जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, January 15, 2011

सौजन्याची ऐशी तैशी....

सकाळचे १० वाजलेले. नवरात्राची पाचवी माळ. दसरा रवीवारी येत होता. उद्या परवा नाहीच जमले तर शुक्रवारी फारच गर्दी उसळलेली असेल म्हणून आजच जाऊन यावे असा विचार करून माझ्या कोऑपरेटिव्ह बँकेत येऊन पोहोचले. चांगली नावाजलेली गेली कित्येक वर्षे ठाणे जिल्ह्यात खूपच गाजत असलेली ही आमची बँक. कॅलेंडरवर जेमतेम पहिला आठवडा उलटला होता. पगार, पेन्शन, आरडी वगैरे नेहमीच्या गडबडीतून अजून पूर्ण सुटका झालेली नसली तरी थोडीशी श्वास घेण्याइतपत परिस्थिती असेल, असा माझा होरा.

दारातच एटिएम ची छोटीशी केबिन. एक जण आत खुडबुडत होता, बाहेर पाच सहा डोकी लाईनीतून पुढे झुकून, माना उंचावून आतला कधी बाहेर येतोय ची वाट पाहत उभी होती. कधी घड्याळाकडे, तर कधी मागे वळून रेंगाळणार्‍या रिक्षांचा माग काढत, चुळबुळत, मध्येच काहीतरी पुटपूटत ... नेहमीचेच दृश्य. रांगेत आपण उभे असतो तेव्हांच नेमके कोणीतरी काहीतरी गोची करते. कधी कार्डच अडकते तर कधी कोडच चुकीचा पंच होतो. माझ्या बर्‍याच मैत्रिणी तर चुकूनपण एटिएम मशीनकडे जात नाहीत. ओल्ड स्कूल म्हटले तरी चालेल पण हेच बरे पडते गं, असे म्हणत पटापट स्लिपा भरून मोकळ्या होतात.

ही शाखा घराजवळ असल्याने बरी पडते, चालतही जाता येते. एटिएम ओलांडून पायर्‍या चढून आत पाऊल टाकले तर नजर पोचेल तिथवर माणसं वर सुरू असलेले दिवेच फक्त दिसत होते. थोडक्यात होरा चुकला होता. एकतर ही शाखा तशी लहानच आहे. तश्यांत सणासुदीचे दिवस. नुसती झुंबड होती. दारापाशीच असलेल्या दोघांतिघांना विनंती करत करत थोडी आत सरकले. मला दोनतीन कामे करायची होती. पासबुक चेक भरायचा होता. पैसे काढायचे होते लॉकरही उघडायचा होता. प्रत्येक काउंटरपासून लाइन निघालेली दिसत होती पण शेपटाच्या टोकाचा पत्ताच लागेना. सगळ्या रांगा एका ठिकाणी येऊन गुंतल्या होत्या. प्रत्येकाचा चेहरा वैतागलेला, त्रासलेला. बाहेर सुरू असलेली डोकवेगिरी इथेही सुरू होतीच. पाच मिनिटे त्याचे निरीक्षण केल्यावर कुठली रांग कुठे वळतेय याचा थोडासा उलगडा झाला. त्यातल्या त्यात पासबुकाची रांग आटोक्यातली वाटल्याने प्रथम तीच धरली. सुदैवाने चेकही तिथेच भरायचा होता. पाच मिनिटे झाली तरी काम फत्ते करून एकही व्यक्ती मागे आली नाही की रांगही तसूभरही पुढे सरकली नाही. म्हणून मीही डोकवेगिरीचा अवलंब करत अंदाज घेऊ लागले. पाहते तो काउंटरवर सामसूम. खुर्ची मालकाची वाट पाहत रिकामी. अरेच्या! हा काय प्रकार. इथे एसी असून जोरदार घुसमटायला लागलेले, गर्दीचा वाढता जोर आणि चक्क काउंटरचा कर्ताकरवीता गायब. माझ्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्हं पुढच्याने वाचले, " आहेत मॅडम, आलेच म्हणून गेल्यात. दहा मिनिटे झाली पण अजून... " तो असे म्हणतोय तोच मॅडम अवतरल्या.

बाविसचोवीसची मॅडम. केस मोकळे ( केस बर्यापैकी लांब होते ), मोठी उभी टिकली, भडक मेकअप, काळपट लालगडद लिपस्टिक, मोठ्या मण्यांच्या तीन माळा गळ्यात, दोन्ही हातात मोठी रुंद कडी, मोरपिशी पंजाबीवर फ्लोरोसंट कलरची ओढणी. एकंदरीत सगळाच प्रकार भसकन डोळ्यात घुसणारा. कोणीही काहीही घालावे, ज्याची त्याची मर्जी हे खरेच. तरीही प्रथमदर्शनीच आठी पडावी... मॅडम बसल्या तोच फोन वाजला.
मॅडमने शेजारी बसलेल्या कलिगकडे तिरका कटाक्ष टाकताच त्याने तत्परतेने फोन उचलला. फोन बहुदा मॅडमचा असावा, मी पाचसहा फुटांवर असल्याने मला शब्द नीट कळले नाहीत पण काय तो निरोप घेऊन त्याने मॅडमला सांगितला. त्यावर मान उडवून उद्या उद्या असे हातवारे तिने केले. निरोप पोचवला गेला.

संतुष्ट होऊन मॅडमने रांगेत उभ्या असलेल्या पहिल्याच माणसाकडची चार पासबुकं ओढली. चार बोटे नाचवत, इतकी? काय तुम्ही पण... अश्या खुणा करत कीबोर्ड बडवला. इतके होईतो एकही शब्द तोंडातून बाहेर आला नव्हता. मी बुचकळ्यांत. ही मुकी आहे की काय? उगीच ही शंका मला छळू लागली. उपकार केल्यासारखी चारी पासबुकं भरून अक्षरश: त्याच्या अंगावर फेकली. त्याने गरीबासारखी गोळा करत थँक्स देत पळ काढला. अजून दोघे जण असेच उपकार घेऊन गेले.

माझ्या दोन नंबर पुढे एक बाई उभी होती. तिला बराच उशीर झाला असावा. हवालदिल झाली होती. एकदाचा तिचा नंबर आला. जवळपास पाचसहा पासबुकं आणि बरेच चेक्स असा मोठा ढीग तिने मॅडमसमोर ठेवला. तो पाहताच मॅडमच्या कपाळावरची शीर तडकली. हातवारे करून आविर्भावाने, " एकावेळी इतके आणलेस तू? वैताग आहेस अगदी. " तिला म्हणत कीबोर्ड चालू झाला. पहिले पासबुक अंगावर भिरकावले गेले. दुसरे प्रिंटर मध्ये घातले पण त्यावर काहीच उमटेना. बाहेर काढून पुन्हा प्रिंटर मध्ये ढकलले, पुन्हा तेच. शाई संपलीये की काय असे वाटून प्रिंटर उघडला पण तसा एकतर मेसेजही पॉप अप होत नव्हता आणि बहुतेक कार्टरेज नुकतेच बदलले असावे त्यामुळे पुन्हा एकदा पासबुकच ढकलायचा प्रयोग झाला. पण दोघेही अडून बसलेले. मॅडमने ते पुस्तक बाजूला टाकले दुसरे आत ढकलले तर त्यावर पटापटा काळे उमटले. तोच ती बाई म्हणाली, " पोरांनी ज्यूस सांडवला होता त्यावर. " हे ऐकले मात्र मॅडमचे पित्त खवळले. चक्क कमरेवर हात ठेवून उठून उभी राहिली आणि डोळे गरागरा फिरवत त्या बाईला धारेवर धरले. " चूक झाली हो. कारटी ऐकत नाहीत नं. "असे म्हणत त्या बाई गयावया करू लागल्या. एकदाची त्यांची सारी पासबुके चेक्स पार पडले. खाली मान घालून ती बाई गरीबासारखी निघून गेली.

अजूनही माझी शंका फिटलेली नव्हती. ही खरेच मुकी आहे की... ? जर मुकी असेल तर या इतक्या गडबडीच्या काउंटरवर हिला कशाला ठेवलेय तेही इतक्या प्रचंड गर्दीच्या वेळी. बरं हिचा एकंदरीत तोरा पाहता काहीतरी गडबड आहे हे मला जाणवत होते. तशातही मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे बँकेत जास्त करून इतर ऑफिसातले शिपाई, ड्रायव्हर, कामवाल्या बाया पेंशनर यांचाच जास्त भरणा होता. माझ्या लाइनीतील पुढची सगळी मंडळी हीच होती. आणि बहुतेक ती नेहमीच येणारीही होती. मॅडमचा हा तोरा त्यांच्या अंगवळणी पडलेला होता.

मी आधीच ठरवले होते की हिने जर माझ्या अंगावर पासबुक फेकले तर मी तिला ते उचलून द्यायला लावणार तक्रारही करणार. माझ्यामागे लाइन बरीच वाढली होती.बँकेत शिरायलाही जागा राहिली नव्हती. माझा नंबर येताच मी माझी दोन्ही पासबुकं तिच्या समोर धरली. तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहत तिने नंबर टाईप केला. मी दोन वर्षाने पासबुक भरत असल्याने बर्याच एंट्र्या बाकी होत्या. वैतागून तिने माझ्याकडे पाहिले पण काही हातवारे केले नाहीत. मीही मख्खासारखा चेहरा करून तिच्याकडे एकटक पाहतं होते. जर मी दोन वर्षे मायदेशात गेलेच नसेन तर एंट्र्या कश्या करून घेणार? माझी दोन्ही पासबुके प्रिंटून तिने प्रिंटरवर ठेवली. चेकच्या स्लिपवर शिक्का मारून तिचा काउंटर पार्ट पासबुकांवर ठेवला. काहीही भिरकावले मात्र नाही. मी ते उचलून लॉकरच्या दिशेने निघाले.

वाटेत मॅनेजरांची केबिन आहे. तिच्या बाहेर चेक्स तस्तम गोष्टींवर शिक्के मारायला शिपाई बसलेला. त्याला नमस्कार केला आणि विचारले, " का हो, त्या मॅडम मुक्या आहेत का? " कानभर पसरेल इतके हसू उतू चालालेले प्रेम त्याच्या चेहर्‍यावर पसरले. " काहीतरीच काय? निशामॅडम ना? नाही हो. आज ना त्यांचे मौनव्रत आहे. नवरात्रसुरू आहे ना, म्हणून. पण सकाळपासून गर्दीने नुसता वात आणलाय. मॅडम तरी पण निभावता आहेत. " ( किती ते कौतुक, म्हणे मौनव्रत आहे. कमालच आहे. स्वत:च्या पोरीने घरी मौनव्रत घेतले असते तर तिचे इतके कौतुक केले असते का यांनी? ) उघडपणे , " वा! वा! मौनव्रत आहे का? तेही ऑफिस ड्यूटीमध्ये? आणि अश्या टेबलवर? छान हो छान. पण, लोकांना त्रास होतोय त्याचा. आणि त्या तुमच्या निशामॅडम डोळ्यांनी हातवारे करून लोकांवर खेकसत आहेत, त्याही उगाचच, त्याचे काय? " " काय मॅडम, काहीही. अहो लहान पोर आहे, चालायचेच. थोडे लाड होणारच की, काय? "

मॅनेजर आतून आम्हा दोघांकडे पाहत असावे. त्यांनी मला खुणेने आत यायला सांगितले. मी आत जाताच, " काय झाले? काही प्रॉब्लेम आहे का? " असे विचारले. मी माझा निषेध नोंदवला. निशामॅडमनी मौनव्रत धारण करण्याबद्दल माझा मुळीच आक्षेप नव्हता. त्यांच्या एकंदरीत वागणुकीचाच मला त्रास झालेला. ' ग्राहक देवो भव ' ही तुमची टॅगलाइन आणि नेमके त्यालाच ही ट्रिटमेंट. मॅनेजरांनी लगेच गुळमुळीतपणा सुरू केला. " अहो तसे नाही. नवरात्र वर्षातून एकदाच असते. त्यातून हौसेने निशाने मौनव्रत ठेवलेय. सांभाळून घ्या. तुमचे कुठले काम अडलेय का? द्या मी करवून घेतो. " " अहो पण मग त्यापेक्षा तुम्ही आजचा दिवस दुसर्‍या कोणाला तरी तिथे बसवायचे आणि निशामॅडमला खाली लोन डिपार्टमेंटला पाठवायचे ना. कस्टमरला निष्कारण ताप कशाला. " आता सौजन्य जाऊन मॅनेजर ही थोडे तडकल्यासारखे दिसू लागलेले. " बरं बरं मी पाहतो. तुम्हाला अजून काही काम आहे का? नसेल तर मला कामे आहेत. " म्हणजे यांना कामं आणि मी रिकामटेकडी. थोडक्यात हा मला, ' फूटा इथून ' चा इशारा होता. निशामॅडमच्या मिरवण्याला या सगळ्यांची फूस होतीच.

मला लॉकरही उघडायचा होता. रजिस्टर मध्ये सही केली उभी राहिले. लॉकरचे काम पाहणारे सद्गृहस्थ लगेच उद्गारले, " उतरा तुम्ही, मी येतो. " मी मान डोलवली खाली गेले. दहा मिनिटे होऊन गेली तरी कोणी आले नाही म्हणून पुन्हा वर चढून आले. मला आलेली पाहताच तेच गृहस्थ थोडे ओरडूनच म्हणाले, " मी म्हणालो ना तुम्ही उतरा, मग पुन्हा कशाला वर आलात? चला. " तरातरा जीना उतरून गेले. लॉकर उघडला निघाले वर जायला तोच मी त्यांच्याकडे स्टूल मागितले. त्या आधी मी स्टूल आहे का ते शोधले होते. पण एकतर मोठ्या शिड्या किंवा एकदम छोटी प्लॅस्टिकची डुगडुगणारी स्टूले होती. मध्यम उंचीचे काहीच नव्हते. खुर्चीही नव्हती. मी शोधाशोध करून झाली आहे हे त्यांनी पाहून झाल्याने, " पाहा जरा इथेतिथे. सापडेल तुम्हाला." असे त्यांना म्हणता आले नाही. " मी वरून पाठवतो शिपायाबरोबर. " असे म्हणून ते निघून गेले. पाच सात मिनिटे झाली. कोणीच आले नाही. लॉकर उघडा सोडून मला जाता येईना. शेवटी दोन छोटी स्टूले एकावर एक ठेवून कसरत करत मी कसेबसे काम आटोपले वर येऊन त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिले. " स्टूलाचे काय झाले? " " मी शिपायाला सांगितले होते. त्याने दिले नाही का तुम्हाला? अरे xxx कुठे तडमडलास? एक काम करायला नको याला. मॅडम आत्ताचे तुमचे काम झालेय ना. पुढच्या वेळी स्टूल देण्याची व्यवस्था करतो. " असे म्हणून त्यांनी रजिस्टर मध्ये जे डोळे घातले ते वरच केले नाहीत.

मी पुन्हा मॅनेजरसमोर.... " खाली स्टूल नाही. कशावर चढून लॉकर उघडायचा? माझे सोडा, उद्या माझी सत्तरीच्या पुढची आई-बाबा आले की मग ते कसे उघडतील लॉकर अशी कसरत करत? तसे करताना ते पडले तर कोण जबाबदार? आणि त्यांचे हाल तुमच्यामुळे का म्हणून व्हावेत? इतक्या चिंचोळ्या जागेत शिड्या पोचत नाहीत हे माहिती आहे ना तुम्हाला? मग तिथे जवळपास शंभर लॉकर असतील. त्या सगळ्यांनी ही अशीच सर्कस नेहमी करायची का? कधीपासून मी खाली वाट पाहत होते पण कोणीही येऊन स्टूल दिले नाही की ते नाहीये असेही सांगितले नाही. याचा अर्थ काय? तुम्हाला वेळ नाही आणि मला काम नाही असा समज झालाय का तुमचा? "
" अहो तुमचे काम झालेय ना आत्ताचे. मग झाले तर. होते कधी अशी गडबड. कामाच्या घाईत विसरले असतील ते. तुमचे आईवडील आले ना तर मी स्वत: त्यांना स्टूल देईन. काळजी करू नका. या आता. " मनातल्या मनात त्यांनी मला दिलेल्या शिव्या मुखवट्याआडूनही दिसत होत्या.

बँक एकच पण दोन निरनिराळ्या शाखांमध्ये इतकी दोन टोकांची वर्तणूक. एकीत, ’ ग्राहक म्हणजे राजाइतके सहकार्य. अतिशय आपुलकीने कामे करतात की कौतुक केल्यावाचून राहवत नाही. ज्येष्ठ नागरिकांची तर खास काळजी. अगदी रजिस्टर समोर आणून सह्या घेतलेल्या पाहिल्यात मी. आणि त्याच बँकेचीच हीही एक शाखा. प्रत्येकजण उर्मट. लॉकरवाले, एफ् डी डिपार्टमेंट तर विचारूच नका. काहीही विचारले की लगेच उडवाउडवी सुरू. ओळखीतल्या बर्‍याच लोकांनी त्यांचे अनुभव ऐकवले होतेच. दिवसातून खूप पासबुके, चेक्स भरले जात असतील. काम खूप पडत असेल. मान्य. पण याचा अर्थ तुम्ही उपकार करता आहात का लोकांवर? पगार मिळतोय ना? आणि नसेल झेपत तर सोडून द्या नं. गोड बोलणे दूरच पण निदान हडतुड करू नका. लेखी तक्रार करायची इच्छा असूनही माझा नाईलाज होता. लगेचच उडायचे होते. पाठपुरावा करणे शक्य नव्हते.

ज्यांचा सतत जनतेशी संपर्क येत असतो त्यांनी कसे वागावे कसे वागू नये याचे नियम काटेकोर पाळायलाच हवेत. नुसत्याच मोठ्या मोठ्या जाहिराती करायच्या. सौजन्य फक्त एका सप्ताहापुरते वागवून उरलेले ५१ आठवडे ही मनमानी....
‍ ‍ ‍ ‍ ‍ ‍ ‍ ‍ ‍

26 comments:

  1. कदाचित परदेशवासियांकडून लेखी तक्रार येते आहे म्हणून त्याला महत्व दिले गेले असते आणि अधिक गतीने त्यावर उत्तर शोधले गेले असते...ही शक्यता आहे आणि ती नाकारता येत नाही. आपल्याला हे करायलाच हवं. वेळ नाही म्हणून ते टाळून होणारं नाही. कारण आपण जातो निघून आणि आपले कुटुंबीय रहातात त्याच परिस्थितीत झगडत. :(
    आणि ही स्टेट बँक होती का? तेथील एकूणच कर्मचारी असे अरेरावी करणारे आहेत. बायका अधिक. त्यांना आदल्या दिवशी बघितलेल्या सिरीयलमध्ये अधिक इंटरेस्ट असतो!

    ReplyDelete
  2. अनघा,मलाही शंभर टक्के मान्य आहे की तक्रार करायलाच हवी. मला लेखी तक्रार करायचीच होती. तोंडी केलेल्या तक्रारीला त्यांनी कसे उडवले ते पाहून तर अजूनच कटकट झाली होती. म्हणून मी दुसर्‍याच दिवशी पहिल्या शाखेत जाऊन ओळखीच्या लोकांना हे ऐकवून तक्रार कुठे करता येईल ची विचारणा केली असता, तुम्ही इथे राहत नसल्याने फारसा उपयोग होणार नाही असे मत दिले गेले. :(

    ही स्टेट बँक नव्हे. मात्र हे सिरीयल कमेंट्स व फोन प्रकरण इथेही जोरदार होतेच...

    ReplyDelete
  3. अगं, केलेल्या तक्रारीचा उपयोग होईल की नाही ही दुय्यम बाब. पण उपयोग होणार नाही आणि म्हणून काही न करणे हे बरोबर वाटत नाही. आणि आपण आम जनता नेहेमी हेच करतो आणि मग समस्येवर कधीच काही उत्तर निघत नाही. :)

    ReplyDelete
  4. एकदा नाही तर दोनदा तोंडी तक्रार केलीच की. लेखी तक्रार करणारा समोरच नसेल तर अर्ज डब्यात जाईल असे म्हटंल्यावर काय करायचे? ( कदाचित ही मिलीभगत असू शकेल... ) :(

    ReplyDelete
  5. हाहाहा... औ मैडम, इंड्या मै म्युच्युअल अंडरस्टॅंडिंगपे सबकुछ होता है... आजकल अपनभी यहीच अनुभव कर रा... ;) :P :D

    ReplyDelete
  6. बॅंक कोअऑपरेटीव्ह होती नां... म्हणून असं झालं . सगळे नोकरी करणारे वशिल्याचे पिट्टू असतात अशा बॅंकात ( अर्थात काही सन्माननीय अपवाद वगळून). ICICI, SBI वगैरे बॅंक्स जरा तरी बऱ्या आहेत..कम्प्लेंट केली की अ‍ॅक्शन घेतली जाते.

    ReplyDelete
  7. अगं अगदी हाच अनुभव येतो गं सगळीकडे... मी तर अमितला बाहेर उभा करते सरळ... त्याचे तर भांडणच होते डायरेक्ट....
    स्टेट बॅंकेत तर मी बाबांची ढाल पुढे केल्याशिवाय शिरतच नाही... ते असले की ओळखीने कामं होतात जरा... :)

    कितीही तक्रारी केल्या तरी काही फरक पडत नाही पण...आणि भारतातल्या लोकांना सवय झाल्यासारखी वाटते आणि आपण तक्रारी करणारे वेडे ठरतो...पण...स्टेट बँकेत लेखी तक्रार केली तर व्यवस्थित उत्तर मिळते!!

    ReplyDelete
  8. dont worry! leave it to me. send your complaint by mail to that bank and a copy to me
    I WILL set it right . let it be any bank !!

    ReplyDelete
  9. मी दोनवेळा डेबिट कार्डासाठी अर्ज भरून दिला. दोन्ही वेळा कार्ड आलं नाही. चौकशी करायला ऑफिसला जाता जाता बँकेत गेलो तर मला म्हणाले दुपारी तीन नंतर या. म्हणजे काय आम्ही पिकनिकला आल्यासारखं दिवसभर जेवणखाण घेऊन तिथे तळ ठोकायचा का?
    माझं आणि बायकोचं असं प्रत्येकी एक अकाउंट होतं. मला एकच पण जॉइंट अकाउंट हवं होतं. त्याबाबत माहिती देताना त्यांनी इतका घोळ घातला की शेवटी मी वैतागून अकाउंट बंद केलं. त्यातही घोळ. बॅलन्स नाही म्हणून २५० रुपये दंड आणि माझ्या खात्यात २२५ रुपये फक्त म्हणून त्यांची ऑटोमेटेड सिस्टीम खातं बंद करेनाच. शेवटी पासबुक आणि चेकबुक त्यांच्या समोर ठेउन "तुम्हाला काय हवं ते करा" हे सांगून तिथून बाहेर पडलो.

    स्टेट बँक ऑफ इंडिया, पौड रोड

    ReplyDelete
  10. सौरभ, अरे इतके मख्ख चेहरे. जणू हसले तर यांना तुरुंगातच डांबतील. बाकी त्यांचे आपसातले बॊंडिंग जबरी आहे....:D

    ReplyDelete
  11. महेंद्र, अजूनही सर्रास वशिल्याचे तट्टू भरले जातात? :( हे प्रकरण इथेच नाही संपले. मी पुन्हा लॊकरसाठी गेले असता स्टूल मिळालेच नाही. वर स्टूल मोडलेय नवीन मागवणार आहोत मग ठेवू. मग ते येईतो लोकांनी काय करायचे? का घरनं स्टूल बरोबर घेऊन जायचे? वैताग वैताग आहे नुसता...

    आभार.

    ReplyDelete
  12. तन्वी, अगं समोर आलेल्या माणसाशी दोन शब्द मृदू स्वरात बोलणे, चेहर्‍यावर इंचभर हास्य आणणे, लोकांची अडचण, काय काम आहे ते ऐकून घेणे हे करणे इतके अवघड आहे का? मीही अठरा वर्षे नोकरी केली तीही सरकारी खात्यात. माणसांचा सतत राबता. पण इथे मुळी चेहर्‍यावर नकाराचाच पाढा. काहीही विचारा," नाही पण ते असे होऊच शकत नाही " हीच मुळी सुरवात.

    गरज आपल्याला आहे गं. तक्रारी केल्या की पध्दतशीर ’निक्का” लावतात. प्रत्येक माणसाचे कोणी ओळखीचे असेल बॆंकेत असे होऊ शकत का? आणि हे योग्य आहे का?

    ReplyDelete
  13. राजीव, धन्यवाद. मी विरोपात लिहीते तुम्हाला.

    ReplyDelete
  14. श्रीताई,
    अगं हल्ली शहरांमध्ये बर्‍याच ठिकाणी असले अनुभव येतात. बहुतेक प्रचंड वाढलेल्या लोकसंख्येमुळे ह्या लोकांवर कामाचा प्रचंड ताण येतो अन त्यामुळे हे प्रकार वाढताहेत. पण ह्याचा अर्थ हा होत नाही, की किमान सौजन्य ठेवावं.
    हल्ली सगळीकडे अरेरावीनं कामं चालवायचा ट्रेंडच आलाय. अन बहुतेक तिनं तुझं पासबुक फेकलं नाही कारण तू च्यामारिकेतनं आलीयस ना! ;)

    ReplyDelete
  15. मंदार, असे अनुभव आले की बॆंका आपल्याला सेवा देत आहेत का उपकार करत आहेत हेच समजेनासे होते. :( खाते ( त्यांच्याकडेच तुमचे दोघांचे खाते असूनही ) उगडतानाही घोळ आणि बंद करतानाही घोळ. माणसाने करायचे तरी काय? आशा आहे तुमच्याकडून २५ रुपयांची वसुली करण्याचा प्रयत्न केला नसेल.

    धन्यवाद.

    ReplyDelete
  16. विद्याधर, अरे उलट मी च्यामारिकेतून आले आहे असे कळले असते तर नक्कीच भिरकावले गेले असते. कुठले सौजन्य घेऊन बसलास बाबा तू. :(

    कामाचा ताण आहे मान्य आहेच. पण काम दोन पाळ्यांत चालते ना. मधे बॆंक बंद असते. शिवाय काही जण फक्त एका वेळेसच काम करतात.

    ReplyDelete
  17. मी कायम कस्टमर फेसिंग/ कस्टमर साईटवरच काम केलं असल्याने (आय टी) कस्टमर्स कसे आपले अधिकार वापरून कामं करवून घेतात याचा नित्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी मी असा कस्टमरच्या रोल मध्ये येतो ना तेव्हा मीही कस्टमर म्हणून माझा हक्क पुरेपूर वापरतो. असं काही झालं की सरळ लोकलज्जा सोडून आवाज चढवून नडायला लागायचं. अनेक हॉटेल्स, आईसक्रीम पार्लर्स, बँक्स, फोटोशॉप्स अशा अनेक ठिकाणांहून मी आत्तापर्यंत नडून डिश अर्धवट टाकून/ ऑर्डर कॅन्सल करून निघून आलोय. अजून एक करायचं.. ताबडतोब त्यांच्या वेबसाईटवर जाऊन भलीमोठी कम्प्लेंट करायची. अशा रीतीने केलेल्या कम्प्लेंटवर अ‍ॅक्शन घेतली जातेच जाते असा माझा आजवरचा अनुभव आहे. आणि पुन्हा तुम्हाला उत्तर म्हणून मेल/फोन वर माफी आणि काहीतरी डिस्काउंट कुपन वगैरे येतं ते वेगळंच... :)

    जोक्स अपार्ट पण आपण ग्राहक म्हणून जोवर आपले अधिकार ओळखत नाही आणि ते योग्य रीतीने वापरत नाही तोवर काही होत नाही. काम जस्त आहे स्टाफ कमी आहे ही कारणं ग्राहकाला कशाला ऐकवताय तुमच्या मॅनेजमेंटला ऐकवा असं सांगायचं..

    ReplyDelete
  18. मला वाटल (हे प्रत्येकालाच वाटत असणार!) की फक्त 'माझ्या' बँकेत अस घडत! पण 'बँके बँकेत तोच प्रकार' म्हणायचा!

    ReplyDelete
  19. खरं आहे भाग्यश्री . फार त्रास होतात अशा ठिकाणी.

    ReplyDelete
  20. हेरंब, तुझे म्हणणे मी ही जितके जमेल तितके अमंलात आणायचा प्रयत्न करतेच. असे मागे एकदा आम्ही कॊन्टिनेंटल ला जाम नडलो होतो. मग आले सरळ लाईनवर.

    काही लोकं जाम उर्मट आणि बेदरकार असतात. त्यांच्याकडे काम घेऊन गेलं की पहिली आठी कपाळावर. तू म्हणतोस तसे तिथल्या तिथे आवाज चढविणे जमायला हवे. नाहितर निभाव लागणे मुश्किल आहे.

    धन्यू रे.

    ReplyDelete
  21. aativas, एकंदरीत परिस्थिती कठिण होत चालली आहे. :(

    ReplyDelete
  22. श्रीराज, हो रे. संताप संताप होतो अगदी.

    ReplyDelete
  23. parichit, या अशा अनुभवांमुळे चांगले काम करणारेही भरडले जातात. :(

    प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.

    ReplyDelete
  24. खरेय तुझे म्हणणे. उठसूट जर वरच्या अधिकार्‍याकडे जायची वेळ येऊ लागली तर... :(

    ReplyDelete
  25. I made a complaint against SBI bareilly to SBI-cusomercare Lucknow. The manager came in person to my college to say sorry....

    But when I send complaint to SBI Mumbai in another case, there was no reply :(

    mi airtelshi itakya vela bhandalo ki customer care vali ek punjabi mulgi olakhichi zali hoti :)

    ReplyDelete
  26. विजय, स्वागत व अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

    अरे बापरे! एअरटेल म्हणजे एक भयंकर शिक्षा आहे. त्यांचे राम मारूती रोड वरचे म्हणजे प्रकरण आहे प्रकरण. एक से एक नमुने भरलेत. बचाव बचाव... हे म्हणतच जायचे तिथे... :(

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !