कधी कधी आपण सहजच खूश असतो. म्हणजे खास काही कारण नसतेच. आतून अगदी छान, उमलून आल्यासारखे वाटत असते. अगदी साध्या साध्या गोष्टीही अशावेळी आपला आनंद वाढवत राहतात. नेहमीसारखाच गजर टाहो फोडून आक्रंदतो.... एरवी त्याचा गळा दाबणारी मी आज आधीच जागी झालेली असते. मिटल्या डोळ्यांनी अंथरुणाची न सोडवणारी उब अनुभवत पडून असते. आज झोपही पूर्ण झाल्यासारखी ..... तृप्त. गजर हलकेच बंद करते. खिडकीतून तुकड्यातुकड्याने दिसणाऱ्या आभाळाकडे टक लावून पाहत खुदकन हसते. तेही लगेच प्रतिसाद देते. " अरे वा! आज मूडमे हो क्या....... चक्क माझ्याकडे तुझे लक्ष गेले.... तेही पहाटे पहाटे..... " असे म्हणून माझ्याकडे पाहत हळूच डोळे मिचकावत सोनेरी-लालसर रंगाची भरभरून उधळण करून आसुसून साथ देऊ लागते. पक्ष्यांची किलबिल, वाऱ्याच्या शीतल लहरी, त्यावर सळसळणारी गुलमोहोराची, पिंपळाची पाने.... फांद्यांफांद्यांतून वारा बागडेल तसतसा उठणारा शीळेचा नाद..... डवरलेल्या पारिजातकाची मुक्त उधळण, जमिनीशी लगट करणारी नाजूक नाजूक शुभ्र फुले व केशर सांडणारी देठे....... सारे चराचर आल्हाददायी झालेले.......
घर अजून शांतच असते. प्रत्येकाच्या संथ, एका लयीत चाललेल्या श्वासोच्छ्वासाचे, चेहऱ्यावरील अर्ध जागृत निद्रेतील भाव - स्वप्नांच्या रेंगाळलेल्या खुणा टिपत, गुणगुणत मी स्वयंपाकघरात शिरते.....
"असाच यावा पहाटवारा जसा वितळतो पावा,
आरसपानी सूर मुलायम असाच निथळत यावा.....
भरून यावा कंठ खगांचा आणि फुटावे गाणे,
व्हावी उन्मन कुणी कोकिळा त्यांच्या मधुर स्वराने,
हुंकारातून असा ओघळत शब्द प्रीतिचा यावा... " मला कशामुळे इतके प्रसन्न वाटतेय हे शोधण्याच्या भानगडीत न पडता भरभरून हा आनंद मी स्वत:त भिनवून घेते. हो नं, न जाणो अचानक संपला तर...... आज तोही माझी साथ सोडायला बिलकुल उत्सुक नसतोच. मोलकरीण वेळेवर येते, लेकाने दप्तर रात्रीच भरून ठेवलेले असते. पहिल्या हाकेला उठून अगदी शहाण्या बाळासारखा आवरून उड्या मारत तो शाळेत जातो. रिक्षावाले काका स्वत: वर येऊन त्याला घेऊन जातात. नवऱ्याच्या शर्टाची बटणे धारातीर्थी पडलेली नसतात. आवर गं पटापट, तुला सोडतो आज स्टेशनवर असे तो मनापासून म्हणतो. एवढेच नाही तर आज डब्यात भाजी कुठली असेही विचारत नाही. मी माझ्याच नादात गुणगुणत राहते......, " गीत होऊन आले, सुख माझे, आले, साजणा, स्वप्न कल्पनेत होते सूर ताल तेच झाले, साजणा........ "
मन प्रसन्न असले की ती प्रसन्नता आपल्या चेहऱ्यावर, अंगावर बिलगून राहते. समोरून पाहाणाऱ्यालाही ती पोचतेच. माझा आवडता पंजाबी घालून जरा सैलसरच शेपटा, कुंकू लावून मी खाली उतरते. तोवर नवरा स्कूटर काढून गेटवर उभा असतो वाट पाहत.... आणि अचानक समोरून मैत्रीण येते. अगदी नखशिखान्तं मला न्याहाळते. मी कावरीबावरी. अशी काय पाहतेय ही......मला उगाचच वाटून जाते..... संडे इज लॉंगर दॅन मंडे झालेयं की काय..... छे! असे कसे होईल....... नाडी तर नीट बांधली होती मी..... तिचे असे माझ्या आरपार पाहणे संपतच नाही. मी वेंधळ्या हालचाली करत ओढणी सावरत चुळबुळत राहते...... ती निरखतच विचारते, " काय खास? नाही म्हणजे ऑफिसातच जाते आहेस नं? की...... बरीच रंगरंगोटी केली आहेस ती ...... "
आता माझी सटकते...... एक तर सरळ सहजपणे म्हणायचे, " अगं, कसली गोड दिसते आहेस तू आज..... एकदम मूडमें नं...... सहीच रे! माझाही दिवस आज मस्त जाईल बघ....... " पण हे शब्द तोंडातून कसे निघावे.... तोंडावर साधा पावडरचा पफ काय फिरवलाय... तर टवळी म्हणतेय रंगरंगोटी करून कुठे निघालीस........वाटते जीभेची तलवार चालवावी अन तटकन घाव घालावा...... टाकावे बोलून .... " तुझ्या तेलकट, मेणचट, सदाच दुर्मुखलेल्या मुखकमलावर इतकी लिपस्टिक बरबटवली आहेस नं ती जरा पूस गं..... कमीतकमी दहा-बारा जणींचे ओठ रंगतील....... " पण मी तिला असे टोचून मला आनंद मिळेल का? छे! उलट दिवसभर मी स्वत:ला कोसत राहीन....... मग माझा आनंद कशाला संपवा- दिवस फुकट घालवा... ( खरे तर इतके बोचरे बोल बोलायची माझ्यात हिंमतच नाहीये..... भिडस्तपणा जन्मजात मुरलेला आहे अंगात.......

म्हणून मग स्वत:चीच समजूत घालून घ्यायची झालं........ ) पण आज मनही बेटे ऐकेना, " अय्या! कशी गं तू मनकवडी..... बरोबर ओळखलेस. आज नं डेट आहे डेट....... " असे म्हणून तिच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे व वासलेल्या तोंडाकडे पाहत मी डोळे मिचकावत पळते ती थेट नवऱ्याच्या मागे जाऊन बसते. ती अजूनही तशीच भिरभिरलेली. ते पाहून नवरा विचारतो, " काय गं, अशी भूत बघितल्यासारखी का पाहतेय ती........" " काही नाही रे....... मी ' डेटला ' चाललेय असे सांगितल्यामुळे बावचळलीये ती..... आता दिवसभर बसेल अशीच आ वासून..... तिला सोड..... चल तू.... आज मस्त गाडी पळवं...... आज मोगॅंबो खूश हैं...... "
आता काहीतरी गरज होती का तिला हा भोचकपणा करण्याची.... कुचकट कुठली...... जणू काही खास लायसन्स दिलेय असे बोलण्याचे ...... पदोपदी ही अशी माणसे सारखी ढवळाढवळ करतच असतात. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायचे आणि दुसऱ्याला लागट बोलत राहायचे....एक से एक नमुने...... " बाहेर निघालीस? इतक्या उन्हाची? कुठे गं? " असेच जरा काम आहे काकू.... म्हणून टाळले की.... " हो का..... अग, काम असणारच गं.... पण इतक्या तातडीने जाते आहेस म्हणून विचारले..... नाही म्हणजे नसेल सांगायचे तर नको सांगूस हो....... मी काळजीपोटी विचारत होते.... तरी पण.... ठाण्यातच जाते आहेस की अजून....... " सोडणार नाही..... छ्ळतच राहणार......
" दुसऱ्याच्या घरात काय चाललेय हे आपल्याला कळलेच पाहिजे..... नव्हे तो आपला हक्कच आहे " असे मत बऱ्याच जणांचे असते. गंमत म्हणजे स्वत:च्या घरात काय काय घडतेय याचा मात्र यांना पत्ता नसतो आणि कळवून घ्यायची गरजही नसते. असेच एकदा एक ओळखीचे काका बिल्डिंगमधल्याच एका लहान पोराला पकडून विचारत होते, " काय रे, काल आई-बाबा भांडत होते नं तुझे? काय झालेले? मग आई रडली नं.... मला ऐकू येत होते....." तो चारपाच वर्षांचा मुलगा बिचारा रडकुंडीला आलेला..... आणि काकांची सरबत्ती चालूच.... मी चटकन पुढे होऊन लेकराला गोंजारले आणि ते बघ तुझे मित्र बोलवताहेत तुला... पळ की.... असे म्हणत काकांच्या हातून त्याचे बखोट सोडवले...... चटदिशी पळाला तो... जणू कुठल्या शिक्षेतूनच सुटला होता. बिचारा......
काकांना म्हटले, " काका, अहो काय हे...... आधीच पोरगं घाबरलेय..... तुम्हाला कशाला हव्यात नको त्या चौकश्या? किती लहान आहे तो...... इतके चैन पडत नसेल आणि धमक असेल तर जा की त्याच्या बाबाला जाऊन विचारा नं...... एवढुसा जीव बिचारा, किती भेदरला होता...... त्याला का छळतायं...... " हे ऐकले मात्र..... ते खवळलेच एकदम, " हेच नं...... आजकालची तुम्ही मुलं, फार आगाऊ झाला आहात........ का? का म्हणून नको विचारू मी त्याला........ एका बिल्डिंगमध्ये राहतो नं आपण. मग...... कळायला नको कोणाच्या घरात काय चालते ते...... काही सामाजिक जबाबदारी आहे का नाही....... विचारीन, त्याच्या बापालाही विचारीन जाऊन..... काय घाबरतो की काय मी..... " असे म्हणत ते तणतणत निघून गेले. हम्म्म..... सामाजिक जबाबदारी....... मी कपाळाला हात लावला......... डोळ्यासमोर सारखा खेटरं खाऊन परत आलेल्या काकांचा चेहरा तरळत राहिला......
काही लोक कहर असतात अगदी. सरदेसाई हे आडनाव सारस्वतांमध्ये आहे, कऱ्हाड्यांमध्ये आहे.... आणिकही कोणात असेल. दोघांचेही कुलदैवत शांतादुर्गाच. सारस्वतांमध्ये हे आडनाव जास्त फ़ेमस. दिलीप सरदेसाई, राजदीप सरदेसाई..... त्यामुळे सरदेसाई म्हणजे सारस्वतच हे समीकरण रूढ झालेयं. तर एकदा अश्याच एका मैत्रिणीशी गप्पा सुरू होत्या...... तुम्ही कुठले आम्ही कुठले....... गाव कुठले - कुलदैवत कोणते....... मी आपले सांगितले, " आम्ही नं, देवरूखजवळ एक छोटेसे गाव आहे वांजोळे म्हणून, तिथले. कुलदैवत शांतादुर्गा. " लगेच मैत्रीण म्हणे, अग ती अमुक तमुक म्हणत होती की तू तर सारस्वतच आहेस पण सगळ्य़ांना चक्क खोटे सांगतेस की मी कऱ्हाडे आहे म्हणून...... म्हणत होती, पक्की मासेखाऊ असेल ती. मी अवाक. मुळात मी चुकूनही कोणालाही जात विचारत नाही. जातपात मी मानत नाही तेव्हां पुढचे प्रश्नच मला पडत नाहीत. संवादाचा - मैत्रीचा आणि जातीचा काही संबंध आहे का? शिवाय हे असे खोटे सांगण्याने माझा कुठला फायदा होणार होता....... मासेखाऊ असेन तर अगदी छाती ठोकून सांगेन नं आहे म्हणून..... मासे खायची काय चोरी आहे का? " अगं काहीतरीच काय, मी कशाला खोटे सांगेन.... जा पाहिजे तर माझ्या सासूबाईंना विचार जाऊन........ आणि तिचे मरू दे गं पण तुलाही खरेच असे वाटते का की मी खोटे सांगतेय..... " हे विचारल्यावर मैत्रीण म्हणे, " अग अगदी तसेच नाही गं...... पण, आजकाल कोणाचा काय भरवसा द्यावा....... " मी नादच सोडला. मला काय फरक पडतो कोणी काही का समजेना ....... पण........ मन दुखलेच.

खूप दिवस मनात होते.... छानशी पैठणी घ्यावी. आता पैठणी काही रोज नेसता येत नाही... कपाटाचीच धन होणार. हे सगळे कळतेय..... पण हौस असतेच नं..... तर मी व आई गेलो पैठणी घ्यायला. गिरगाव पंचे डेपोमधून पैठणी घेतली आणि दुकानाची पायरी उतरलो तोच समोर वरच्या काकू दत्त म्हणून उभ्या....... एक तर गिरगाव पंचे डेपो हेच मुळी एक मोठे प्रकरण आहे. पैसे देऊन साडी घ्यायला गेलोय का घोडचूक करायला......... असा प्रश्न पडावा आणि आपणच आपल्याला दोन चापट्या मारून घ्याव्यात, अशी गत.... त्या दिव्यातून पार पडून घेतलेली पैठणी अजून नीट मनभरून पाहिलीही नाही तोच या काकूंचे दर्शन.......
आम्हां दोघींकडे व हातातल्या पिशवीकडे पाहत, " काय..... मायलेकी अगदी गळ्यात गळा घालून फिरतायं..... खरेदी का? वा.... वा...... काय घेतलेस गं? पाहू तरी मला......" ( खसकन माझ्या हातातली पिशवी ओढून भसकन पैठणीची घडी विस्कट्त बाहेर काढलेली पाहून माझा जीव कळवळल्याने.... न राहवून..... मी एक क्षीण प्रयत्न करत म्हटले..... ) " काकू.... अहो जरा हळू तरी..... चुरगळतेय हो...... " माझ्या बोलण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत किती गं बावळट तू असा आविर्भाव चेहऱ्यावर व शब्दाशब्दात ठासून भरत, " बाई बाई...... अगं किती हा पैशाचा नास. कुठे मिरवणार आहेस तू ही नेसून..... पाहावं तेव्हा तर जीन्स मध्ये असतेस..... तुमच्या त्या अमेरिकेत का घालणार आहेस ती..... जळ्ळलं मेलं लक्षणं..... आता जाशील इथेच कपाटात ठेवून. त्यापेक्षा सिफॉन- सिल्क काहीतरी हलकेफुलके घ्यायचेस नं..... अहो भाग्यश्रीच्या आई तुम्ही तरी सांगायचेत तिला...... कसली मेली हौस.... एक नाचली की लगेच सगळ्यांची सुरवात..... शोभते का हे वागणे..... " हे बोलून काकू गायब.
किती हा भोचकपणा ........ काहीतरी गरज होती का याची? मी पैठणी नेसेन.... कपाटात ठेवीन... अमेरिकेत आणेन..... नाहीतर कात्रीने कापून त्याचे पडदे बनवेन....... तुम्हाला काय करायचयं? विचारायला आले होते का मी? किती हौसेने गेलेलो आम्ही दोघी.... तासभर पंच्यांचे टिपीकल कुचकट शेरे ऐकून ( जणू गिऱ्हाईकावर मेहेरबानीच केलीये दुकान थाटून ) त्यांना पुरून उरत घेतलेली माझी सुंदरशी पैठणी बिचारी मलूल होऊन गेलेली पाहून भडभडून आले मला. पुन्हा काकुंच्या या तोफखान्याला प्रत्युत्तर देण्याआधीच त्यांनी पलायन केलेले...... पैठणी घेऊन झाली की मस्तपैकी मंजूचा वडा चापू गं असे मनाशी ठरवून निघालेल्या आम्ही दोघी आमचाच वडा झाल्यासारख्या पाय ओढत घरी आलो.
घरातलेच आपले म्हणवणारे लोकही कधी कधी इतका अति भोचकपणा करतात नं ........ माझ्या एका दूरच्या बहिणीने माझ्या आईला फोन केला. नेमकी मीही आईकडे होते. " आज कसा गं हिचा फोन आला..... एरवी तर चुकून कधी साधी चौकशीही करत नाही.... " आईच्या मनात आधीच पाल चुकचुकलेली. दोन मिनिटे उगाच इकडचे तिकडचे काहीतरी बोलून झाल्यावर म्हणे, " मामी, अगं मी नं एका इन्शुरन्स कंपनीचे काम करतेय. उद्याच येते बघ तुझ्याकडे..... तू आणि मामा घेऊन टाका एक एक छोटिशी पॉलिसी, फक्त दहा दहा लाखांची. " मला हे काही ऐकू येत नव्हते.... पण आईच्या कपाळावरची शीर तडतडायला लागलेली पाहिली आणि समजले की काहितरी पेटलेयं........ तरी आई संयम ठेवून म्हणाली, " अगं, आम्हा दोघांची कसली पॉलिसी काढतेस आता या वयात..... ती मॅच्युअर होण्याआधीच आमची रवानगी होणार आहे इथून.... आणि रिटायर्ड माणसांकडे कुठले आले गं इतकाले पैसे....... बरं तुझ्या मामाला पेन्शनही मिळत नाही. "
हे ऐकताच आमची ही भोचकभवानी म्हणते कशी, " अगं मामी, तुम्ही गचकलात तरी मुले आहेत की... त्यांना होईल...... आणि मामाला पेन्शन नसले म्हणून काय झाले.... आत्ताच तर घर विकलेत नं तुम्ही..... मग मिळाले असतील की खोऱ्याने पैसे..... काय कुजवायचेत का आता ते..... द्या की मला त्यातले थोडे. " आमची आई सिंह राशीची........ उगाच सिंहाला डिवचू नये हेच खरे....... एकदा का तो संतापला नं की मग मात्र...... " अगं तुझा मामा दोन वेळा हॉस्पिटलात अगदी मरणाच्या मुखात होता....... इतकाले पैसे लागले ऑपरेशनला...... कसे उभे केले असतील मामीने- तिच्या मुलांनी.... आलीस का विचारायला...... ते सोड गं...... ढांगभर अंतरावर राहत होतीस साधा एक वेळेचा गोळाभर भातही आणला नाहीस शिजवून... जरा तेवढीच मामीला मदत. आणि आता पैसे कुजवायचेत का म्हणून विचारतेस तू......... आमच्या गचकण्याचे तुला काडीचेही दु:ख तर नाहीच वर सल्ले देतेस...... खबरदार पुन्हा फोन करशील तर....... " असे म्हणून आईने फोन आपटला..... आहे की नाही कमाल भोचकपणाची......