जाता जाता एक नजर इथेही........

Friday, May 8, 2009

कमळ

कमळ. नितळ काया, सोनसळी गोरी, पायात भरपूर उंची, चांगले जाड लांबसडक सरळ केस, नाकीडोळी ठीक होती. एकच दात वर उचललेला त्यामुळे तिचे ओठ थोडेसे पुढे आल्यासारखे दिसत अन तिचे सौंदर्य खूपच खुले. आईबापाची एकुलती एक अत्यंत लाडात वाढलेली, ग्रॅज्युएट मुलगी. स्वभावाने मिलनसार होती. तिचा साड्यांचा चॉइस मस्त होता. तिला कधीही मेकअप केलेला पाहिले नाही. गरजही नव्हतीच. कमळच्या बाबांची मोठी वाडी होती. खूप उत्पन्न होते. शिवाय किराणामालाचे दुकानही जोरात चालत होते.

कमळचे लग्न आता करावे ह्या दृष्टीने स्थळे पाहणे सुरू होते. कमळ थोडी अनुत्सुक दिसे पण आईबाबांना वाटे लाजत असेल म्हणून त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. तशातच, एके दिवशी संध्याकाळी कमळला पाहायला येणार होते. आधीच्या तीनचार स्थळांना तिने मला पसंत नाही म्हणून बोळवले होते. पण असे किती वेळा करणार. " आई, ऐकतेस का गं जरा? मला तुला काहीतरी सांगायचे आहे. " आईने ऐकले आणि म्हणाली, " कमळ, अग संध्याकाळी लोकं यायचीत. तुझे ते काहीतरी ऐकायला आत्ता वेळ नाही मला. रात्री सांग, आता आवरायला घे. " आईचा उत्साहाने भरलेला आवाज ऐकून कमळ गप्प राहिली. निमुटपणे कामाला लागली.

नेहमीप्रमाणे मुलाला, घरच्यांना ती पाहताक्षणीच पसंत पडली. तिथेच पसंती सांगून कधी साखरपुडा करायचा हीबोलणी सुरू झाली. कमळच्या उदास चेहऱ्याकडे पाहून बाबांनी, हे सगळे छानच आहे पण पोरीची पसंतीही हवी ना विचारायला. सगळ्यांसमोर ती लाजतेय, मोकळेपणी बोलायची नाही तेव्हा मी कळवतोच तुम्हाला. डोळ्यांनीच बाबांचे शतशः: आभार मानत कमळने बैठकीतून स्वत:ची सुटका करून घेतली.

पाहुणे गेले, जेवणे झाली. तिघांच्या हालचालीत थोडा तणाव होताच. आईला कमळचा राग आला होता. पोर हट्टीपणा करून स्वत:चे नुकसान करून घेईल. बाबांना कळत नव्हते की कमळला लग्न करायचे आहे का नाहीये. कमळ धीर गोळा करत होती. शेवटी बाबांनीच कोंडी फोडली, " कमळ, इकडे ये पाहू. अहो तुम्ही पण या, कमळला काय म्हणायचे आहे ते ऐकायलाच हवे. उगाच स्थळ बघत राहण्यात काय अर्थ आहे. " आई वाटच पाहत होती, " येगं बाई, एकदाचे काय तुझ्या मनात आहे ते सांगून टाक. " कमळ येऊन समोर उभी राहिली.

" आई-बाबा, मला सुदिपशी लग्न करायचे आहे. " एका क्षणात हे सांगून कमळने मनात हुश्श्श केले. " काय? अग तुला कळतेय का तू काय बोलतेस ते. अगोचर कुठली, तरी मी नेहमी तुम्हाला सांगत होते, हिला फार सूट देऊ नका. आता ऐकलेत ना, म्हणे सुदिपशी लग्न करायचे आहे. कोण कुठला सुदिप, करतो काय? जातीचापातीचा पत्ता.... " आई एकदम सटकली. बाबांनाही थोडा धक्का बसला होता परंतु कुठेतरी ही शंका आली होतीच. आणि हे असे तांडव करून काय होणार होते. " तुम्ही जरा हा तुमचा त्रागा बंद कराल तर मी बोलतो. कमळ, बाळ नुसते एवढेच सांगून कसे होणार. सविस्तर सांग जरा. मग ठरवू काय करायचे. "

