जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, January 23, 2011

ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर...

न्यू इंग्लिश स्कूल व शुभंकरोती दोन्ही ठिकाणी नेमेची भरणारी प्रदर्शने भरली होती. बऱ्याच वर्षांनी हा योग आलेला. मी संचारल्यासारखी आईला घेऊन निघाले. मला सगळ्या प्रकारच्या प्रदर्शनांना, सेलला जायला आवडते. आर्ट गॅलरी असो, फोटोंची मनोहरी पकड, तैलरंग, रांगोळी, हस्तकला, यात तर अनेक लक्षवेधक प्रकार, किंवा नेसणे किती होते हा प्रश्न कानामागे टाकून साड्यांचे ढीग उपसणे असो. उत्साहाने सळसळणारे वातावरण कधीनुक आपल्यालाही त्या भरात खरेदी करायला लावते ते बरेचदा कळतही नाही. घेतलेली वस्तू कशी स्वस्त व मस्त मिळाली या आनंदात मशगुल आपण घरी येतो. हातपाय धुऊन केलेली खरेदी कौतुकाने घरातल्यांना दाखवायला जातो आणि कोणीतरी पटकन म्हणते, " अगं, पुन्हा मरूनच कलर घेतलास? आधीच पाचसहा साड्या पडल्यात ना मरून? त्यात पुन्हा हिची भर? " खरे तर साडी घेतानाच हा विचार मनात चमकून गेलेला असतोच पण जीव फिरून फिरून मरून शीच अडकलेला. एखाद्या भुताने पछाडल्यासारखे या मरून ने नं मला पछाडलेय. लिंबू, मोतिया, अबोली, चिंतामणी, गर्द हिरवा किती सुंदर सुंदर रंग खुणावत होते. पण नाही, दहा स्टॉल्स फिरून पुन्हा पावले तिकडेच वळली. मग, बोलणारीला कारणे दिली जातात. अगं, ब्लॉउज तरी किती शिवायचे? याचे पर्फेक्ट मॅचिंग आहेच माझ्याकडे. किंवा, मरूनच असला तरी याचे काठ पाहिलेस का? जर नाहीये ती. रेशीम आहे रेशीम. किती सुंदर दिसतेय ना? ना ऐकणारीचे समाधान होते ना आपले. मात्र आधीच्या पाचसहा मरूमरूत अजून एक दाटीवाटीने विराजमान होते.

दिवाळीच्या आसपास दरवर्षी आकाशकंदील, पणत्या, फटाके, अनेकविध गोष्टी नवे रूप धारण करतात. गेल्या वर्षीच्या हौसेने आणलेल्या सगळ्याच गोष्टी वापरून झालेल्या नसतात. काहींचे तर पॅकिंग ही सोडलेले नसते. कारण त्या आधीच्या वर्षी आणलेल्या वस्तू त्यांचे अस्तित्व दाखवत राहतात. तरीही नवे काही दिसले की लगेच आपल्याला ते उचलण्याचा मोह होतोच. स्वाभाविकच आहे ते. पण कळत नकळत आपण वेळेचा, पैशाचा, जागेचा ( आजकालच्या सुपरबिल्टअपच्या जमान्यात तर कितीही असली तरी टीचभरच वाटू लागलीये ) अपव्यय करत राहतो. दिवाळीच्या आधीच्या साफसफाईतून दरवेळी आपल्या मोहाची फळं जागोजागी दिसतात. मग, " अय्या! कधीपासून मी ही बरणी शोधत होते. इथे लपली होती का? "यासारखे व्यक्ती व्यक्तिनुरूप चित्कार घराघरातून ऐकू येत असतात. बरेच दिवस कुठेतरी मागे दडलेली, हरवली की काय? या सदरात मोडलेली गोष्ट दुसरेच काहीतरी करताना अचानक समोर आली की घबाड मिळाल्याचा आनंद होतो. म्हणजे मुळात ती आणली तेव्हाही घबाडच होती. पण, मग अशी कुठेतरी मागे कशी गेली???

अगदी लहानपणापासूनच संग्रहाची लागण होते. पोस्टाचे स्टँम्प्स, चांद्या, गोळ्यांचे रॅपर्स, बुचे, गोट्या, कवड्या, काड्यापेट्या, जियाजो, पेन्सिली, बाहुल्या, कॅलेंडर्स, कात्रणे, मोरपिसे, गणपती, एक ना दोन... एखाद्या छोट्याश्या पेटीत, चपलेच्या खोक्यात, फोल्डरमध्ये ही अलीबाबाची गुहा तयार होते. जरा वेळ मिळाला किंवा नवीन भर पडताना, या संपत्तीचा आढावा, आस्वाद घेतला जातो. एखाद्या घारीसारखी नजर अचूक आवडत्या गोष्टीचा मागोवा घेत असते. पुन्हा हा अनमोल खजाना कोणी घेऊ नये म्हणून जीवापाड जपणूक सुरू असते. मग हळूहळू जसजश्या इयत्ता वाढत जातात तसतसे संग्रहाच्या कक्षाही विस्तारतात. कुत्री, मांजरी पाळण्याचा प्रकारही होतो. माझी धाकटी भाची जिथे मनीमाऊ दिसेल तिथे तिथे रेंगाळत राहते. दूध, पोळी भरवते. घरीही आणते मधून मधून.

आजोळी गेलो की सुटीतला जिव्हाळ्याचा व न चुकता होणारा कार्यक्रम म्हणजे आजीची शिसवी काळी ट्रंक उघडून, तिच्या आजीपासून जपलेल्या वस्तूंचा खजिना आ वासून भारलेल्या नजरेने पाहत राहणे. आजीच्या आईची अंजिरी डबल पदराची, मोराची पैठणी. तिच्यावरचा खऱ्या सोन्याचा जर, अंगभर बुंदे, खोप्यात खोवायची सुवर्णफुले, हस्तिदंती फणी, चांदीची मेणाची व कुंकवाची डबी. सोनसळी कद. गौरींचे खरे दागिने. बाबांना शिवलेली कुंची, टोपडी. अजूनही न उसवलेली आजोबांना आजीने विणलेली बंडी. बंदे रुपये, सगळ्यांच्या लग्नाच्या पत्रिका, खूप खूप जुने फोटो. श्रीखंडाच्या, सुंठेच्या वड्या. काय काय निघे तितून. शिवाय दरवर्षी भरही पडलेली असे ती वेगळीच.

यातले काही संग्रह कालाच्या मर्यादा ओलांडून कायमचे मनात घर करून राहतात. कित्येक वर्षांनी अचानक बेडच्या आत, ट्रंकेच्या तळाशी, माळ्यावरच्या मोठ्याश्या बोचक्यातून हळूच डोकावतात. मग पसारा तसाच टाकून त्यातच फतकल मारून आपण बसतो. हळुवार हाताने, अनेक आठवणींच्या गर्दीत तो खजिना डोळेभरून पाहतो. प्रत्येकीची अनोखी सुरस कथा असते. तित आपले बालपण, शैशव, तर कधी पहिल्या वहिल्या एकतर्फी प्रेमाच्या खुणा दडलेल्या असतात. आजचे आपण दंग होऊन कालच्या आपल्याला पाहण्यात रममाण होऊन जातो. तास दोन तास या तल्लीनतेत पसार होतात. मन तरल तरंगत असते. अचानक वास्तवाचे भान येते. नकळत थरथरत्या हाताने आपण तो खजिना नीट ठेवतो. पुन्हा काही वर्षांनी ' त्या ' आपल्याला पाहण्यासाठी...

अरेच्य्या! पण मुळात आपण पसारा आवरायला काढला होता ना? काय ठरवले होतेस तू? जी गोष्ट वर्षाचे तीनही ऋतू उलटून गेले तरी लागली नाही याचा अर्थ यापुढेही ती लागणार नाही. अपवादात्मक काही गोष्टी वगळता सर्वसाधारणपणे सर्रास हा निष्कर्ष सत्य असतो. पण... इथेच सगळे घोडे अडते. काहीत जीव गुंतलेला तर बऱ्याच गोष्टींना अपवादात्मक लेबल लावले जाते. त्यातून आजी-आजोबा आसपास असले की उघडलेले बोचके तसेच पुन्हा बांधून माळ्यावर रवाना होते. वर पसाभर बेजबाबदार व उधळेगीरीची लेबले आपल्यावर लावली जातात. थोडक्यात कमीअधिक प्रमाणात आपण सगळेच काही ना काही तरी संग्रह करत राहतो. घराघरातून ठासून भरलेले माळे, कात्रणांच्या चळती, मासिकांच्या थप्प्या, कॅसेट्स, जोडे, पंखे, रेडिओ, लोकरीचे गुंडे, रंग, दोरे, खवले, अश्या कित्येक, " मला पाहायचेय, दुरूस्ती करणार आहे मी, वेळ मिळाला की सगळ्या ऐकेन ना... अश्या निरनिराळ्या कारणांनी जमा केल्या जातात. फक्त जमाच होतात. वेळच नाही ही कायमची पळवाट.( खरीच आहे ती काही काळापुरती... ) नंतर जेव्हां वेळ असतो तेव्हां इतका उत्साह उरलेला नसतो. पण म्हणून इतक्या वर्षांची स्वप्ने टाकवत नाहीत आणि पुरीही होत नाहीत. उरते ती रद्दी, भंगार,धूळ, जळमटं.... परिणाम, अपुरी जागा, सर्वत्र जमवलेल्या वस्तूंचे आक्रमण, त्यापायी वाढणारा कचरा, धूळ... अस्थमा.

छंदासाठी संग्रह व पछाडले जाऊन गोष्टी जमवणे यातली सीमारेषा अतिशय धूसर आहे. छंदात भारलेपण असावेच लागते. भारलेपण पछाडलेपणाकडे झुकले की ताळतंत्र सुटतो. बऱ्याच जणांना जुन्याबाजारात जाऊन अँटिक लेबल लावून निरनिराळ्या वस्तू जमा करण्याचा षौक असतो. त्या घेतांना होणारी किमतीची घासाघीस, वस्तूंची काळातीत महती, भूरळ पाडते. पण छंद हा विरंगुळेच्या पलीकडे गेला की अपरिहार्यतेचे रूप धारण करतो. अपरिहार्यता विकृतीचे. ( Obsessive Compulsive Disorder ) आपण सगळेच काही वेळा वस्तू घरात असूनही तीच पुन्हा घेतो. आधीची जुनी झाली म्हणून, नवीन सुधारीत आवृत्ती आली म्हणून, घाट, रंग वेगळा आहे म्हणून, आधीची सापडत नाही म्हणून, कारणे बरीच पुढे केली जातात पण खरे तर तिची बरेचदा गरज नसतेच. काही वेळा, पुढे कधीतरी लागेल आणि त्यावेळी जी किंमत असेल ती देऊन घ्यावी लागेल, हे एक अतिशय सोयिस्कर व पटणारे ( स्वतःला ) कारण देऊन अनावश्यक वस्तू विकत घेतली जाते. बरेचदा तो दिवस उगवतच नाही. आणि उगवलाच तरी त्यावेळी नेमकी ही वस्तू हाताशी सापडतच नाही. त्यामुळे मिळेल त्या किमतीला विकत घ्यावीच लागते. एकदा ठेच लागली की लगेच शहाणपण, हा प्रकार अशक्यच असल्यामुळे या अश्या त्यात्या वेळी अनावश्यक व नंतर आवश्यक वस्तूंचा भरणा नित्यनेमाने चालू राहतो. सेलमधे स्वस्तात मिळून गेली हेही एक हमखास दिले जाणारे कारण आहेच.

आपल्याकडे सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा जागेची टंचाई व महागाई या दोन्हींच्या कृपेने पछाडलेपणालाही मर्यादा पडतातच. सर्वसाधारण घरांत पाचसहा गोण्यांपलीकडे भंगार जमूच शकत नाही. क्वचित काही घरांत प्रचंड जुने सामान, रद्दी सापडू शकेलही. पण निदान शहरांत तरी फारसा वाव नाहीच. अशी पछाडलेली माणसे सगळ्यांच्या कुचेष्टेचा, तक्रारीचा विषय बनतात. जपून नीट ठेवलेल्या वस्तू ऐनवेळी आठवल्या नाहीत की घरातले चिडचिड करू लागतात. भाराभार वस्तू आणायची घाई नुसती, वेळेला एकतरी मिळेल तर शपथ. कशाला इतके सामान जमवलेत? घड्याळं घड्याळं तरी किती आणायची? कधी दुरुस्तं करणार आहात ती? डोळे फुटतील अशाने. अशी वाक्ये सारखी ऐकू येतात. पण हे सारे वरवर दिसणारे रूप. मुळात हे पछाडलेपण सुरू होण्यामागे अनेक कारणे दडलेली असतात.

माझ्या ओळखीत एकट्या राहणाऱ्या एक आजी आहेत. त्यांचे घर म्हणजे कबाडखानाच. घरात आलेली कुठलीच गोष्ट कचऱ्यात जात नाही. कित्येक वर्षांच्या दुधाच्या पिशव्या, कार्डबोर्डचे खोके, प्लॅस्टिक, वर्तमानपत्रे, काय काय जमवलेय त्यांनी. सगळेजण त्यांना नावे ठेवतात. पण यासगळ्या मागे जीवघेणे दुःख दडलेय ते कोणी लक्षात घेत नाही. त्यांचा मुलगा त्यांना विचारत नाही. मावशीचे सगळे करतो पण आईशी बोलत नाही. नवरा असताना तो म्हणेल तीच पूर्वदिशा होती. सततचे दबलेपण व भावनिक गळचेपीमुळे आजींचे सगळे उभारीचे, उमेदीने, आनंदाने जगण्याचे दिवस भीतीत, घुसमटण्यात गेले. आपले, आपल्यासाठी कोणी आहे ही भावनाच कधी अनुभवता आली नाही. आता निर्जीव वस्तूंमधून आजी ते मिळवण्याचा प्रयत्न तर करत नसतील??

इथे अमेरिकेत, तीस लाखापेक्षा जास्ती लोकं या विकृतीचे बळी आहेत. मोठीमोठी घरे, मागेपुढे अंगण, स्टोरेज, गॅरेज, बेसमेंट, यामुळे या पछाडलेपणाची सुरवात कधी झाली हे कळतच नाही. सुरवातीला बेसमेंट, गॅरेज, क्लोजेटपर्यंत सीमित सामान लिव्हिंग रूमच्या आढ्याला पोचते तेव्हां कळले तरी आवर घालणे अशक्य होऊन बसते. एखादी गोष्ट आवडली की ती आणल्याशिवाय चैनच पडत नाही. ज्यांच्याकडे पैसे नसतात ते लोकांनी कचऱ्यात टाकलेल्या वस्तू उचलून आणतात. प्रत्येक वस्तूच्या आवश्यकतेची ठळक कारणमीमांसा यांच्यापाशी असतेच असते. घरातल्या लोकांच्या विरोधाला, तक्रारींना, त्यांना होणाऱ्या गैरसोयींवर, प्रेमावर, सोबत राहणाऱ्यावरही हे पछाडलेपण मात करून जाते. अनेकदा अशी माणसे एकटीच राहताना आढळतात. जोडीदार बरोबर असले तरी ते हताश, अलूफ, तटस्थ, कोरडे झालेले आढळून येतात.

वस्तू, कपडे, काय वाटेल ते जमा करणाऱ्यांबरोबर इथे जनावरांचाही अतिरेक सापडतो. एका माणसाची बायको चाळिशीतच अचानक अपघाताने गेल्यावर त्याने एक उंदीर पाळला. लोकं कुत्री, मांजरी सर्रास पाळतात. मला उंदीर आवडला म्हणून मी पाळला. ती उंदरीण होती. पाहता पाहता एकीचे दहा कधी झाले आणि त्या दहांचे हजार कधी झाले ते कळलेच नाही. ( अजिबात अतिशयोक्ती नाहीये ही ) उंदरांनी संपूर्ण घरच ताब्यात घेतले. सगळ्या भिंती कुरतडल्या, प्रत्येक कपाट, पलंग, गाद्या, काही काही म्हणून सोडले नाही. शेवटी अशी वेळ आली की या माणसाला घरात राहणेही अशक्य झाले. नाईलाजाने व आजूबाजूवाल्यांनी तक्रारी केल्यामुळे याने मदत मागितली असता याला मानसिक धक्का न बसू देता प्रत्येक उंदीर अतिशय काळजीपूर्वक हाताळून त्याला नवीन घर मिळवून दिले जाईल असे आश्वासन देत उंदीर पकड मोहीम सुरू झाली. शेवटी ते उंदीरच. चला बरं शहाण्या मुलासारखे पटापट डब्यात चढा असे थोडेच होणार होते. सुरवातीला प्रचंड संख्येमुळे भरभर हाताशी लागत होते. नंतर मात्र त्यांनी लपाछपी व पकडापकडी खेळायला सुरवात केली. किमान पंचवीस वॉलेंटियर्स उड्या मारून मारून पकडता आहेत आणि उंदीर चकवून पळत आहेत. शेवटी घराची एक ना एक भिंत, कपाट, अगदी बाथटबही फोडला, तेव्हां कुठे ८०% प्रजा हाती लागली. त्यांची संख्या भरली दोन हजारापेक्षा जास्त. ती टीम निघून गेल्यावर पुढे पंधरा दिवस त्याने स्वतः चारशे पेक्षा जास्त उंदीर पकडून सिटीकडे दिले. या साऱ्या प्रकारात अनेकदा तो ढसढसून रडला, ही धरपकड व वियोग सहन न होऊन निघून गेला. बायको गेल्याचे सत्य तेव्हां व आजही पचवू न शकल्याने सोबतीचा हा मार्ग त्याने शोधला होता.

अनेकदा हे ' जमा करणे ' आरोग्यास धोकादायक होऊन बसते. जिकडे तिकडे धूळ, स्वयंपाकघरातील सडलेल्या अन्नामुळे झुरळे, माश्या, किडे, वाळवी, सततची ओल, मांजरे, उंदीरांची शिशू यामुळे लहान मुलांच्या प्रकृतीला प्रचंड अपाय होतो. अशावेळी चाइल्ड सर्विसेस मुलांना घरापासून दूर करतात. थोडक्यात या विकृतीमुळे मुले आईवडीलांना व आईवडील मुलांना मुकतात. घटस्फोट होतात. समाजात मिसळणे कमी होत जाते. कोणालाही घरी आणणे शक्य नसल्याने संपर्क व संवाद टाळण्याची प्रवृत्ती बळावत जाऊन एक वेळ अशी येते की अशी व्यक्ती संपूर्णपणे एकटी होते. कळत असूनही वळत नाही. प्रयत्न करावेसे वाटतात परंतु आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली असल्याने शेवटी तेही बंद होतात. उरते ते भंगार व भकास जीवन.

ही विकृती बळजोरीने दूर होऊ शकत नाही. यामागची दडलेली कारणे शोधून त्यांचे समूळ उच्चाटन केले गेले तरच काही प्रमाणात यश मिळू शकते. काही प्रमाणात ही विकृती आनुवंशिकही आहे. जोवर ही माणसे स्वतःहून मदत घेण्यास तयार होत नाहीत तोवर मदत करूनही उपयोग होत नाही. जोरजबरदस्ती केल्यास परिणाम अजून भयावह होतात. यांच्या कलाने घेऊन, अतिशय संयम व पेशन्स ठेवून मदत करावी लागते. काही जण लवकर व स्वतःहून यातून बाहेर येतात, काही वेळ घेऊन व खूप वेळा निग्रह मोडून, थेरपी घेत घेत सुधारतात तर काही कधीच बाहेर येतच नाहीत.

सर्वसामान्यपणे प्रत्येकात असणारी संग्रही वृत्ती, मोह, मालकी हक्काची भावना आटोक्यात आहे तोवरच जीवनात त्याची मजा आहे. वस्तूसाठी आपण की आपल्यासाठी वस्तू हा तोल ढळता नयेच. आणि हा मोहाचा तोल सांभाळणे आपल्या हातात आहे. मात्र एकदा का या साऱ्याचा अतिरेक सुरू झाला की फक्त सजाच उरते. स्वतःसाठी व स्वतःच्या माणसांसाठीही.

26 comments:

  1. आणि 'बुद्धीजीवी' लोक विचारांचा संग्रह पण असाच करतात ... टाकाऊ असले तरी जपतात जुनाट विचारांना प्रेमाने!

    ReplyDelete
  2. अगदी अगदी. मुळात अतिरेक व त्यातून घडत राहणारी रिपीटेटिव्ह अ‍ॅक्शन विचारांच्या भोवर्‍यात गरगरत राहील्यानेच निर्माण होते ना... :(

    aativas, धन्यवाद.

    ReplyDelete
  3. ह्म्म्म. अतिरेक हा वाईटच. प्रेमाचा, द्वेषाचा, सुखाचा, दु:खाचा. सगळ्याच गोष्टी ह्या तारत्म्यातच असलेल्या बऱ्या. :)
    माझ्याकडे आहेत बुवा अशा खूपखूप गोष्टी जमवलेल्या! एक बॅग भरून! कायपण मिळू शकेल त्या बॅगेत! एकदा उघडली पाहिजे! बरी आठवण करून दिलीस! :p

    ReplyDelete
  4. एकदा का तारतम्याशी फारकत घेतली की मग अतिरेकच अतिरेक. पुन्हा या मनाच्या ट्रंकेचे गणितच वेगळे. काढून फेकून दिलेली गोष्ट पुन्हा कधीनुक तळाशी जाऊन बसते ते ही उमगत नाही.

    अनघे, अगं काही दिवसांपूर्वीच तर डोकावली होतीस ” पुंजीत ’, आता पुन्हा काय उपसायचा विचार आहे तुझा? :D

    धन्यू गं.

    ReplyDelete
  5. खरंच छंदाचा अतिरेक होत होत मानसिक रोगात त्याचं कधी रुपांतर होतं हे कळतही नाही. पण त्या आजीबाईंची आणि उंदीरवाल्याची कहाणी मनाला चटका लावून गेली !!

    मला कधी कधी वाटतं मला घड्याळांची (रिस्ट वॉच) ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे. कितीही घेतली तरी दर वेळी नवीन आवडतं आणि ते घरात आणलं जातं.

    >>लिंबू, मोतिया, अबोली, चिंतामणी, गर्द हिरवा<<

    यातला मला फक्त गर्द हिरवाच कळला :D

    ReplyDelete
  6. हेरंब, बरेचसे नवरे एकमुखाने बायकांच्या साडी/पंजाबी च्या मेंटलब्लॊक बद्दल सहमत होतील. :D आपल्याकडेही चप्पल/बूट व रिस्ट वॊचेस चे वेडे सापडतील.

    रंगोंकी इतनी लुभावनी दुनिया से फारकत... हेहे, मी वाचलीये तुझी रंगांची धमाल. :)

    हे मात्र नक्की, जेव्हां वेडाच्याही सीमारेषा पार होतात तेव्हां डीप डाऊन काहीतरी अतिशय खुपलेले असते आणि खूपतच राहते. बरेचवेळा एकटेपण हे जीवघेणे कारण. सोबतीची, कोणी आपले असण्याची गरज माणसाला अशी गिळंकृत करून टाकते. :(

    धन्यू रे.

    ReplyDelete
  7. बापरे ती उंदरांची कहाणी एकदम जबरी आहे गं....
    मी माझं घर आवरताना कळलं किती वस्तु, कपडे, स्वयंपाकघरातली भांडी यांचा अतिरेक झालाय ते.....काही दिल्या..नंतर घेणार्‍यांना पण रस नव्हता त्यांची घर भरण्याचा मग तसंच सोडलं...लागेल तेच आणलं आणि त्यानंतर का कोण जाणे खरेदीचाच रस आटला...अगदी नुस्त दुकानात चक्कर मारणंही गेल्या वर्षभरात किती कमी झालंय ते आठवलं ही पोस्ट वाचल्यावर.....
    पोस्ट मात्र एकदम हटके...
    जाता जाता.....वाचलं होतं की सुधा मूर्तींनी नवीन साड्या विकत घेणं केव्हाचं बंद केलंय....डिटेल्स आठवत नाही पण वाइज अदरवाइजमध्ये उल्लेख असावा.......
    असो...मी प्रतिक्रियेच्या नावाखाली काही भलतंच नाही नं लिहिलं..आता सवय गेलीय ब्लॉग,प्रतिक्रिया सगळ्याची...पण अधेमध्ये वाचायला हवं....

    ReplyDelete
  8. ताई,
    एकदम बेक्कार प्रकार आहे..व्हिशियस सर्कलसारखा...मलाही बर्‍याच बाबतींत जाणवतो..

    अन हो
    >>लिंबू, मोतिया, अबोली, चिंतामणी, गर्द हिरवा<<

    यातला मला फक्त गर्द हिरवाच कळला :D
    +१०१०१०१०१०१०१०

    ReplyDelete
  9. अपर्णा, बर्‍याच दिवसांनी तुझी कमेंट पाहून छान वाटले. धन्यवाद. डोकावत जा अधूनमधून. :)

    सेम पिंच. इलिनॊय सोडताना चांगलेच कळलेय, सहा बॆग्ज घेऊन आलेलो इथे त्याचे वाढता वाढता... :D आता खरोखरच कुठल्याही खरेदीत रसच उरला नाहीये. ( इथे, मायदेशी मात्र अजूनही मला झटके येतात.. हा हा.. )


    वाईज अदरवाईजमध्ये आहे हा उल्लेख. आहे ते पुस्तक माझ्याकडे. :)

    ReplyDelete
  10. बाबाने एकदम बायनरीत अनुमोदन दिलंय मला ;)

    ReplyDelete
  11. विद्याधर तू ही... :D आत्ताच एका शो मधे किचनला रंग द्यायला घेत असतात. डबा उघडून देणारी ओनरला म्हणते, " ओळख कुठला रंग आहे ते? " तो शांतपणे एकदा डब्यातल्या रंगाकडे एकदा तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, " मी रंगांध आहे. " :)) तिचा सगळा टडाSSSण आवेश भुईसपाट. :D

    खरेयं. हे न थांबवता येणारे चक्र आहे. फार फार एफर्ट्स आणि पेशन्स ( मदत करणार्‍यांना ठेवायला हवा ) हवा. शिवाय हे कधीही ट्रिगर होऊ शकते... चला,आता लवकर स्टोअर रूमची झडती घ्यायला हवी. इथे मेली दिवाळीही आपल्यासारखी होत नाही ना... :( ( दोन दोन दु:खं... )

    धन्यू रे.

    ReplyDelete
  12. हेरंब, बाबाला तुझी रंगीन दुनिया एकदम पटेश रे. वाचताना किती माझ्यासारखाच आहे हा ही म्हणून मनापासून खुदखुदला असेल तो... :))

    ReplyDelete
  13. सुंदर लिहिलंस श्रीताई..
    जुन्या संग्रहाला परत आवरायचं म्हणून काढलं तर आवरण्याऐवजी एकएक गोष्ट काढून त्याबद्दलच्या आठवणीत आपण रमून जातो आणि तू लिहिलंस त्याप्रमाणे अगदी ठीय्या मारून तिथे बसतो, एकही गोष्ट कमी करत नाही, पण सध्याच्या एक-दोन गोष्टी त्या पोतडीत भरून आपण परत माळ्यावर सरकवतो.. :)))

    उंदरांची आणि आजींची गोष्ट खरंच चटका लावून गेली...

    ReplyDelete
  14. बाबाचा नवा अवतार आहे बायनरी बाबा...:)


    अगं मी वाचते जमेल तसं पण नेमकं परतिकियेच्या वेळंला ट्याहा ऐकायला आलं की लिंक जाते...नशीबाने साथ दिली की प्रतिक्रिया द्याय्ला नक्कीच आवडेल गं...तू लिहित राहा.....:)

    ReplyDelete
  15. आनंद, खरेच होते की नाही तसेच.:) म्हणून तर ना साफसफाई इतका वेळ घेते... :D

    आभार रे.

    ReplyDelete
  16. हा हा... हो बाई, ट्यांहा ला लगेच अटेन्ड करायलाच हवे... :) अपर्णा, नशिब असेच तुला साथ देते राहो. धन्यू गं. बरे वाटले तू लिहीलेस.

    ReplyDelete
  17. सुंदर लिहिलंस श्री!!!..माझ्याकडे सुध्दा घड्याळे आणि सेल फोन चा संग्रह आहे...माउचे सेल म्युझिअम...तरी नविन सेल हवाच..त्यातुनही त्यांचे चार्जर अधिक..आमचे कुठे राहुन गेले म्हणुन नविन विकत घेतलेले तर काही आलेले पाहुणे विसरुन गेले म्हणुन तर प्रत्येक नविन सेल्ल बरोबर मिळालेला नविन चार्जर..ढिंगणे पडले आहेत..आता ठरवलय एक बोर्ड घरासमोर लावायचा...अय्या चार्जर मळशे...फ्री मां..:P
    कठिण झालाय सगळा प्रकार..बाकी आजीबाईंचा संग्रह जोरदार..नकळत काही आठवणी देउन गेला..[तुला माहितच आहे]..प्रत्येकाच्या जगायची रीत..पण नक्कीच विचारकरण्याजोगे..
    बाकी साड्यांबद्दल म्हणशील तर लगेच एक मुंबई/पुणे ट्रीप काढावीशी वाटतेय्य...चल दोघी घेउ मस्त....साड्या कितपत नेसणे होइल ह्याची अजिबात चिंता न करता...

    ReplyDelete
  18. खरय भानस... कुठच्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. छान उहापोह केलायस OCD -चा.

    मला हि त्याची लागण झाली असती; पण माझ्या वडिलांचा बारीक लक्ष असतो माझ्यावर.

    ReplyDelete
  19. तायडे अगं तूझा ब्लॉगची एंट्री ब्लॉगविश्वावर दिसलीच नाही मला :(

    OCD अगदी बरोबर गं... आमच्या मातोश्रींना आहे हा नाद, आणि आजी तर कहर आहे, चिंधीही फेकत नाही... वस्तू जमवण्याबाबत मी जरा बरी आहे, गरज नसल्याखेरीज निदान मस्कतला तरी मी चटकन वस्तू उचलत नाही, भारतात गेल्यावर जरा नियम सैल होतात :)

    पण तायडे अनावश्यक विचार आणि घटनांचा पसारा मनात सांभाळलेला असतोच गं... कळतं पण वळतं नाही ची गत नुसती....

    मस्त लिहीलीयेस पोस्ट...
    (कितिही सांभाळले तरी साड्यांच्या दुकानात शहाण्या मनावर या डिसऑर्डरने ताबा घेतलाच जातो ;))

    ReplyDelete
  20. उमा, खूप दिवसांनी तुझी प्रतिक्रिया आली. छान वाटले. धन्यू.

    हा हा... बरे झाले सांगितलेस, मायदेशी माझा चार्जर हरवलाच तर लगेच तुझ्या बोर्डासमोर उभे राहून,’बेन आपोतो मन” म्हणता येईल. :)

    खरेच. ज्याची त्याची जगण्याची रीत निराळीच. बाकी तू म्हटंल्याबरोबर साड्यांच्या दुकानात जावेसे वाटले... याला म्हणतात,’ पालथ्या घड्यावर पाणी " :D

    ReplyDelete
  21. श्रीराज, धन्यवाद. हो रे. कधी आपण कुठल्या गोष्टींच्या आहारी जातो हे कळतही नाही... कोणीतरी हवेच कान उपटायला.

    ReplyDelete
  22. तन्वी, आज्या म्हणजे खरेच कहर आहेत. :D आमचे बाबाही पक्के ओसिडी झालेत हल्ली. अगं कॆसेट्स, सिडी, टेपरेकॊर्डर, घड्याळे, अनेक इलेक्ट्रॊनिक वस्तूंचा भरणा करून करून आईला कठलाही टाईलचा तुकडा दिसेना करून टाकलाय. :)) आता एकदा मीच फेकाफेकी करावी म्हणतेय. :)

    अनावश्यक विचारांचे म्हणशील तर त्यांच्यामुळे झालेले दु:ख आपण कुरवाळत राहतो नं... :( सुखाचेच पाहा, एकदा आनंद झाला की तो काही काळाने संपतो पण दु:खाचे कढ नुसते उसळतच राहतात. चूक आपलीच. कळतेय, वळवायची इच्छाही आहे पण... बोंब तिथेच...


    बयो, अभिप्रायाबद्दल धन्यू गं. :)

    ReplyDelete
  23. हेरंब
    घड्याळं.. माझ्याकडे पण चार आहेत :) कम्पल्सिव्ह डिसऑर्डर ?? याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सालारजंग ऑफ हैद्राबाद.. त्या म्युझियम मधे असलेल्या वस्तू पाहिल्या की खात्री पटते की हा मानसिक रोग आहे .

    ReplyDelete
  24. हा हा... अशाने सगळी म्युझियम्स या रोगाने पछाडलेली आहेत असे म्हणशील तू. महेंद्र, नागपूरला घरी शोधलेस तर अजूनही तू जमवलेले ( लहानपणी/तरुणपणी ) छंद सापडतील. :)

    ReplyDelete
  25. ओपेरा विनफ्रे वर एक जुना एपिसोड बघत असताना अशाच एका बाईची कहाणी बघितली..त्या बाईने ३५ वर्षे शॉपिंग चा सपाटा लावला होता...तुम्ही म्हणालात तसेच अध्यापर्यंत वस्तू होत्या..जुनी पुस्तके,तृन्क्स सर्वांचा विडीओ पहिला..बघताना भोवळ यायचे बाकी राहिले होते...नंतर सांगितले की १२५ लोक ३ महिने स्वयंसेवक म्हणून तिच्या घरी राबली त्यावेळेला घर साफ झाले...इतके स्वछ घर पाहून त्या बाईने घरात शिरताना हर्षाने जी काही 'आरोळी' मारली त्यावेळेला शो मधल्या सर्व बायका आणि ओपेरा विनफ्रे यांची हसून पुरेवाट झाली..

    ReplyDelete
  26. बहुतेक आता पुन्हा जोमाने शॉपिंग करायला हरकत नाही... याचा हर्ष झाला असेल तिला... :D:D

    अनेक धन्यवाद सिध्दार्थ. :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !