तू नेहमीच मनस्वी वागायचीस. स्वत:वर आसुसून प्रेम करायचीस. अगदी लहान होतीस तेव्हांही आणि आता ’ सरलं किती - उरलं किती ’ चा हिशोब स्वत:च वारंवार मांडू लागलीस, तरीही. तुझा अट्टाहासी, झोकून देण्याचा स्वभाव तसाच किंबहुना जास्तीच मनस्वी झालाय. मनात एखादी गोष्ट आली की त्याक्षणापासूनच तू स्वत:ला त्या गोष्टीस समर्पित करून टाकायचीस. योग्य-अयोग्य, गरज, शक्य-अशक्य, यासारख्या माझ्या मध्यमवर्गीय शंकाकुशंका कधीच तुला पडल्या नाहीत. चुकून कधी मी त्या तुझ्या डोक्यात भरवण्यात कणमात्र यशस्वी झालेच तर, तू ते कधीच मला दाखवले नाहीस आणि त्या कणमात्र शंकांना लगेचच कचऱ्याची टोपली दाखवायला चुकलीही नाहीस.
परिणामांची तुला कधीच भीती नव्हती आणि क्षितीही. एखाद्या गोष्टीला किती वाहून घ्यायचं हे परिमाणात तू मोजलं नाहीस की त्या वेड्या ध्यासातून तुला सुखाची-दु:खाची-प्रेमाची-अवहेलनेची-तिरस्काराची-रागाची आणि शब्दात न मांडता येणाऱ्या ’ त्या ’ काही जिव्हारी भावांची प्राप्ती होईल याचीही फिकीर केली नाहीस. मोजके, अगदी बोटावर मोजण्या इतकेच अपवाद वगळता हा मनस्वी अट्टाहास तुला अपयशच देऊन गेला. तरीही तू थांबलीच नाहीस.
नक्की काय शोधत होतीस गं तू? का कोण जाणे, ’ खरंच का काही शोधत होतीस तू? ’ या प्रश्नातून मी कधीच बाहेर आले नाही. आजही हा प्रश्न तसाच अनुत्तरित आहे. अर्थात मी तुला कधीच उत्तर विचारले नाही. जे तुझ्याकडे नाही ते विचारण्यात काय मतलब गं? उगाच तुझ्या डोळ्यात त्या प्रश्नाने क्षणमात्र उठणारी वेदनेची लहर, कुठेशी लागलेली बोच, ठसठसणारी ठेच उघडी पडायची अन मीच त्यात जखमी व्हायची. नेहमीसारखीच. पुन्हा पुन्हा:.... आताशा तुझ्या वेदनांची-ठेचांची दुखरी ठणठण सोसायची ताकद नाही गं माझ्यात. म्हणून बये, वारंवार तुला सावरायचा फोल प्रयत्न मी सोडत नाही. तुला आवडो न आवडो, पटो न पटो... तू माझीच... माझ्यातच सामावलेली आहेस ना बयो.... म्हणून माझा हा दुबळा अट्टाहास सोडत नाही. त्या विक्रमादित्यासारखीच मी ही सदैव प्रयत्न... प्रयत्न आणि प्रयत्न करते आहे. पाहू कोण जिंकते ते. कुठेतरी, कधीतरी तू थकशील.... थांबशील.... शांत बसशील..... मी वाट पाहीन. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत..... मात्र जिंकेन नक्की.
ही आयुष्यभर अशीच सामान्य... नाही नाही, मध्यमवर्गीयच राहणार. अगदी लाडका शब्द आहे तिचा हा. या मध्यमवर्गाचे चांगलेच फावले आहे. काही जमले नाही, काही मिळाले नाही... अहं... मिळवता आले नाही की लगेच याच्यावर खापर फोडून मोकळे व्हायचे. जरा चौकटीच्या बाहेर जायची वेळ आली की लगेच याची ढाल पुढे करायची.
मनात कितीही भराऱ्या मारायची ऊर्मी उसळली तरी, " छे! हे कुठले आपल्या आवाक्यात... " असे म्हणत तेच तेच घिसेपिटे, मागल्या पानावरून पुढच्या पानावर मिळमिळीत आयुष्य उलटत राहायचे. बदल गं जरा स्वत:ला. हे बागुलबुवे तूच उभारलेस, तेही अनाकारण. अगं, इथे स्वत:चे झालेय जड तिथे दुसऱ्याच्या आयुष्याची उठाठेव करायला कोणाला वेळ आहे?
काय म्हणतेस? स्वत:च्या पायाखाली काय जळतेय हे पाहायला वेळ नसेल पण लोकांच्या घरची खडानखडा माहिती आहे.
बरं. समजा असेलही तू म्हणतेस तसे. त्याने तुला काय गं फरक पडतो. मुळात तुझा स्वत:कडे पाहण्याचा चष्मा बदल. लोक काय म्हणतील.... हे शब्दच तुझ्या कोशातून हद्दपार कर. आणि लोकांचे काय घेऊन बसलीस, त्यांना स्वत:च्या टोचणीतून सुटका हवी असते ना. मग करतात हा दुसर्याच्या जीवनात डोकावण्याचा टाईमपास. तू कधीपासून लोकांच्या या छंदाला भीक घालू लागलीस? अगं ते तुला जगायला देत आहेत/नाहीत हा संभ्रम का पडावा? एकेक नवलच ऐकते आहे मी हे. जरा जग गं मनापासून.... मनसोक्त! इच्छा, ओढ, आस फक्त मारण्यासाठीच नसते गं. उद्या तू फटदिशी मरून गेलीस ना, तर लोकं त्यांना म्हणायचे तेच म्हणतील फक्त तुझा जीव मात्र गेलेला असेल. मग ही भावनांची आसुसलेली भुतं धड ना तुला मरू देतील धड ना दुसऱ्या जीवात जगू देतील.
अजूनही वेळ गेलेली नाही. जगायचे, का रोज... अव्याहत कणाकणाने कुढत मरायचे..... निवड तुलाच करायची आहे. निदान ती तरी मोकळी होऊन.... निर्भयपणे कर..... करशील ना?
चला. आजचा एपिसोड संपला रे. आताशा ही प्रतिबिंबांची लढाई वारंवार होऊ लागली आहे. का? भुवया का उंचावल्या तुझ्या? ’ प्रतिबिंब ’ म्हटले म्हणून? मग काय म्हणू? खरं सांग, ’ तुला तरी कळतेय का, खरी कुठली आणि छबी कुठली? ’ भेसळ इतकी बेमालूम आहे की माझा पाराही ओळखू शकत नाही आताशा. म्हणा, मी ही काहीसा जीर्ण, विदीर्ण झालोय. कुठे कुठे पारा उडलाय... विरलाय.... त्या विरलेल्या तुकड्यात दिसणारी तिची तडफड पाहवत नाही. वाटतं, सांगावं तिला.... इतरांसाठी जगच गं बयो पण त्याचबरोबर स्वत:साठीही जग गं..... स्वत:साठीही जग.....
( फोटो जालावरून साभार )
?????.........
ReplyDeleteपोस्ट छान झालीय, नेहमीसारखीच...
अप्रतिम !!! सुंदर पोस्ट... जवळपास प्रत्येक 'माध्यमवर्गीयाच्या' मनातलं द्वंद्व अगदी अचूकपणे पकडलं आहेस आणि छान शबदात मांडलं आहेस. आवडलं !
ReplyDelete>>आताशा ही प्रतिबिंबांची लढाई वारंवार होऊ लागली आहे
ReplyDelete......अगदी अगदी
सुंदर पोस्ट....अप्रतिम !!
ReplyDeleteअप्रतिम !!
ReplyDeleteसुंदर पोस्ट !!
अगं, इतकी प्रश्नचिन्हं... :)
ReplyDeleteधन्यवाद अनघा.
अनेक धन्यवाद हेरंब. :)
ReplyDeleteअपर्णा, गंमत म्हणजे विरोधाभास वाढतच चाललाय दरवेळी. :D:D... आभार्स!
ReplyDeleteधन्यवाद योमू.
ReplyDeleteसुहास, अनेक आभार्स !!
ReplyDeleteतायडे का आलेत हे सगळे विचार हे समजतेय गं ....
ReplyDeleteअगं कितीही द्वंद्व मांडलस ना तरिही ’ती’ ईतरांसाठी जगणारी बयो तुझ्या नकळत पुन्हा डोके वर काढेल त्याआधि तिला ठाम सांग की मी स्वत:साठी पण जगणार आहे....
आणि खरच स्वत:साठी जगणं अत्यंत गरजेचं आहे गं... निदान कधितरी स्वत:ला आधि मोजायला शिकायलाच हवे ना!!!
भावना शब्दात फार सुंदर ओवता येतात तूला ... मानलं बयो!!!
एव्हढच म्हणेन..अगदी अगदी मनातले लिहीलेस...
ReplyDeleteतन्वे, धन्यू गं. ” धरले तर चावते सोडले तर पळते ’ची गत आयुष्यभर झेलायची म्हणजे हाल गं. त्यातून अनेक धोंडे स्वत:च स्वत:च्या पायावर पाडून घ्यायची वाईट्ट खोड. :( :(
ReplyDeleteआभार्स गं उमा.
ReplyDeleteशब्द नाहीयेत ताई माझ्याकडे! .....
ReplyDeleteधन्यवाद विद्या.
ReplyDeletemadhyam vayin, madhyam vargiya, madhayam maarg kadhalele aayUShya jagayache, hec nashibat asate madhyam vargIyaaMcyaa. agadI kharM lihile ahes.
ReplyDeleteधन्यू रे. भिडस्तपणाने कुचंबणा कायमची तरीही स्वभाव बदलतच नाही. बरेचसे मध्यम...प्रकार त्यातच गुदमरून जात राहतात. :(
ReplyDeleteअप्रतिम...
ReplyDeleteधन्यवाद आनंदा.
ReplyDeleteखुपच सुंदर पोस्ट.... आवडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही ...
ReplyDelete