कमळने सुदिपची सगळी माहिती दिली. फारसे चांगले चित्र नव्हतेच. गरिबी असली तरी बाबांची त्याला हरकत नव्हती. पोरगा चांगला असेल तर पैसे कमवता येतील परंतु इथे सगळाच आनंद होता. जेमतेम दहावी शिकलेला सुदिप, कुठल्यातरी सिनेमा कंपनीत लाईटमनचे काम करीत होता. दिसायला रुबाबदार होता अन त्यालाच पोर भुलली होती.

चाळीत एका खोलीत सुदिप त्याचे भलेमोठे कुटुंब राहत होते. आई-बाप, तीन बहिणी चार भाऊ. जातीचाही नव्हता. मोठे घर, गाडीघोड्याची सवय असलेली कमळ अशा ठिकाणी अश्या माणसात कशी राहील ह्या विचाराने बाबांना झोप लागेना. आईचा संताप दर क्षणाला वाढत होता. कमळ संपूर्ण आंधळी झाली होती. काहीही समजवून घेण्याच्या पलीकडे गेली होती. बाबांनी विचार केला, पोर पळून गेली तर मोठा अनर्थ होईल. निष्कारण पोरीला माहेर पारखे होईल. तो सुदिप तिला आयुष्यभर ह्यावरून वाटेल तसे बोलेल, त्यापेक्षा आपणच लग्न लावून द्यावे म्हणजे वेळप्रसंगी पोरीला मदत तरी करता येईल.

बाबांनी व्यवस्थित सालंकृत कन्यादान केले. सासरच्या लोकांचे मानपान, रीतभात, जावयाचे कोडकौतुक, सुंदर जेवण सगळे सगळे उत्तम केले. कमळ आनंदाने सासरी आली. पाचपरतवणे झाले. कमळला अनेक गोष्टी नव्या होत्या, ती मनापासून रुळण्याचा प्रयत्न करीत होती. स्वत:ची मोठी बेडरूम असणाऱ्या कमळला सुदिप बरोबरची संसाराची सुरवात तीन फुटी माळ्यावर करायची वेळ आली पण तिला धुंदीत फारसे काही जाणवले नाही.


आठवड्याच्या आत कमरेवर हंडा घेऊन पाण्यासाठी दुसऱ्याच्या दारात जावे लागले. लाकडाचे जीने सकाळी पाणी सांडून घसरडे होत. सवयीने सगळे सरावत. पहिल्याच दिवशी कमळचा पाय घसरला ती सात-आठ पायऱ्या खाली घसरली. सुदिप नेमका जीने चढत होता त्याने तिला सावरले आणि पुढच्याच क्षणाला त्याने कमळच्या फाडकन मुस्कटात मारली. शिवीगाळ करून तिला ओढत घरात घेऊन गेला. कमळला समजेना की हा मला का मारतोय. मला लागले का ते विचारायचे सोडून... दोन दिवस तो धुसपुसतच होता. घरातल्या कोणीही त्याला काहीही म्हटले नाही. तिसऱ्या दिवशी म्हणाला पाणी भरताना अंगावर सांडते कसे? मग कपडे चिकटले की लोक आहेतच, का तू मुद्दामच.... कमळला धक्का बसला. हा इतके घाणेरडे का बोलतोय, लग्ना आधी भरभरून प्रेम करणारा हाच का सुदिप आहे.

आठ दिवस गेले, सुदिप थोडा बरा होता. एक दिवस संध्याकाळी फिरायला जाऊया का? असे कमळने विचारले तर हसून चल म्हणाला. कमळ खूश झाली. रस्त्यात बरेच लोक वळून वळून तिच्याकडे पाहत होते. तिला ह्याची सवय होती. कमळ स्वत:च्याच नादात आनंदात होती. तेवढ्यात समोरून दोन मुले आली आणि काहीतरी पांचट बडबडून खिदळत गेली. सुदिपचे टाळके सटकले, त्याने कमळला रस्त्यातच वाटेल तसे मारायला सुरवात केली. तो इतका अनावर झाला होता की कमळ रस्त्यावर पडली होती आणि सुदिप तिला लाथा घालत होता. शेवटी काही बघे मध्ये पडले त्याला ओढून बाजूला केले. कमळला पाणी पाजले, कसेबसे ती उठली.

तिला तशीच फरफटत सुदिप घरी घेऊन आला. घरी आल्यावर कमळने त्याला विचारले, " काय चुकले माझे? " त्यावर पाठीत अजून एक गुद्दा घालून सुदिप म्हणाला, " तूच त्या मुलांना खुणा करून बोलावलेस, मी पाहिले. थांब तुझा हा सुंदर थोबडाच डागून ठेवतो. " कमळ थरथर कापायला लागली. कसे तरी तिने त्याला समजावले. तोझोपला. कमळला आता फार भिती वाटू लागली. हा माणूस नाही राक्षस आहे, आता मी सगळे आयुष्य कसे ह्याचे वेडेचाळे सोसायचे. आपण झोपलो तर जाणो कधी पुन्हा मारहाण चालू होईल ह्या धास्तीने ती रात्रभर बसूनच राहिली.

कुठल्याही कारणावरून सुदिपचे डोके फिरे की मारहाण चालू. कमळच्या सासूला वाईट वाटे पण ती कधीच मुलाला काही बोलत नसे. बहीण-भाऊ तर त्याच्या आसपासही फिरकत नसत. तशातच कमळला दिवस राहिले. सुदिप नेमका बाहेरगावी गेला होता. तो आला की त्याला ही आनंदाची बातमी सांगू मग तो किती खूश होईल ह्या कल्पनेत कमळ रमली होती. सुदिप आला अन जिने चढताना नेमके शेजारच्या घरातल्या काकांनी, " अरे वा सुदिप तू आता बाप होणार. " असे हाक मारून सांगितले. हे एकले आणि उरलेले जिने पळतच चढत सुदिप घरात पोचला. नेमकी समोरच कमळ ओट्यापाशी होती. पोळ्या करायला घ्यायच्या म्हणून लाटणे हातात होते. तिला काही कळायच्या आत सुदिपने तिच्या हातून लाटणे ओढून घेतले आणि अंदाधुंद मारायला सुरवात केली. कमळने खूप प्रयत्न केला त्याला थांबवण्याचा पण तिचे बळ तोकडे पडले. ह्यावेळी मात्र सुदिपची आई मध्ये पडली आणि लाटणे ओढून घेतले. तसाच तणतणत तो माळ्यावर जाऊन बसला.

सासूने पोरीला उठवले, म्हणाली, " जा बाई, वर जा. नशिबाचे भोग आहेत. त्याला काय हवे नको ते बघ. नाहीतर पुन्हा त्यावरून.... " कशीबशी कमळ उठली, वर गेली. तिला पाहून सुदिप म्हणाला, " कोणाचे पोर आहे हे? माझ्यामागे कुठे उंडारतेस, आणि तो शेजारचा म्हातारा मला सांगतो, मी बाप होणार. तुझी जीभ काय झडलीये का? " तेव्हा कुठे कमळ ला थोडासा अंदाज आला की काय झाले असावे. ती म्हणाली, " अरे तू नव्हतास तेव्हा कळले मला. मग कसे सांगणार, कधी तू येतोस आणि कधी ही गोड बातमी सांगते असे झाले होते मला. घरातले कुणीतरी शेजारच्या काकूंना बोलले असेल मग काकांना कळले असेल, म्हणून मग तू दिसताच त्यांनी... आता ह्यात माझा काय दोष? आणि काहीही काय संशय घेतोस रे? " तोवर सुदिपचे डोके थोडेसे ताळ्यावर आले होते. चूक लक्षात आली तरी अहंकार होताच त्यामुळे त्याने, " बरं बरं, कळली अक्कल. कामाला लाग, चहा आणून दे. " असे म्हणत कमळला झापले.

पाहता पाहता कमळचे दिवस भरत आले. मधून मधून मारहाण चालू होतीच. पण सुदिपलाही थोडी बाळाची हौस होती त्यामुळे माराचे स्वरूप बदलले होते. चिमटे, चावणे, ओरबाडणे. कमळच्या आईबाबांना काही गोष्टी कळल्या होत्या पोरीचा सतत धास्तावलेला चेहरा पाहून राग, दुःख होत होते. त्यांनी एकदोनदा सुदिपला समजवायचा प्रयत्न केला त्याचा परिणाम कमळला अजूनच मारहाण असा झाल्यामुळे तेही घाबरले. पहिले बाळंतपण माहेरीच असते असे म्हणून सुदिपच्या विनवण्या करून बाबा कमळला घरी घेऊन आले. आठ दिवसातच कमळ थोडी निवळली. मन शांत राहू लागले. तशातच ती बाळंतीण झाली अन मुलगा झाला. नऊ महीने इतके मानसिक शारीरिक हाल सोसूनही बाळ सुखरूप होते. भरपूर कौतुक, थाटात बारसे होऊन बाळ कमळ परतले.

महिनाभर कमळ नसल्याने सुदिपला तिची आठवण येतच होती. त्यात बाळामुळेही तो थोडा बरा होता. कामावरही त्याला पगारवाढ मिळाली होती. एकंदरीत गाडी खुशीत होती. एक दिवस संध्याकाळी सुदिप आपल्या एका मित्राला बरोबर घेऊन आला. कमळने स्वागत केले, चहा दिला. मित्र बाळाला पाहून थोडावेळ बसून गेला. खाली उतरताना, " सुदिप साल्या कसली चिकणी आहे रे बायको तुझी. नशीबवान आहेस. " असे बडबडून गेला. हे एकले आणि सुदिपचे डोके फिरले. ह्यावेळी मात्र त्याने लागलीच काही केले नाही. कमळला तर काही कल्पनाच नव्हती. ती बाळ जेवणखाण ह्याच्यात गुंतली होती. रात्र झाली. घरातही सामसूम झाली. कमळ माळ्यावर गेली. बाळ शांत झोपले होते. त्याचे पापे घेऊन तिने पाठ टेकली.

थोडी झापड येऊ लागली तोच सुदिपने तिच्या पोटात गुद्दा मारला. इतके अचानक हे घडले की कमळच्या तोंडून एक जोरदार किंचाळी उमटली. तसे तिचे तोंड दाबून सुदिप तिला मारायला लागला. एकीकडे तोंडाने बडबडत होता, " माझ्या मित्रांबरोबरही तुझे धंदे चालू आहेत हां. थांब आज तुला जिवंत सोडतच नाही. " घरचे सगळे जागे झाले होते, पण सुदिपच्या रागाला घाबरून कोणीही वर गेले नाही. रागाच्या भरात सुदिपने कधीकाळी माळ्यावर ठेवलेला सुरा शोधून काढला कमळच्या पोटात खुपसला. एकदा, दोनदा.... तीनदा. तोवर आई एक भाऊ वर चढले होते. त्यांनी पाहिले तर कमळ बिलकुल हालचाल करीत नव्हती. सारे संपले होते.

पोलीस आले सुदिपला घेऊन गेले. कमळ सगळ्याच्या पलीकडे पोचली होती. दीडदोन महिन्याचे तान्हे बाळ, ना आई ना बाप अशा अवस्थेत दुपट्यावर पडलेले होते. सगळेजण हळहळत म्हणत होते, देवाने चांगली सोन्यासारखी बायको दिली होती पण ज्याची लायकीच नाही त्याला हे देणं कसे पेलायचे? कसला हा आंधळा राग, हकनाक पोरीचा जीव गेला हो...

2 comments:

  1. Mazya pahnyat hi ashi ek changli mulgi fukat geliye.

    Tumche vyaktichitran faarach chaan aahe.

    Rohan.

    ReplyDelete
  2. धन्यवाद रोहन.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !