लहानपणी माझ्या भावाला भूक लागली की तो म्हणायचा, " आई, मला ना ओशाळल्या सारखे वाटतेय. " आई विचारायची, " कोणाशी भांडलास का? कोणाला मारलेस का? " तर नाही. मग कशाला ओशाळल्यासारखे वाटतेय? म्हणजे नेमके तुला काय होतेय? असे विचारले की कपाळावर हात चोळून म्हणायचा, " अगं, इथे ओशाळल्यासारखे होतेय. " खेळण्याच्या नादात तो खायचा नाही. मग खूप वेळ न खाल्ल्याने पित्त चढून त्याचे डोके दुखायचे. भूक लागलीये हे न समजल्याने आणि केव्हातरी " ओशाळल्या सारखे वाटणे " हे कानावर पडलेले त्याच्या मनात पक्के बसलेले होते. तो सारखी तीच रट लावून धरायचा. मग आई त्याला पकडून जेवू घालायची की गडी पुन्हा टणाटण उड्या मारायला तयार.
माझेही असेच काहीतरी कारण असणार हे तिच्या लक्षात येऊ लागलेले पण काही केल्या चटकन ते कोणालाच उमगेना. झाले! ते निमित्त होऊन मी पुन्हा जोरदार ताप काढला. एकदम पारा चारच्या पुढेच चढला. रात्री ग्लानीत म्हणे मी खूप वेळ बडबडत होते. त्या बडबडीतून आईला त्या मिसिंग चा पत्ता लागला. इंजक्शन, थंड पाण्याच्या पट्ट्या, गोळ्या असा चोहोबाजूनी मारा केल्यावर दोन दिवसात ताप १०० वर आला. नुसत्या साखरपाणी, ग्लुकॉन डी, इलेक्ट्रॉल पिऊन कंटाळलेल्या जिभेला काहीतरी छानसे हवे ची जाणीव होऊ लागलेली. पोटात उंदरांनी कबड्डीचा हैदोस घातलेला. आईने तांदुळाची हिंगजिरे घालून साजुक तुपावर परतलेली पेज आणि मोठ्ठा पेढेघाटी डबा समोर ठेवला. पेजेच्या वासानेच भुकेले मन तृप्त होत गेले होते.
चार चमचे पेज पोटात गेल्यावर माझे डब्याकडे लक्ष गेले आणि मी जोरात, " आईईईईईई..... अगं..... "
" अगं हो हो... मला कळलेय आधीच तुला काय म्हणायचेय ते. आता खूश ना? त्यासाठी इतका ताप काढायची काही गरज नव्हती तुला. आजीला नुसते एक पत्र टाकले असते की काम झाले असते ना. आत्ता कसा हा डबा आला तसाच ताप न येताही आला असता. पण तू म्हणजे अशी आहेस ना..... असा कसा गं तुला हुकमी ताप काढता येतो? मला तरी सांग... " असे म्हणत आई हसत होती.
मी डबा जवळ ओढला. झाकण न उघडताच वास घेतला. अहाहाSSS ! तोच चिरपरिचित साजुक तुपावर भाजलेल्या तांदुळाचा, वेलदोडे मिश्रित साखरेचा वास. न राहवून लगेच डबा उघडला. पांढरे शुभ्र, गुलगुलीत, जिभेवर ठेवताक्षणी विरघळणारे तांदुळाचे लाडू मी त्यांना कधी गट्टम करते याची वाट पाहत दाटीवाटीने बसलेले. हे लाडू खावेत तर ते फक्त माझ्या आजीच्या हातचेच! अप्रतिम! एकदम मास्टरी होती तिची. मला ताप आलाय असा निरोप रावळगावी तिला गेला की लगोलग करून तिसर्या दिवशी कोणाला तरी पकडून ती मुंबईला माझ्या हातात पडण्याची चोख व्यवस्था करीत असे.
अचानक माझ्या टॉन्सिल्सनी काढता पाय घेतल्याने या दर पंधरा दिवसाआड येणार्या लुसलुशीत ठेव्याचा रतीब थांबला होता. हेच ते दु:ख मला छळत होते पण उलगडाच होत नव्हता. खरोखरच जसा हुकमी ताप आला तसा लाडवांचा डबा हातात पडल्याबरोबर तापाने लगेच काढता पाय घेतला. त्यानंतर न चुकता महिन्याभरात कोणाबरोबर तरी आजी हे लाडू धाडूनच देई. " उगाच पोरीने पुन्हा तेवढ्यासाठी ताप नको हो काढायला ", हे आणि वर.

तांदुळाचे लाडू खासच लागतात. त्याचा घास लागत नाही. वरवर येत नाहीत. दिवसाकाठी चार सहा जरी मटकावले तरी कुठलाच त्रास होत नाही. फक्त ते मन लावून करायला हवेत. माझ्या आजीसारखे.
वाढणी : आता ती तुम्हीच ठरवा बुवा....
साहित्य : चार वाट्या तांदूळ. तसे कुठलेही घेतले तरी चालतात पण आंबेमोहोर किंवा दुभराज घेतला तर सोनेपे सुहागा!
दीड ते पावणेदोन वाट्या साजुक तूप. आजी दोन वाट्या घेत असे. नुसती रेलचेल. पण माझा हात तितका सैल सुटत नाही म्हणून मी दीड वाटी आणि वर दोन चमचे घेतले.
तीन वाट्या घरी दळून घेतलेली साखर
दोन चमचे वेलदोड्याचे दाणे साखरेबरोबरच दळावेत.
कृती : मध्यम मंद आचेवर तांदूळ किंचितसा रंग बदलेतो भाजावेत. नीट भाजले गेल्याची खात्री करून लगेच ते गरम असतानाच त्यावर पाणी ओतून धुऊन घ्यावे. पाणी काढून टाकून कपड्यावर पसरून फार कडक ऊन पडणार नाही अशा बेताने ठेवून वाळवावेत. खडखडीत वाळल्यावर घरीच दळून त्याचे पीठ करून घ्यावे. परातीत/ ताटात ( फेसायला सोपे जाईल असे पसरट काहीही घ्यावे ) प्रथम तूप फेसून घ्यावे. नंतर त्यात दळलेली पिठीसाखर+ वेलदोडा घालून पुन्हा एकजीव होईतो फेसावे. मग तांदुळाचे पीठ घालून एकजीव करावे. खूप चांगले मळावे, जेणेकरून गुठळ्या अजिबात राहणार नाहीत व मिश्रण अतिशय हलके होईल. नंतर मध्यम आकाराचे लाडू वळावेत.
घरात कोणीही नसताना गुपचूप हे लाडू करावेत. स्वत: एक गट्टम करून झाल्यावर माणशी एक असे वाटीत काढून ठेवून बाकीचे लाडू दोन डब्यात विभागून ठेवावे. अन्यथा त्याचे त्या दिवशी परातीतच संपून जाण्याचा खतरा संभवतो. ( मी माझ्यापासूनच कसे लपवायचे बरे??? )

टीपा : तांदूळ भाजताना आच अजिबात वाढवू नये. घाईघाईने उरकून टाकणे प्रकारात हा लाडू बसत नाही. तांदुळाच्या पांढर्या रंगाचा काटा मोडला तर जायला हवाच. पण फक्त हलका बदामी रंग येईस्तोवरच. नाहीतर दृश्यस्वरुप खतरेमें! कुठलाही पदार्थ हा नुसताच जिभेने खायचा नसतो. आधी घरभर सुटणार्या वासाने जठराग्नी खवळून जायला हवा. मग परातीत सुबक बांधलेल्या लाडवांची तब्येतीत मारलेली बैठक डोळ्यांना सुखावून जायला हवी. मग हळूच तुकडा मोडून अल्लाद जिभेवर सोडायचा.... वा! आजी हो तो ऐसी!!!
गूळ घालूनही हा लाडू करता येतो. तूप व गूळ एकत्र करून गुळाचा पाक करून घ्यायचा बाकी सगळे वरीलप्रमाणेच करायचे. गुळाचा लाडू खमंग लागतो. त्याचा बाज वेगळाच आहे.
आवडत असल्यास साखरेचा लाडू करताना खसखस, काजू व सुके खोबरे भाजून घेऊन घालावे. ( प्रत्येकी अर्धी वाटी ) गुळाचा केल्यास तीळ, सुके खोबरे ( अर्धी वाटी ) घालावे. मात्र हे जिन्नस घातल्यास लाडूचा लुसलुशीतपणा काहीसा कमी होतो. म्हणून शक्यतो टाळावे.
तायडे, रेसिपीइतकीच तुझी टीपही आवडली बरं का!
ReplyDeleteनिषेध!
ReplyDeleteमला जोरदार ताप चढतोय असं वाटतंय :)
अगं कसलं वर्णन केलेयेस त्या लाड्वांच्या सौंदर्याचे.... नुसत्या वासाने नव्हे तर त्या सुवासाचे वर्णन वाचून जठराग्नी खवळतोय...
ReplyDeleteमाहेरी जायचे म्हटले की त्या बर्फाबिर्फाचं दु:ख असं विसरलयं एकजणं :) ...
खुसखुशीत झालीये पोस्ट ... लाडवांची वाढणी मी ठरवलेली आहे... तूला भेटले की सांगेन :)
मला ते ’ओशाळणे’ फार आवडले :)
Tai.. jam awaghad watayta karayala pan chhan hi hot asatil asa wataty..
ReplyDeleteaai la sangen banawayala.. :P
:-) Rather tempting!
ReplyDeleteअरे वाह..मस्त.
ReplyDeleteहा प्रकार कधी ऐकला नव्हता, आईला मस्का लावावा लागेल हे करून घ्यायला ;-)
कसला भारी फोटो आहे! :(
ReplyDeleteमला कधी मिळणार????
कांचन, धन्यू गं! :)
ReplyDeleteहा हा... गौराईला डबा पोचवावा लागणार. :D
ReplyDeleteआभार्स!
तन्वे, मनकवडी गं तू. :)
ReplyDeleteआता मिशन माहेर नुसते अंगात भिनलेयं. :D
त्याचे ’ओशाळणे’ भारीच मजेशीर प्रकरण होते.:)
लाडू वाट पाहत आहेत बयो...
अवनी, अगं किती आनंद झाला तुला पाहून. एकदम ’तिकोना’ तुझे आणि अनिकेतचे संभाषण ऐकू आले गं. :)
ReplyDeleteअगं, नाहीये तितके अवघड करायला. जमतील तुला. नाहीतर आई आहेच. :D
धन्यू गं!
धन्स सविता! :)
ReplyDeleteसुहास, लाव लाव. आईला मस्का लावून करून घे.
ReplyDeleteखाताना माझी आठवण काढ रे. तू म्हणशील काय दम देतेय पाहा... ;) :D :D
धन्यवाद!
विद्या, तू येतोस का एप्रिल मधे? डबा भरून देते तुला. बघ विचार कर... सौदा फार महाग नाहीये ;)
ReplyDeleteधन्स रे!
मला पण ओशाळवाणं वाटतंय.. :)
ReplyDeleteआई पण करते गं हे लाडू.. आणि भाजलेली कणिक+ डींक+ बदाम..
कसली आठवण करून दिलीस:)
ताप चढला...
ReplyDeleteखूप पूर्वी आजीच्याच हाताचे हे लाडू खाल्ले होते...परदेशात आलो...आजी गेली आणि नंतर हे सुख संपले...
हा हा... महेंद्र, तुझा ताप उतरवता येईल लगेच. :D:D...
ReplyDeleteआईकडे जातो आहेस का एवढ्यात? निघण्याआधी फोन कर फक्त, स्वागताला लाडू हजर! :)
धन्यू रे!
सिध्दार्थ, ब्लॉगवर स्वागत व अनेक आभार. :)
ReplyDeleteअगदी असेच माझ्या आजीचेही झालेय. मी इथे आले आणि दुसर्याच वर्षी आजी गेली. तिच्या बरोबरच हा ठेवाही हरवला.:(
आता उरल्यात त्या फक्त आठवणी. ज्यातून ती पुन्हा पुन्हा मला सापडते.:)
एकदम historicalलाडू आहेत बुवा...मला जाम आवडणार आहेत...
ReplyDeleteमी तसेही सध्या लाडू खात आहेच त्यात ही एक भर घालावी म्हणते...आईला ही रेसिपी दाखवावीच लागेल असं दिसतंय....
भारी वर्णन केले आहे :)
ReplyDeleteमलाही ताप आलेला आहे ...
लाडवांचा डब्बा पाठवून द्या ..
आता भेटशील तेव्हा खायला मिळतील का मला? :)
ReplyDeleteहे ओशाळणं भारीच आहे! :)
लेख रंगत गेला आहे...पीठ हळूहळू खरपूस भाजावे...तसा!
तर काय... :D:D
ReplyDeleteअपर्णा, तुला नक्कीच आवडतील आणि चालतीलही. शिवाय आई आलेली आहेच. मजा आहे बाबा... :)
आभार्स!
BB, यादीत तुझे नाव शामील केलेय. :)
ReplyDeleteधन्सं!
अनघा, यावेळी तू माझ्याकडे येणार हे ठरलेय ना आपले. :) आलीस की तुला हवे ते खिलवते बयो.
ReplyDeleteआता थेट मायदेशातूनच बोलते गं! :)
धन्यवाद!
अगदी रंगवून लिहिलयस... मजा आली. आता ही रेसिपी नेऊन आईला देतो :)
ReplyDeleteBy the way... 'रावळ' कुठे आहे गं... म्हणजे कुठच्या तालुक्यात
श्रीराज,अरे मालेगाव जवळ आहे. प्रसिध्द ’रावळगाव शुगर फॅक्टर” आहे ना तेच गाव हे. :)
ReplyDeleteआभार्स!
सुपर दिसत आहेत
ReplyDeleteब-याच दिवसांत तुमची नवी पोस्ट नाही. फक्त लिहिण्याचा कंटाळा असेल आणि बाकी सगळ ठीकठाक असेल अशी आशा आहे.
ReplyDeleteसविता, तू आवर्जून विचारपूस केलीस खूप छान वाटले गं. धन्यू. अगं, लिहिण्याचा कंटाळा म्हणून पोस्ट टाकली नाही असे नसून अचानक मायदेशी येण्याचा योग आल्याने गेले चार आठवडे मस्त धमाल सुरू आहे. जालाशी संपर्क तुटलाय. आता परतीची वेळ झालीच आहे. मग पोस्टेन लवकरच आणि सगळ्यांच्या पोस्टही वाचेन.
ReplyDeleteपुन्हा एकवार आभार्स. :)
आनंदा, आभार्स रे. :)
ReplyDelete