जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, May 4, 2010

माझी व लाखों-करोडोंची लाईफलाईन......

तिला प्रथम कधी बरं पाहिलं होतं मी...... आई सांगते त्यानुसार जेमतेम वर्षाची असेन. दादर ते अंधेरी हा नेहमीचा प्रवास. मामा अंधेरीला राहायचा नं. तेव्हांपासून ती माझी व मी तिची झालेली. गेल्या जन्माचे माहीत नाही पण या जन्माचे ऋणानुबंध नक्कीच होते. आम्ही ठाण्याला शिफ्ट होऊन दोन-तीनच महिने झाले होते. स्कूटर स्टॅंडला लावतानाच ८.५३ आज तिनावर येतेय हे ऐकताच मी नवऱ्याला टाटा करून पळत सुटले. ब्रिजवरून उतरतानाच लोकल आलीही त्यामुळे रोजचा डबा सोडाच पण पुढचा फस्टही गाठणे केवळ अशक्य असल्याने समोरच असलेला महिलांचा सेकंडचा डबा चटदिशी पकडला. दहा सेकंदाच्या चलबिचलीमुळे इतके जीव खाऊन धावूनही माझी गाडी सुटणार होती. हुश्श..... मिळाली बाई एकदाची.

काय कोण जाणे पण समोर आलेली गाडी कुठल्याही कारणाने चुकणे म्हणजे ' घोर अपमान '
, लोकलशी बेईमानीच जणू. "क्या रे, इत्ता भी नही जमताय तेरेकु? कितने सालोंसे आ रही हो? ऐसे गाडी छोडनेका नहीं....... " कितीही गर्दी असो, गाडी या प्लॅटफॉर्मवरून अचानक ट्रॅक बदलून पलीकडच्या ट्रॅकवर अवतरो...... वाटेल ते झाले तरी हवी ती गाडी मिळालीच पाहिजे हा अलिखित करार होता. मीच माझ्याशी केलेला. कायमचा करार. काळ, वेळ व दुरावा या साऱ्यावर मात करणारा....... हाडीमाशी मुरलेला. आजही मी समोर आलेली गाडी चुकूनही सोडत नाही..... केलेला करार मोडत नाही.

आता समजा नसती मिळाली तरी काय मोठे बिघडणार होते..... दुसरी मागोमाग येतेच की...... बरे कोणी काही सक्तीही केलेली नाही की कोणी पारितोषिकही देणार नव्हते. पण नाही...... गाडी दिसताच कधी पावले धावू लागतात ते कळतच नाही. कशी गंमत आहे पाहा, आजही मी जेव्हां जेव्हां ठाण्यात जाते लगेच दुसऱ्याच दिवशी जाऊन पास काढते. सकाळच्या धावपळीचे - कोलाहलाचे - निवेदकांचे आवाज - त्यावरच्या माणसांच्या प्रतिक्रिया - ब्रिजवरून सुसाट धावणे, चालत्या ट्रेनमधून बरोबर गेटसमोर अलगद प्लॅटफॉर्मवर उतरणारे पाय, स्टॉलवरची लगबग, तिकीटांची लाईन, टीसी व त्याला पाहून मुद्दाम समोर येणारी किंवा हमखास पळणारी माणसे, सगळी जिवंत सळसळ आसुसून नसानसात भरून घेत निदान दादरपर्यंत तरी जातेच जाते. पासही केवळ आजवरच्या लोकलच्या कराराच्या बांधीलकीसाठी. नाहीतर अशी मी कितीवेळा जाणार असते..... फार तर दोन..... अगदीच डोक्यावरून पाणी तीनदा. पण पर्स मध्ये पास नाही म्हणजे जणू चाकातली हवाच काढून घेतल्यासारखे वाटते. कुछ तो भौत गडबड हो रहेली हैं रे चे फिलिंग देणारे...... उगाचच तुटल्यासाखे वाटत राहते.


काही सवयी जन्मजात अंगात मुरलेल्या...... लोकलचा पहिला डबा स्टेशनात शिरताच प्रतिक्षिप्त क्रियेने ओढणीची गाठ मारून पटकन ती पुढे येते, पर्स काखोटीला जाते. मंगळसूत्र चटदिशी ओढणीखाली दडते आणि कधी डब्याच्या पहिल्या नाहीतर मागच्या दरवाज्याचे हॅंडल पकडले जाते कळतही नाही. आतला रेटा उतरताच टुणकन उडी मारून एकदम आत घुसले की वीरश्री ओसरते. हे सारे करताना कुठलेही श्रम नाहीत की भीती नाही. जसे आपण बोलतो- चालतो तसेच हेही एक यावर समस्त लोकल परिवार एकमताने सहमत होईल.

रोजची गाडी तर मिळाली पण डबा चुकला होता. सेकंडमधून प्रवास करणे मला मनोमन भावते मात्र अतिरेक गर्दीमुळे नाईलाजाने मी शक्यतो पहिला वर्गच पसंत करी. फर्स्टमध्ये सगळे जरा तोऱ्यातच असतात. आता हा कसला तोरा हे मला कधीच न उलगडलेले कोडे आहे. एकेकाचे अजब प्रकार. अगदी रोजचे चेहरेही एकमेकांच्या आरपार पाहताना पाहिले की मला घुसमटून जायला होई. कोरा चेहरा आणि आक्रसून घेतलेली मने...... क्वचित एखादा दुसरा हल्लागुल्ला करणारा ग्रुपही दिसे...... नाही असे नाही...... पण त्याही चौकटीत अडकलेल्या. कोणालाही सहजी आपल्यात न सामावून घेणाऱ्या. उत्स्फूर्त होणारी शब्दांची देवाणघेवाण जवळजवळ नाहीच. मुळात फक्त तेराच सीट त्याच्या कश्याबश्या मेहरबानी खातर झालेल्या पंधरा-फार तर सोळा जागा. त्यातही सीटवर तासभर बसूनही उतरणारी आधी जागेवर उभी राहील. ओढणी-साडी नीट करेल, वरची पर्स काढेल.... आणि मग कोणाचाही स्पर्श होणार नाही याची खबरदारी घेत दाराकडे वळेल. जणू बाकीच्या अछूत कन्या.....


कोणाची सुंदर साडी तर कोणाचा नवाकोरा पंजाबी, घातलेला मोगऱ्याच्या, चमेलीच्या कळ्यांचा घट्ट विणलेला गजरा तर कोणाच्या आकर्षक चपला........ एखादी गोडशी , नाकीडोळी रेखीव तर एखादी वेड लावणाऱ्या खळ्या गालावर अन अनेकांचे जीव त्या खळ्यांत ....... कोणाचे अपरे नाक तर कोणाचा लांबसडक शेपटा....... सगळ्याची नोंद मनात होत असते पण उघडपणे चटकन कोणी, " अगं, किती गोड दिसते आहेस गं. " असे म्हणणार नाही. एखाद्या जागेचाच दोष म्हणायचा की काय पण जरा रुक्षच मामला. अन त्या उलट सेकंडमध्ये पाहावे तर सगळे कसे भरभरून - फसफसून उतू जाणारे. मग त्या गप्पा असोत नाहीतर भांडणे असोत. कुठेही हातचे राखून काही नाही. जो भी कुछ हो पुरे दिलोजानसे....... सगळे कसे जीवनरसाने सळसळणारे. जिकडेतिकडे मोठे मोठे ग्रुप्स, त्यांचे खिदळणे, थट्टा, मध्येच खादाडी.....डोहाळजेवणे - वाढदिवस.... फेरीवाल्यांची लगबग....... मध्येच कचाकचा भांडणाचे आवाज तर कोणा गात्या गळ्यातून उमटणारी सुरेल तान....


घरातून निघताना कितीही धावपळ-तणतण झालेली असू देत. एकदा का या विश्वात प्रवेश केला की नकळत ताण हलका होतो. सगळे श्रम विसरून काहीसे हलके वाटते. तासाभरासाठी सगळ्या कटकटीतून झालेली मुक्तता. लोकलच्या तालावर..... दर स्टेशनागणिक उतरणाऱ्या - चढणाऱ्या मैत्रिणी, काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे..... एखादी नुकतेच लग्न झालेली....... लाजरी-बुजरी तर कोणी आठवा लागलेली...... अवघडून आलेली, कोणाचे स्वप्नाळू भावुक डोळे तर कोणाची चहाटळ-चावट छेडाछेडी ...... कोणाचे हळवे होऊन आसवे गाळणे तर कोणाचे घरच्यांच्या वागण्याने अगतिक होणे..... कोणाचा सात्त्विक संताप तर कोणाचा खुल्ला तळतळाट....... अनेक जणींसाठी हा सकाळचा व संध्याकाळचा लोकलचा एक तास खास स्वत:साठीचा..... हक्काचा कोपरा...... तरोताजा करणारा- भावना समजून घेणारा - ओढ लावणारा ..... जीवनरस देणारा. भले ही प्रत्यक्षात हाडामासाची नसेल पण हिला मन मात्र नक्की आहे आणि या मनाला हजारो चेहरे आहेत. अन या साऱ्या चेहऱ्यांत प्रेम - आपुलकी - स्नेह ठायीठायी समावलायं. एक आश्वस्त स्नेह.

" बाई बाई.... किती गं ही गर्दी.... कसा प्रवास करता तुम्ही दररोज कोण जाणे...... आमचा तर जीवच घाबरा होतो. लोकल समोर आली की पाय लटपटायला लागतात. गाड्यांवर गाड्या सोडत राहतो पण गर्दी काही संपत नाही. " मुंबई बाहेरच्या काही मैत्रिणींच्या या अश्या प्रश्नांवर मी नुसतीच हसते. काय आणि कसे सांगू हिला यातले रहस्य..... ते अनुभवायलाच हवे. तेही झोकून देऊन, हातचे न राखता......सर्वस्वी अधीन होऊन...... मग कितीही गर्दी वाढो...... मोटरमनचा संप होवो की पावसाने काही काळ गाड्या मंदगती चालोत-क्वचित बंदही पडोत.... का बॉम्बं ब्लास्ट होवोत...... या सगळ्यांना पुरून उरणारी, भरभरून जीवन देणारी व जीव जगवणारी, दिवसातले बावीस तास अव्याहत धावणारी........ अनेकांना हजारो करांनी आपल्यात सामावून घेत त्यांच्या जगण्याची गणिते जुळवणारी - सोडवणारी, आयुष्याचा अपरिहार्य व अविभाज्य भाग होऊन राहिलेली प्रिय सखी ...... माझी व माझ्या सारख्या लाखों-करोडोंची लाईफलाईन...... लोकल.

फोटो जालावरून साभार.

16 comments:

 1. श्री,अग्ग काय सही वर्णन केले आहेस गं...नेउन सोडलेस बघ..त्या लोकल मध्ये...तेही बिन तिकिटाने..:फ.. मी म्हणुनच नेहमी तु्ला सांगते..मी मुंबई ला,पुण्याला गेले की रस्त्यावरुन भरभरुन श्वास घेत जाते.....लोकल च्या प्रत्येक डब्ब्यातुन फ़िरुन येते...नेहमी वाटते..इथेच कुठेतरी आपण ही होतो....कुठे गेला ग तो काळ??गेले ते दिन गेले...

  ReplyDelete
 2. Very nice and true !!!

  what i like in your writing is, you have a great power of words to ply on!!

  liked the comparison of 1st and 2nd class compartments!!! It happened same in case of gents !!!!

  good one !!!

  Regards
  Deepak Parulekar
  Mumbai.

  ReplyDelete
 3. फस्ट क्लास मधले वर्णन वाचून पु. ल. देशपांडे यांचे "काही अप काही डाऊन" मधले वर्णन आठवले. पहिला वर्ग, दुसरा वर्ग अन तिसरा वर्ग ह्यातल्या मनोव्रुत्तीवर त्यात मस्त लिहिले आहे.

  ReplyDelete
 4. फारच छान लिहिले आहे. जुने दिवस आठवले. पट्टीचा लोकल प्रवासी गाडी सोडून देत नाही हे खरेच. बाकी चालत्या गाडीत चढताना येणारी वीरश्री वगैरे एकदम चपखलवर्णन!

  ReplyDelete
 5. अगदी दिल का तार छेड दिया तुम्ही. मी कॉलेजची सगळी मिळून जेमतेम सहा वर्ष लोकलवासी होतो, पण जीव आहे माझा लोकलवर. अगदी जिव्हाळ्याचा विषय. मस्त वर्णन केलंय तुम्ही. इथे मेट्रोतही गर्दी होते कधीकधी, पण बंद दरवाजाच्या मेट्रोला तो मोकळा आनंद काय येणार?
  बाकी फर्स्ट क्लासचं म्हणाल तर तो कदाचित सहापट भाडे दिल्याच्या भावनेचा परिणाम असेल.

  ReplyDelete
 6. अप्रतिम वर्णन.. मी सुद्धा लोकलचा प्रवासी.. वर्णन तंतोतंत जुळणारे... मी सुद्धा गाडी कशीही सुटु देत नाही, कारण इथे दोन मिनिटात दुसरी गाडी येत नाही, तब्बल ४०-५० मिनीटे वाट पाहावी लागते ;-)

  ReplyDelete
 7. हा हा.... तेही बिन तिकिटाने...सहीये!माऊ, ते विश्वच वेगळे आहे गं.

  ReplyDelete
 8. दीपू,इतक्या सुंदर अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार.:)

  ReplyDelete
 9. अनिकेत, तरी बरेयं आजकाल दोनच वर्ग आहेत... पुलंची काही फेमस पात्रे उभी करायची झाल्यास कोण कोण व कशी करू शकेल....मस्त टीपी होतो.:D

  ReplyDelete
 10. निरंजन, हो नं.... ते काही सेकंद म्हणजे युध्दाचाच प्रसंग... हल्ला बोल....:D. धन्यवाद.

  ReplyDelete
 11. विद्याधर, हा हा... अहो पण ते सहापट जास्त भाडे तिथे येणारे सारेच देतात नं... मग तरीही.... खळ घातलेले कडक इस्त्रीचे चेहरे...यस्स्स्स, अपुन का भी जीव है लोकलपे.:)

  ReplyDelete
 12. आनंद,तुला तर चालणारच नाही की गाडी सुटून... :). चुकून गेलीच तर फलाटावर गर्दी तरी असते का? तेवढाच जरा टीपी.

  ReplyDelete
 13. वा श्रीताई.. किती जिवंत वर्णन केलं आहेस ग !! नुकताच लोकलमधून प्रवास करून आल्यासारखं वाटलं...

  गाडी चुकू न देण्याचा करार, पहिल्या आणि दुस-या वर्गातल्या मानसिकतेतला फरक सगळं सगळं पटलं. खुपच छान !!

  ReplyDelete
 14. हेरंब,मानला तर त्रास अन शोधले तर सुख.... आता हे रोजचं आणि वर्षानुवर्षे करायचेच आहे म्हटल्यावर आनंदाने केले तर खरोखरच काही काळाने लॉंग टर्म कटकट होणे बंद होते.आणि माणसांच्या विविध छटांचा खजिना ठासून भरलेला... बस नजरियां होना...:)धन्सं रे.

  ReplyDelete
 15. नेहमीप्रमाणे यावेळेला पण लोकलचा प्रवास करुन आले तेही सेंट्रल-वेस्टर्न दोन्ही त्याची आठवण ताजा झाली..बोरीवली-चर्चगेट अशा सुरुवातीच्या स्थानकांवर भेळवाल्यांची कापाकापी आणि रचुन ठेवलेली टोपली पाहाणं हेही मला फ़ार आवडतं आणि त्यांची ती मसाला-डाळ...अहाहा..पाणीच आलं तोंडातून बघ...

  ReplyDelete
 16. अपर्णा, किती गोष्टी लोकलच्या अनुषंगाने आपल्या जीवनात कायम घर करून बसल्यात नं. :) आभार्स !

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !