गेल्या महिन्याभरात रोहन, महेंद्र, अपर्णाने त्यांच्या भेटीच्या, गोमांतकी खादाडीच्या मला जळवणाऱ्या सुरस कथा पोस्टताना हटकून सोलकढीचे फोटो टाकले. त्यात भर मनमौजीनेही टाकली. सोलकढीवर माझे खास प्रेम आहे. पुण्याला बेडेकरांची मिसळ खायला गेले की सोलकढीची थंड बाटली पाठोपाठ हवीच. मी मासेखाऊ नसल्याने कुठे जेवायला गेलो असता हातासरशी सोलकढीची वाटी काही समोर येत नाही.
तुकडी, चिकन बरोबर कशी सोलकढी आपसूक. मालवण, सिंधुदुर्ग सारख्या खास खास हाटेलात शाकाहारी थाळीतही येते म्हणून मी हटकून तिथे जातेच.

गेल्यावेळी देवरुखात एका एकदम साध्याश्या दिसणाऱ्या खानावळीत जेवायला गेलो असता इतर पदार्थ जरा डामाडौल असल्याने मी खट्टू झालेली. अचानक मालकाने आरोळी दिली, " काय रे दिन्या, पाहुण्यांना सोलकढीची वाटी विसरला काय? " ससा कसा कान टवकारतो तसे सोलकढी हा शब्द कानावर पडताच माझी नजर, कान, जीव सगळे दिन्याकडे धावले. तोही तसा चपळ होता. चटदिशी चार वाट्या घेऊन आला. " ए, अरे त्यांच्या पानाशी नको सगळ्या माझ्याजवळ ठेव आणि त्यांना घेऊन ये आणखी. " असे म्हणत मी हावरटासारख्या चारही वाट्या ओढून घेतल्या व जेवण बाजूला सारून मन लावून घोट घोट ते अमृत प्याले. अगदी ताज्या ताज्या खवलेल्या नारळाच्या दाटसर दुधाची, गडद आमसुलांमुळे आलेला गुलाबी रंग व आंबटाला अचूक तोललेली, अप्रतिम सोलकढी होती ती. नशीब लागते हो, कधी कधी अगदी रद्दड ठिकाणी अवचित असे घबाड लागते हाताला. 
इथे येतांना मी चक्क विळीही घेऊन आलेय ती केवळ ताजा फोडलेला नारळ खवून सोलकढी करता यावी म्हणून. पण हाय रे दैवा! नारळ मेले कुजकेच निघतात. फ्रोजन खोबरे मिळते पण त्याची सोलकढी करण्यासाठी बरेच बाळंतपण करावे लागते. शिवाय त्यावर तवंग येणार नाहीच अशी खात्री देताच येत नाही. दुसरा प्रकार म्हणजे टिनचे नारळाचे दूध वापरणे. दगडापेक्षा वीट बरी इतपतच असले तरी काहीच नसण्यापेक्षा टिनचे दूध धावते. थोडे तंत्र नीट हाताळले तर प्रिझर्वेटीवचा वास पुढे येत नाही. शिवाय करायला अतिशय सोपी व चटकन होणारी.

इथे येतांना मी चक्क विळीही घेऊन आलेय ती केवळ ताजा फोडलेला नारळ खवून सोलकढी करता यावी म्हणून. पण हाय रे दैवा! नारळ मेले कुजकेच निघतात. फ्रोजन खोबरे मिळते पण त्याची सोलकढी करण्यासाठी बरेच बाळंतपण करावे लागते. शिवाय त्यावर तवंग येणार नाहीच अशी खात्री देताच येत नाही. दुसरा प्रकार म्हणजे टिनचे नारळाचे दूध वापरणे. दगडापेक्षा वीट बरी इतपतच असले तरी काहीच नसण्यापेक्षा टिनचे दूध धावते. थोडे तंत्र नीट हाताळले तर प्रिझर्वेटीवचा वास पुढे येत नाही. शिवाय करायला अतिशय सोपी व चटकन होणारी.

वाढणी: माझ्यासारखी हावरी असेल तर एकालाच पुरेल... नाहितर तिघांना पुरावी.

साहित्य:
आठ-दहा अमसुले ( रंग येत नसेल तर दोन चार अजून घ्यावीत )
एका नारळाचे दूध( एक टिन:
दोन ओल्या मिरच्या चिरून
पाच-सहा लसूण पाकळ्या चिरून ( खूप मोठ्या असतील तर तीन पुरेत )
एक चमचा जिरे पूड/अर्धा चमचा जिरे
चवीनुसार मीठ
चमचाभर साखर ( साखरेचे प्रमाण आपापल्या आवडीनुसार कमी/जास्त करावे. गूळही वापरता येईल )
दोन चमचे कोथिंबीर
कृती:
नारळ फोडून खवून घ्यावा. प्रथम एक भांडेच पाणी घालून खोबरे मिक्सरमधून काढावे व नंतर पिळून दूध काढावे. पुन्हा खोबऱ्यात भांडभर पाणी घालून फिरवावे व पिळून काढावे. एकंदरीत चारदा असे करून दूध काढून एका पातेल्यात घ्यावे. हे करतांनाच अर्ध भांड गरम पाणी घेऊन त्यात अमसुले भिजत घालावीत. दूध काढून झाल्यावर लसूण, मिरच्या व जिरे वाटून घ्यावेत व दुधाला लावावेत. त्याच मिक्सरच्या भांड्यात अमसुलेही भिजवलेल्या पाण्यातच वाटून घेऊन गाळणीने गाळून ते पाणी दुधात घालावे. स्वादानुसार मीठ व साखर घालावी. आता हे सगळे मिश्रण एकजीव करावे, कोथिंबीर भुरभुरावी व शक्यतो थंडच द्यावी. मसालेदार व जड जेवणामुळे हमखास पित्ताचा त्रास होतो त्यावर हमखास उपयोगी.
सोलकढी गरमही छान लागते. वरील सगळी कृती करून झाली की मध्यम आंचेवर ठेवून सारखे ढवळत राहावे. कढ आला की आंचेवरून उतरवावी. फुटू देऊ नये.
त्याचप्रमाणे गरम किंवा गार सोलकढीला फोडणीही देतात व तीही मस्तच लागते. फोडणी देतांना पळीत एक मोठा चमचा तूप घ्यावे, गरम झाले की जिरे टाकावेत. जिरे तडतडले की लगेच दुधात फोडणी घालावी.
टिपा:
साखरेचे प्रमाण किती आंबटपणा हवा आहे यावर ठरवावे. सोलकढी अती आंबटढोक करू नये. टिनच्या दुधाची सोलकढी करताना टिनमधले दूध पातेल्यात ओतून घेऊन आधी चांगले हालवावे. बरेचदा खोबऱ्याचा साका वर घट्ट होऊन बसलेला असतो व खाली पाणचट द्राव दिसतो. हालवून घेतल्यावर तो टिन हेच प्रमाण घेऊन दुप्पट पाणी घालावे. बाकी कृती वरीलप्रमाणेच. शक्यतो टिनच्या दुधाची सोलकढी गरम करावी व तिला फोडणीही द्यावी म्हणजे इतर कुठलाही वास येणार नाही.