जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, January 3, 2012

थोड्या कष्टाची तयारी - खुपसा पेशन्स आणि फक्त रुपये : एकशेपंचविस.....

रिक्षातून उतरून हातातल्या जड पिशव्या सांभाळत उकरून तथाकथित बुजवलेल्या रस्त्यावरची केविलवाणी ढेकळे आणि मुजोर खड्डे चुकवण्याची कसरत करत, तोल सांभाळत सोसायटीच्या गेटात शिरले. त्या दोन मिनिटात सगळी तीच तीच वाक्ये मनात उमटत गेलीच..... " या मेल्यांना एकाचवेळी खोदायला काय होते? काय टाकायच्या त्या लाइनी एकदाच टाका... पण नाही. अगदी जाणूनबुजून ठरवल्यासारखे एकमेकांना खो देत आळीपाळीने मनापासून रस्त्याला भगदाडे पाडत राहतील. बुजवताना मात्र कुणीकडून माती लोटून सुंबाल्या... तोही लगोलग ! कुत्री-मांजरी तरी चारवेळा माती टाकतील... पण यांना कशाचीच चाड नाही. त्यातून वरून दट्ट्या कधी याबाबतीत येतच नाही मग कशाला सामान्य जनतेची काळजी घ्यायची. कोणी पडू दे... लागू दे... हातपाय तुटू दे.... आपल्या बापाचे काय जातेय. तेच एखाद्याने चार पैसे दिले की त्याच्या दुकानासमोरचा भाग मात्र गुळगुळीत ! "

बरं तक्रार तरी कुठे आणि कितीवेळा करायची ? खोदणारे दहा जण.... सांगायला गेलं की लगेच टांगायला जातात. " मॅडम, अहो आम्हालाही काळजी आहेच की. आम्ही खोदतो तेव्हां अगदी नीट पूर्वीसारखा ( आँ... पूर्वीसारखा... ??? बॉस, म्हणजे पूर्वीइतकाच अडथळ्यांच्या शर्यतीसारखा म्हणताय होय...) करतो. आत्ता आम्ही खोदलेलाच नाही तर... पाणी नाहीतर टेलिफोनवाले असतील. कधी सुधारणार नाहीत. त्यांच्यामुळे आम्हाला फुकटचे ऐकायला लागते. " घ्या... म्हणजे तक्रार करायला गेलो की वर आणखी हे ऐकायचे. हा त्याच्यावर ढकलेल तो ह्याच्यावर ढकलेल... की पुन्हा खोदायला सगळे मोकळे आणि आपण तारेवरची आय मीन चावड्यांवरची कसरत करायला कायमचे तयार ! पण ' हा आजचा विषय ' नाहीये. डायरेक्ट मुद्द्यावर यायचं ठरवून बसले होते पण मन व त्याला तत्परेतेने साथ देणारी बोट ऐकतील तर नं... ती लगेच मोकाट सुटतात. जाऊ दे... असाही ब्लॉग आपलाच आणि तुम्हालाही सवय झालीये आताशा.... तरी सुद्धा ’ मोजक्या शब्दात मुद्दल ’ मांडायचा प्रयत्न अधुनमधुन करावाच म्हणतेय... झालंच तर त्यावरही ’ व्याजाची किंचित सूट " मिळून जाईलच की !

तर, स्वत:ला... पिशव्यांना... ढेकळांना सांभाळत व खड्ड्यांना चुकवत चवडा आणि चप्पल दोन्हींची काशी करत मी गेटमधून आत आले आणि जाधवकाकांची (चारसहा रखवालदारांपैकी एक) हाक आली. सरदेसाईमॅडम, जरा इकडे येता का? इतकी कटकट झाली होती की जाधवकाकांची हाक ऐकल्यावर कपाळावर एक बारीकशी आठी उमटलीच. कधी एकदा घरी जाऊन मस्तपैकी आलं-गवतीचहा-वेलदोड्याचा वाफाळता चहा घेते असं झालं होतं. पण ज्या अर्थी थांबवून ते बोलावत आहेत त्याअर्थी काहीतरी तसंच असेल म्हणून त्यांच्या केबिनमध्ये गेले.

हातातली १५-२० विजेची बिलं माझ्यासमोर धरत ते म्हणाले, " यातले तुमचे जे असेल ते घेऊन जा. " " काका नंबर असेल पाहा लिहिलेला डाव्या कोपर्‍यात आमच्या फ्लॅटचा... द्या नं काढून, मी घेऊन जाते. " " तो नंबर असता तर मीच तुमच्या पोस्टाच्या पेटीत टाकले असते नं नेहमीसारखे. सध्या सोसायटीचा क्लार्क नाहीये म्हणून सगळा घोळ झालाय. " आता मला काय आमचा ग्राहक क्रमांक पाठ थोडाच आहे की मी लगेच बिल शोधून घ्यायला. उद्या आधीचे बिल घेऊन येईन म्हणजे ग्राक्र जुळवून यातले घेऊन जाईन असे त्यांना सांगून मी एकदाची घरी गेले. जरा स्थिरस्थावर झाल्यावर आधीचे बिल शोधून ग्राहक क्रमांक सेलच्या नोटपॅडमध्ये महत्त्वाच्या यादीत टायपून टाकला.

तो टायपत असतानाच मालकाच्या नावाकडे नजर गेली. आता फ्लॅट माझा म्हणजे माझे किंवा नवर्‍याचे नाव हवे. पण सोसायटी बांधली त्या दिवसापासून आमच्या बिल्डरचे नाव फेविकॉलच्या जोडसारखे जे जुडलेय ते आजतागायत. कधी हा जोड तुटणार कोण जाणे. बिल्डर काही आमच्या नावावर करून देत नाही.... एमएसईबीत त्याने भरलेले डिपॉझिट त्याला परत हवे आहे.... आणि सोसायटीच्या ठरावानुसार बिल्डरने आधी हे सांगितलेले नव्हते तेव्हां पैसे का म्हणून द्यायचे ? परिणामी, हे घोंगडे असेच वर्षोनवर्षे भिजत पडलेय. बिल्डर म्हणतो मरा तिकडे... लोकं म्हणतात आम्हाला काय फरक पडतोय. फ्लॅट आमच्या नावावर आहे... अनेक ब्लॉक असेच विकले गेले... नवीन लोकं आले... पुन्हा ते विकून गेले. थोडक्यात काय कोणाचे काही थांबलेले नाही. तरीही केव्हांतरी हा प्रश्न धसास लागणे गरजेचे आहेच. एक हताश सुस्कारा सोडून खड्ड्यांप्रमाणे हाही विषय मी मिटला.

दुसर्‍या दिवशी सकाळीच बिल घ्यायला गेले असता सोसायटीतल्याच राऊतआजोबांनी हाकारले. कधी आलीस- शोमू -शोमूचे बाबाही आलेत का? कसे आहेत दोघे? वगैरे प्रश्न झाल्यावर माझ्या हातातले बिल घेत ते म्हणाले, " अजून तुझे नाव नाहीच का यावर ? " मी बुचकळ्यांत.... म्हणजे यांच्या बिलावर यांचे नाव येते की काय? (मनात ) " आजोबा कधी हा तिढा सुटायचा आता ?" " बहुतेक तुला कळले नसणार... अगं, हा तिढा कधीच सुटलाय. २००८ सालीच बिलं आपापल्या नावावर झालीत. मीच आपल्या सोसायटीच्या जवळपास १०० लोकांचे काम करून दिलेय. ( ह्म्म... नेमके अशावेळी आम्ही गायब.... ) आता तू आलीच आहेस तर टाक करून." असे म्हणून ते गेले.

आमचे संभाषण ऐकत अजून एकजण उभे होते. राउतआजोबा गेल्यावर ते म्हणे की अगं तू कुठे खेटे मारत बसणार बोर्डाच्या ऑफिसात, त्यापेक्षा एजंटला देऊन टाक. तो देईल आठ दिवसात तुला आणून. मला हे एजंट प्रकरण अजिबात मानवत नाही. आजवर मी कधीच कुठल्याही कामाकरिता यांच्या वाटेला गेलेली नाही. अगदी डोमिसाईलपासून सगळे स्वत:च केलेय. तरी म्हटंले विचारूया एजंट किती पैसे घेईल ते. कळाले की साधारण अडीच ते तीन हजाराच्या आसपास घेईल. शिवाय बिल्डरची सही मलाच आणावी लागेल आणि सोसायटीचे नाहरकत प्रमाणपत्रही मलाच घ्यावे लागेल. मला कळेना की मुळात इतके पैसे कशाला लागणार आहेत? इलेक्ट्रिक बिल आपल्या नावावर करण्यासाठी बोर्ड किती चार्ज लावते? फॉर्मला पैसे पडतात का? स्टॅंपपेपर चे काय... हे काहीच माहीत नसल्यामुळे तो सांगतो ते पैसे मुकाट द्यायचे किंवा आपण स्वत: बोर्डाचे ऑफिस गाठायचे.

एरवी अश्या कामात आपण हमखास चालढकल करतोच. आणि मला तर सबळ कारणही होते. एकतर घराचे काम काढलेले त्यामुळे ठाण्यात राहता येत नव्हते शिवाय दातांनी माझा जीव कडकड चावलेला... या दोन्ही आघाड्यांवर लढून लढून मी आधीच अर्धमेली झाले होते. तरीही संचारल्यासारखे मी तिथूनच ठाण्याचे एमएसईबीचे ऑफिस गाठले. आधी कधीच मी तिथे न गेल्याने रिक्षावाला आपल्याला घुमवतो आहे की काय.... म्हणून मधूनच त्याला अरे पासपोर्ट ऑफिसच्या शेजारी आहे नं... हा तेच सांगत होते. ( पासपोर्ट ऑफिसही पाहिलेले नव्हतेच तरीही उगाच... ) त्याने अगदी नीट गेटात नेऊन सोडले.

आत शिरतानाच एकदम छान वाटले. गावी आल्याचा भास व्हावा अशी मस्त झाडी... पारही आहे. थंडावाही जाणवतो. गेटपासून बाहेर अक्षरश: पन्नास पावलांवर प्रचंड गोंगाट, प्रदूषण आणि आत प्रसन्न शांतता. आश्चर्य म्हणजे वर्दळही नव्हती अजिबात. ऑफिसच्या आत असेल सावळागोंधळ असे मनाशी म्हणत मी आत शिरले तर आतही बाहेरची शांतता अजिबात ढवळली जाणार नाही इतकी शांतता. झरझर सगळ्या खिडक्यांवरून नजर फिरली. सगळी डोकी खाली मान घालून कामे करत होती. चटकन वाटून गेले की आपले काम होणार नक्की. तोच सकारात्मक भाव मनात घेऊन चौकशीकडे सरकले. मला काय हवे आहे हे सांगताच चौकशीने तत्परतेने एक चार कागदांचा स्टेपल केलेला गठ्ठा दिला. त्यावर काय कुठे भरावयाचे आहे व सोबत काय जोडावे लागेल हे सांगून अजून एक जादा सेटही आपणहून दिला. मी सगळे नीट पुन्हा एकदा समजावून घेऊन तिचे आभार मानून घर गाठले.

सोबत दिलेला फॉर्म संपूर्ण व बिनचूक भरणे. व
१. आपल्या खरेदीखताच्या बाडातल्या काही पानांची झेरॉक्स सोबत जोडणे.
२. सोसायटीचे नाहरकत प्रमाणपत्र.
३. रु. १०० च्या स्टॅंपपेपरवर अमुक अमुक टायपून नोटराईज्ड करून घेणे.
४. एमएसईबीने दिलेल्या चार पानी फॉर्मवर काही रकाने भरून बिल्डरची सही घेणे.
५. शेवटच्या विजेच्या भरलेल्या बिलाची झेरॉक्स.
६. ब्लॉक माझाच आहे हे साबीत करणारा कुठलाही एक कागद.... फोन बील, रेशन कार्ड, पॅनकार्ड इत्यादीची झेरॉक्स.

मी साडेसतरा वर्षे सरकारी नोकरी केलेली आहे. एकदा का तुम्ही न चिडचिडता ( सरकारी नियमांवर व कागदांवर ) जे काही मागितलेले असेल त्यांची पूर्तता केली तर काम सहसा अडत नाही. त्यातून मी स्वत: सरकारी नोकर पडल्याने संयमाने व चटचट कामे उरकायला घेतली. या सगळ्याची पूर्तता करून ( धावपळ + कधीमधी चिडचिडही झाली हे करताना.... ) चार दिवसांनी सकाळी सकाळी बोर्डाचे ऑफिस गाठले. आज मात्र गर्दी होती. महिन्याचा पहिला आठवडा होता तो. चौकशी चारी बाजूने घेरलेली. आत शिरल्या शिरल्या समोरच चार खिडक्या आहेत. प्रत्येकीवर काय काम येथे होते हेही लिहिलेले आहे. तरीही थोडासा गोंधळ होताच. तेवढा चालायचाच की. खिडकी नं ३ ने माझे बाड घेतले. तपासले. संगणकावर काही रकाने टंकले, प्रिंटरवर कार्बनसकट तीन कागद चढवले... करकर करत मिनिटभरात त्यावर काळे उमटून त्यातला एक कागद माझ्या हातात पडला. रजिस्टर मध्ये माझी सही घेऊन ती उद्गारली, " वीस दिवसांनी घरी फोन येईल. तो आला की रहेजा ला जाऊन रु. २५ किंवा ५० ( फोनवर यातली जी रक्कम सांगतील ती ) भरा आणि तिथेच त्या पावतीची झेरॉक्स देऊन टाका की पुढल्या महिन्याचे बिल तुमच्या नावावर येईल. नेक्स्ट.... "

मी स्तब्ध ! झाले ?? इतकेच ? फक्त इतकेच करायचे होते तर मग एजंट अडीच तीन हजार कशासाठी मागत होता... हा पहिला प्रश्न आला. पुन्हा विचार केला आधी ही काय म्हणतेय तसे होऊ तर दे. वीस दिवसांनी फोन येणार होता.... पण माझे घरच खाली आलेले.... फोन येणार कसा? म्हणून पावती घेऊन पुन्हा बोर्डाचे ऑफिस गाठले असता माझे काम झालेले होते. तिने रु. २५ रहेजाला जाऊन भरण्या करिताची दुसरी पावती हाती दिली. लगेच रहेजा गाठले. इथे मात्र थोडी कटकट झाली. या खिडकीवरचा बाबा फारच खडूस-किरकिरा होता. कदाचित त्याचा ' तो ' दिवस वाईट होता आणि नेमकी मी त्यादिवशी तडमडलेली. त्याचे खेकसणे मी हसून साजरे करून माझ्या आनंदावर अज्याबात विरजण पडू दिले नाही. पैसे भरून झेरॉक्स काढून पावती तिथेच दुसर्‍या मजल्यावरील योग्य त्या टेबलावर देऊन टाकली. काम फत्ते ! डिसेंबरचे बिल आस्मादिकांच्या नावावर हजर !!

एकंदरीत या सगळ्याला लागलेला वेळ : दोन महिने.
बोर्डाच्या ऑफिसात खेपा तिनवेळा.
एकूण खर्च : रु. १०० ( स्टॅंपपेपर )+ रु. २५ बोर्डाची फी = रु. १२५ /-
इतर कारणिक खर्च :रु.२१५ रिक्षा (कोर्ट+बोर्डाचे ऑफिस तीन वेळा+ बिल्डरचे ऑफिस दोनदा + रहेजा ) रु.१५ झेरॉक्स = रु. २३० /-.
बचत : रु. २,१४५ /-

हुर्रेर्रे... !!!

30 comments:

  1. हुर्रे......मस्त ग...असं काही वाचलं की छान वाटत...आणि तू लिहिलंस ते वाचताना मला मीच तुझ्याबरोबर ठाण्याला फिरतेय असं वाटत होतं इतक जिवंत....
    चला आता राहिलेल्या पैशाची पार्टी करायला इकडे ये...:D

    ReplyDelete
  2. मस्त ! एकदम झकास ! :) :)
    बाब गंभीर होती..पण संयमाने किती छान सोडवलीस तू ! आणि बरं झालं इथे त्याबद्दल लिहिलंस ते ! कारण हे वाचून वाचकाला देखील एक बळच मिळतं ! आपला लढा लढायला...! हो ना ?! :)

    ReplyDelete
  3. मस्तच :)

    मला मागच्या आठवड्यात आयकर विभागाचे पत्र आले होते , २७००० tax भरायचा राहिला आहे म्हणून :(

    मी ITR चुकीचा भरला होता.
    सगळे म्हणत होते CA कडे जा आणि करून घे. आयकर ऑफिस मध्ये पैसे द्यावे लागतील, चकरा माराव्या लागतील, असेच सगळ्यांचे म्हणणे होते.

    पण मी ठरवले जे होईल ते होईल सगळे स्वतःच करायचे. माझे काम फक्त ५ मिनिटात झाले. काही कागदपत्रे जोडून एक पत्र पाठवायला सांगितले बस :)

    ReplyDelete
  4. बयो अगं मलाही मंडळाच्या कामाचा असाच सुखद अनूभव आला होता, वर्षभराचे बिल भरायला गेले होते तेव्हा!!! व्यवस्थित दिलेली माहिती , आणि चटकन पाच मिनिटात झालेले काम पहाता आपण चुकलोय किंवा काम तरी चुकीचे झालेय असे वाटत होते सारखे :)

    मस्त मस्त वाटतं अशी पोस्ट पाहिली की!!!

    ReplyDelete
  5. पैशांची बचत आणि एक चांगला अनुभव गाठीशी पण. बोर्डात कोणी ओळखीचे असेल कोणा वाचकांच्या तर त्यांनी आवर्जून ही लिंक त्यांना द्यावी. बिचारे नेहमी शिव्या खातात (त्या योग्यच असतात त्या अनुभवांमुळे ) .. पण आता कौतुकाचे दोन शब्दही त्यांच्या पदरी पडू देत :-)

    ReplyDelete
  6. मलादेखील अडवणुकीचा अनुभव नाही. कागदपत्रे कशासाठी पहिजेत हे समजून घेतल्यावर पर्यायी व्यवस्था करता येते.

    ReplyDelete
  7. माझ्याचाच एका एजंट मित्राने अशाच एका कामाकरता चांगलीच फोडणी दिली
    आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणून काही बोललो नाही पण आता मात्र कानाला खडा लावला आहे किती उशीर झाला आपल्याकडून किंवा सरकारी कार्यालयातून तरी हि काम आपणच करायची..
    खूप छान आहे लेख ..

    ReplyDelete
  8. हा हा... येतेच आता लवकर तुझ्याकडे अपर्णा. :) तुझा लगेच आलेला अभिप्राय भावून गेला गं ! :):)

    ReplyDelete
  9. नक्कीच !अगं ही अशी कामं जितक्या लवकर होतील तितकी बरी नं. आणि खरं तर हे वाटतं तितकं अवघड नसतंच पण आपण आधीच कटकट होईलच अशी धारणा करून घेतो आणि मग प्रयत्नही करत नाही... :(

    ReplyDelete
  10. बंड्या, बरं केलेस तू स्वत:च गेलास. सरळ मार्गाने व चटदिशी होणार्‍या कामाला निष्कारण वेळ लागला असता आणि तुला नक्की तिथे काय सुरू आहे ते प्रत्यक्ष न कळल्यामुळे कटकट होत राहीली असती. आता कसे.... एकदा का नेमके कागद दिले की काम सोपे झाले. :):)

    धन्यू रे !

    ReplyDelete
  11. तन्वे, अगं इतक्या चटदिशी कामे होण्याची सवय नसते ना मग उगाच शंका कुशंका... :D:D

    अगं आणि सरकारी नोकर कामसू असतातच... :) कधीमधी एखादा कटकट्या निघायचाच. :D:D

    ReplyDelete
  12. सविता, अगदी माझ्याही हेच मनात आलेले. मंडळाची लोकं कामं करतात आणि हसून करतात. मेहेरबानी म्हणून नाही... :):)

    अर्थात एखाद्याचा अगदी उलटा अनुभव असेलही. व्यक्तीव्यक्तीवर अवलंबून आहे ते शेवटी.

    ReplyDelete
  13. धन्यवाद अनामिक !

    ReplyDelete
  14. ह्म्म्म.. :(:(

    यशवंत वाईट वाटते नं असे झाले की. त्यातून ओळखीच्या माणसाकडून झाले की अजूनच. पण जाऊ द्या... पुढल्यावेळी आपला लढा आपणच लढायचा. :)

    धन्यवाद !

    ReplyDelete
  15. ram ram....happy new year. kothe patta hota tumcha...akdam gayab. diwali zali tari patta nahi. kothe gayab zala hota. kiti wat pahili tumchya postchi....tumchya pratikriyanchi....ase naka gayab hot jawu......punha akda happy new year.

    ReplyDelete
  16. वॉव.. झकास.... "सरकारी काम आणि सहा महिने थांब" हा वाक्प्रचार बदलतोय म्हणायचा :))

    ReplyDelete
  17. खरंच हुरूप आला हा लेख वाचून! आभार भानस! खरंच आभार!! आता एजंटला ढुंकून ही बघणार नाहीत तुझे वाचक :)

    @ ANAGHA +1

    ReplyDelete
  18. योग्य निर्णय, अभि! :)

    ReplyDelete
  19. हाहाह! मस्तच लेख !
    मी सुद्धा माझी बहुतेक सरकारी कामं स्वःताच केलीत. अगदी बरोबर आहे ताई पेशन्स भरपूर लागतात आणि ते जर असतिल तर मग बचतच बचत !
    आतापर्यंत मला भेटलेले सगळे सरकारी ऑफीसर कारकुन जरा चांगलेच होते.
    एकदा मी अशाच एका कारकूनाबरोबर नडलो कारण खूप वेळ काढत होता, तर पठ्ठ्याने मला बाहेरुन १ रु. चा रेव्हेन्यु स्टँप आणायला सांगितले, मी सुद्धा मोठ्या तोर्‍यात बाहेर गेलो. फिरफिर फिरलो कुठेच सापडले नाहीत.
    नंतर लक्ष्यात आलं की त्यावेळी तेलगी प्रकरणामुळे बाहेर कुठेही स्टँप विकायला बंदी होती. मग काय आलो आणि धरले त्याचे पाय. ;)

    ReplyDelete
  20. प्रसाद, नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !

    आणि माफी !माफी !!

    अरे काहितरी सारखे सुरूच राहीले त्यामुळे... :( मी ही तुझ्या पोस्ट आणि मुख्यत्वे दिवाळी अंक मिस केलाय. आता एक एक करुन वाचतेय. :)

    माझी आवर्जून आठवण काढलीस... खूप बरं वाटलं. :)

    ReplyDelete
  21. हेरंब, सगळेच थांबे नसतात... :D:D.

    ReplyDelete
  22. श्रीराज धन्यू रे ! चांगले अनुभव हुरुप वाढवतात. :)

    ReplyDelete
  23. हा हा... ! दीपक, तेलगी प्रकरणाचे पडसाद असेही उमटले तर.. :D:D

    धन्सं !

    ReplyDelete
  24. vvaa !!! shaabbas... mi pan passport fakta 1000 Rs madhye ghetala (fee) ... No agents please cha board lavun sarakari office madhye shirav ka, ashi parish\thiti aahe sadhya :)

    ReplyDelete
    Replies
    1. हो नं! अरे हे एजंट ना उगाच आपल्याला घाबरवून सोडतात. आणि आपण नेमकी चौकशी केलेली नसल्यामुळे ते जे सांगतील ते खरे वाटून भयभीत होतो आणि त्यांचे फावते.

      धन्यवाद विजय! :)

      Delete
  25. विजय, ब्लॉगवर मन:पूर्वक स्वागत व धन्यवाद !

    अचूक कागदपत्रे सादर केली तर सहसा कोणाच्या मदतीची गरजच पडत नाही. :)

    ReplyDelete
  26. masta blog ahe.
    Kedar

    tuljabhavani.in[majha blog]

    ReplyDelete
    Replies
    1. केदार, ब्लॉगवर स्वागत व अभिप्रायाबद्दल आभार! :)

      Delete
  27. नेहमी पाहिलंय मी.. स्वतःहून थोडेसे कष्ट घेतले आणि थोडं डोकं लावलं, तर बिन एजंट व्यवस्थित कामं होतात.. :)

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी अगदी! :) धन्सं रे!

      Delete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !