जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, July 8, 2009

नाण्याच्या दोन बाजू

आई: विराज... ए विराज... बसला असेल दोन्ही कानांचा जगाशी संपर्क तोडून. काय करावे बाई या मुलांना? सदानकदा गाणी ऐकत बसतात. पूर्वी डेकवर मोठ्याने लावत होता ते तरी बरे होते. निदान बहिरे होण्याची भीती नव्हती शिवाय नाईलाजाने का होईना पण आईच्या हाकेला उत्तर मिळत होते. कुठून एकदा म्हटले त्याला.... अरे केवढा तो आवाज डोकं दुखायला लागलं माझं. पडत्या फळाची आज्ञा सारखा उठला आणि हेडफोन्स घेऊन आला. आता दुनियेत काही का होईना याला काही पडलेले नाहीये. पण ते जाऊ दे. आज जे मनात घोळतेय ते याला सांगायलाच हवे. बारावीत पोत्याने मार्क्स आणलेत पोराने... तसे दहावीतही आणले होतेच पण तेव्हा जरा लहान होता. शिवाय त्याचे विश्वही लहान होते. गेल्या दोन वर्षात ते बरेच रुंदावलेय. मित्र मैत्रिणींचा गराडाही फार वाढलाय. तशी आजकालची पोरं आपल्या त्या वयापेक्षा जास्त हुशार आणि जाणती आहेत हे खरं असलं तरी जग सुंदरच आहे या मताशी सहमत असल्याने अनेक छुप्या गोष्टी समजत नाहीत. किमान काही धोके तरी सांगायला हवेत.

पुन्हा हाका मारते... विराज... अरे ऐकतोस का जरा?

विराज: आई काय गं, कधीपासून कशाला हाका मारते आहेस. मला सगळं ऐकू येतंय. आणि इतका गंभीर चेहरा कशाला केला आहेस? बापरे आज पुन्हा मला एक मोठे लेक्चर ठोकायचा विचार आहे का तुझा? नो नो. ममा आज नाही हं, मी चाललो. कधीपासून तन्वी, मुग्धा, अमेय, रोहन .... आमचा सगळा ग्रुप मॉलमध्ये जमलाय. तू आज घरी आहेस म्हणून मी तुझ्यासोबत थांबलो होतो. नाहीतर म्हणशील कारट्याला एक मिनिट आईबरोबर बोलायला वेळ नाही. पण तुझे उपदेशाचे डोस चालू होणार असतील तर मी चाललो.
आई: कारट्या, उपदेशाचे डोस काय? थांब आज तुला चांगले दोन तास पिळते बघ. अजिबात मॉल मध्ये जायचे नाही. आणि काय रे तुझ्या ह्या मित्र मैत्रिणींना घरात कोणी अडवत नाही का? पाहावे तेव्हा कुठेतरी पडलेलेच असतात.
विराज: पडलेले..... आई तू पण ना.... अग मी ही त्यांच्यातच पडलेला असतो तेव्हा त्यांची आई ही हेच म्हणत असेल ना? बापरे! आता तू या नवीन Subject मध्ये शिरू नकोस. मी पण काय मूर्ख आहे, आणखी एका उपदेशाच्या डोसाची .......
आई: बरं बरं कळलं. तू काहीही म्हणालास ना तरीही आज मी तुला मला जे सांगायचेय ते सांगणारच आहे.
विराज: मातोश्री, ते आम्हाला तुमची पहिली हाक आली ना तेव्हाच उमगले होते. तेव्हा एकदाचे काय ते फर्मान ओकून.... सॉरी वाचून टाका.
आणि प्लीज डायरेक्ट विषयालाच हात घाल गं बाई, उगाच ते तुझं ... काय गं ते, नेहमी मला ऐकवत असतेस.... हां ताकाला जाऊन भांड लपवणे प्रकार नको. ( खो खो हसतो.... आई त्याला दोन धपाटे मारते आणि तीही हसते. )
आई: विराज, तू चांगला मुलगा आहेस. हुशार आहेस........
विराज: ( तिला मध्येच तोडत.. ) आज आमच्या मातोश्री अशी स्तुतिसुमने का बरे उधळत आहेत. सहीच यार, ममा तू उगाच ओरडतेस ... शुद्ध मराठी बोलता येत नाही म्हणून. मीतर आलंकारिक वगैरे काय ते म्हणतात ना तसेच बोललो ना. ( खूश होतो. )
आई: चूप रे.... मध्ये मध्ये बोलून माझी लिंक तोडू नकोस. तर तू हुशार आहेस... चांगल्या घरातला, माझाच पोरगा म्हणून नाही म्हणत पण इंप्रेसिव्ह आहेस. तुझ्यातला आत्मविश्वास, डीप डाउन आम्ही केलेले संस्कार कुठेतरी तुझ्यात सतत जागृत असतात त्यामुळे तुझ्याही नकळत अनेक चांगले गुण तुला चिकटलेत.
विराज: ( आज आईला काय झालेय? काहीतरी मोठ्ठा बाँब टाकेल आता... )
आई: विराज, बाळा स्पष्टच सांगते. हेच वय फार धोक्याचे आहे. कॉलेजमध्ये निरनिराळे मित्र-मैत्रिणी असतात. आत्ताच तुझा केवढा गोतावळा आहे तो अजून अजून वाढणार. कोण चांगले कोण वाईट हे ओळखता आले पाहिजे. मैत्रिणी असाव्यात परंतु जपून राहा. कोणाच्याही आहारी जाऊ नकोस. सगळ्याच मुली साध्या नसतात. तुझ्यासारख्याला पर्फेक्ट टार्गेट करणाऱ्या मुलींपासून दूर राहता आले पाहिजे. तू किती हुशार, हँडसम... वगैरे म्हणत तुझ्या गळ्यात पडतील, नादी लावतील. एकदा का तू गुरफटलास असे लक्षात आले की मग तुला तंगवत ठेवतील व शेवटी टांग मारतील. तुझ्या अभ्यासाची मनाची वाट लागेल. हे वय प्रेमात पडायचे नाही.... प्रथम करियर मग प्रेम. आता तू हुशार म्हणून आजूबाजूला रुंजी घालणाऱ्या मुली जर तू मागे पडलास ना तर तुझ्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. मुली फार कॅलक्यूलेटीव असतात. स्वतःचा अभ्यास, मार्क्स करियर सगळे व्यवस्थित करतात. पण त्यांच्या प्रेमात पडून पोरांची मात्र वाट लागते. याचा अर्थ असा नव्हे की सगळ्या मुली अश्याच असतात. म्हणूनच कोण अननेसेसरी जवळीक करतेय आणि कोण खरेच आपले माणूस आहे हे ओळखता आले पाहिजे. या वयात मैत्रिणींचा सहवास आवडणारच. त्यांचे आसपास घोटाळणे, तू किती आवडतोस.... किंवा.. यार काल रात्री ना तुझी खूप आठवण आली. ग्रुपमध्ये सतत तुझ्या जवळ राहणे, बसणे, सहेतुक अहेतुक स्पर्श..... तुझ्या प्रत्येक बोलण्याला सहमत होणे.... अनेक प्रकारे फक्त तू आणि तू असे दर्शविणे हे सगळे तुला लुभावणार. पण बरेचदा हे फक्त त्या त्या वेळेपुरते आणि त्या ग्रुपपुरतेही मर्यादित असू शकते. दगडापेक्षा वीट मऊ सारखे. तू मात्र त्यात गुंतशील. हे नैसर्गिकच आहे रे. म्हणूनच हे असले घोळ घालूच नयेत. त्यापेक्षा सगळ्यांशी फ्रेंडशिप ठेवावी. कोणाला आपल्या मनात कुठे ठेवायचे हे ठाम ठरवता आले पाहिजे.

दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट..... एकवेळ तू प्रेमात पडून सपशेल तोंडघशी आपटलास तरीही चालेल परंतु तुझ्या कुठल्याही मैत्रिणीला तुझ्याबरोबर कुठेही व कुठल्याही वेळी जाण्यात, राहण्यात तुझी भीती वाटता नये. कोण मिळालेल्या संधीचा फायदा घेऊ शकते हे मुलींना बरोबर कळते. तेव्हा तू नेहमीच तुझा विवेक जागा ठेव. फ्रिडम जरूर असावा परंतु लक्ष्मण रेषा ओलांडू नये. मुलींना तुझ्याबरोबर त्या नेहमीच सेफ आहेत हा विश्वास वाटेल असेच तू वाग.

विराज: आई, अगं तू स्वतः एक मुलगी असून हे सगळे बोलते आहेस.... ह्म्म्म्म्म, मी लक्षात ठेवीन हा तुझा डोस. खरा जरा जास्तच झालाय मला तो. आता उगाच काही दिवस मला सगळ्या मुली व्हिलन वाटायला लागतील. बाबाला विचारायला पाहिजे...... अगं म्हणजे तू त्याच्यावर खरे प्रेम करत होतीस की...... सॉरी सॉरी...... ( मोठ्याने हसतो, आईला मिठी मारतो. आणि टाटा करत पळतो. )
आई: ( स्वतःशीच.... ) अरे मी स्वतः मुलगी असून असे बोलतेय याचे इतके नवल नको वाटायला..... मी जवळून पाहिलेय. आमच्या एका मित्राने जीव गमावला अशा प्रकरणातून. ( सुस्कारा टाकते.... ) अर्थात असेच सगळ्यांच्या बाबतीत घडेल असे नसले तरी आपण जपून राहावे झालं.

उद्या काही झालं तरी अनुजाला भेटायलाच हवेय. अनुजा... माझ्या बहिणीची गोड पोर. एकतर मला मुलगी नाही. अनुजात फार जीव अडकलाय माझा. तिलाही मावशीचे वेड आहेच. कधी मावशी म्हणत नाही.... माई म्हणेल.... काय तर म्हणे मावशीतला मा आणि आईतली ई... म्हणजे तू माझी दोन्ही आहेस. नुसती गोडूली आहे. पण आता पोर मोठी होतेय. दहावीत आहे यंदा. बापरे.... नाही नाही उद्या अनुजाला भेटायलाच हवे.....

पुढच्यावर्षी पोर कॉलेजमध्ये जाणार..... विराजला सांगितले तेच तिलाही सांगायला हवे. फक्त थोडे जास्तीच डीप जाऊन. ह्म्म्म्म...... ही दोघे भेटल्यावर जर चुकून एकमेकांशी या त्यांना वाटणाऱ्या उपदेशाच्या डोसाबद्दल बोलली तर चक्रावून जातील. ही आईच आहे ना.... मला एक सांगते आणि बरोबर उलटे अनुजाला सांगते. काय करावं पोरांनो तुम्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहात ना.... मग.....

6 comments:

  1. जसा-जसा वाचायला लागलो तसा-तसा ही पोस्ट माझ्यावरतीच लिहिली आहे की काय असे वाटायला लागले. :) ११ वी ला (१९९९) असताना मला आईने असेच सांगितले होते तरी पण मी १२ च्या सुरवातीला एका मुलीच्या प्रेमात पडलो. ४ वर्ष कोंलेजला एकत्र होतो. त्या नंतर ती पुढे शिकायला लागली. मी पुढे शिकता ना आल्याने नोकरी करू लागलो. २ वर्षापूर्वी आमचे लग्न झाले. :) दोन्हीकडच्या घरून रितसर परवानगीने ... :)

    "तुझ्या कुठल्याही मैत्रिणीला तुझ्याबरोबर कुठेही व कुठल्याही वेळी जाण्यात, राहण्यात तुझी भीती वाटता नये. कोण मिळालेल्या संधीचा फायदा घेऊ शकते हे मुलींना बरोबर कळते. तेव्हा तू नेहमीच तुझा विवेक जागा ठेव. फ्रिडम जरूर असावा परंतु लक्ष्मण रेषा ओलांडू नये. मुलींना तुझ्याबरोबर त्या नेहमीच सेफ आहेत हा विश्वास वाटेल असेच तू वाग."

    एकदम परफेक्ट ----- प्रत्येक मुलीकड़े तो 'सिक्स्थ सेंस' असतो... एकदम मस्त पोस्ट लिहिली आहेत तुम्ही ... :) आईची आठवण आली एकदम ... !!!

    ReplyDelete
  2. रोहन,:). अभिनंदन व अनेक शुभेच्छा! प्रेमात पडल्याशिवाय मजा नाही. मग ते आधी पडा वा नंतर.
    तुला ही पोस्ट आवडली मला खूप आनंद झाला.

    ReplyDelete
  3. wow this is beautifully marathi :)

    ReplyDelete
  4. आणखी १० वर्षांनी मी हेच म्हणत असेन. सेव्ह करून ठेवते फाइलीत आत्ताच. :)

    इयत्ता १लीतल्या मुलीकडून कोणाला कोणाचे चुंबन घ्यायचे आहे याचे डीटेल्स ऐकल्यावर मुलींची काळजी करणे मी सोडून दिले आहे. ;)

    पण हा एक आयुष्याचा हवाहवास भाग आहे. प्यार ना किया तो क्या किया? :)
    मला इथे ड्र्ग्ज आणि बुलिइंग ची काळजी जास्त वाटते. कसे जपायचे मुलांना? कितपत लक्ष ठेवणे शक्य असते? हम्म. बापरे. चिंतेने डोके दुखू लागलेय.

    ReplyDelete
  5. साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत सहजपणे तुम्ही किती महत्वाचं सांगितलं. असा सुसंवाद घरोघरी घडावा हिच ईच्छा.

    ReplyDelete
  6. Gomu, Welcome & Thanks.

    प्रभावित, होना गं ड्र्ग्ज हाही एक फारच गंभीर विषय झालाय. प्रेमापेक्षाही गंभीर.

    रोहिणी, धन्यवाद.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !