जाता जाता एक नजर इथेही........

Monday, January 16, 2012

फिरणी

कोणालाही जेवायला बोलवायचे म्हटले की भाज्या- ओल्या-सुक्या, भाताचा प्रकार, डाव्या बाजूला तिखटमाखट, रायते, कोशिंबीर, चटण्या.... हे सगळे पटापट ठरते. एकदा का ' दिशा ' ठरली की मग एकमेकांना पूरक पदार्थ आपोआप समोर येतात. पण गोडाची गोची होते. श्रीखंड, बासुंदी, शिरा, शेवयांची खीर, गुलाबजाम, रसगुल्ले, सारखे पदार्थ सारखे सारखे होत असल्याने नकोसे होतात. त्यात एकंदरीतच गोडाचा कल अनेक कारणांनी कमी होऊ लागलाय. आधीच्या भरभक्कम जेवणानंतर काहींना गोड नकोसेच असते. किंवा जिभेवर रेंगाळणारी चटपटीत चव घालवायची नसते. किंवा गोड हवे असले तरी ते गोडमिट्ट व जड प्रकारात मोडणारे नको असते. त्यातून तीनचार कुटुंबे असतील तर घरातली धरून माणसे होतात पंधरा-सोळा. म्हणजे एकतर बाहेरून काहीतरी आणा नाहीतर मोठा घाट घाला. अशावेळी वारंवार न होणारी, करायला एकदम सोपी आणि पोटाला अजिबात तडस न लावणारी थंडगार फिरणी बाजी मारून जाईल. छानपैकी मडक्यात भरून, त्याचे तोंड फॉईलने बंद करून आदल्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवली की काम फत्ते.

वाढणी : सहा ते आठ मडकी ( कुल्फीचे मध्यम आकाराचे मटके मिळतात ते घेतल्यास आठ भरावीत )

साहित्य : दोन वाट्या तुकडा बासमती किंवा आंबेमोहोर। ( शक्यतो वासाचा तांदूळ घ्यावा ) सव्वा लिटर दूध, एक चमचा तूप, अडीच वाट्या साखर, बदामाचे -पिस्त्याचे पातळ काप, गुलाबपाणी, खस.

कृती : तांदूळ धुऊन रोळीत (गाळणीवर) थोडावेळ टाकून ठेवावे। खडखडीत कोरडे झाले की कढईत एक चमचा तुपावर मंद आचेवर पाच मिनिटे परतून घ्यावे. थंड झाले की मिक्सरमधून काढावे. बारीक रवा होईल इतपत वाटायला हवेत. एकीकडे जाड बुडाच्या पातेल्यात दूध तापत ठेवावे. दुधाला तीनचार उकळ्या आल्यावर वाटलेला तांदुळाचा बारीक रवा घालून चांगले ढवळावे. अजून एक उकळी फुटू लागली की साखर घालावी. मिश्रण हालवत राहावे. तळाला लागू देऊ नये. मिश्रण घट्ट होऊ लागले की ज्या भांड्यात किंवा मडक्यात काढावयाचे आहे त्यात ओतून त्यावर बदामाचे-पिस्त्याचे काप लावून गुलाबपाणी/खसाचे थेंब टाकावेत. मिश्रण जरा कोमट झाले की फ्रीजमध्ये ठेवावे. जसजसे थंड होईल तसे घट्ट होईल. जेवण झाले की ही सेट झालेली मडकी द्यावीत. मडक्यातली थंडगार शुभ्र फिरणी-आकर्षक सजावट पाहूनच मंडळी खूश होतील.

टीपा:
तांदूळ न भाजता नुसताच कोरडा करून बारीक वाटून घेऊन फिरणी करता येते. तीही चांगली लागते. परंतु भाजल्याने तांदूळ हलका होऊन जातो व पटकन शिजतो.
मात्र तांदूळ भाजताना मंद आचेवरच भाजायला हवा तोही अगदी पाच मिनिटेच. तांदळाचा पांढरा रंग बदलता नये. तूप एक चमचाच टाकावे. फिरणी तयार झाल्यानंतर त्यावर ओशट तवंग दिसता नये.

दूध आणि नंतर मिश्रण बुडाला अजिबात लागता नये. लागल्यास तो लागल्याचा जळका वास संपूर्ण मिश्रणाला येतो. म्हणून फिरणी करायला घेतल्यावर समांतर इतर कुठलीही कामे करू नयेत. गॅससमोरून हालू नये. अन्यथा एकतर सगळे परत करावे लागेल किंवा तसेच ढकलले तर प्रत्येक घासाला किंचितसा जळकट वास व चव जाणवत राहील. आधीच्या मस्त जेवणाचा बेरंग होईल.

चारोळीही घालतात पण मी घालत नाही, बरेचदा त्या कडूच असतात. गुलाबपाणी व खस हे दोन्ही मी एकत्र वापरलेत. चांगले लागतात. ज्यांना दोन फ्लेवर एकत्र करायचे नसतील त्यांनी फक्त एकच घालावा.

28 comments:

  1. आमच्याकडे निळा सोमवार असला की तुमच्याकडे नेमकी गोडाची गोची होते असं काही आहे का ग??
    मला ती मडकी हवी आहेत....ती माझी आहेत...बसं बाकी कुणाच्या प्रतिक्रिया यायच्या आत मी त्यांच्यावर हक्क सांगून ठेवला आहे हे ध्येनात असुद्या ताय...

    ReplyDelete
  2. Okkk! So you can make 'firni' also ! Great ! मी यादी बनवतेय तू परत आलीस की काय काय तुला करायला लावायचं ! ;) :)

    सुंदर गं ! :)

    ReplyDelete
  3. तोंडाला पाणी सुटलं गं!!! :)''


    शी:! तू माझी खरोखरची बहिण पाहिजे होतीस. दर विकएंड-ला तुझ्या कडे आलो असतो आणि हे सगळे पदार्थ तुला करायला लावले असते :D

    ReplyDelete
  4. या तयार फिरनीवर अपर्णाने आधीच क्लेम लावलाय. त्यामुळे आता तू परत इकडे आलीस, म्हणजे अनघाची यादी तिच्याबरोबरच मलाही खिलव ;)

    ReplyDelete
  5. श्रीराज अरे ताई ज्यांच्याकडून शिकलीये ती म्हणजे श्रीताईची आई.... तिच्या हातचं जेवण जेवलेय मी, आणि दिवाळीचा फराळही.... हाताला चव असणे म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायचं असेल तर काकूंकडे जावं असा माझा सल्ला आहे :) ....

    बाकि बयो कातिल दिसतेय ती फिरनी... मडकी अपर्णाकडॆ गेलीत म्हणून आता फकस्त फिरनी घ्यायचा विचार चाललाय :)

    बयो मस्त दिवस पाहून गोडाचा बेत आखलास... खरी माझी ताई तू :)

    ReplyDelete
  6. वॉव...मला हवे...

    ReplyDelete
  7. अप्रतिम! पोस्टही आणि फिरनीही!:)

    ReplyDelete
  8. आई शप्पत !! तोंडाला पाणी फिरलं... सॉरी सुटलं :)

    ReplyDelete
  9. अहा!!!
    तोंडाला पाणी सुटलं

    ReplyDelete
  10. अपर्णा, मडकी ठेवलीत गं! :)

    ReplyDelete
  11. अनघा, चांगले दोन दिवस भटकायला जाऊया. कुठे कळाले नं... :) मग तिकडे काय म्हणशील ते खिलवते.

    ReplyDelete
  12. श्रीराज, मी मायदेशी आले की ये नं... :) म्हणजे इथेही तुझे स्वागत आहेच बरं का.

    ReplyDelete
  13. गौरी अगं अपर्णा ने मडक्यांवर क्लेम लावलाय. :D तू फिरणीवर ताव मार कसा तो...

    बाकी भटकंतीच्या बेतात तू हवीसच.

    ReplyDelete
  14. तन्वी, कैसे पर्फेक्ट ओळख्या. :) खास तुझ्यासाठीच होती ती. आणि एक रोहनासाठी. :D:D ( आता म्हणेल झाली हीची सुरवात... )

    यस्स! आमच्या मातोश्रींची बातच न्यारी ! अगं कोंड्याचा मांडा करावा कसा वो बस वहीच जानती हैं । माय झिंदाबाद !

    ReplyDelete
  15. उमा, विनायक फिरणी देऊनच धन्यवाद करतेय. :)

    ReplyDelete
  16. हेरंब, ये फिरत फिरत फिरणी खायला. :D


    धन्सं BB !

    ReplyDelete
  17. आमच्या कडे रथसप्तमीला केली जाते. मोठ्या मडक्यात शिजवून मग लहान भांड्यात ट्रान्स्फर.... :)

    ReplyDelete
  18. aajach karun baghitali firani.
    nawrobala aawadali (aamhala lawakar khayachi ghai asate tyamule 3 tasach freeze madhe thewali).

    ReplyDelete
  19. मस्तच....शुभस्य शीघ्रम ....करून बघते लगेच ....धन्यवाद !! फोटो पण मस्तच आला आहे...:)

    ReplyDelete
  20. अपर्णा, अनघा, गौरी आणि तन्वे.. सर्वांचा क्लेम रद्द.. मै असताना तुमका कायका क्लेम??? हवा आने दो... ये बयो अपुनके गल्लीवाली है... :D

    ReplyDelete
  21. महेंद्र, मस्त भरीत- भाकरी-खिचडीच्या जेवणावर छानच लागेल नं फिरणी... :)

    ReplyDelete
  22. impromptu ब्लॉग वर स्वागत व धन्यवाद!

    वा! आवडली नं सगळ्यांना... मग झाले तर. :)

    ReplyDelete
  23. श्रिया, ब्लॉगवर स्वागत आहे. :)

    बघितलीस करून की सांग गं... आवडेलच नक्की.:)

    अनेक धन्यवाद !

    ReplyDelete
  24. रोहनाचा डबल क्लेम. :):)

    तुमचा सगळ्यांचा है बरं का... :)

    ReplyDelete
  25. जब्बरदस्त दिसतंय हे प्रकरण! तोंडाला पाणी सुटलं!

    ReplyDelete
  26. आज काहीतरी गोड खायची इच्छा झाली म्हणून ही बनवली ग ... तुझ्यासारखी सजवली नव्हती, पण आमची गरीब फिरणीसुद्धा मस्त लागत होती! :)
    नवर्‍याला गोड अज्जिबात आवडत नाही. त्याच्या नावाने केलेलीसुद्धा मलाच चापायला मिळाणार या हिशोबाने केली होती, तर त्याने सगळी संपवून टाकली! ;) आता पुन्हा करायला हवी!

    ReplyDelete
  27. हाहा.. ! गरीब फिरणी.. उपमा मस्त ! :D:D

    चला नवर्‍यालाही आवडल्याने अधूनमधून तुला गोड खायची इच्छा झाल्यावर करता येईल. :):)

    बाकी सजावट हा दिखावाच, मुख्य गोष्ट उत्तम झाल्याची पावती मिळालीच नं तुला. :) धन्यू गं !

    ReplyDelete
  28. विद्याधर, मायदेशी भेट झाली असती तर तुला खिलवली असती नं मी. आता पुढल्यावेळी. :):)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !