जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, February 12, 2012

कांद्याचे फूल...

आठवतेय तेव्हापासून निरनिराळी झाडं लावतेय. लहान असताना डालडाच्या डब्यात गुलाबाची रोपे, गावठी गुलाबावर विलायती गुलाबाचे रोपण, कलम बांधायचे, डोळे भरायचे. पाचवी ते नववी गुलाबांचे जबर वेड लागलेले मला. सुंदर सुंदर रंगांचे टपोरे गुलाब माझ्या कुंडीत कसे फुलतील यामागेच मी लागलेली. आजोळी गेले की हे वेड बरेचसे पूर्ण होई. तिथे बंगल्याच्या आवारात अनेक प्रकारचे गुलाब मी लावलेले. मी नसताना माळी काळजी घेई. हळूहळू गुलाबावरून गाडी पांढर्‍या सुवासिक फुलांकडे वळली. मोगरा, जाई-जुई, सायली, चमेली, रातराणी, सोनचाफा, अनंत, पारिजात, तगर फुलांनी बाजी मारली. शिवाय अबोली, अनेक रंगांची गुलबक्षी, जास्वंदीही सोबतीला होतीच. पण ही सगळी गॅलरीत असलेल्या फ्लॉवरबेडमधे असायची.

स्वयंपाक घराच्या खिडकीत हाताशी असावी म्हणून कडीपत्ता, मधून मधून धणे पेरणे, मिरच्या, ओवा यांनी जम बसवला. सोबतीला लसूण, कांदाही अधुनमधुन पाहुणे बनून येत. कांदा, लसणीला डालकीत पात फुटली की मातीत रुजवायचा मोह आवरत नाहीच. आपल्या कुंडीत लावलेली लसणीची ओली पात इतकी सुंदर लागते म्हणून सांगू. ओव्याची भजी खाण्याचा कार्यक्रम महिन्यातून एकदा होत असेच. ओव्याची पाने किंचित फुगीर व खरखरीत असतात. या पानांची भजी अप्रतिम लागतात. अहाहा! नुसत्या आठवणीनेही तोंडाला पाणी सुटलेय.

कांदा म्हटला की प्रथम आठवतात त्या डोळ्याला लागणार्‍या धारा। डोळ्यातून पाणी काढणारा कांदा. लेक तर दुसर्‍या खोलीत असला तरी ओरडतो, " आई, डोळे चुरचुरतात. " भजी करू का असे विचारले की लगेच जोरात ’ हो ’ येते. तेव्हा आईचे डोळे वाहिले तरी चालतात. जिभेपुढे कोणाचे काही चालत नाहीच. खेकडा भजीचा कांदा, कांदेनवमीची धमाल. पीठ पेरून केलेली कांद्याची भाजी. आपले अनेक पदार्थ कांद्याशिवाय होतच नाहीत.

लहानपणी अचानक ठसका लागला की, " अगं वर बघ, वर बघ " असे आजी सांगे आणि म्हणे, " ती बघ तुझी सासू कांदे खाई " कोणी जरा अतीच करत असेल तर लगेच ऐकू येते, " नाकाने कांदे सोलू नकोस.. " किंवा " हा बघ अकलेचा कांदा बोलला... " कोणी कुचकटपणा केला की, " कुजका कांदा कुठला.. " हल्लीच भाव गगनाला भिडल्याने चिरताना डोळ्यांना नाही तर खिशाला रडे आणणारा कांदा. शंकर पाटील यांचे " कथा अकलेच्या कांद्याची " हे वगनाट्यही खूप गाजले होते. कांद्याची महती सांगावी तितकी थोडीच आहे.

हल्लीच आईने अश्याच लावलेल्या कांद्याच्या पातीवर अतिशय सुंदर फुल उमलले. इवलेसे ते फूल इतके गोंडस होते. कांद्याची शेती मी पाहिली आहे. पण मी गेले असताना एकदा कांदे काढणी सुरू होती तर एकदा पात डोलत होती. फूल आधी कधीच पाहिले नव्हते. फूल पाहिल्याचा आनंद तेही आपण स्वत: लावलेल्या कांद्याला आलेले पाहून द्विगुणित झाला. वेबकॅमवरुन त्याला पाहिले. त्याचे कौतुक, लाड झाले. बाबांनी त्याला कॅमेर्‍यातही बंदिस्त केले आणि लगेच ते फोटो मला धाडले. प्रत्यक्ष नाही तरी वेबकॅमवरुन का होईना ते गोजिरे फूल पाहिले. तुम्हीही पाहा...


किती इवलेसे आहे नं...

मेथीच्या दाण्याएवढ्या छोटुकल्या कळ्या आहेत या...

देवाने किती मनापासून निर्मिली आहे नं सृष्टी...

31 comments:

 1. अहाहा... कसले गोड दिसतेय गं ताई ते फुल :)

  बाकि ’फक्त ’ फुलाच्या पोस्टमधे किती पदार्थांची नावं सुबकपणे पेरलीयेस..... :) ... कांद्याची खेकडा भजी, आणि ओव्याच्या पानांची भजी ... निषेध!!!

  ’बाबांनी फोटो पाठवले ’ या वाक्यामूळे मला काका आणि त्यांचा कॅमेरा आठवला.... किती हौस आहे त्यांना फोटो काढण्याची .... गौराक्का कशी लाड करून घेते आणि एकेक फोटोसाठी :)... इशान शहाणा आहे तुझा हे वाक्य त्या दोघांकडून ऐकायला इशानूला कसं मस्त वाटतं आणि :)

  ReplyDelete
 2. खूप सुंदर फूल. मीही कधी नव्हते पाहिले! त्याला वास येतो का कांद्या सारखा? तुझं वाक्य देखिल फार आवडलं....खरंच किती मनापासून सृष्टी निर्माण करतो देव!

  अश्विनी

  ReplyDelete
 3. खूपच सुरेख :)

  इथे बंगलोरमध्ये कांद्याची फुले विकायला असतात हल्ली मार्केटमध्ये...

  ReplyDelete
 4. सुंदर गं ! तुमच्यामुळे ही कायकाय वेगळीच फुलं बघायला मिळतात ! गेल्यावेळी गौरीने आल्याच्या फुलाचा फोटो टाकला होता ! आठवतं ? :) :)

  ReplyDelete
 5. हो गं, बाबांना आणि आमच्या माताहरीला हौस भारी. आईचे तर सारखे काहितरी सुरूच असते. गौरा,इशानची आठवण निघतच असते वारंवार. :)

  ReplyDelete
 6. माधुरी, अगं आईने उत्साहाने अजून दोन तीन कांदे खोवलेत. पाहुया जास्त फुले येतात का.. :)

  ReplyDelete
 7. अश्विनी, येतो गं.त्याला कांद्याचाच वास येतो. अति उग्र नव्हता असे आई म्हणाली. अर्थात ते इवलेसे एकच होते नं... मळा असेल तिथे आसमंतात नुसता कांद्याचाच वास असेल.

  धन्सं!

  ReplyDelete
 8. सुप्रिया, कांद्याची फुले विकायला.. पण मग त्याचे काय करतात? म्हणजे भाजी वगैरे करतात का?

  ReplyDelete
 9. हो तर, आठवतेय नं! निसर्गाची किमया न्यारीच बघ! अनघा, अगं माझ्या जर्द पिवळ्या जास्वंदीला थंडीत चक्क केशरी रंगाची फुले येतात. आहे नं गंमत..

  ReplyDelete
 10. कांद्याचं फुल?? 'पत्थर के फुल' सारखं वाटतंय ऐकायला ;)

  >>
  बाकि ’फक्त ’ फुलाच्या पोस्टमधे किती पदार्थांची नावं सुबकपणे पेरलीयेस..... :) ... कांद्याची खेकडा भजी, आणि ओव्याच्या पानांची भजी ... निषेध!!!

  +११२२३३४४

  ReplyDelete
 11. मी नव्हते पाहिले कधी हे फूल... :) मस्तय.. :)

  आणि मी नाही करणार निषेध... :) माझ्यावर ओवाळून टाकते ती कुठलाही पदार्थ केला की... ;)

  ReplyDelete
 12. 20/21 varshaanpoorvi aamhi Chandigadhlaa gelo hoto na Sarmilacya lagnala tevha tithe Vasantimavashikade kandyache ek shetch hote. tevha hi phule pahili hoti. tya phulana kandyachach vaas yeto. phulala kandyacha vaas baghun gammat vatali hoti. vaas jara soumya asato.

  ReplyDelete
 13. ताई,मला पण हाच प्रश्न पडला होता कि,कांद्याच्या फुलाच काय करत असतील?
  माझ्या ऑफिसच्या मैत्रिणीला विचारलं....ती सांगत होती कि आपण जशी दह्याची कढी बनवतो तशीच कढी बनवतात आणि कांद्याची फुले देठासकट कापून उकळी येण्यापूर्वी टाकतात...त्याला "हस्सीभाजी" म्हणतात (हस्सी म्हणजे "फ्रेश")....

  ReplyDelete
 14. 'देवाने किती मनापासून निर्मिली आहे नं सृष्टी...'
  अगदी खरं. खूप छान पोस्ट आणि कांद्याचं फूल सुद्धा!

  ReplyDelete
 15. मला मी पहिल्यांदा पाहिलेली कांद्याची फुलं आठवली :-)

  ReplyDelete
 16. हेरंब, पत्थराची फुलेही भारी सुंदर असतात रे! केव्हांतरी तेही फोटू टाकायला हवेत.:)

  मला सारखी ओव्याच्या भजीची आठवण येतेय.. आईची आठवण येतेय..!!

  ReplyDelete
 17. रोहन आहे नं सुंदर !

  चला आता ओवाळून टाकायची तयारी करायला घेते. :D:D

  ReplyDelete
 18. ओह्ह! वासंतीमावशीकडे गेला असताना नं.. हो. आईही म्हणाली की वास मवाळ आहे. कांद्याइतका उग्र नाही.

  धन्यवाद आई!

  ReplyDelete
 19. ओह्ह! असं आहे का. कांद्याच्या फुलांची कढी.. केव्हांतरी कुंडीत जास्ती फुले फुलली की करून पाहायला हवी. :)

  धन्यू गं!

  ReplyDelete
 20. मेघना, आभार्स गं! इवलेसे.. सुंदर!

  श्रीराज, सविता, धन्यवाद! :)

  ReplyDelete
 21. मी नव्हते पाहिले कधी हे फूल....खूप खूप सुंदर...

  ReplyDelete
 22. कांद्याचं फूल बरेचदा पाहलंय या पूर्वी पम तुझे डोळे अन मन यांनी काय चमत्कार घडवलाय .

  ReplyDelete
 23. किती गोड दिसतेय नं अपर्णा कांद्याचे फूल.. :)

  धन्सं गं !

  ReplyDelete
 24. आशाताई खूप खूप धन्यू! :) आता हे इवलेसे मोहक फूल प्रत्यक्ष कधी पाहायचा योग येतोय कोण जाणे. सध्या मी इथे कुंडीत लावलेय. :)

  ReplyDelete
 25. khup sundar disatay he fool..me kadhi pahile navhate ..

  ReplyDelete
 26. While checking recipe for 'sabudana khichadi' I got on to your blog, and then spent full two hours on it. Loved it! Will keep reading again and again. Thanks.

  ReplyDelete
 27. उमा धन्यू गं! :)

  ReplyDelete
 28. सतीश, माझ्या ब्लॉगवर आपले मन:पूर्वक स्वागत आहे. :)
  असं कोणी आवर्जून, मनापासून कळवले नं की खूप आनंद होतो. लिहायची उर्मी पुन्हा बळावते... जोर धरु लागते.

  आपले अनेक आभार. आशा आहे आपल्याला लिखाण आवडेल.

  ReplyDelete
 29. मी कधीच पाहिलं नव्हतं कांद्याचं फूल.. सृष्टीचं क्रियेशन जबरदस्त आहे!

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !