जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, August 25, 2011

काजवे...

" जानू, अगं लक्ष कुठेय तुझे? काय सांगतोय मी... ऐकते आहेस का? "

" ह्म्म... "

" अगं ह्म्म काय... सांग बरं माझं शेवटचं वाक्य... "

" संध्याकाळी तयार राहा... गोसावींच्या नव्या फार्महाऊसची पार्टी आहे... हेच सांगत होतास नं? "

" जानू तू आणि तुझे मल्टिटास्किंग पुरे झाले. कानावर पडलेले रट्टा मारल्यासारखे माझ्या तोंडावर मारू नकोस... काय सारखी त्या खिडकीतून बाहेर पाहत असतेस गं? बरं ते सोड, आपल्याला... ऐकलेस नं... मला एकट्याला नाही तर दोघांनाही जायचेच आहे. तुझ्या सबबी चालणार नाहीत आज. मी शार्प सातला येईन. साडेसातला निघू आपण. तयार राहा. आणि ते तुझे जीन्स-खादी प्रकार नकोत. छानशी रेशमी साडी नेस. ती मोरपंखी नाहीतर कलकत्त्याहून आणलेली जांभळी... जानू, काय दिसतेस गं तू त्यात.... नुसते जळतील सगळे. अरे बापरे! आठ वाजत आले... चल मी पळतो. तयार राहा गं! "

खिडकीतून एकटक बाहेर पाहत जानू ऐकत होती. अजय घरात असला की एखाद्या धबधब्यासारखा अविरत कोसळत राहतो आपल्यावर. बरेच आहे म्हणा.... दिवसभर नुसत्या उसासत राहतात या भिंती.... आपल्यासारख्या. शांतता छेदायला उसना आवाजही सापडत नाही. फक्त सुरू असते ते घड्याळाचे एका लयीत श्वास घेणे... टिकटिक टिकटिक... तासागणिक लंबकावर पडणाऱ्या टोल्यांचे झंकारणे... काळाची लढाई अव्याहत सुरूच आहे. तो लढतोय म्हणून मला, अजयला, सगळ्यांनाच लढावे लागते. वेळेचे महत्त्व, गेलेला क्षण, प्रवाही काळ.... वर्तमान... या आत्ताच्या क्षणाचा भूतकाळ कसा असावा हे आपल्या हाती.... येणाऱ्याचे भविष्यही आपल्याच हाती..... टिकटिक टिकटिक.... आपल्यासाठी क्षण का क्षणांसाठी आपण.... भूत व वर्तमान नक्कीच आहेत पण भविष्य ही असेल हे चक्क गृहीत धरून चाललोय आपण. याची टिकटिक सगळी बॅटरीच्या जोरावर.... सेल संपला की नुसता शोपीस.... आपली धडधड कशाच्या जीवावर..... कोणासाठी.... कोण जाणे उद्या आपण फ्रेममध्ये.... आपलाही शोपीस.... त्यावर एक हार.... मागे उरेल तो फक्त भूतकाळ.... का आठवणींची भुतं... अजय घड्याळाचा सेल बदलेल... शेजारीच आपला मोरपंखी फोटो सुंदरश्या फ्रेममध्ये लावेल.... आणि मग सारखी या मेल्याची डोके उठवणारी टिकटिक.... दर तासागणिक ठाण ठाण.....

जान्हवी तिरमिरीत उठली. धुण्याची काठी घेऊन ताडताड पावले टाकत घड्याळासमोर येऊन उभी राहिली. कशाला सारखी टिकटिक... करत राहतोस? जरा म्हणून क्षणभर उसंत नाही कशी ती.... थांब तुला कायमचे गप्प करून टाकते. त्वेषाने तिने काठी उगारली तोच खाडकन दार उघडून हाती टोला घेऊन पाहरेदार बाहेर आला आणि त्याने पहिला घाव घातला... ठाण.. दुसरा... ठाण... एका मागोमाग एक घाव घालतच सुटला... तिच्या त्वेषाची लागण त्यालाही झालेली. आठवा घणाघाती घाव घालून आला तसाच तो खाडकन लुप्तही झाला. तिच्या हातातली काठी गळून पडलेली. त्या विरणाऱ्या आवाजासोबत तिचा आवेशही विरत गेला. स्वत:ला गोळा करत, सावरत ती किचनच्या खिडकीशी आली.

अजयने मुद्दामहून शहराच्या बाहेर दरीच्या टोकावर बंगली बांधली होती. तसे शहर फार लांब नव्हते... फार तर दहा मैल. कोणाला सांगून खरे वाटणार नाही इतके या दहा मैलात सृष्टी पटल बदलत असे. जणू एखाद्या कसलेल्या चित्रकाराने पांढऱ्या शुभ्र कॅनव्हासवर दिवसभर निरनिराळ्या छटांचे मनोहरी चित्र रेखाटत राहावे! खिडकीतून दिसणाऱ्या परमेश्वराने चारी हातांनी मन लावून रंगवलेल्या निसर्गाचे प्रसन्न, उत्फुल्ल, पहाटेच्या पहिल्या प्रहराच्या हलक्या रेघा, झुंजूमुंजू, पक्ष्यांची अखंड किलबिल, नभ कधी खेळकर, कधी अवखळ.. उनाड, तर कधी भरून आलेले. गदगदलेले, कधी उदासवाणा पिवळसर संधिप्रकाश... कधी हिमटी काढलेले ओठ अन गालावर ओघळलेला एक अश्रू.... कधी अविरत कोसळणारा तुफानी पाऊस, तर कधी हसरा, नाचरा पाऊस, उन्हात चमचमणारा पाऊस, धरतीला कुरवाळणारा पाऊस, कौलावर ताडताड वाजत शांततेला भेदणारा आक्रमक पाऊस.... कधी चराचराला डोलवणारा आल्हाददायक वारा तर कधी झोडपवणारा बेभान वारा.... तिन्हीसांजेला दूर मावळणारा सूर्य आणि जवळच भासणारा चंद्र, रात्र जशीजशी चढत जाईल तसतसा पडत जाणारा चांदण्यांचा सडा.... अमावस्येच्या रात्रीचा गूढ अंधार.... खिडकीबाहेर निरनिराळी निसर्गाची रुपे अन आत जानू.... दोघांनाही समीप आणणारी जानूची आवडती चौकट... खिडकी !

शहराच्या कोलाहलापासून दूर ही बंगली तिला आवडत असे आणि नसेही. फार एकाकी वाटे. जणू ग्लोरिफाईड तुरुंगच ! तिथे तरी सोबतीला कैदी असतात. असेत का खुनी-दरोडेखोर पण जिवंत असतात. तसा तिचा गोतावळा खूप होता. पण ते सगळे शहरात. तिच्याकडे यायचे म्हणजे त्यांना खूप लांब वाटे. अजय म्हणे, दिवसभर त्यांच्यातच असतो गं मी... संध्याकाळी तरी शांतता हवीच ! त्याचे बरोबरच आहे.

जानू आता अजयला, घड्याळाला विसरली होती. खिडकीतून दिसणाऱ्या चिरपरिचित कॅनव्हासवर कोणाचीतरी चाहूल दिसत होती. तिने निरखून पाहिले... कोणीतरी बाई दिसत होती. एकटीच... तीही इतक्या लांब. बापरे! जीव तर द्यायला आली नसेल. जानूचा श्वास कोंडला. छे ! काहीतरीच ! ती पुन्हा पाहू लागली. साधारण सत्तरीची असावी. शेलाटा बांधा, रुपेरी लांब वेणी, छानशी झुळझुळीत साडी..... जीवनावर-स्वत:वर प्रेम करणारी वाटत होती. अजून तीसपस्तीस वर्षांनी आपण अशाच दिसू कदाचित. पण अशा उत्साही असू का? काय हे कुठून कुठे पोचलीस तू जानू... ' भविष्य आहे ' असे गृहीत धरून पुन्हा क्षण गुंफू लागलीस नं.... मान झटकून जानूने विचारांची गर्दी पांगवली. डोळे तिचा पाठलाग करत ती फिरेल तसे फिरत होते. जणू तिच्या जीवाची जबाबदारी जानूचीच झालेली.

तासभर तरी ती होतीच. दोन्ही हात पसरून निसर्गाला गोळा करत होती. काही वेळ दरीच्या टोकाशी जाऊनही उभी होती. तो सगळा वेळ जानूने पापणीही लववली नाही. हलके हलके पावले टाकत, तृणालाही आपले ओझे होणार नाही याची खबरदारी घेत ती आली तशीच कॅनव्हासवरून नाहीशी झाली. बेडरूमच्या खिडकीतून रस्ता दिसत असे... जानू धावली.... कुठे गेली.... या खिडकीतून पाहा त्या खिडकीतून... ती कुठेच दिसेना. जणू आलीच नव्हती. म्हणजे निव्वळ भास होता का.... आता जानू थकली. सोबतीचा एक किरण अचानक समोर आलेला.... उद्याची वाट पाहू लागली.

दुसऱ्या दिवशी कालच्या पार्टीबद्दल बोलून नेहमीसारखाच घर दणदणवून अजय गेला. जानूचे सगळे चित्त तिच्याकडे लागलेले. एकीकडे कामे करत करत ती सारखी खिडकीतून डोकावू लागली. बरोब्बर कालच्याच वेळेला ती आली.... झुळझुळीत साडी, प्रसन्न चेहरा... शालीन सौंदर्य ! तासाभराने दिसेनाशी झाली.... रोजच येत राहिली... एखाद्या अदृश्य बंधासारखी जानू तिच्यात पूर्णतः गुंतली होती. जानू खिडकीत असते हे काही दिवसांनी तिच्याही लक्षात आले होते.... दरीच्या टोकावर जाण्याआधी ती जानूकडे एकटक पाही... हलकेच हात उंचावे आणि चालू लागे. पाहता पाहता महिना उलटला. जानूला रोज वाटे खाली जाऊन तिच्याशी बोलावे.... पण तिची तंद्री मोडायचे जानूच्या जीवावर येई. शिवाय तिनेही कधी आपणहून जानूची ओळख करून घ्यायचा प्रयत्न केला नव्हता.

दोन दिवस सरले..... ती आली नाही. असे कसे झाले? अगदी धुवांधार पावसातही ती छत्री घेऊन आली होती. बरे नसेल का? घरी कोणी असेल का तिच्या? का एकटीच.... एकाकी? का नाही आपण ओळख करून घेतली... आता ती आलीच नाही कधी तर? प्रश्नांची मालिकाच फेर धरून नाचू लागली. पाहता पाहता चार दिवस उलटले. जानू मरगळून गेली. अजयने विचारलेही, " काही बिनसलेय का? डॉक्टरकडे जायचे का? " पाचव्या दिवशी दिवेलागणी होऊन गेलेली... अजय दोन दिवस टूरवर गेलेला. काहीतरी पोटात ढकलावे म्हणून जानू किचनमध्ये आली. चहाचा कप हाती घेऊन खिडकीशी आली... पाहतच राहिली.

ती, तीच होती. नेहमीसारखीच प्रसन्न, आज काळी खडीची साडी नेसलेली. एक तर इतके दिवस गायब होती आणि आता आली तर इतक्या रात्री... हातात काय धरलेय तिने..... काचेची बरणी दिसतेय..... त्यात सोनेरी चमचमता लोळ. काळ्याभोर आकाशावर लक्ष लक्ष चांदण्यांच्या ज्योती उजळलेल्या तश्यांत तिच्या काळ्या चंद्रकळेवरच्या चांदण्या हातातल्या सोनेरी तेजाने लखलखत होत्या. नेहमीसारखीच हलकी अल्लाद पावले टाकत ती दरीच्या टोकाशी जावून पाठमोरी उभी राहिली. खिडकीकडे पाहत हातातल्या बरणीचे झाकण उघडले.... असंख्य सोनेरी तेजःपुंज ठिपके आसमंत उजळू लागले. बरणी रिकामी झाली. आभाळातली नक्षत्रे, तिच्या चंद्रकळेवरच्या चांदण्या अन चहुबाजूने लपेटलेले लखलखते काजवे.... पाहता पाहता त्या सगळ्यांचे वेगळेपण संपले...... चांदण्यांनी ती मढली आणि आसमंत काजव्यांनी.... पुढच्याच क्षणी तिने स्वत:ला झोकून दिले....

जानू जीवाच्या आकांताने धावली. काजवे सैरावैरा उधळले होते. चांदण्याही भयाने दूरवर पांगलेल्या.... जानू दरीच्या टोकावर उभी राहून वेड्यासारखी हाकारत होती... खाली होता केवळ मिट्ट काळोख आणि भयाण शांतता.... या वर्तमानाचा अर्थच तिला लागत नव्हता.... काही क्षणांपूर्वी सर्वांगी तेजाचा लोळ बनून तळपणारी ती भुतकाळ झाली होती.... जानू वळली तोच कशालातरी अडखळली. खाली वाकून पाहिले तर रिकामी बरणी होती. तिथेच बसून जानूने बरणी हातात घेतली. तिचा - तिच्या मनाचा स्पर्श झालेली बरणी.... एकुलता एक काजवा बरणीत चमचमत होता..... जणू तिची वाटच पाहत होता. जानूने हळूच फुंकर घातली तशी पटकन तो बाहेर आला... थेट आसमंताच्या दिशेने झेपावला.

जानूला वाटले, तिचा वर्तमान हळूहळू विझत असावा, रिक्त विरक्त झाली असावी..... आता नव्याने देण्याघेण्यासारखे काही उरले नसावे.... भविष्याचे ओझे तिच्या कुडीला पेलायचे नव्हते.... तिच्या अनेक बऱ्या वाईट अनुभवांचे, नात्यांचे, बंधांचे, रेशमी स्पर्शाचे, समाधानाचे, अत्यानंदाचे, सुखद-दु:खद, बोचरे, एकाकी क्षण तिने पकडून पकडून बरणीत भरलेले. तिच्यालेखी तिच्या आत्म्याची वस्त्रे बदलायची घटिका भरलेली.... तसेच असावे, म्हणूनच या जीवनातले सगळे क्षण इथेच उधळून निर्मोही होऊन ती प्रसन्न निघून गेली..... पुढच्या प्रवासासाठी !

बरणीचे झाकण लावावे म्हणून जानूने ते उचलले... त्यावर लिहिले होते.... " ही तुझ्या क्षणांसाठी.... माझ्याकडून सप्रेम !!! "

25 comments:

  1. सुंदर गं ! रूपक खूप आवडलं.

    अमेरिकेत भाची धावायची रात्री परसात...काजव्यांच्यामागे...मुठीत पकडून आणायची दाखवायला...आणि मग भुर्रकन सोडून द्यायची....त्याची आठवण झाली.
    :)

    ReplyDelete
  2. निव्वळ अप्रतिम लिहल आहेस... वन ऑफ दि बेस्ट फ्रॉम यु....

    ReplyDelete
  3. जबरदस्त !! अप्रतिम... एकदम वेगळाच शेवट.. खुपच सुंदर.. खूप आवडली.

    ReplyDelete
  4. रुपक तुला आवडलेलं पाहून खूप आनंद झाला!

    ब्लूमला असताना शोमूही बरेचदा गोळा करून आणायचा... :)

    ReplyDelete
  5. देवेन, अनेक धन्यवाद! तुझ्या शब्दांनी उत्साह वाढला. :)

    ReplyDelete
  6. आभार्स हेरंब!

    ReplyDelete
  7. अप्रतिम :)
    एकदम वेगळीच ..

    ReplyDelete
  8. खर सांगु मी वाचणार नव्हते कथा समजून..पण सुरु केलं आणि काशी गुंतले कळलंच नाही बघ..अप्रतिम...The Best on Sardesai's blog...

    Aparna

    ReplyDelete
  9. BB, खूप खूप धन्यवाद!

    ReplyDelete
  10. अपर्णा, तू कथा असूनही वाचलीस आणि तुला आवडली... खुपच आनंद झाला गं! धन्यू!

    ReplyDelete
  11. akdam bhannat.....patta kothe aahe...ki ganpati bappamadhe gung?

    ReplyDelete
  12. अप्रतिम....भन्नाट रूपक.....हरवून गेले मी पण काही क्षणांसाठी....

    ReplyDelete
  13. अनेक धन्यवाद प्रसाद. आहे रे इथेच आहे. थोडी गडबड... :)

    ReplyDelete
  14. सुप्रिया, ब्लॉगवर मन:पूर्वक स्वागत! आनंद झाला रुपक आवडल्याचे वाचून. :)

    ReplyDelete
  15. काजवे हा प्रकार वाढत्या शहरीकरणात पुढच्या पिढीला फक्त शब्दांतुनच अनुभवा लागेल अशी परीस्थिती आहे. अर्थात तुला जे व्यक्त करायच आहे ते वेगळच आहे. परत एकदा तु तुझ्या वाटेवर (लिखाणाच्या) परतली आहेस याची खात्री काजवे हा लेख करुन देतो. शब्दां पलीकडचे जाणवुन देण्याचा हा सायास छान जमला आहे हे उमजतं. अशीच लिहीत जा.....

    ReplyDelete
  16. धन्यवाद महेंद्र... :)

    ReplyDelete
  17. देवेन, मनाचे खेळ अजबच असतात... :) अनेक अव्यक्त भाव जरासा धागा मिळाला की उचंबळून येतात. रुपक तुला आवडल्याचे पाहून आनंद झाला. धन्यू रे! उत्साह वाढला..

    ReplyDelete
  18. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  19. ब्लॉगवर स्वागत व अनेक धन्यवाद प्रज्ञा. :)

    ReplyDelete
  20. भानस कथा खरंच सुंदर आहे गं!!!

    ReplyDelete
  21. जबरदस्त रूपक.. आवडली कथा! :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !