जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, October 23, 2010

मी मायदेशी...











१५ सप्टेंबर नंतर ब्लॉगवर काहीच लिहिले नाही. कारण अचानक ठरलेला मायदेशाचा दौरा. अचानक ठरल्याने फार काही योजनाबद्ध, आखीव रेखीव नियोजन शक्यच नव्हते. परंतु मायदेशी जायला मिळणार होते. आता गेल्यावर किती प्रकारे आनंद भरून घेता येईलची आखणी करण्यात मन रममाण झाले. तिकीट बुक झाले आणि मन आनंदून गेले. वेळ फारच थोडा आणि कामे फार त्यामुळे ब्लॉगवर निदान आठवड्याला तरी एखादी पोस्ट यावी ही तरतूद काही करता आली नाही. थोडी रुखरुख लागली. अजिबात पोस्ट नाही असे ब्लॉग सुरू झाल्यापासून घडलेच नव्हते. पण नाईलाज होता. आठ दिवसात जमेल तितकी तयारी करून ओढीने घर सोडले. सप्टेंबरच्या शेवटी शेवटी घरात आईबाबा, वाहिनी, भाच्या व मित्रमैत्रिणींच्या गोकुळात रमले. दोन वर्षांचा दुरावा किती व कसा भरून काढू असे झालेय. नुसता दंगा मांडलाय.

तिथून निघण्याआधीच रोहनाच्या मागे लागलेले. बाबा रे, लगेच एखादा ट्रेक ठरव. नंतर तू उडनछू होशील आणि मग माझे परतायचे दिवस येतील. त्यात नवरात्र, दसरा व दिवाळीचीही धूम असणार मग ट्रेक राहूनच जाईल. रोहनने मनावर घेतले आणि ' तिकोना गडाची ' मोहीम ठरवली. येऊन फक्त चारच दिवस झाले होते व झोपेचे तंत्रही ताळ्यावर आले नव्हते. मात्र मन गडावर जाण्यासाठी आतुरलेले. अधीर झालेले. ट्रेक मस्तच झाला. एक दोनदा दमछाक झाल्याने माझा निश्चय डळमळू लागलेला. पण आका – आपला आनंद काळे हो, त्याने, "अगं ताई, थांबू नकोस. आलोच आपण " असे म्हणत म्हणत माझा उत्साह वाढवला . त्याला अनघाने छान साथ दिली आणि मला शिखरावर पोहोचवलेच.

चोवीस मावळ्यांनी फतेह केली. शिखरावरील झेंड्याला हात लागले. शंकराच्या पिंडीसमोर मस्तक टेकले. वरून आसपासचा नयनरम्य परिसर, हिरवाई डोळ्यात व मनात साठवली. त्यानंतर तिथेच सगळ्यांनी आणलेल्या एक से एक पदार्थांचा फन्ना उडवला. थालीपीठ, भाकर्‍या, अळूवडी, लसणाची चटणी, लाडू, मक्याचे दाणे, बटाट्याची भाजी, ठेपले, बरेच काही होते. सगळेच पदार्थ अप्रतिम व अतिशय चविष्ट झाले होतेच आणि पोटात भूक भडकलेली. त्यात मोसंबी सोलून सगळ्यांना वाटून टाकण्याऐवजी चक्क रस काढून रुमालाने गाळून अनुजाने( अनुजा सावे ) दिला. ती इतके लाड करतेय हे पाहून मीही तव्येतीत लाड करवून घेतले.

भरल्यापोटी गड उतरू लागलो आणि माझी थोडी घाबरगुंडी उडाली. पहिल्याच उतरणीला जरासा पाय सरकला तर सरळ सरळ कपाळमोक्षच होणार हे पाहून फे फे उडाली. तोच अनिकेत वैद्य मदतीला आला. मग काय अर्ध्याहून जास्त गड त्याचाच हात धरून उतरले. जेवढा आनंद शिखर गाठल्याचा झाला तेवढाच जमिनीला पाय टेकल्यावरही झाला. रोहन, आका, अनघा व अनिकेत धन्यू. पुन्हा एखादा ट्रेक करायचा का? प्लीज प्लीज...

तिकोना गडावर जवळपास सगळ्यांनी लिहिले असेलच. आणि खूपच सविस्तर छान लिहिले असेल. त्यामुळे भारनियमनाचा अतिरेक असल्याने कधी विजदेवी नाराज होईल याचा भरवसाच नसल्याने पोस्ट आटोपती घेते. सोबत थोडेसे फोटो जोडतेय. १५ सप्टेंबर पासून जालावर माझा वावर जवळपास शून्यच. डायल अप आणि विजेच्या तालावर निदान छोटीशी तरी पोस्ट टाकण्याचा मोह आवरत नसल्याने....



26 comments:

  1. तायडे ... तिकोना ट्रेकवरची ही पहिलीच पोस्ट बरं का!!! कोणीच काहीही लिहिलेले नाही. मी पण अजून पोस्ट लिहितोच आहे... :) उद्या होईल पूर्ण. कशी आहेस तू?
    नाशिकला दिवाळी ची तयारी कशी जोरात सुरू असेल ना... मी येतोय लवकरच. तू पुन्हा उडायच्या आधी भेटू एकदा... आणि हो अजून एका ट्रेकचे बघू कसे करायचे ते.. :)

    ReplyDelete
  2. मस्त झाला होता ट्रेक...परत एकदा करयला नक्की आवडेल...

    ReplyDelete
  3. मस्त फोटू आणि शॉर्ट अँड स्वीट पोस्ट.. सहीये गेल्या गेल्या ट्रेक ... मजा चाललीये तुझी एकंदरीत :) .. यंज्वाय !!

    ReplyDelete
  4. तुझी पोस्ट बघुन खुप आनंद झाला... ट्रेकला मला येण्यास जमलं नाही याचा खेद वाटतोय :(

    ReplyDelete
  5. Chhaan lihile aahes..kara majjaa !!

    ReplyDelete
  6. अरे!! असं झालं का?? रोहना, मला वाटलं की सगळ्यांनी सविस्तर पोस्ट टाकली असेल म्हणून मी गड, आसपासचा परिसर, जाण्याचा मार्ग, धरण आणि येताजातांना घडलेल्या रंजक घटना विस्तृत वर्णिल्या नाहीत. असो. तू लिहितो आहेस ना... वाट पाहते.
    तू ये लवकर. भेटूच पण जमले तर अजून एखादा झेंडा गाठू. :)

    ReplyDelete
  7. सागर, धन्यवाद. सहमत आहे. मस्तच झाला होता ट्रेक. रोहनला रिक्वेस्ट पाठवली आहेच... :D

    ReplyDelete
  8. हेरंब, मजाच मजा सुरू आहे. त्यातून सध्या नाशिकला आईकडे आल्याने लाडच लाड. म्हणजे ती माझे करतेय आणि मी तिचे... :)

    ReplyDelete
  9. आनंद, तुला खूप मिस केले बघ. हेरंब, विभी, तन्वी, अपर्णा तर येणार नव्हतेच ( त्यांच्या कितीही मनात असले तरी... ) पण कदाचित तू येशील असे वाटलेले. पुढच्या वेळी जमव.

    ReplyDelete
  10. उमा धन्यू गं. :)

    ReplyDelete
  11. इथे असतांना नेट वर कशाला वेळ वाया घालवते आहेस?? दुसरं बरंच काही करता येईल बघ... :) म्हणजे फिरणं< खादाडी<इतर नातेवाईकांच्या भेटी<आणि बरंच काही.
    पोस्ट झॅक झाल पहा.

    ReplyDelete
  12. महेंद्र, मातोश्री तर फार आरडाओरडा करतात नेटवर जाते असं नुसतं म्हंटले तरी...:D खादाडी, भटकंती सुरू आहेच. मुंबईत आले की भेटूच रे पुन्हा. :)

    ReplyDelete
  13. वाह ताई मस्त पोस्ट...आवडली. त्या बेसनाच्या लाडवाची चव अजूनही आहे बर जिभेवर :)

    ReplyDelete
  14. >>मस्त फोटू आणि शॉर्ट अँड स्वीट पोस्ट.. सहीये गेल्या गेल्या ट्रेक ... मजा चाललीये तुझी एकंदरीत :) .. यंज्वाय !!
    +१

    ReplyDelete
  15. श्रीताई, किती मिस करतेय तुला तर माहित आहेच...शिवाय ते भारनियमनमुळे तू साध्या मेलवर पण नसणार आणि नसलीस तरी ठीक आहे गं मजा कर..पोस्ट मस्त शॉर्ट आणि स्वीट झालीय...Hats off....फ़ोटोसुद्धा झकास आहेत....
    रच्याक तिकोनावर पहिली पोस्ट योगेश (मनमौजी) ने टाकली होती....पब्लिकने वाचली असेल असं वाटतंय....
    सगळ्या आठवणी गोळा करुन ठेव. परत आलीस की पुन्हा त्याच आठवणींचा आधार असतो....मी सध्या तेच करतेय...दिवाळीच्या शुभेच्छा तुला अम्मळ आधीच देतेय..

    ReplyDelete
  16. >>>> इथे असतांना नेट वर कशाला वेळ वाया घालवते आहेस?? दुसरं बरंच काही करता येईल बघ... :) म्हणजे फिरणं< खादाडी<इतर नातेवाईकांच्या भेटी<आणि बरंच काही.
    पोस्ट झॅक झाल पहा.

    +100

    मी अगदी हेच लिहीणार होते तूला... :)

    एकदा परत गेलीस की आहेच नेट, तोवर मात्र मस्त भटक आणि धमाल कर...(मी येतेच आहे :) )

    ReplyDelete
  17. भाग्यश्री, पोस्ट छान झालीय. :D मजाच आली नाही का ट्रेकला? अगं पण, आपले 'दोघीदोघीं'चे फोटो कुठेयत?? मला मेल कर ना प्लीज? :)

    ReplyDelete
  18. सुहास,धन्यू रे! पुन्हा ट्रेक झाला तर लाडूही येतीलच. :)

    ReplyDelete
  19. विभी, तुला मिस केले खूप. आता तू येशील पण मी नसेन. :(
    धन्यवाद.

    ReplyDelete
  20. अपर्णा, भारनियमाने तर उच्छाद मांडला आहे. :(
    मी ही मिसते आहेच तुला. योमूने टाकलेली पोस्ट वाचेन आता परत आले की. तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा! आरूषला खूप पापे.

    ReplyDelete
  21. तन्वी, ये लवकर. मी वाट पाहते आहे. बाकी भटकंती, गाण्याच्या मैफिली आणि खादाडी जोरो शोरों पें हैं। :) परत गेले की जाल की जाल में वापसी होनी ही हैं... :D

    ReplyDelete
  22. अनघा, खरेच. ट्रेक सहीच झाला. तुला फोटो मेल केलेत गं.

    ReplyDelete
  23. छान छोटीशी पोस्ट झालीये ताई ...त्या कमानीचा फोटो बघून वाटत कि " अरे आत्ताच तर आपण इथे बसून गप्पा मारत होतो " पुढल्य ट्रेक ला नक्कीच भेटू ..

    ReplyDelete
  24. good job ....hava changli ahe towar ajun ek trek karun ghe.

    atta Zionla gelyawar asech watat hote ajun ek tari trek karawa

    pustakanchi yadi nelis ki nahi?

    enjoy

    ReplyDelete
  25. खूपच धमाल आली गं ट्रेकला. आले की बोलूच. :) थंडी सुरूही झाली ना? :( माधुरी, जरा प्लीज तुझ्याकडे पुस्तकांची यादी असेल तर पाठव ना... माझ्याकडेही आहे पण कदाचित काहितरी नजरेतून सुटेल म्हणून... धन्यू गं.

    ReplyDelete
  26. सागर, हो ना. अगदी डोळ्यासमोर आहे सारे. ट्रेक नाही तरी आउटिंग तरी होऊ घातलेय. भेटूच... :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !