जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, May 9, 2010

टाको

आज फार कंटाळा आला होता. एकतर सगळी सकाळ खूप उदासवाणी गेली. हळहळ - हुरहूर - अगदी मी का नाहीये तिकडे...... असे फुरंगटून, रडक्या आवाजात म्हणूनही झाले. आत्ता किती हल्लागुल्ला असेल ना चालू... नेमकी मी मात्र या आनंदाला मुकलेय.... दुधाची तहान ताकावर... आय मीन फोनवरच्या बोलण्यावर भागवायचा प्रयत्न केला खरा पण....... होय हो मी त्याबद्दलच बोलतेयं...... आमची सकाळ म्हणजे मायदेशातली संध्याकाळ... ९ तारीख... ' मुंबईतील ब्लॉगर्स मेळावा ' होता नं आज. महेंद्र, अपर्णा, रोहन कडून एक छोटिशी पंधरा मिनिटांची झलक मिळाली आणि खूप बरे वाटले. महेंद्र, रोहन, कांचन व सगळ्या मित्रमैत्रिणींनी हा मेळावा यशस्वी केला. सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन!

महेंद्र, तू फोन करशीलच याची खात्री होतीच. थँक्स रे, आवर्जून लगेच फोन केलास. आता फोटो-चित्रफिती व पोस्टसची वाट पाहतेय. अपर्णा म्हणाली, मस्त वडे चापलेत.... बस ते ऐकले मात्र आणि लगेच निदान काहीतरी खादडंती तरी करावीशी वाटू लागली. पण मसालेदार, अती तिखटाचा मूड बिलकुल नव्हता. काहीतरी थोडे चिजी - जरासे मध्येच किंचित तिखट आणि फार खटाटोपही नको. काय करावे या विचारात आणि फोनाफोनीत सकाळ अशीच कंटाळत गेली. मनाचे पोट आज भरणे शक्यच नव्हते त्यामुळे ते आळसावलेले उदास असले तरी पोटाचे काय....... ते बेटे कुठले गप्प बसायला, लागले की गुरगुरायला. काय ती हुरहूर लागली आहे नं ती उपाशी पोटी नको..... मस्त भरल्या पोटी कर गं.... असे म्हणू लागताच उठावेच लागले. काय बरे करावे हा विचार करत स्वयंपाक घरात शिरले तोच समोरच टाको शेल्स दिसले. अरे वा! चलो आज टाको को थोडा मायदेशी स्टाइल मे ढालेंगे.... बस, मग काय.... बनवले फटाफट आणि मटकावलेही. चला आता भरल्या पोटी जरा तुम्हालाही खिलवावे आय मीन दाखवावे म्हटले......

वाढणी: तीन माणसांना पुरेल.

साहित्य:

६ तयार टाको शेल्स. ( सपाट बेस असलेले शक्यतो घ्यावेत )
एक मध्यम सिमला मिरची उभी पातळ चिरून
एक कांदा व एक गाजर उभे पातळ चिरून
पाच - सहा मशरूम्स उभे पातळ चिरून
मक्याचे व मटारचे कोवळे दाणे वाटीभर
अर्धी वाटी फरसबी छोटे छोटे तुकडे करून
तीन लसणाच्या पाकळ्या व दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून
चार चमचे ऑलिव्ह ऑइल ( नसल्यास सनफ्लॉवर/सफोला/ शेंगदाणा कुठलेही चालेल )
तीन चीजच्या स्लाइस. ( किसलेले चीज एक वाटी )
दोन चमचे लाल तिखट, अर्धा चमचा मिरपूड, एक चमचा पार्सली ( पूड ) व स्वादानुसार मीठ

थोडा चिरलेला पालक, लेट्युस व थोडीशी गाजरे घेऊन सजावट करावी.




कृती:

जरा पसरट कढई/नॉनस्टिक पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल घालून मध्यम मोठ्या आचेवर तापत ठेवावे. तापले की लसूण, हिरवी मिरची व कांदा घालून तीन चार मिनिटे परतून त्यावर गाजर व सिमला मिरची टाकून चार-पाच मिनिटे परतावे. अर्धवट शिजले की मशरूम्स व मका-मटार-फरसबी टाकून आच मोठी करून तीन-चार मिनिटे परतावे. किंचित कमीच शिजवायचे असल्याने लगेच त्यावर तिखट, मिरपूड, पार्सली व स्वादानुसार मीठ टाकून सगळे मिश्रण एकजीव करावे. आच लहान न करता या मिश्रणावर चीजचे स्लाइस किंवा किसलेले चीज टाकावे व दोन मिनिटांनी आच बंद करावी. आता मिश्रण शक्यतो ढवळू नये.

एक एक टाको घेऊन हलकेच त्यात मावेल तितके मिश्रण भरावे . चीज जास्त हवे असल्यास वरून किसलेले चीज भुरभुरावे. आवडत असल्यास अवाकाडोचे तुकडे, सार क्रिमही घालावे. आतले सारण गरम असतानाच खायला द्यावे. चिप्स+सालसा व हे टाको, कंटाळवाण्या संध्याकाळी छान वाटतात व अगदी फटाफट होतात. रोजच्या पोळीभाजी पेक्षा थोडे जरा हटके, मुलांचे आवडते.



टीपा:

मुलांच्या पार्टीसाठी एकदम हिट आयटम. त्यानिमित्ते भरपूर भाज्याही खाल्ल्या जातात. यात उकडलेला राजमा घालता येईल. तसेच चिरलेली काकडी व कैरीचे तुकडे लज्जत अजूनच वाढवतील. मात्र हे दोन्ही टाकोत मिश्रण भरल्यावर वरून घालावे. शिजवू नये. पालक दोन-तीन मिनिटे गरम पाण्यात टाकून काढून घ्यावा व टाकोवर पेरावा. बरेचदा लहान मुलांना व मोठ्यांनाही पालक आवडत नाही. म्हणून मिश्रणात टाकू नये. वाढताना विचारून वर पेरावा. मिरचीच्या तुकड्यांमुळे तिखटपणा येतो.

टाकोच हवेत असे नाही. बरेचदा अचानक हॉटेलात जायचा मूड बनतो आणि पोळ्या उरतात. अशा वेळी अशाप्रकारे मिश्रण बनवून पोळीत भरून गुंडाळी पोळी करून द्यावी. पोळीत भरण्याआधी तव्यावर अर्धा चमचा तूप टाकून पोळी दोन्ही बाजूने किंचित क्रिस्प होईल अशी शेकवून घ्यावी व मग मिश्रण भरून मस्त चीज भुरभुरून द्यावी. पोळ्या कधीनुक संपून गेल्या कळणारही नाही. आपल्याकडे बेकरीत मिळणाऱ्या पावाला अर्धे कापून, बटरचा हात लावून मस्त शेकवून घेऊन त्यात हे मिश्रण भरून ताव मारावा.

16 comments:

  1. अगं कसले भन्नाट दिसताहेत... मी पण नाही गेले मेळाव्याला, म्येरेको भी जामच रुख रुख लागून राहिली आहे... मग मी मस्त ईडली चापली....तुझ्यासारखाच विचार करून की भरल्या पोटी हळहळावे :)

    ReplyDelete
  2. तन्वे, अगं Great minds think alike... :) मेळावा नाही तर निदान खादाडी तरी... ही..ही... शिवाय तिकडे सगळे वडे-कटलेट चापत होते,पाहिलेस नं... आपल्यालाही जाता आले असते तर किती छान झाले असते गं...

    ReplyDelete
  3. काल मेळाव्याला खुपच मजा आली. आर्यनने पण मस्त एन्जॉय केले.
    ही रेसिपी एकदम सोपी आणि छान आहे. टाको मिळणे कठीण आहे, पोळीची गुंडाळी करुन मस्त लागेल खायला.
    सोनाली केळकर

    ReplyDelete
  4. हा पदार्थ फ्रॅंकीच्या जवळ जातोय...सही आहे आयडीया..आता करून बघायला हवा (ऑफकोर्स पोळीबरोबर :( (रडका स्मायली))...दिसतोय जोरदार...
    बाय द वे, मी काल बेसनाचे लाडू बनवून खाल्ले..दुःखात तेव्हढंच सुख!

    ReplyDelete
  5. अरे माझी जुनी कॉमेंट दिसत नाही, म्हणुन पुन्हा टाकतोय. तुझी सगळ्यांनी खूप आठवण काढली. तू पण असतीस तर बरं झालं असतं.
    वडे मस्त होते बरं कां.

    ReplyDelete
  6. अगदी खरंय. खुपच रुखरुख लागली होती काल. सगळ्यांना एकत्र भेटण्याची (आणि वडे, कटलेट्स खाण्याचीही) सुवर्णसंधी हुकल्यामुळे :(

    आता मूळ विषय :) .. अहाहा.. काय छान दिसतायत फोटो. उचलून गट्टम करावं असं वाटतंय. टाको... माझा प्रचंड म्हणजे अतिप्रचंड आवडता पदार्थ. क्रिस्पी टाको. चिपोटले/टाको बेल/मोज कुठेही गेलो की ही माझी ठरलेली ऑर्डर असते. आता घरी पण करता येईल.. वा वा. पुढच्या वीकांतात घरी करून मनसोक्त खातो आणि पुढची प्रतिक्रिया देतो :)

    ReplyDelete
  7. सोनाली,अगं हो नं...पोळीत-पावातही मस्तच लागते. तुला आवडेल नक्की.

    ReplyDelete
  8. विद्याधर, फ्रॅन्कीच्या एकसेएक आठवणी आहेत रे... कसली मस्त लागते. अरे पोळीतही सुंदरच लागते. खरी चव मिश्रणालाच आहे नं. बाहेरच्या आवरणाला स्वत:चा फारसा फ्लेवर नसला की झाले. अर्थात आपल्या पोळीची बातच न्यारी आहे म्हणा. :) आईने करायला घेतल्या की लगेच कावकाव सुरू होते.
    वा! बेसनाचे लाडू तू बनवलेसं... सहीच! :)

    ReplyDelete
  9. महेंद्र, मी पण नचिकेतला जाम पिडले... शेवटी तो म्हणू लागला, " अगं त्यापेक्षा गेली असतीस तर बरे झाले असते....:D " तुझी ही एकच कमेंट मला मिळाली.:( बरे झाले पुन्हा टाकलीस. थांकू.:)

    ReplyDelete
  10. हेरंब, चिपोटले माझे पण अतिशय आवडते. सेम पिंच. टाकोचे पोटॅटोज पण. शाकाहारींसाठीही बरेच ऑपशन्स मिळतात. :) करून पाहा आणि सांग मला.
    बाकी सगळ्यांना भेटण्याची खूप इच्छा होतीच पण... योग येईलच लवकर.... ते वडे मात्र जाम छळता आहेत.:D

    ReplyDelete
  11. मेळाव्यात असल्यामुळे नो निषेध.. पण तोंडाला पाणी सुटेश.. तू आली असती तर खुप बरं वाटलं असतं

    ReplyDelete
  12. आनंद,यायचे होतेच रे मला पण....फोनवर बोललेच शिवाय आता निदान सगळ्यांना फोटोत पाहून आणि पोस्टस वाचून थोडेसे समाधान.:) आलास का परत का अजून मुंबईत आहेस?

    ReplyDelete
  13. परतलोय.. पण आता वाटते आहे. अजुन एखादा दिवस रहायला हवे होते

    ReplyDelete
  14. चित्रकला क्या! आप उत्तम होना चाहिए.कल्पना की दुनिया से पेस्ट्री एक ग्रीटिंग

    ReplyDelete
  15. वडे पचल्यामुळे कमेन्टायला हरकत नाही....:) अगं तुझी आठवण काढुन काढुनच खादाडी केलीय...पण आत्ता सॉलिड तृप्त आहे खादाडीच्या बाबतीत त्यामुळे छान दिसतंय एवढंच म्हणेन..नंतर पाहिन तेव्हा तर निषेध पक्का...

    ReplyDelete
  16. अपर्णा,वेलकम बॅक. :)मज्जा आली नं... सगळे भेटले+खादाडी, सहीच रे!

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !