जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, January 17, 2013

गुळाची पोळी


संक्रांत आणि तिळाचे लाडू, वड्या, तिळगूळ, गुळाची पोळी हे समीकरण अगदी हवेहवेसेच. वर्षभरात आपण चिक्की किंवा वड्याही खातो पण सहसा गुळाची पोळी केली जात नाही. माझ्याकडून तरी नाही होत. तसेच आपल्याकडे या सगळ्या परंपरांमागेही एक धारणा दडलेली आहे. थंडीचा कडाका पडलेला असतो. त्वचा फार कोरडी, शुष्क जाणवते. शरीराला उष्णतेची, इंधनाची गरज तीव्रतेने जाणवते. मला आठवतेय माझी आजी दर शनीवारी चुकता वाटीत खोबरेल तेल घेऊन गरम करून संपूर्ण अंगाला लावत असे. ८४ वर्षापर्यंत तिच्या त्वचेची तकाकी आणि पोत इतका सुंदर होता. रोज मॉश्चरायजर लावले तरी तेलाइतका परिणाम बहुदा होत नाही. आजी, आई चुकता संक्रांतीला वड्या, लाडू गुळाची पोळी करतच करत. विशेषतः: पोळी हटकून होत असे. आई अजूनही करते. आजकाल घरटी माणसांची संख्या रोडावत चालली आहे. दोघच दोघं. असे घाट घालावा तर खाणार तरी कोण असा प्रश्न पडतोय. पण तरीही ही गुळपोळी, होळीला पुरणाची पोळी, पाडव्याला श्रीखंड, गणपतीला मोदक दिवाळीचा फराळ करायचाच असे ठरवून टाकलेय. या गोष्टी वारंवार होत नसल्याने दरवेळी थोडीशी धाकधूकच वाटते. तश्यांत जर केल्याच गेल्या नाहीत तर जमायच्याच नाहीत आणि इथे विकत मिळणार नाहीत.

" संक्रांतींच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!! "
" गुळाची पोळी अतिशय खुसखुशीत, खमंग झालीये. ती खाऊन तोंड गोड करा आणि गोड बोला !!! "


साहित्य :

पिवळा गूळ चार वाट्या

अर्धी वाटी खसखस,

अर्धी वाटी चण्याच्या डाळीचे पीठ

दोन चमचे तीळ भाजून पूड करून

तांदळाची पिठी एक वाटी

सहा वाट्या कणीक

एक वाटी तेल

चवीपुरते मीठ

एक चमचा वेलदोड्याची पूड

दोन चमचे बदाम+काजूची पूड ( ऐच्छिक )

कृती :

फार कडक नाही लिबलिबीतही नाही असा चांगल्या प्रतीचा मऊसर पिवळा गूळ किसून घ्यावा. कुटूनही घेऊ शकतो. मात्र कुटताना खलबत्त्यात थोडे तेल घालावे म्हणजे खाली चिकटणार नाही. मी गूळ किसून घेते. खसखस तीळ मंद आचेवर भाजून पूड करावी. डाळीचे पीठ चमचाभर तेलावर बदामी रंगावर आंच मंद ठेवून पक्के भाजावे. किसलेला ( वा कुटलेला ) गुळात खसखस+तिळाचे कूट, डाळीचे पीठ, वेलदोड्याची बदाम+काजूची पूड घालून चांगले मळावे. गुळात खडे, गठुळ्या बिलकूल नसाव्यात. एकसंध गोळा व्हायला हवा. अन्यथा लाटताना हटकून चिरा पडतील.


कणकेमध्ये अर्धी वाटी तेल गरम करून घालावे. चवीपुरते मीठही घालावे. कणीक घट्ट भिजवावी. गुळाचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यावे. कणकेचेही गोळे करून घ्यावेत. एका पोळीला दोन गोळे हवेत त्यातील एक गुळाच्या गोळीपेक्षा किंचित मोठा असावा. कणकेच्या दोन गोळ्यांमध्ये गुळाची गोळी ठेवून दोन्ही कडा नीट जुळवून बंद करून घ्याव्यात. तांदुळाच्या पिठीवर हलक्या हाताने पातळ पोळी लाटावी. पोळी लाटताना गूळ नीट कडेपर्यंत पसरेल असे पाहावे.


तवा गरम करून घेऊन मध्यम आंचेवर हलकेच पोळी टाकून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यावी. पातळ केलेले तूप त्यावर पसरवून गरम गरम खावी. गुळाची पोळी थंड झाली तरी छान लागते. आता घरोघरी मायक्रोव्हेव आहेत. टिशू पेपरमध्ये गुंडाळून तीस सेकंद ठेवून खाल्ल्यास नुकतीच केल्यासारखी चव लागेल. शिळी गुळाची पोळीही अप्रतिम लागते. थोडक्यात काय कशीही खाल्लीत तरी आवडणारच. :)




टीपा :
  
गूळ चांगला असणे हे फार महत्त्वाचे आहे. ओला जास्त आंबल्यासारखा वास येणार गूळ अजिबात घेऊ नये. तसेच अतिशय कोरडा, कडक गूळही घेऊ नये. गूळ फार वेळ किसून-कुटून उघडा ठेवून देऊ नये.


कणकेत तेलाचे मोहन घालायलाच हवे. हा पदार्थ फारच क्वचित केला जातो त्यामुळे तो करताना उगाच हात आखडता घेऊ नये. जे गरजेचे आहे ते तितक्या प्रमाणात घातले नाहीतर सगळे मुसळ केरात. पोळी लाटतानाच जर फुटली, चिरा गेल्या तर मग ती भाजताना फार कटकट होते.

गुळाची पोळी खाताना भरपूर साजूक तूप घालून खावी. मनात डाएटाचा विचार अजिबात आणू नये. :)


28 comments:

  1. हा सल्ला आवडला.. "गुळाची पोळी खाताना भरपूर साजूक तूप घालून खावी. मनात डाएटाचा विचार अजिबात आणू नये. :)
    "

    ReplyDelete
  2. गोड, अगदी गुळाच्या पोळी सारखा.....

    ReplyDelete
    Replies
    1. विजय ब्लॉगवर स्वागत आहे व धन्यवाद! :)

      Delete
  3. आधी डाएट्वर,व्यायामावर पोस्ट लिहायची मग गुळाचे पोळी सुद्धा दाखवयाची...ह्म्म्म्म्म्म..निषेध !!!

    ReplyDelete
    Replies
    1. हाहा.. मला वाटलेलेच. आता पुढल्यावेळी तुला खिलवते म्हणजे तुझा निषेध विरघळून जाईल बघ. :)

      Delete
  4. Last sentence of post is MOST IMPORTANT PART

    ReplyDelete
    Replies
    1. ब्लॉगवर स्वागत आहे! त्याशिवाय गुळाची पोळी पूर्णत्वास जात नाही नं. :)

      धन्यवाद!

      Delete
  5. Agree with 'Mau' in the comments. :) Me pan goad nako mhanun kelya nahit ya veli aani aata he baghun pani sutalay tondala. :)

    ReplyDelete
    Replies
    1. अगं, छोट्या छोट्या कर हव्या तर. हारोळ्य़ांच्या आकाराच्या. लेकीलाही आवडतील. :)

      धन्यू गं!

      Delete
    2. तू विणकाम घे परत करायला, ब्लॉग नकोच... गुळाच्या पोळ्या, हारोळ्या वगैरे एकाच पोस्ट मधे गुंफायला लागलीयेस :)
      हारोळी तरी करते आता लग्गेच :)

      Delete
    3. अगं ते करतेच आहे. :) केल्यास का मग हारोळ्या?

      Delete
  6. गूळपोळी हा प्रकारच डायेटचा विचार मनात न येऊ देता खाण्याचा आहे :) पूरण पोळी कितीही आवडली तरी दीड फार तर दोनच्या वर पोटात जात नाही. खमंग मात्र गूळपोळी कंट्रोल ही नही होता टाइप्स :)

    ReplyDelete
    Replies
    1. मस्त लागते नं. दुसर्‍या दिवशी अजून मुरल्यासारखी लागते. :)

      धन्सं गं!

      Delete
  7. >>गुळाची पोळी खाताना भरपूर साजूक तूप घालून खावी. मनात डाएटाचा विचार अजिबात आणू नये. :) +++ :)

    बयो अगं निषेधू की नको... त्याऐवजी मला आणि नचिकेत दादाला गरम पोळ्या वाढण्यात याव्या असा आदेश देते (विनंती समज गं हवी तर :) )

    ReplyDelete
    Replies
    1. आदेश पाळला जाईल. कधी येतेस ते सांग... :)

      आमचा मोगॅम्बो खुश झाला गं! :D

      धन्यू बयो!

      Delete
  8. गुळाच्या पोळ्या हा जीव की प्राण आहे माझा... !! (पत्ता आहेच तुझ्याकडे ;))

    रच्याक, ब्लॉगोबाचं नवीन रुपडं झक्कास एकदम !

    ReplyDelete
    Replies
    1. पुढल्या यॉर्काच्या फेरीत.. :)

      धन्यू रे!

      Delete
  9. bhannat....tondala...pani sutale....mastchhhhhh....shaniwari karun pahtochhhhh

    ReplyDelete
    Replies
    1. जमतील जमतील. जरा धीराने घे बरं... :)

      कळवशील..

      Delete
  10. वॉव कसल्या मस्त दिसताहेत..मी येताना विकत घेऊन आलेय आणि त्या पुरवून खातेय म्हणून यंदातरी तितकी फ़िकिर वाटत नाही. पण पुढच्या वर्षीचे काय ;)
    असो..बाकी तू ते वर म्हटलेस नं की सणाप्रमाणे पदार्थ केले जावेत मी पण यंदा प्रयत्न करणार आहे...
    संक्रातीच्या (उशीराने शुभेच्छा)

    आणि ब्लॉग अतिचशय सुंदर नटवला आहेस....

    ReplyDelete
    Replies
    1. मायदेशाहून येतांना ही थोडीशी चंगळ करता येते नं. पुढल्यावर्षी तू करशील की. :)

      आभार्स!

      Delete
  11. taai,
    vaachun tondala paani sutale!

    Pushpa

    ReplyDelete
  12. Last sentence is very imp..and true..mastch..गोड, अगदी गुळाच्या पोळी सारखा...

    ReplyDelete
  13. परेश, ब्लॉगवर स्वागत आहे व मन:पूर्वक धन्यवाद! :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !