, हळद, तिखट व मीठ घालून हळूहळू पाणी घालत एकसंध मिश्रण तयार करावे. खूप घट्ट नको व खूप सैल नको. बटाटेवड्यांसाठी करतो तितपतच. मिश्रण एकाच दिशेने पाच मिनिटे फेटावे म्हणजे थोडे हलके होईल.

मध्यम मोठ्या आचेवर कढईत वडे बुडतील इतपत तेल घ्यावे. तेल चांगले तापल्यावर बेसनाच्या पिठात पनीरचे गोळे बुडवून सोनेरी आचेवर तळावेत. गरम गरम खायला द्यावेत.


टीपा

पनीर घेताना शक्य तितके घट्ट घ्यावे. घरी करून वापरणार असल्यास संपूर्ण पाणी काढून टाकावे. पनीरमध्ये जास्त ओलसरपणा असल्यास गोळे नीट बांधले जात नाहीत खातानाही जरा पानचट लागते.

मिरच्या आपल्याला झेपतील तितक्या वाढवाव्यात. पनीर तसे गोडसरच असते. शिवाय इतर कुठलाही मसाला यात घालायचा नसल्याने तिखटपणा/तिखट स्वाद फक्त मिरच्यांचाच. थोडे तिखटच जास्त छान लागतात.
तांदुळाच्या पिठीमुळे वड्यांचे आवरण कुरकुरीत होते.

खायला देताना सोबत काहीही दिले नाही तरी चालेल. खरं तर गरजच पडत नाही. म्हणूनच वर चटणी-सॉस वगैरे लिहिलेच नाहीये.

पार्टीसाठी हिट पदार्थ आहे आणि खूपच झटपट होणारा. आदल्या दिवशी पनीरचे गोळे वळून ठेवून आयत्यावेळी तळता येतील.


21 comments:

  1. वा.. :) हे बरंय. तू येच लवकर.. :) मी मेन्यू तयार ठेवतो... :D

    ReplyDelete
  2. अरे काय चाललंय काय हे !! निषेध !!!
    ताये, अधूनमधून जरा कथा/ललित वगैरेही लिही ग ;)

    ReplyDelete
  3. इतक्या लगेच पंढरीच्या वारीचे नाव काढले तर मार खावा लागेल नं.... जरा दमाने दमाने.... :D:D

    ReplyDelete
  4. हा हा.... आता खाण्याचा वेगळाच ब्लॉग सुरु करावा ते बरे...

    लिखाण मागेच पडलेय.... :(

    ReplyDelete
  5. हे बरयं..तुम्ही दोन दोन दिवस गायब राहुन खादाडी कराय व्हय तिकडे...मी पण आलेच उद्याच्या फ्लाईट ने..ठेव माझ्या साठी..

    ReplyDelete
  6. मस्त ! चमचमीत ! :)

    ReplyDelete
  7. आईशप्पथ कसले मस्त दिसताहेत हे वडे (पकोडे )... मला तूला दे-’वडे’ म्हणावसं वाटतय आज :)

    >>>ताये, अधूनमधून जरा कथा/ललित वगैरेही लिही ग ;)

    तर काय.... खा खा सुटलीये बाईला नुसती.... वजन वाढेल नं , त्यापेक्षा रोहनचं ऐक, ये भारतात तिथे कर हो पदार्थ... तूला केल्याचं समाधान आम्हाला खाल्ल्याचं :)
    (नचिकेत दादा सॉरी :) )

    ReplyDelete
  8. दे-वडे... तन्वी पण भारीच.. :D

    ReplyDelete
  9. उमा, अगं येते आहेस नं? वाट पाहतेय मी-वडे :D:D

    ReplyDelete
  10. थंडीत चमचमीत मस्त वाटतं नं. अनघा, आपण पेणला करूयात. :)

    ReplyDelete
  11. हा हा.. ! दे-’वडे’ घे’वडे’! :D:D:D

    अगं, सुपरबॉल होता नं... मग धमाल!

    ललित ललित... येतेयं हळूहळू... :)

    ReplyDelete
  12. तोंडाला पाणी सुटलं :)

    ReplyDelete
  13. hi asli post mahnje...wachkacha niwwal..chal....aani yachi shiksha dyyla hawi.....(nuste pahun trupt whawe lagte na)

    ReplyDelete
  14. आमच्या घरात वड्याचा खास चाहता वर्ग आहे त्यांना करून देईन म्हटलं तर माझ्या पनीरचं रुपांतर अचानक (??) माव्यात झालंय....:P
    असो....त्यादिवशी पार्टीसाठी पनीरचं काहीतरी बनवेन म्हटलं ते हे??? च्यामारी हे "काहीतरी तर मग "पेशल" मेन्यु काय गं असेल...काही नाही अब आ जाओ खिलाने को.....

    ReplyDelete
  15. प्रसाद, मायदेशी आले की तू ये माझ्या घरी. :)

    ReplyDelete
  16. अपर्णा, अगं करून पाहा. मस्त लागतात! :)

    आणि त्या माव्याचे फायनली एन्ड प्रॉडक्ट काय झाले?

    ReplyDelete
  17. त्या 'बॉम्बे टू गोवा' मधल्या मुलासारखं.. "पकोडा, पकोडा" म्हणून तुटून पडावंसं वाटतंय!

    ReplyDelete
  18. हा हा... हो जाओ शुरू!

    बाकी ’बॉम्बे टू गोवा”.. कसला भन्नाट होता. किती वेळा पाहीला असेल तरीही लागला तर पुन्हा पाहतेच. :)

    ReplyDelete
  19. Replies
    1. Sur Julatana ब्लॊगवर स्वागत व अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !

      Delete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !